वृद्धि, वनस्पतींची : वृद्धी किंवा वाढ ही अशी एक प्रक्रिया आहे की, ती प्रत्येक सजीवात असतेच असे अगदी सहजपणे गृहीत धरले जाते. वरवर पाहता ती साधी दिसते तथापि प्रत्यक्षात मात्र तितकी सोपी नसून तिच्यात अनेक अंतर्बाह्य प्रक्रियांचा समावेश असतो. वृद्धी होत असताना, जीवद्रव्याचे उत्पादन व सात्मीकरण, पुन्हा पूर्वस्थितीत न येऊ शकणारा असा कोशिकांच्या म्हणजे पेशींच्या किंवा व्यक्तिच्या अवयवांच्या आकारमानात कायमचा बदल आणि संपूर्ण शरीराच्या किंवा एखाद्या अवयवाच्या वजनात वाढ, असे परिणाम मुख्यत्वेकरुन दिसून येतात.

बीजुक (अलैंगिक सूक्ष्म प्रजोत्पादक घटक) किंवा रंदुक स्वरुप (नर व स्त्री प्रजोत्पादक कोशिकांच्या संयोगाने बनलेल्या कोशिकेसारख्या) कोशिकेपासून संपूर्ण वनस्पतीची वाढ होताना ती केवळ आकारमानतच होत नसते तसे झाले तर तिच्यापासून केवळ एक निराकार गोळाच तयार होईल. वृद्धीबरोबरच जीवाच्या आनुवंशिक प्रवृत्तीनुसार त्यांत प्रभेदनही होत असते. कोशिकांचे विभाजन व वाढीबरोबरच प्रभेदन होऊन त्यांपासून ऊतके (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचे समूह) व भिन्न अवयव तयार होतात. प्रत्येक वनस्पतीच्या जनुकविध (आनुवंशिक लक्षणांना कारणीभूत असलेल्या घटकांच्या संचाच्या) घटनेप्रमाणे साध्या दिसणाऱ्या रंदुकापासून वनस्पतिसृष्टीत अनेक प्रकारच्या वनस्पती निर्माण झालेल्या दिसतात. [→ऊतके, प्राण्यांतील ऊतके, वनस्पतींतील].

वनस्पती व प्राणी यांच्या वृद्धीत काही मूलभूत फरक आहेत. प्राण्यांना प्रौढावस्था प्राप्त होताच त्यांची वाढ थांबते, तर वनस्पतींची आयुष्यभर होत असते आणि नवनवीन अवयवांची भर पडत जाते. याशिवाय प्राण्यांच्या भिन्न अवयवांची वाढ एकाच वेळी होत असते, तर वनस्पतींमध्ये ती मुख्यतः अग्रस्थ विभाजी [टोकास असलेल्या आणि सतत विभाजन व वाढ चालू असलेल्या→विभज्या] कोशिकांत आढळते. यामुळे जीवनचक्र संपताच संपूर्ण प्राण्याचा मृत्यू होतो पण अनेक वनस्पतींमध्ये मात्र पाने, फुले, फळे व क्वचित शाखाही गळून पडल्या, तरी मुख्य खोड व मूळ जिवंत राहते इतकेच नव्हे, तर त्यांची पुढे वाढ होऊ शकते. शाकीय अवयवांपासून नवीन वनस्पतींची निर्मिती अनेक वनस्पतींत सामान्यपणे आढळते.

कोशिका-विभाजन व कोशिकालंबन : वनस्पती किंवा त्यांचा कोणताही  भाग अगर अवयव यांची वाढ होते म्हणजे त्याची लांबी किंवा जाडी यामध्ये, किंवा दोन्हीमध्येही, अगर संपूर्ण आकारमानात वाढ होते. या वाढीसाठी मुख्यतः दोन गोष्टी कारणीभूत असतात. पहिली म्हणजे कोशिका-विभाजन ही होय. विभज्या-कोशिकांचे सूत्री विभाजन होऊन नवीन कोशिकांची भर पडते. जितक्या वेळी विभाजन होईल त्या प्रमाणात अधिक कोशिकांची निर्मिती होते. याचाच अर्थ येथे कोशिकांमध्ये संख्यात्मक वाढ होते आणि त्याचीच परिणती वनस्पतींच्या वृद्धीमध्ये होते. दुसरी कारणीभूत गोष्ट म्हणजे खुद्द कोशिकांच्याच आकारमानात वाढ होणे ही होय. येथे मूळ कोशिकांची संख्या साधारणत: तेवढीच राहते पण त्यांचे आकारमान वाढते. काही कोशिकांचे आकारमान सर्व बाजूंनी वाढते, तर बर्यादच वेळा त्यांची लांबी वाढते. त्यामुळे त्या अवयवांची लांबी अगर उंची वाढते अगर एकंदरीत आकारमान वाढते.

वृध्दीचे घटक : वनस्पतींच्या वाढीस सर्वसाधारणपणे तीन मूलतत्त्वे कारणीभूत असतात : (१) जनुकविध घटना : प्रत्येक वनस्पतीच्या कोशिकेतील जनुके [→जीन] वाढ व वाढीची दिशा पक्की ठरवून प्रभेदनाने अवयव व जीवातील हे रुपांतर नियंत्रित करतात. (२) वनस्पतींतील कोशिकांचे, ऊतकांचे आणि अवयवातील अन्योन्यक्रियांचे हॉर्मोनांद्वारे [→हॉर्मोने] नियंत्रण आणि आतील अन्नघटकांचे वितरण वगैरे अंतर्गत परस्परसंबंधांवर वृद्धी अवलंबून असते. (३) वनस्पतींच्या मूळ व खोड यांच्या सभोवतालच्या परिस्थितीवर वृद्धी बऱ्याच अंशी निगडित असते.

जमिनीत उपलब्ध असलेले पाणी आणि बाष्पोच्छ्‌वासाद्वारे [→वनस्पती व पाणी] वनस्पतींनी वातावरणात सोडलेले पाणी यांतील संतुलन हा वृद्धी नियंत्रित करणारा एक प्रमुख घटक होय. ह्याबरोबरच पोषणास आवश्यक त्या खनिजद्रव्यांची जमिनीतून उपलब्धता व त्यांची जमिनीतील संहती (प्रमाण), हवेचे प्रमाण, तापमान व मूलतंत्राचा विस्तार इ. अनेक बाबींवर वृद्धी अवलंबून असते. स्थलवासी वनस्पतींच्या बाबतीत तर वातावरणाचे तापमान, प्रकाश, आर्द्रता, वार्यातची तीव्रता, पराकाष्ठेची उष्णता किंवा थंडी, पर्जन्याचे प्रमाण, अदृश्य प्रारणे (तरंगरुपी ऊर्जा), भोवतालच्या इतर वनस्पती व प्राणी इ. घटकांचा परिणाम वृद्धीवर व त्यांच्या सर्वच जीवनावर होत असतो. [→परिस्थितीविज्ञान वनस्पतींचे खनिज पोषण].

वनस्पतींची वृद्धी ही जितकी त्यांच्या जनुकविध घटनेवर अवलंबून असते, तितकीच ती भोवतालच्या वातावरणावरही अवलंबून असते. वनस्पतीतील हरितद्रव्याचे संश्लेषण हे याचे एक उत्तम उदाहरण होय. जनुकविध घटकांमुळे नित्याच्या हिरव्या वनस्पतींत जसे हरितद्रव्याचे संश्लेषण होते व ते घटक नसल्यास विवर्ण (रंगहीन) वनस्पती मिळते त्याचप्रमाणे वातावरणातील प्रकाशामुळे हरितद्रव्य तयार होत असते व वनस्पती अंधारात ठेवल्यास हरितद्रव्य निर्माण होत नाही. जनुकविध घटकांमुळे असलेली विवर्ण वनस्पती जशी प्रकाशात ठेवूनही हरितद्रव्याचे संश्लेषण करु शकत नाही, त्याचप्रमाणे जनुकविध घटनेत हरितद्रव्य तयार करण्याची पात्रता असूनही ती वनस्पती प्रकाशाशिवाय हरितद्रव्याचे संश्लेषण करु शकत नाही [→हरितद्रव्य]. यावरुन वनस्पतींची वृद्धी अंतर्गत तसेच बाह्य घटकांवर पूर्णपणे अवलंबून असून त्यांचे परस्परसंबंध किती गुंतागुंतीचे आहेत, याची कल्पना येईल. या सर्व घटकांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष, दृश्य व अदृश्य परिणाम वनस्पतींच्या वाढीवर होत असतात. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या परस्परसंबंधाविषयीचे आपले ज्ञान आजही अपूर्ण आहे असेच म्हणावे लागेल कारण त्यासाठी प्रत्येक बाब ही स्वतंत्र रीत्या नियंत्रित करुन वृद्धीवर काय परिणाम होतो हे पाहणे तितकेसे सोपे व साधे काम नाही. तथापि हवामानातील भिन्न घटक स्वतंत्र रीत्या कृत्रिमपणे नियंत्रित करुन त्यांचे वृद्धीवर होणारे परिणाम एकसारखी जनुकविधा असलेल्या अनेक वनस्पतींवर अभ्यासले जात आहेत अशा प्रकारच्या विशिष्ट नियंत्रण व्यवस्थेच्या योजनेला ‘पादपगृह’ म्हणतात.⇨ऊष्मागतिकी, इलेक्ट्रॉनिकी आणि वातानुकूलन यांमध्ये झालेल्या आधुनिक प्रगतीमुळे ह्या अधिष्ठापनाची सोय व उपलब्धता आटोक्यात आली आहे. यामध्ये अनेक पादपगृहे व प्रयोगशाळांचा समावेश असून एकाच वेळी भिन्न ठिकाणी विभिन्न परिस्थितींत ठेवलेल्या वनस्पतींची प्रतिक्रिया नोंदता येते. तसेच आनुवंशिक घटकाव्यतिरिक्त इतर एक किंवा अनेक घटकांच्या निश्चित परिणामसंबंधी निष्कर्ष काढणे शक्य होते. पादपगृहाचा (फायटोट्रॉनांचा) वापर प्रथमच ⇨एफ्. डब्ल्यू. वेंट यांनी १९४९ साली पॅसाडीना (कॅलिफॉर्निया) येथे केला होता. [→पादपगृह].

हॉर्मोने : सजीवांचा सर्वांत लहान घटक ⇨कोशिका  असून जीवनावश्यक सर्व प्रक्रिया ती स्वतंत्र रीत्याही पार पाडू शकते. योग्य वातावरणात वाढ केली असता रंदुकाचेच (लैंगिक कोशिकांच्या संयोगाने बनलेल्या प्रजोत्पादक कोशिकेचे) नव्हे, तर कोणत्याही शरीरकोशिकेचे (स्थातुकाचे) पूर्ण वनस्पतीत रुपांतर होऊ शकते. तेव्हा स्थातुक हा ऊतके व अवयवाचा एक भाग असतो त्यावेळी त्याच्या जवळच्या इतर स्थातुकांचा त्यावर प्रभाव पडत असल्याने त्यातील सुप्त गुणांच्या विकासास वाव मिळत नाही व ऊतकातील अनेक कोशिकांपैकी तो एक घटक म्हणून सहकार्य करतो. याचाच अर्थ असा की, वनस्पतींच्या अंतरंगातील नियंत्रणाच्या विशिष्ट कार्यपद्धतीमुळे संपूर्ण शरीरात कोशिका, ऊतके व अवयव यांच्या कार्यांत एकसूत्रीपणा येतो.

आ. १. वनस्पतीच्या निरनिराळ्या भागांच्या वृद्धीतील सहसंबंध : (१) मूलतंत्र, (२) कॉलोकॅलाइन, (३) वृद्धि-हॉर्मोन, (४) अग्रस्थ कोरक, (५) फुले निर्माण करणारे घटक, (६) वृद्धि-हॉर्मोन, (७) पानांच्या वाढीस कारणीभूत घटक, (८) पान, (९) जीवनसत्व ब१ (१०) खोड.

वनस्पतींतील कोशिका, ऊतके व अवयव ह्यांतील परस्परसंबंध विशिष्ट वृद्धि-हॉर्मोनांद्वारे (ऑक्सिनांद्वारे) नियंत्रित केले जातात, हे आज सप्रयोग सिद्ध झाले आहे. काही विशिष्ट जागी निर्माण झालेल्या ह्या वृद्धि-हॉर्मोनांचे इच्छित स्थळी, एका कोशिकेतून दुसऱ्या कोशिकेत किंवा बाष्पोच्छ्‌वासाच्या प्रवाहाद्वारे स्थानांतरण होत असते. एखादी कोशिका जीवनावश्यक सर्व कार्बनी संयुगे स्वतः तयार करुन वाढत असेल, तर तिला एककोशिक जीव असे म्हणतात.⇨शैवलांमध्ये असे बरेच प्रकार आढळतात तसेच काही कोशिका समूहाने राहतात. किण्व [→यीस्ट] ह्या अशा सामूहिक जीवांमध्ये [→कवक] मात्र बायोटीन व थायामीन ही दोन जीवनसत्वे त्यांच्या समूहाद्वारे तयार होईपर्यंत त्यांची वाढ सुरु होत नाही. एक सेंटिमीटर लांबीचे मूलाग्र घेऊन जर ते साखर व आवश्यक ती खनीजद्रव्ये देऊन कृत्रिम रीत्या वाढविण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची वाढ फारच कमी होते परंतु केवळ दहा कोटीत एक भाग या प्रमाणात थायामिनाचा त्यात समावेश करताच त्याची भरपूर व अमर्याद वाढ होऊ शकते, असे दिसून आले आहे. वनस्पतींमध्ये मुळांच्या वाढीस आवश्यक ती खनिजद्रव्ये जमिनीतून मिळतात. साखर हिरव्या पानांतून⇨प्रकाशसंश्लेषणामुळे मिळते, तर थायामीन हे लहान कोवळ्या पानांतून उपलब्ध होते. मुलाग्राच्या कृत्रिम संवर्धनात थायामिनाप्रमाणेच जीवनसत्त्व ब६ व निॲसीन (निकोटिनिक अम्ल ब जीवनसत्त्वातील एक भाग) हे वृद्धिघटक साखर व खनिजद्रव्यांव्यतिरिक्त वाढीस अत्यंत आवश्यक असल्याचे आढळले आहे. प्ररोहाचे (खोड, फांद्या व त्यांवरची पाने यांनी बनलेल्या भागाचे) टोक कापले असता त्याचीही वाढ थांबल्याची किंवा कमी झाल्याची दिसते परंतु ते टोक त्यावर परत ठेवले असता किंवा त्याऐवजी हॉर्मोनांचा उपयोग केला असता त्याची वाढ परत सुरु होते. यावरुन जीवनसत्त्वे व वृद्धि-हॉर्मोने वनस्पतींची वृद्धी नियंत्रित करतात, असे दिसून येते. [→वृद्धिनियंत्रक, वनस्पतींतील].

वृद्धीतील सहसंबंध : वनस्पतींच्या भिन्न अवयवांच्या वाढीस अनेक सहसंबंध कारणीभूत असतात, हे आ. १ वरुन सुस्पष्ट होईल. मोठ्या पानांतून प्यूरिन व ॲडेनीन पुरविले गेल्यावर लहान पाने वाढू लागतात त्याचप्रमाणे मुळांतून काही अज्ञात वृद्धि-घटकांद्वारे प्रेरणा मिळाल्याने प्ररोहाची वाढ होते. एफ्. डब्ल्यू. वेंट (१९३८) यांच्या मते पानांत तयार झालेल्या ‘फायलोकॅलाइना’ मुळे त्यांची वाढ होते मुळांत तयार झालेल्या ‘कॉलोकॅलाइना’ मुळे खोड व बाजूच्या कळ्या वाढीस लागतात आणि खोड, पाने, कळ्या इ. वायवी (हवेत वाढणाऱ्या) अवयवांत तयार झालेले ‘ऱ्हायझोकॅलाइन’ मुळांच्या वाढीस चालना देते या सर्व वृद्धि-घटकांची ने-आण वृद्धि-हॉर्मोनांतर्फे (ऑक्सिनांतर्फे) होते, तसेच त्यामुळे त्या अवयवांचे वैशिष्ट्यही राखले जाते परंतु याला प्रायोगिक पुरावा उपलब्ध झालेला नाही यावर व्हान ओव्हरबेक, जे (१९४६) व त्यांचे सहकारी यांच्या संशोधनावरुन असे आढळते की, वेंट यांच्या ऱ्हायझोकॅलाइन या वृद्धि-घटकाचा अर्थ कार्बोहायड्रेटे, नायट्रोजन व बहुधा ब-जीवनसत्त्वे इतकाच घेता येईल. जिबरेलिने किंवा कायनिने या नावाचे वृद्धि-घटक हॉर्मोनात समाविष्ट करावेत किंवा कसे याबद्दल जरी वाद असला, तरी त्यांचे वनस्पतींतील अस्तित्व व वृद्धीस त्यांनी लावलेला हातभार लक्षात घ्यावा लागतो. जिबरेलिनामुळे वनस्पतींच्या होणाऱ्या डोळ्यात भरणाऱ्या वाढीमागील रहस्य जरी अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी खोड, पाने, फुले व फळे यांच्या वाढीस आज त्यांचा वापर सर्रास होत आहे.

अग्रस्थ कळ्यांच्या (कोरकांच्या) द्वारे बाजूच्या कोरकांची वाढ रोखली जाणे, पाने, फुले व फळे यांच्या देठांत विभाजक थर निर्माण होणे [→अपाच्छेदन व पानझड], कलमांना मुळ्या फुटणे, ऊतकांची नियंत्रित व सूत्रबद्ध किंवा अमर्याद वाढ होणे, बीजहीन फळाचे उत्पादन व ⇨वाहक वृंदातील  प्रकाष्ठाचा नाश झाला असता त्याचे होणारे ⇨पुनर्जनन हे हॉर्मोनांचे वनस्पतींची वाढ व तिचे नियंत्रण, ह्यासंबंधीचे काही दृश्य परिणाम होत. कोशिकेच्या पार्यतेत बदल घडवून आणणे, कोशिकेच्या श्वसनक्रियेतील एखाद्या अवस्थेवर नियंत्रण ठेवणे व काही पदार्थांच्या स्थानांतरणाला चालना देणे अथवा ते रोखणे इ. काही प्रमुख कार्यवाहीद्वारे हॉर्मोने नियंत्रण ठेवून एकाच वेळी इच्छित परिणाम साधतात. या बाबतीत असे कोठेही पुराव्याने सिद्ध करण्यात आले नसले, तरी ते गृहीत धरण्यात येत असून त्यासंबंधी अधिकाधिक शास्त्रशुद्ध संशोधन सुरु आहे.

मॉर्‌फॅक्टिने : वनस्पतींच्या वृद्धीचे नियंत्रण ज्याप्रमाणे नैसर्गिक वृद्धि-हॉर्मोने (ऑक्सिने) करतात, तसेच काही कृत्रिम (संश्लेषित) व ‘मॉर्‌फॅक्टिने’ नावाची रासायनिक द्रव्ये करु शकतात, असे आढळून आले आहे. जर्मनीतील सुप्रसिद्ध संशोधन प्रयोगशाळेत (ई. मर्क, डार्मस्टाट) बनविलेल्या ह्या नवलपूर्ण वृद्धि-नियंत्रकाचे वनस्पतींच्या क्रियावैज्ञानिक व आकारजननिक [→आकारजनन] प्रक्रियेवर महत्त्वाचे परिणाम घडून येतात, असा अनुभव नमूद आहे. याबाबत अधिक प्रयोग केल्यावर कृषीमध्ये त्यांचे अनेक व्यावहारिक फायदे घेता येतील, असा विश्वास व्यक्त केला गेला आहे. १९६०-७० च्या दशकाच्या आरंभी मॉर्‌फॅक्टिनांचा शोध लागल्यापासून त्यांच्या शास्त्रीय व व्यावहारिक महत्त्वाकडे लक्ष दिले जात आहे. वनस्पतींच्या अवयवांच्या आकारमानांची जडणघडण निश्चित होत असताना ह्या रासायनिक द्रव्यांचे क्रियाशीलत्व अधिक प्रत्ययास येते. यांच्या कमी संहतीचा वापर केल्यास कक्षास्थ (बगलेतील) बाजूच्या फांद्यांच्या वाढीस चालना मिळते लिंगभेदात बदल होतो व अनिषेकजनित (लैंगिक प्रक्रियेशिवाय) फलोत्पत्ती होते. अधिक संहतीचा वापर केल्यास खुजेपणा येतो. बहुतेक वनस्पती अधिक संहती सहन करु शकतात कारण त्यांमध्ये फारसा विकृत परिणाम दिसत नाही. हे पदार्थ वनस्पतींच्या चयापचयात (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींत) त्वरित रुपांतरित होतात या पदार्थांच्या कमी किंवा मध्यम संहतीमुळे त्या बिघडलेल्या वृद्धि-प्रक्रियेतून, नित्य स्थितीला येतात. मॉर्‌फॅक्टिनांची अनेक प्राण्यांना विषबाधा होत नाही त्यांवर सूक्ष्मजीवांची क्रिया होते. त्यामुळे जमिनीत किंवा पाण्यात त्यांचा प्रवेश झाल्यानंतर तेथे ती फार काळ टिकू शकत नाहीत. जंबुपार किरणे व उच्च तापमान यांपुढे त्यांचा टिकाव लागत नाही.

जैव क्रियाशीलता : रुजणाऱ्या बिया व मुळे मॉर्फॅक्टिनांचे शोषण करतात; तथापि पाने या शोषणाच्या संदर्भात सर्वांत कार्यक्षम असतात. जिबरेलिनाप्रमाणे वनस्पतींच्या शरीरात त्यांची अभिसरण क्रिया चालते; शरीरावयवांच्या ध्रुवत्वाशी तिचा संबंध नसतो. कोवळ्या रोपट्यात खालून शेंड्याकडे परंतु प्रौढावस्थेत शेंड्याकडून खाली त्यांचे स्थलांतर चालू असते. वर्धी कळ्यांत व विभज्येत त्यांचा संचय व क्रिया विशेषेकरून चालतात. कापणी व मळणीपूर्वी काही आठवडे मॉर्फॅक्टिने पिकांवर फवारल्यास बीजांचे अंकुरण व कंदांना कोंब फुटणे ह्या प्रक्रिया विलंबाने घडून येतात. वनस्पतींच्या वाढत असलेल्या भागांवर मोठ्या प्रमाणावर ती फवारल्यास कांड्यांची वाढ व संख्या खुंटते व खुजेपणा येतो; फवारल्यानंतर येणारी पाने बहुधा लहान, अधिक जाड व गर्द रंगाची असतात; कधी आकारात विकृतीही येते; संयुक्त पानांऐवजी साधी पाने येतात; बाष्पोच्छ्वास कमी होऊन पाण्याची गरज भासू लागते. याचा अर्थ रुक्षताविरोधात मॉर्फॅक्टिनांमुळे सुधारणा घडून येते, असा केला जातो. पुढे उल्लेखिलेल्या अग्रप्रभावावर मॉर्फॅक्टिनांमुळे बंधन येते; परिणामी अधिक फांद्यांची वाढ होते व वनस्पतींचा आकार खुजा व दाट झुडपासारखा होतो. तृण वनस्पतींच्या [⟶ग्रॅमिनी] बाबतीत फुटवे येण्यापूर्वी मॉर्फॅक्टिनांचे फवारणी केल्यास फुटव्यांची संख्या अधिक होते. मुळांच्या बाबतीत उपमुळांची संख्या बरीच कमी होऊन प्रमुख मूळ मात्र बरेच लांब वाढते आणि मूलकेश संख्येने व आकारमानाने मोठे होतात. त्यामुळे अभिशोषण वाढते. मॉर्फॅक्टिनांचा पुरवठा फार कमी प्रमाणात झाल्यास मुळांच्या धन संवेदन गुरुत्वानुवर्तनात (जमिनीत खाली वाढण्याच्या नित्य प्रवृत्तीत) फरक पडून त्यांची वाढ कोणत्याही दिशेकडे होते. मॉर्फॅक्टिनांची संहती व ती फवारण्याचा काल यांचा परिणाम फुले व फळे यांची वाढ कमी-जास्त करण्यावर होतो. फुलांच्या कळ्या ओळखू येण्याअगोदर अधिक संहतीचा वापर केल्यास फुलोरे अपूर्ण येतात किंवा पूर्णपणे थांबून पल्लव-निर्मिती होऊ लागते. याउलट कमी संहती वापरल्यास पुष्प बहार भरपूर येतो. सफरचंद, नासपती, अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळे (जरदाळू, बदाम इ. ) सोयाबीन व इतर शिंबावंत (शेंगा येणारी ) धान्ये, टोमॅटो व काकडी यांच्या बाबतीत हा परिणाम व्यावहारिक दृष्टीने फार महत्त्वाचा असल्याचे आढळले आहे. लैंगिक बाबतीत मॉर्फॅक्टिनांचा परिणाम लक्षात घेण्यासारखा असतो. द्विलिंगी (उदा., तंबाखूची) फुले स्त्रीलिंगी बनतात. एकाचा झाडावर दोन्ही प्रकारची एकलिंगी फुले येत असल्यास, आरंभी होत असलेल्या नित्याच्या वाढीतील पहिल्या प्रकारची (उदा., नर) फुले न येता दुसऱ्या प्रकारची (स्त्रीलिंगी) येतात; उदा., काकडीला स्त्री-पुष्पे व दोडक्याच्या वेलीला नर-पुष्पे येतात. भिन्न लिंगी फुले वेगवेगळ्या झाडांवर येतात. त्यावेळी मॉर्फॅक्टिनांचा परिणाम दोन्हीवर एकसारखा होऊन त्या सर्वांवर दोन्ही प्रकारची फुले येतात. ऑक्सिने व जिबरेलिने यांच्याप्रमाणे मॉर्फॅक्टिनांचा परिणाम बीजहीन फलोत्पादनाला पोषक असतो : त्याकरिता काकडी, टोमॅटो, चेरी व नासपती यांच्या बाबतीत कमी संहतीचा वापर फुलोऱ्यावर करावा लागतो. साखर, चीक, तेले, अल्कलॉइडे, स्टेरॉइडे इ. आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या वनस्पतिज उत्पादनांत मॉर्फॅक्टिनांचा वापर केल्याने बरीच वाढ होते, असे आढळले आहे.

वृद्धी व तापमान : वनस्पतींची वृद्धी ही सर्वसाधारणपणे तापमानाबरोबर वाढत जाते व तापमान कमी झाल्यास ती कमी होते. तापमानाशी संलग्न असलेल्या या वाढीला काही मर्यादा आहेत. तापमानात वाढ होतच राहिली, तर काही ठराविक अंशापर्यंतच अनुकूल परिणाम दिसून येतात व त्यानंतर पाण्याचे प्रमाण फार कमी झाल्याने व श्वसनक्रिया अधिक वेगाने होऊन अन्नाचा साठा संपू लागल्याने वाढ कमी होते. चयापचय, प्रकाशसंश्लेषण, श्वसन, बाष्पोच्छ्‌वास, जलशोषण [→वनस्पति व पाणी] व मुळांची वाढ ह्या सर्व प्रक्रियांवर तापमानाचा परिणाम होत असल्यामुळे वृद्धीवरही अप्रत्यक्ष परिणाम दिसून येतो. प्रत्येक वनस्पतीच्या वृद्धीसाठी ठराविक अशा किमान तापमानाची आवश्यकता असते त्याखालील तापमानात वनस्पतीची वाढ खुंटते. ज्या तापमानात वनस्पतीची कमाल वाढ होते ते तिचे इष्टतम तापमान मानतात त्यावरच्या तापमानात वाढ खुंटते तेव्हा ते कमाल तापमान ठरते

वृद्धी व तापमान ह्यांतील परस्परसंबंध दर्शविणाऱ्या या अवस्था होत. इष्टतम तापमान वनस्पतींच्या जातीप्रमाणे बदलते व तापमानाच्या सहनशीलतेच्या कमाल व किमान मर्यादाही कमी-जास्त होतात. वनस्पतींवरील प्रकाश पडण्याच्या कालावधीचा परिणाम हाही तापमानाशी निगडीत असतो. केवळ आवश्यक तेवढे तास प्रकाश वनस्पतींना मिळून त्यांना फुले येत नाहीत, तर त्याबरोबरच योग्य तापमानाचीही जरुरी असते. तापमान कमी-जास्त करुन वनस्पतीवर भिन्न प्रकारचे प्रकाशावधिप्रभाव पडल्याचे प्रयोगांद्वारे दाखवून देण्यात आले आहे. काही वनस्पतींच्या कळ्यांची प्रसुप्तावस्था [निष्क्रिय अवस्था→ग्रीष्मनिष्क्रियता शीतनिष्क्रियता] वातावरणातील तापमानाशी निगडीत असते व अनुकूल तापमान मिळताच त्यांची प्रसुप्तावस्था संपून वाढ सुरु होते. पानझडी वृक्ष, कॉफी, डेंड्रोबियम [→ऑर्किडेसी] वगैरे वनस्पतींमध्ये कळ्यांची एका ठराविक अवस्थेपर्यंतच वाढ होते. त्यानंतर त्या प्रसुप्तावस्थेत जातात. हिवाळ्यातील थंड हवामानबरोबर त्यांची परत वाढ सुरु होते. कॉफीच्या झाडांना पहिल्या पावसाच्या सरीमुळे फुले येण्यास चालना मिळून सु. आठ दिवसांत झाड फुलांनी डंवरुन निघते.

गर्भाची वाढ : अंदुक (स्त्री-कोशिका) व पुं-गंतुक (नर-कोशिका) म्हणजेच प्रजोत्पादक लैंगिक कोशिका असून यांच्या संयोगाने होणाऱ्या रंदुकाचे विभाजन लगेच किंवा काही कालांतराने सुरु होते व गर्भाचा प्राथमिक अवस्थेतील गोळा तयार होतो. प्रभेदनाने ह्या गोळ्याचे नंतर गर्भाक्षात रुपांतर होऊन या वाढीसाठी आवश्यक ती द्रव्ये पुष्कातील (बीजातील दलिकाबाहेरच्या अन्नांशातील) ऊतकातून अथवा दलिकांकडून पुरविली जातात. पूर्ण वाढ झालेला गर्भ हा बीजापासून वेगळा काढून साखर व खनिजद्रव्ये यांच्या मिश्रणावर निर्जंतुक वातावरणात कृत्रिम रित्या वाढविता येतो परंतु अपूर्ण वाढलेला गर्भ बीजापासून वेगळा करुन कृत्रिम रीत्या वाढवावयचा झाल्यास त्याच्या पोषणद्रव्यात जीवनसत्त्वांची भर घालावी लागते. त्याहीपेक्षा लहान गर्भ घेतला, तर साखर व खनिज द्रव्यांव्यतिरिक्त ठराविक प्रमाणात कार्बनी पोषक द्रव्ये असलेल्या शहाळ्याच्या पाण्याचा समावेश केला, तरच त्याची वाढ होते. [→ ऊतकसंवर्धन अंकुरण गर्भविज्ञान].

बिजातील गर्भाची वाढ पूर्ण झाली म्हणजे बीज रुजेपर्यंत तो गर्भ काही काळ प्रसुप्तावस्थेत राहतो. जवळजवळ पूर्णपणे शुष्कावस्थेत सुद्धा जिवंत राहू शकणे, हे गर्भाचे एक वैशिष्ट्य होय. वनस्पतीचे इतर भाग मात्र कोरड्या अवस्थेत कार्यक्षम राहू शकत नाहीत व ही अवस्था फार काळ राहिल्यास त्यांचा नाश होतो. बीज रुजल्यावर खोडाच्या (प्ररोहाच्या) टोकात सतत होणाऱ्या कोशिका-विभाजनाद्वारे खोडाची व त्यावरील आद्यपर्णांपासून पानांची घडण होत असते. यामध्ये होणाऱ्या प्रभेदनावर विलक्षण प्रभावी नियंत्रण असून⇨पर्णविन्यास  हा अतिशय सूत्रबद्ध दिशेने होत असतो. हे नियंत्रण कसे ठेवले जाते, याविषयी अद्याप शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण आढळलेले नाही. विशेषतः समशीतोष्ण कटिबंधात वाढणाऱ्या झुडपांसाठी व वृक्षांसाठी या प्रकारची वाढ होण्यास मोठ्या (जास्त वेळ प्रकाश असणाऱ्या ) दिवसांची आवश्यकता भासते. कृत्रिम रीत्या काही रसायनांचा उपयोग करुन प्ररोहाग्राच्या वृद्धीत बदल घडवून आणता येतात. प्ररोहाग्राचे सूक्ष्म विच्छेदन केले असता असे दिसून येते की, त्यातील लहानात लहान अशा आद्यपर्णांचा पुढे उत्पन्न होणाऱ्या आद्यपर्णांवर प्रभाव पडत असतो. प्ररोहाग्रातील कोशिका जरी स्वयंशासित असल्या, तरी त्यांचा एकमेकींवर प्रभाव पडत असून त्या काही प्रमाणात एकमेकींवर अवलंबून असतात. विचित्रोतकी (चिमेरा) यामध्ये याची प्रचिती येते. वनस्पतींच्या दोन जातींमध्ये त्यांच्या खोडाच्या कांडांचा कृत्रिम रीत्या संयोग घडवून आणला असता, संपर्कस्थानापासून नवीन प्ररोह उत्पन्न झाल्यास, दोन्ही जातींची लक्षणे त्यात एकत्र आलेली आढळतात व यालाच विचित्रोतकी म्हणतात. ह्या प्ररोहाग्रात दोन जातींची ऊतके वेगळी राहिली, तर त्यांपासून दोन जाती लांबीच्या दिशेत सांधल्यासारख्या ‘त्रिज्यखंडी विचित्रोतकी’ निर्माण होतो व ह्या दोन जाती खुल्या असताना त्यांची वृद्धी विसंगत प्रमाणात होत असली, तरी विचित्रोतकीमुळे एकत्र येऊन ऊतकांच्या परस्परसंयोगामुळे वृद्धीत एकतानता येते. भिन्न जातींची ऊतके एकत्र येऊन त्यांच्यात निर्माण झालेला सलोखा हा ‘परिवेष्टित विचित्रोतकी’तही दिसून येतो ह्यामध्ये पाने, फुले, फळे वगैरे अवयव दोन्ही जातींच्या लक्षणांच्या मिश्रणाने तयार झालेले दिसले, तरी अपित्वचा, मध्यत्वचा व रंभ हे ठळक भाग क्रमसंचयाने दोन्ही जातींपासून विचित्रोतकी प्रजेत आलेले पाहण्यात आहेत.

प्राथमिक वृद्धीबरोबरच काही वनस्पतींमध्ये ऊतककर व त्वक्षाकर [→त्वक्षा] या पार्श्विक ऊतककरांमुळे द्वितीयक वृद्धी होत असते व यामुळे वनस्पतींच्या घेरात वाढ होते. ऊतककराची क्रियाशीलता कळी व पाने नियंत्रित करतात. पानझडी वृक्षांमध्ये वसंत ऋतूत जेव्हा कोवळी पाने व कळ्या फुटतात, त्या वेळीच ऊतककरापासून परिकाष्ठ व प्रकाष्ठ ही ऊतके उत्पन्न होऊन वसंतकाष्ठ निर्माण होते. नंतर पाने मोठी झाल्यावर ऊतककरापासून लहान व जाड कोशिकांचे उन्हाळी काष्ठ तयार होते. यामुळे काष्ठात वार्षिक वलये आढळतात. [→ शारीर, वनस्पतींचे].

ऊतककरामुळे होणारी ही वृद्धी स्वायत्त नसून पानांतून मिळालेल्या प्रेरणेमुळे होत असते कारण पाने तोडून टाकल्यास वाढ थांबते पण कृत्रिम रीत्या हॉर्मोनांच्या सिंचनाने ती उद्दीपित करता येते. ऊतककरापासून तयार होणारे वसंतकाष्ठ व उन्हाळी काष्ठ यांचा संबंध कळ्या (कोरके) आणि पानांतून एका ठराविक आवर्तनात कमी-जास्त प्रमाणात स्रावणाऱ्या होर्मोनांशीही सहज जोडता येतो व त्यामुळे तयार होणाऱ्या वार्षिक वलयांच्या रहस्याचा उलगडा होतो. ऊतककराच्या कोशिका वेगळ्या काढून त्यांचे कृत्रिम संवर्धन करण्यात आले आहे परंतु त्यांपासून परिकाष्ठ व प्रकाष्ठ या ऊतकांची निर्मिती न होता प्रभेदनाअभावी त्यापासून कोशिकांचा एक गोळा तयार होतो. यावरुन वनस्पतींत त्यांच्या सूत्रबद्ध वाढीवर हॉर्मोनांव्यतिरिक्त आणखी काही अज्ञात घटकांचे नियंत्रण असावे असे वाटते.

प्रजोत्पादन व वृद्धी : वनस्पतींत सलिंग व अलिंग प्रजोत्पादन होत असते. येथे काही उच्च वनस्पतींच्या प्रजोत्पादनातील वृद्धीसंबंधीच परामर्श घेण्यात आला आहे. काही वनस्पतींत (फायकॅरिया, लिली, हायड्रोकॅरिस इ.) बाजूच्या कळ्यांच्या खवल्यात अन्नसाठा वाढून मूळ वनस्पतीपासून त्या वेगळ्या होतात व त्यापासून नवीन वनस्पती बनतात. हायड्रोकॅरिसमध्ये वसंत ऋतूत लहान (प्रकाश कमी वेळ असणाऱ्या) दिवसांचा परिणाम म्हणून कळ्या तयार होतात व थंडी संपल्यावर त्या रुजतात. ट्यूलिप, हायसिंथ, डॅफोडिल व कांदा ह्यांमध्ये साधारणपणे शाकीय उत्पत्ती होते. यांच्या खवलेदार कंदांच्या तळाशी दोन किंवा अधिक पार्श्विक (बाजूच्या) कळ्या असून फुले येऊन गेल्यावर त्यांची वाढ होऊन त्यांपासून नवीन कंद बनतात. कंदाचा वरचा अर्ध कापला, तर पार्श्विक कळ्यांच्या संख्येत भर पडून त्यांपासून पुढे कंदांचा गुच्छ तयार होतो. पॉलिगोनमच्या काही जातींमध्ये फुलांच्या जागी लहान कंद येऊन त्याद्वारे प्रजोत्पादन होते.⇨घायपातातही  कधी फुलांची वाढ थांबून तेथे कंद येतात. हे रुपांतर का व कसे होते याचे शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण अजून उपलब्ध नाही.⇨पानफुटीतही  पानांच्या खाचांमध्ये नवीन वनस्पतींच्या कळ्या येतात हिच्या काही जातींत (ब्रायोफायलम कॅलिसीनम) पान तोडून टाकल्यावर त्यांच्या किनारीवरील खाचेतून नवीन रोपे वाढतात. कमळासारख्या बऱ्याच वनस्पतींत जमिनीत मूलक्षोड असून त्यापासून जमिनीबाहेर येणाऱ्या काही शाखा असतात. मूलक्षोडाचे तुकडे होऊन त्याद्वारे प्रजोत्पादन होते. बटाट्याच्या धुमाऱ्यांची टोके फुगून त्यांचे नवीन बटाटे बनतात. वनस्पतींच्या वरच्या भागांतून स्रवणाऱ्या हॉर्मोनांमुळे किंवा अन्य काही प्रेरणेमुळे लहान दिवसात व कमी तापमानाच्या ऋतूत हे धुमारे फुटतात. ह्याप्रमाणे तयार झालेले बटाटे बराच काळ प्रसुप्तावस्थेत राहतात परंतु एथिलीन क्लोरोहायड्रिनाच्या फवाऱ्या‍ने त्यांना फुटवे येतात. डेलिया व रताळे ह्यामध्ये फुगीर (मांसल) मुळांचा [→मूळ-२] गुच्छ तयार होत असून त्यावर असलेल्या कळ्यांची अनुकूल परिस्थितीत वाढ होते याचप्रमाणे उसाची लागवड खोडाचे छाट (तुकडे) लावून करतात. उद्यानविज्ञानात अशा प्रकारे छाटकलमे लावून फुलझाडांचा व फळझाडांचा प्रसार करतात. अशा कलमांना, पेऱ्यांमध्ये असलेल्या आद्यमुळांपासून किंवा संपूर्णपणे नवीन (आगंतुक) मुळे येतात [→पुनर्जनन]. साखर व पोषक खनिजद्रव्यांवर प्ररोहाची कृत्रिम वाढ करुन त्यापासून पाने व मुळे यांसह संपूर्ण वनस्पतीही मिळू शकते. मुळे तयार होऊन ती वाढण्यासाठी लागणारी हॉर्मोने ही खोडातून खालील भागांना पुरविली जातात व ते खोड मध्येच कापले, तर त्या ठिकाणी त्याचा संचय होऊन कापलेल्या ठिकाणाहून मुळे फुटतात. खोडातून येणाऱ्या हॉर्मोनांवर अवलंबून न राहता कलमाचे खालचे टोक हॉर्मोनाच्या विद्रावात बुडवून लावले असता त्यांना भरघोस मुळ्या फुटतात, हे सर्वश्रुतच आहे. हॉर्मोनांव्यतिरिक्त काही ॲमिनो अम्ले आणि जीवनसत्वे कलमांना मुळे फुटण्यास उपयुक्त असतात, असे आढळले आहे. ज्या वनस्पतींत कलमांना मुळे फुटणे शक्य नसते, तेथे दाब-कलम किंवा डोळे बांधणे इ. उपायांनी प्रजोत्पादन घडविता येते. [→कलमे प्रजोत्पादन].

पुष्प विकसन : वनस्पतींच्या जीवनचक्रात एका ठराविक वेळी त्यांची शाकीय वृद्धी थांबून त्या जागी फुलांची कळी येऊन वनस्पतींची जननावस्था सुरु होते. पानांतून मिळणाऱ्या व खोडातील परिकाष्ठ-ऊतकाद्वारे वाहून येणाऱ्या प्रेरणेमुळे हे परिवर्तन घडून येते ते येत असताना ज्या टोकातून सर्वसाधारणतः एका ठराविक आवर्तात⇨पर्णविन्यास होतो, ते टोक चकतीसारखे थोडे रुंद होऊन त्यावर संदलाचे वलय निर्माण होते. त्यानंतर ठराविक अंतराने पाकळ्या, केसरदले व किंजदलांची मांडणी होऊन फूल तयार होते. जेव्हा फुलोरा [→पुष्पबंध] निर्माण होतो, तेव्हा त्यावर अनेक फुले अग्रवर्धी किंवा तलवर्धी क्रमाने येतात. [→फूल].

प्रकाशावधिप्रभाव : लहान व मोठ्या दिवसामुळे मिळणाऱ्या कमी व जास्त तास प्रकाशाचा वनस्पतीवर परिणाम होत असतो. शाकीय वृद्धी थांबून जननावस्था प्राप्त होते त्या वेळी प्रकाशाचे नियंत्रण असते. लहान किंवा मोठे दिवस हे पृथ्वीवर अक्षांशाप्रमाणे निरनिराळ्या ऋतूंतही बदलत असतात. या प्रकारे कमी-जास्त तास प्रकाश मिळाल्याने वनस्पतीवर होणारे परिणाम लक्षात घेऊन फुले येण्यास (१) कमी तासांचा प्रकाश व (२) जास्त तासांचा प्रकाश आवश्यक असणाऱ्या, (३) कमी व जास्त तासांच्या प्रकाशाचे बंधन नसणाऱ्या व (४) अनियमित प्रतिक्रिया दर्शविणाऱ्या वनस्पती, असे चार प्रकार मुख्यत्वेकरुन दिसून येतात. लहान दिवस आवश्यक असणाऱ्या वनस्पतींची फक्त पाने जरी जरुर तितका काळ प्रकाशात ठेवली व प्ररोहाग्र (खोडाचे टोक) अंधारात ठेवले तरी त्यांना फुले येतात. ह्यावरुन असे दिसून येते की, वनस्पतीत फुले येण्यासाठी पानांतून मिळणाऱ्या कोणत्या तरी प्रेरणेने प्ररोहाग्रात बदल घडून येतो. फ्लोरिजेन नावाचे हॉर्मोन पानांमध्ये वनस्पतीच्या प्रकाशसंबंधित आवश्यकतेप्रमाणे लहान किंवा मोठ्या दिवसात तयार होऊन त्याचे प्ररोहाग्राकडे वहन झाल्याने फुले येतात, असे दिसून आले आहे. मोठे दिवस आवश्यक असणाऱ्या वनस्पतींना जास्त तास प्रकाश मिळाला व लहान दिवस आवश्यक असणाऱ्या वनस्पतींना कमी तास प्रकाश मिळाला तरच फुले येतात. प्रकाशकालाचा वनस्पतींच्या फुलण्यावर होणाऱ्या परिणामाला ‘प्रकाशावधिप्रभाव’ म्हणतात. फुले येण्यास आवश्यक तितक्या प्रकाशावधीत फरक पडल्यास वनस्पतींची केवळ शाकीय वृद्धीच होत राहते. कमी तासांच्या प्रकाशात फुलणारी एखादी वनस्पती घेऊन लहान दिवसात वाढविली, तर तिला फुले येतील परंतु जर त्या वनस्पतीवर रात्री थोडा वेळही कृत्रिम प्रकाश पाडला, तर तिच्या फुलण्याच्या क्रियेत व्यत्यय येतो. हाच प्रकार उलट अर्थी जास्त तास प्रकाश आवश्यक असणाऱ्या वनस्पतींच्या बाबतीतही दिसून आला आहे.

वासंतीकरण : प्रकाशाचे तास कमी-जास्त करुनही काही वनस्पती फुलत नाहीत किंवा उशीरा फुलतात. अशा वनस्पतींच्या बीजांवर शीत प्रक्रिया करण्यात येते व तिला ‘वासंतीकरण’ म्हणतात जास्त तापमानाचीही बीजांवर प्रक्रिया केली असता असा परिणाम (लवकर फुले येण्यास लावणे) काही वनस्पतींच्या बाबतीत दिसून आला आहे. वासंतीकरणानंतर फुले येण्यास काही काळ लागतो व त्या काळात बीजांवर उष्ण प्रक्रिया केली, तर वासंतीकरणाचा परिणाम नष्ट होतो. बहुतांशी वासंतीकरणाचे प्रयोग हे शूकधान्यावर करण्यात आले आहेत. हिवाळी गव्हाचे वसंत ऋतूत पीक काढताना त्याचे वासंतीकरण करतात, म्हणजे कमी वेळात पीक तयार होते. सर्वसाधारणपणे १५० दिवसांत तयार होणारे पीक वासंतीकरणामुळे ११०-१२० दिवसांत तयार होते. वासंतीकरण ही संज्ञा बीजाखेरीज वनस्पतींच्या इतर अवयवांवरच्या तापमानक्रियेसंबंधातही वापरतात.

फलविकास : फळांमध्ये त्यांचा आकार, रंग, आकारमान, वास, चव या बाबतींत फुलाप्रमाणेच विविधता आहे तरी त्यांच्या वाढीमागील तत्त्व मात्र सारखेच आहे. बहुतेक सर्व खरी फळे किंजमंडलापासून तयार होतात. ⇨परागण  व फलन या दोन प्रक्रिया फलवृद्धीस उत्तेजक ठरल्या आहेत कारण परागणाच्या अभावी किंजपुट (स्त्रीकेसराचा तळभाग) गळून पडल्याचे दिसून आले आहे. परागणाचे फलवृद्धीवरील नियंत्रण हे हॉर्मोनांद्वारे होत असते, कारण परागकण व परागनलिकांमध्ये हॉर्मोने भरपूर प्रमाणात सापडतात. बीजकांमध्येही हॉर्मोने असतात परंतु त्यांना कार्यक्षम होण्यासाठी परागनलिकेतून प्रेरणा मिळणे आवश्यक असते. परागणामुळे पहिला दृश्य परिणाम जर कोणता होत असेल, तर तो म्हणजे किंजपुटाची गळती थांबून त्याची वाढ सुरु होते. काही फळांमध्ये मात्र फलन व गर्भाची वाढ सुरु होईपर्यंत वाढ दिसून येत नाही, कारण त्यांच्या वाढीस आवश्यक ती हॉर्मोने बीजकामधून पुरविली जातात. [→फळ].

बीजहीन फळे : फळात सर्वसाधारणपणे एक किंवा अनेक बीजे असतात, परंतु याबरोबर काही बीजहीन फळेही (उदा., केळी, द्राक्षे) आपल्या परिचयाची आहेत. अपवादात्मक अशी क्वचित बीजहीन फळे निर्माण होताना काही वनस्पतींत दिसून येतात व त्याला ‘अनिषेकजनन’ म्हणतात. बीजहीन फळे ही परागणानंतर, तर कधी त्याअभावी तयार होतात. दुसऱ्या जातीच्या परागकणांचे सिंचन केले असता केवळ त्यापासून मिळणाऱ्या प्रेरणेने बीजहीन फळे मिळतात, तर कधी फलन झाल्यानंतर गर्भाची वाढ मध्येच थांबते पण फळ वाढत राहून त्यापासून बीजहीन फळ मिळते. बीजकात वाढणाऱ्या गर्भापासून काही प्रेरणा मिळून त्याचा फळाच्या वाढीवर बऱ्याच प्रमाणात परिणाम होत असला, तरी बीजहीन फळांत त्यांच्या वाढीसाठी लागणारी द्रव्ये ही बहुतांशी त्यांच्या किंजपुटातच उपस्थित असतात व वाढीला आरंभ होण्यासाठी केवळ काहीही चेतना मिळाली तरी पुरते. हल्ली कित्येक वनस्पतींमध्ये इंडॉल प्रॉपिऑनिक, इंडॉल ब्युटिरिक, फिनिल ॲसिटिक, फिनॉक्सी ॲसिटिक इ. अम्ले किंजलावर शिंपून कृत्रिम रीत्या बीजहीन फळे (उदा. टोमॅटो, कलिंगडे इ.) मिळविण्यात आली आहेत. फलधारणेच्या प्रक्रियेत रंदुकाचे गर्भात, पोषक कोशिकांचे पुष्कात (गर्भाबाहेरील अन्नांशात), प्रदेहाचे (बीजकातील मुख्य गाभ्याचे) परिपुष्कात (पुटकाबाहेरच्या अन्नांशात) व किंजपुटाचे फलावतरणात रुपांतर होत असताना कोशिकांचे विभाजन, त्यांच्या आकारमानात वाढ व प्रभेदन या वृद्धीच्या तीन मुख्य प्रक्रिया होत असतात. या सर्व क्रिया परस्परसंबंधित असून त्यांचा फळांच्या एकंदर वाढीवर परिणाम होत असतो. वास्तविक तसा प्रत्यक्ष संबंध नसतानाही कपाशीच्या बोंडात कापूस तयार होत असताना त्याच्या धाग्यांची लांबी बीजातील पुष्काच्या वाढीशी व जाडी गर्भाच्या वाढीशी अत्यंत निगडीत असते, असे आढळले आहे. फळांची वाढ होत असताना त्यांना आवश्यक ती सर्व द्रव्ये उपलब्ध करुन दिली जातात व कमी पडल्यास वनस्पतीची इतर वाढ रोखून पोषक द्रव्यांचा ओघ वाढणाऱ्या फळांच्या दिशेने केला जातो. वनस्पतीवरील सर्व फुलांचे फळात रुपांतर झाले, तर त्या सर्वांच्या वाढीकरिता लागणारी द्रव्ये पुरविणे शक्य होणार नाही म्हणून काही फुले व फळे गळून पडतात. अकाली गळणाऱ्या अपक्व फळांची गळती हॉर्मोनांचे शिंपण करुन थांबविता येते, यावरुन हॉर्मोनांद्वारे हे नियंत्रण ठेवले जात असावे असे दिसते. [→फळ].

अग्रप्रभाव : बहुधा प्रत्येक पानाच्या बगलेत एक कळी (मुकुल) असते तिची वाढ झाली असता तीपासून शाखा निर्माण होते परंतु सर्वच कळ्यांची अशी वाढ झाली, तर झाडावर शाखांची फारच गर्दी होईल म्हणून काही ठराविक कक्षास्थ कळ्यांचीच वाढ होऊन बाकीच्या निष्क्रिय राहतात. हा पक्षपात शेंड्याजवळील कक्षास्थ कळ्यांवरील प्रभावामुळे होत असतो. वनस्पतीचा शेंडा कापला, तर खालच्या कळ्या वाढू लागतात पण कापल्या जागी हॉर्मोने लावले असता खालच्या (कक्षास्थ) कळ्यांची वाढ परत थांबते यावरुन शेंड्यापासून निघणारी हॉर्मोने पार्श्विक कळ्यांची वाढ रोखतात, असे सिद्ध होते. कक्षास्थ कळ्यांच्या वाढीवरील शेंड्याच्या प्रभावामुळे होणाऱ्या नियंत्रणाच्या अभ्यासाने असे आढळले आहे की, जसजसे खाली जावे तसतसे कळ्या जास्त निष्क्रिय झालेल्या दिसतात. शेंडे कापले असता त्यांच्या अगदी निकटच्या खालच्या कक्षास्थ कळ्यांची वाढ होते. एकदा त्यांची वाढ सुरु झाली की, स्वतःच्या प्रभावाने त्या खालच्यांची वाढ रोखतात. याचे स्पष्टीकरण असे की, शेंड्यातून खाली येणाऱ्या हॉर्मोनांचे वाटप कमीजास्त प्रमाणात होते. कमी असताना ते कळ्यांच्या वाढीस मदत करते व जास्त असताना ते वाढ रोखते. शिवाय खोड आणि कळी ह्यांतील हॉर्मोनांचे सापेक्ष प्रमाणही नियंत्रण करीत असावे. हॉर्मोने वाढ रोखण्यास काही निरोधकेही निर्माण करीत असावीत किंवा वृद्धीस आवश्यक त्या पदार्थांचा ओघ बगलेतील कळ्यांकडे न वळविता शेंड्याकडे जात असावा, असेही समर्थन केले गेलेले आढळते.

काही वनस्पतींत कळ्यांची वाढ अनुकूल वातावरण प्राप्त झाल्याशिवाय होत नाही, तोपर्यंत त्या प्रसुप्तावस्थेतच राहतात. सर्वसाधारणपणे पानझडी वनस्पतींवर अशा कळ्या हिवाळ्यात जास्त असतात. ही प्रसुप्तावस्था हिवाळ्यातील कमी तासांच्या दिवसांमुळे निर्माण होत असते, कारण ही झाडे जास्त तासांच्या दिवसात वाढली, तर कळ्यांना प्रसुप्तावस्थाच येत नाही. शीतप्रक्रिया, ईथर, नायट्रोफिनॉल, एथिलीन, क्लोरोहायड्रीन यांसारख्या रासायनिक संयुगाद्वारे प्रसुप्त कळ्यांना जागृत (क्रियाशील) करण्यात यश आले आहे.

बीजी वनस्पतींचे प्रजोत्पादन सर्वसाधारणपणे बीजाकडून होत असते. बीज हा वनस्पतींचा असा एक अवयव आहे की, वातावरणातील अनेक बदल तो सहन करु शकतो. अनुकूल परिस्थितीत बीज रुजून वनस्पतीचा वंश चालू होतो. [→अंकुरण बीज].

वृद्धीतील आवर्तिता : वनस्पतींच्या वाढीच्या निरनिराळ्या अवस्था असतात. उदा., कंदयुक्त वनस्पतींच्या प्ररोहाग्रापासून आधी शल्कपर्ण, त्यानंतर नित्य पाने व शेवटी फुले या ठराविक आवर्तनात वाढ होते. प्ररोहाग्राचे शेवटी फुलात रुपांतर होऊन त्याची वाढ संपल्याने कक्षास्थ कळ्यांची वाढ सुरू होते. याच प्रकारे, इतर वनस्पतींतील वाढही काही ठराविक क्रमाने होते. प्रत्येक दिवस व रात्रीतील आणि वर्षाच्या भिन्न ऋतूंतील प्रकाश व उष्णतेच्या प्रभावाने वृद्धीत आवर्तने व चढउतार होतात. काही बांबूंच्या जाती दर अकरा ते तेहतीस वर्षांतून एकदाच फुलतात [→बांबू] आणि कारवी हे झुडूप श्रीलंका, जावा व भारत येथे चार किंवा सात वर्षांतून एकदा फुलते. पाने, फुले व फळे यांमध्ये विभाजक थर निर्माण होऊन [→अपाच्छेदन व पानझड] ती गळून पडणे हा प्रकार वृद्धीत समाविष्ट होतो. शरद ऋतूत पाने गळणे, बिजकांची (अपक्व बीजांची) वाढ न झाल्याने किंजपुट (स्त्रीकेसराचा तळभाग) गळून पडणे, फळांची वाढ होताना इतर पुष्पदले गळून पडणे इ. क्रिया वृद्धीशी संलग्न असल्याने हॉर्मोनांचा परिणाम म्हणून होतात, कारण गळणाऱ्या पानांच्या व फळांच्या देठावर वृद्धि-हॉर्मोनांचे शिंपण केले असता त्यांची गळती थांबते व पानांचे पाते कापले असता न गळणारे पानही देठासकट गळून पडते. वनस्पतींच्या शरीरावर होणाऱ्या जखमांवर किंवा जवळपास नवीन ऊतकनिर्मिती होऊन ‘जखम बरी होते’ त्यावेळीही तेथे वृद्धि-हॉर्मोन क्रियाशील असते.

वनस्पतींची वृद्धी दर ताशी, दिवसा-रात्री व वर्षाच्या सर्व ऋतूंत सारख्या गतीने होत नसून निरनिराळ्या वेळी एका ठराविक आवर्तनात तिचा ठराविक अनुक्रम असतो व त्यात एक प्रकारची लयबद्धता आढळते. वनस्पतीच्या प्रत्येक क्रियाशील अवयवात दिवसाच्या व रात्रीतील वाढीत फरक आढळतो. खोडाच्या लांबीतील फरक, पानांच्या रुंदीतील फरक व फळांच्या आकारमानातील फरक यांद्वारे वृद्धीचा अभ्यास करण्यात आला आहे. दिवसा-मासातील वृद्धीला तापमान, अंतर्गत जलसंबंध व प्रकाश हे तीन घटक मुख्यतः कारणीभूत असतात. तापमान फारच वाढले, तर त्याचा वृद्धीवर विपरीत परिणाम होतो. त्याचप्रमाणे अतिथंड हवामानातही वृद्धीचा ऱ्हास होतो. भिन्न वनस्पतींत दिवसाच्या २४ तासांत जास्तीत जास्त वृद्धी काहींत सकाळी, काहींत दुपारी तर काहींत सायंकाळी होते. आकाशातून सरकत जाणाऱ्या ढगांमुळे पडलेल्या तत्कालीन सावलीमुळे मक्याची जास्त वृद्धी झाल्याचे आढळले आहे. वनस्पतीचे तापमान, बाष्पोच्छ्‌वास व ⇨प्रकाशसंश्लेषण  यांद्वारे प्रकाशाचा वृद्धीवर विशेष परिणाम होतो व त्याचे प्रत्यंतर वृद्धीत येते. पाण्याच्या प्रमाणामुळे विशेषतः अतिशय शुष्क अवस्थेत, वनस्पतीचे अंतर्गत जलसंबंध बिघडल्यास वृद्धी कमी होते. वर्षातील भिन्न ऋतूंतही वनस्पतीची कमी-जास्त वृद्धी असते यालाही तापमान, पाणी व प्रकाश ह्यांसारखे बाह्य घटक व जनुकविधा, प्रसुप्तावस्था, निरनिराळ्या अवयवांतील परस्परसंबंध व अंतर्गत पाण्याची वाटणी यांसारखे अंतस्थ घटक कारणीभूत असतात. भिन्न वनस्पतींवरील कळ्या निर्माण झाल्यावर काही काळ प्रसुप्तावस्थेत राहून वर्षातील अनुकूल ऋतूचे आगमन होताच ती अवस्था संपवून नवीन अंकूर निर्माण करतात. काही वनस्पती ठराविक ऋतूतच फुलतात व त्यांना फळे येतात.⇨ऊतककराची  वाढ ही ऋतुमानाप्रमाणे कमी-जास्त होऊन तयार होणारी वार्षिक वलये सर्वपरिचितच आहेत. तुलनात्मक दृष्ट्या मुळात होणाऱ्या वृद्धीच्या आवर्तितेवर कमी अभ्यास झाला असून त्याविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे.

आ. २. वनस्पतीच्या वृद्धीचा वक्र : वनस्पतीच्या एकेका नमुन्यांची प्रत्यक्ष वजने वक्राशेजारील वर्तुळे दर्शवितात.

वृद्धिमापन : वृद्धीचे मापन हे अनेक प्रकारे करता येते. वनस्पतीच्या ओल्या किंवा सुक्या स्थितीतील स्थूल वजनातील वाढ लक्षात घेऊन वृद्धीची कल्पना येऊ शकेल परंतु वाढ पूर्ण झाली तरीही वनस्पतीच्या सुकलेल्या स्थितीतील वजनात वाढ होत राहू शकत असल्याने वृद्धीमुळे उंचीत, लांबीत किंवा आकारमानात होणारी वाढ हे वृद्धीचे एक सोयीस्कर माप प्रचारात आहे. वनस्पतींची वाढ ही सुरुवातीच्या काळात मंद गतीने होत असून ती हळूहळू वाढत जाते व कमाल मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर ती काही काळ कायम राहून पुढे कमीकमी होत जाते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास लागणाऱ्या अवधीस ‘समग्र वृद्धिकाल’ म्हणतात. आलेखाद्वारे ही (ज्वारीची) वाढ आ. २ मध्ये दाखविल्याप्रमाणे अवग्रहाकारी (सिग्मॉइड) रेषाकृती होते. वनस्पती लावल्यानंतरचे दिवस ही रेषाकृती सर्व प्रकारच्या वनस्पतींसाठी कायम असून केवळ वातावरणातील घटकांमध्ये फारच बदल झाले असता तिचे विचलन होते.

वृद्धीचे मापन हे वनस्पतींच्या प्रकाराप्रमाणे निरनिराळ्या पद्धतींनी करण्यात येते. काही शैवले, सूक्ष्मजंतू व किण्व (कवक) यांसारख्या एककोशिक वनस्पतींमध्ये कोशिकांच्या संख्येत झालेली वाढ हे वृद्धीचे माप धरण्यात येते. कोशिकांच्या संख्येतील वाढ हे माप पान, खोड, मूळ वगैरे अवयवांच्या संदर्भात वापरणे तितकेसे विश्वासार्ह नसून जेथे त्याचा तसा उपयोग केला गेला, तेथे हे काम बरेच किचकट असल्याचे दिसून आले आहे. संख्येतील वाढीप्रमाणेच आकारमानातील वाढ लक्षात घेऊन विशेषतः गोलाकृती एककोशिक वनस्पती किंवा फळे यांच्या वृद्धीचे मापन करता येते. प्ररोह, मूळ, पान किंवा खोडाचा घेर इत्यादींची वृद्धीमुळे होणारी वाढ ही लांबी, रंदी व उंची यांच्यातील वाढीचे मोजमाप करुन करणे सोयीचे असते परंतु हे मापही फसवे असू शकते. कारण एखादी वनस्पती अंधारात वाढविली असता ती तिच्याच वयाच्या इतर वनस्पतींपेक्षा जास्त उंच वाढते. वनस्पतीचे शुष्क स्थितीतील वजन हे वृद्धीचे माप आजकाल फार प्रचलित असून बरेचसे विश्वासार्ह आहे. काही वनस्पतींच्या बाबतीत मात्र त्यांचे ओल्या स्थितीतील वजन हे वृद्धीचे माप धरण्यात येते त्यात एक मोठा फायदा असा की, या पद्धतीत वनस्पतींना कोणतीही इजा न होता तिच्यातील वाढ मोजता येते. वृद्धिमापनाच्या या सर्व पद्धतींमध्ये काही फायदे-तोटे आहेतच परंतु त्या त्या पद्धतीमधील पथ्ये पाळली असता वृद्धीचे बऱ्याच अंशी अचूक मोजमाप करता येते.

वृद्धी व ऊतकसंवर्धन : वनस्पतींच्या कोशिका, ऊतके व अवयव वेगळे करुन त्यांची कृत्रिम खाद्यावर वाढ करता येणे ऊतकसंवर्धनाद्वारे अलीकडे शक्य झाले आहे. कोशिकांची कृत्रिम खाद्यावर निर्जंतुक वातावरणात वाढ करुन त्यांपासून मिळणाऱ्या किणाच्या (कॅलसच्या) एका कोशिकेपासून अनुकूल वातावरणात व आवश्यक त्या सर्व घटकांचा पोषणद्रव्यात समावेश केला असता त्या प्रकारची संपूर्ण वनस्पती तयार होऊ शकते. वनस्पतीत रंदुकापासून जसा गर्भ तयार होऊन त्याची वाढ झाल्याने बीज व बीजापासून परत वनस्पती मिळते तसेच ती त्या वनस्पतीच्या एखाद्या स्थातुकापसूनही मिळू शकते, हे एफ्. सी. स्ट्यूअर्ट यांनी गाजराच्या बाबतीत सिद्ध करुन दाखविले आहे. [→ ऊतकसंवर्धन].

वनस्पतींच्या वृद्धीवरील या विवेचनाच्या शेवटी कृत्रिम रीत्या वनस्पतींची वाढ इच्छेनुसार रोखता येणे आज कसे शक्य झाले आहे याची थोडी फार कल्पना देणे अप्रस्तुत ठरणार नाही. काही कार्बनी संयुगांचा वनस्पतींची वाढ रोखण्यासाठी निरोधकासारखा उपयोग होऊ लागला आहे. तणनाशक म्हणून २, ४-डी (२, ४-डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक अम्ल) किंवा एमसीपीए (२-मिथिल-४-क्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक अम्ल) याचा सर्रास उपयोग आज केला जात आहे. यांचे उच्च संहतीचे शिंपण केले असता मोठ्या व रुंद पानांच्या वनस्पतींचा नाश होऊन गवताच्या कुलातील [ज्यात बरीच धान्यपिके, ऊस वगैरेंचा समावेश आहे अशा→ग्रॅमिनी] वनस्पतींवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. शीतगृहात साठवण करुनही बटाट्यांना कोंब येतात व त्यामुळे त्यांना बाजारात किंमत येत नाही, ही नित्याची बाब होय यासाठी नॅप्थॅलीन ॲसिटिक अम्लाचे फवारे मारुन किंवा त्याच्या विद्रावात भिजलेले टीपकागदाचे कपटे बटाट्यांत पसरून ठेवले असता त्यांचा प्रसुप्तावस्थेचा काल वाढून साहजिकच कोंब फुटत नाहीत. त्याचप्रमाणे काही फळझाडांमध्येही त्यांना नेहमीपेक्षा उशीरा फुले आणून नंतर फळे लागल्यामुळे अतिशीत हवामानात होणारे फळांचे नुकसान टाळण्यात यश आले आहे. फळझाडे व फुलझाडे यांच्या कलमांचा साठा करुन त्यांना अवेळी मुळ्या फुटू नयेत म्हणूनही निरोधकांचा उपयोग केला जातो.

बुटके वृक्ष : मोठ्या मोठ्या वृक्षांची कलमे लावून किंवा त्यांच्या बीजांपासून वाढ नियंत्रित करुन केलेले ‘बुटके वृक्ष’ जपानमध्ये ⇨बॉनसाई  या नावाने प्रसिद्ध असून अंतर्सजावटीसाठी असे वृक्ष तयार करण्याचा एक उद्योगच तेथे अस्तित्वात आहे. मुळ्या कापणे, पानांचे आकारमान कमी करणे, कळ्या कमी करणे इ. प्रक्रियेने त्या वनस्पतींची वाढ रोखण्यात येते. वाढीसाठी आवश्यक त्या अंतर्बाह्य घटकांवर नियंत्रण ठेवून झाड हे जीवन व मृत्यूच्या सीमेवर ठेवण्यात येते. वनस्पतीचे एकंदर चयापचयच कमी केल्यामुळे वाढ कमी होऊन बुटके अथवा लघू वृक्ष तयार होतात. लहानशा कुंडीत हुबेहुब मोठ्या वृक्षासारखे पण आकारमानाने अतिशय कमी अशा शोभिवंत बॉनसाई वनस्पतींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली आहे. या वृक्षांची पाने, फुले, फळे वगैरे सर्वच भाग लहान होत असून सुचिपर्ण [शंकुमंत → कॉनिफेरेलीझ] वृक्षासारख्या सु. ९० मी. उंच वाढणाऱ्या वृक्षांचे फक्त ६० सेंमी. इतक्या कमी उंचीचे बॉंनसाई तयार करण्यात आले असून त्यांना १००-३०० वर्षे जगविता येते. [→ बॉनसाई].

पहा : अंकुरण; कृषि रसायनशास्त्र; गर्भविज्ञान; चयापचय; जीवजलवायुविज्ञान; पुनर्जनन; प्रकाशसंश्लेषण; प्रसुप्तावस्था; बॉनसाई; विभज्या; वृद्धिनियंत्रक, वनस्पतींतील; श्वसन, वनस्पतींचे; हॉर्मोने.

संदर्भ : 1. Audus, L.J. Plant Growth Substances, New York, 1965.

2. Went, F. W. and others, Experimental Control of Plant Growth, New York, 1957.

सप्रे, अ. ब.; परांडेकर. शं. आ.