सीतारामय्या, व्यंकटरामय्या : (२ ऑक्टोबर १८९९ – १९८३). प्रसिद्घ कन्नड कवी, टीकाकार व निबंधकार. ‘व्ही. सी.’ या टोपण नावाने विशेष परिचित. जन्म बूदिगेरे (ता. देवनहळ्ळी, जि. बेंगळूर ) येथे. अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय घेऊन म्हैसूर विद्यापीठातून ते एम्.ए. झाले (१९२२). त्या आधी १९२० मध्ये त्यांना अर्थशास्त्र विषयातील सर शेषाद्री सुवर्णपदक मिळाले होते. महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच त्यांनी शारदा विलास माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून काम केले. पुढे बेंगळूर इंटरमीडिअट कॉलेज व सेंट्रल कॉलेज येथे कन्नड विषयाचे अधिव्याख्याता (१९२८ – ४२) म्हैसूर महाराजा कॉलेजमध्ये अधीक्षक (१९४३ – ४८) चिकमंगळूर इंटरमीडिअट कॉलेजमध्ये साहाय्यक प्राध्यापक (१९४८ – ५०) बेंगळूर सेंट्रल कॉलेजमध्ये कन्नड विभागप्रमुख (१९५० – ५५) म्हैसूर विद्यापीठात कन्नडचे साहाय्यक प्राध्यापक होन्नावर कॉलेजचे प्राचार्य (१९६४ – ६८) इ. विविध पदे भूषवून ते शिक्षकी पेशातून निवृत्त झाले. १९५६ – ५८ या काळात त्यांनी बेंगळूर आकाशवाणी केंद्रात भाषणविभागात निर्माता म्हणूनही काम पाहिले.

व्ही. सीं.च्या वाङ्‌मयीन कारकीर्दीची सुरुवात पंपायात्रे (१९२८) या प्रवासवर्णनपर ग्रंथाने झाली. उत्तम गद्यलेखनाचा व प्रवासवर्णनाचा नमुना म्हणून पंपायात्रे चा गौरवाने उल्लेख केला जातो. नंतरच्या काळात त्यांचे गीतगळु (१९३१), दीपगळु (१९३३), हेज्जेपाडु (१९५८), अरलुबरलु (१९७२) इ. काव्यसंग्रह प्रसिद्घ झाले. कदंब हा त्यांचा निवडक कवितांचा संग्रह होय. सोहराब-रुस्तुम (१९३०), आग्रह (१९३१), अश्वत्थामन् (१९४६), श्रीशैलशिखर (१९६०) इ. नाटके त्यांनी लिहिली. बेळुदिंगळु (१९५९) हा त्यांचा निबंधसंग्रह व महानियारू (१९७०) हा व्यक्तिरेखांचा संग्रह ह्या त्यांच्या साहित्यकृती उल्लेखनीय आहेत. कवि-काव्यदृष्टी (१९५५), साहित्यमत्तु निमर्शेय अर्थमत्तु मौल्य (१९६१), साहित्य मत्तुहोस मार्ग (१९६७) हे त्यांचे प्रसिद्घ समीक्षाग्रंथ होत. ह्याशिवाय त्यांनी महाकवी पंप (१९६७) हा समीक्षाग्रंथ इंग्रजीतून लिहिला. तसेच पुरंदरदास (१९७१), एम्. विश्वेश्वरय्या (१९७१), वाल्मीकिरामायण (१९७२), डी. व्ही. गुंडप्पा (१९७२) ही त्यांनी लिहिलेली अन्य समीक्षात्मक इंग्रजी पुस्तके होत. एकूण वीस गद्यग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. याखेरीज त्यांनी जॉर्ज बर्नार्ड शॉचे पिग्मेलियन (१९६३) व मेजर बार्बरा (१९६८) यांचे कन्नड अनुवाद केले. त्यांची सु. ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या अरलुबरलु ह्या बालगीतसंग्रहास १९७४ साली साहित्य अकादेमीचे पारितोषिक प्राप्त झाले. १९७३ मध्ये व्ही. सी. ७५ ह्या नावाचा त्यांचा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. व्ही. सीं.ची मने तुंबिसुव हाडु –’ घरभरणी प्रसंगीची गाणी’ –कर्नाटकात घरोघरी लोकप्रिय झाली आहेत.

व्ही. सीं.च्या काव्यात जुन्या व नव्या काव्यदृष्टींचा समन्वय साधण्याची वृत्ती दिसते. त्यांच्या काव्यातून साधेपणा, शुचिर्भूतता, मनाचा प्रसन्नपणा व निर्मळपणा या गुणांचा उत्कटतेने प्रत्यय येतो. रुपवादी, सौंदर्यवादी परंपरेतील उत्कृष्ट निर्मितीचा आविष्कार म्हणजे व्ही. सीं.ची कविता होय. त्यांना संपादनकार्यातही मनापासून रस होता. त्यांनी कन्नड नुडी (१९३९ – ४२), प्रबुद्घ-कर्णाटक (१९४३ – ४८),परिवत् पत्रिका (१९५५-५६) आदी नियतकालिकांचे संपादन केले, तसेच ‘आय्. बी. एच्. ‘ या प्रकाशनसंस्थेच्या ‘ कवि-काव्य परंपरा ‘मालिकेचेही ते संपादक होते. ‘पेन’, साहित्य अकादेमी, ज्ञानपीठ इ. साहित्यसंस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. १९३१ साली भरलेल्या कारवार कविसंमेलनाचे व १९६४ साली कुमठा येथे भरलेल्या छत्तिसाव्या कन्नड साहित्य-संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांना म्हैसूर विद्यापीठाने डी.लिट्. ही पदवी देऊन गौरविले (१९७६).

बेंद्रे, वा. द.