वूहू : चीनच्या आन्हवे प्रांतातील प्रमुख औद्योगिक आणि व्यापारी केंद्र तसेच महत्त्वाचे नदीबंदर. लोकसंख्या ३,८५,८०० (१९८५ अंदाज). यांगत्सी नदीच्या त्रिभुज प्रदेशात, नदीमुख खाडीच्या उजव्या काठावर वूहू वसलेले असून भरतीच्या वेळी पाण्याची पातळी शहरापर्यंत वाढते. उत्तरेकडील ८८ किमी.वरील नानकिंगशी रेल्वेने, तर १३० किमी.वरील ताइपिंगशान या चहाच्या व्यापारकेंद्राशी कालव्याने (यातून गलबते व स्टीमर बोटींनी वाहतुक चालते) जोडलेले आहे.
दुसऱ्या महायुध्दापूर्वी स्थानिक व्यापारात शांघाय व नानकिंगखालोखाल याचाच क्रमांक होता. देशाच्या एकूण विदेशी व्यापारापैकी १० टक्के व्यापार येथून चालत असे. विशेषतः जपानला तांदूळ, चहा, द्विदलधान्ये, तेलबिया, अशोधित लोखंड (१९३८–४५ या काळात जास्त प्रमाणात) यांची निर्यात येथून होत असे. दरम्यानच्या काळात रस्ते व लोहमार्गांनी हे महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडण्यात आले. आसमंतातील शेतमालाचे (तांदूळ, चहा, कापूस व गहू) हे महत्त्वाचे वितरण व प्रक्रिया केंद्र समजण्यात येते. कोळसा व लोहखनिज यांच्या सान्निध्यामुळे हे औद्योगिकदृष्ट्याही विकास पावले आहे. लोखंड व लोखंडी वस्तुनिर्मिती, पीठ, भातसडीच्या तसेच कापड, तेल इत्यादींच्या गिरण्या, अंडी-प्रक्रिया, कागद, स्वयंचलित यंत्रे यांची निर्मिती यांसारखे उद्योग येथे स्थिरावले आहेत.
चौधरी, वसंत