वेंट, फ्रिडरिक ऑगस्ट फर्दिनांद ख्रिस्तिअन : (१८ जून १८६२-२४ जुलै १९३५). डच वनस्पतिवैज्ञानिक. त्यांनी वनस्पतींमधील हॉर्मोनांच्या (उत्तेजक स्रावांच्या) अध्ययनास चालना दिली. वेंट यांचा जन्म ॲम्स्टरडॅम येथे झाला व त्यांचे शिक्षण ॲम्स्टरडॅम विद्यापीठात ह्यूगो द व्ह्रीस यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. १८८६ साली त्यांनी पीएच्.डी. पदवी संपादन केली. त्यांनी वनस्पतींतील रिक्तिकांवरील [पटलाने बंदिस्त असलेल्या कोशिकांतील मोकळ्या जागांवरील → कोशिका] आपल्या पीएच्.डी. च्या प्रबंधाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या मते पूर्वी अस्तित्वात असलेल्या रिक्तिकांपासून नव्या रिक्तिका तयार होतात. जावामधील कागोक येथे ऊस संशोधन केंद्राचे संचालक असताना (१८९१-९६) सेरे या उसावरील व्हायरसजन्य रोगावर त्यांनी संशोधन केले व उसाचे पीक वाचविण्यात यश मिळविले. त्यांनी उसाच्या शरीरक्रियाविज्ञानावरही संशोधन केले. ⇨प्रकाशसंश्लेषणामध्ये सुक्रोज प्रथम तयार होते असे त्यांनी दाखवून दिले आणि पानांतील व उसातील साखरेचे प्रमाण निश्चित केले. त्यावरुन त्यांनी शेतातील उसाची पक्वता ठरविण्याची पध्दती बसविली. ही पध्दती अद्यापही वापरात आहे.
जमदाडे, ज. वि.