वेंकटाचार्य, बी. : (? –१८४५–२६ जून १९१४). कन्नड लेखक व अनुवादक. पूर्ण नाव बिंडिगनवले वेंकटाचार्य. त्यांचा जन्म कोईमतूर जिल्यातील कोल्लेगाल येथे झाला. त्यांचे वडील गरुडाचार्य यांनी त्यांना संस्कृतचे उत्तम शिक्षण दिले. त्यांचे इंग्रजी शिक्षण तुमकूर (कर्नाटक) येथे झाले. त्यानंतर १८७४ पासून निवृत्तीपर्यंत त्यांनी सरकारी खात्यात प्रमुख मुनशी, शिरस्तेदार, न्यायाधीश अशा विविध पदांवर कामे केली. तमीळ ही त्यांची मातृभाषा होती. प्रारंभी त्यांनी तमिळ व इंग्रजी ग्रंथांचा कन्नड अनुवाद केला. पुढे त्यांच्या एका नातेवाईकामुळे ते बंगाली शिकले. ⇨ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबरोबर त्यांनी बंगालीत पत्रव्यवहार केला. ईश्वरचंद्रांच्या भ्रांतिविलास (१८६९) या साहित्यकृतीचा (शेक्सपिसरच्या द कॉमेडी ऑफ एरर्सचे स्वैर गद्य रुपांतर) त्यांनी कन्नड अनुवाद केला व त्याचा मद्रास विद्यापीठाने अभ्यासक्रमात समावेश केला. त्यानंतर वेंकटाचार्यांनी ईश्वरचंद्रांच्या सीतार वनवास (१८६०) व शकुंतला उपाख्यान (१८५४) या कादंबऱ्यांचेही कन्नड अनुवाद केले. याच काळात बंगालमध्ये ⇨बंकिमचंद्र चतर्जींचे नाव कादंबरीकार म्हणून गाजत होते. बंकिमचंद्रांच्या दुर्गेशनंदिनीचा (१८६५) त्यांनी १८८५ साली कन्नड अनुवाद प्रसिद्ध केला. त्यानंतर वेंकटाचार्यांनी बंकिमचंद्रांच्या विषवृक्ष (१८७३), इंदिरा (१८९७), कपालकुंडला (१८९८), देवी चौधुराणी (१८९९), आनंदमठ (१८९९), युगळांगुरीय, सीताराम (१९०१), कृष्णकांतेर विल (१९०९) इ. प्रसिद्ध कादंबऱ्यांचेही कन्नड अनुवाद केले. बंकिमचंद्रांच्या लोकरहस्य (१८९८) या प्रबंधाच्या त्यांनी केलेल्या कन्नड अनुवादापासून कन्नड साहित्यातील निबंध वांड्मयाची सुरुवात झाली. अरेबियन नाइट्सचा अनुवाद त्यांनी यवनयामिनीविनोद या नावाने केला. वेंकटाचार्यांनी एकूण पंचाहत्तर ग्रंथ लिहिले. त्यांत साठपेक्षा अधिक कथा-कादंबऱ्याच आहेत. त्यांच्या उल्लेखनीय वांड्मयात अमृतपुलीन (१९०७), अडविय हुडुगी (१९१६) आदींचा अंतर्भाव होतो. १९०६-०७ मध्ये त्यांनी अवकाश तोषिणी मासिकाचे संपादन केले. ⇨गळगनाथांनी मराठी व वेंकटाचार्यांनी बंगाली कादंबऱ्यांचे अनुवाद करुन आधुनिक कन्नड साहित्याचा पाया घातला.
बेंद्रे, वा. द.