वूजो : जुने नाव त्सांगवू. चीनच्या आग्नेय भागातील ग्वांगसीच्वांग या स्वायत्त प्रदेशातील एक शहर. लोकसंख्या १,९०,३०० (१९८५ अंदाज). कँटनच्या पश्चिमेस १८५ किमी., ग्वांगसीच्वांग प्रदेशाच्या पूर्व सरहद्दीजवळ, शी  व ग्वे या नद्यांच्या संगमावर हे वसले आहे. इ. स. पू. पहिल्या शतकात व्कांगसीन नावाने हे परगण्याचे प्रशासकीय केंद्र होते. इ.स. ५८९ मध्ये त्याचे नाव त्सांगवू असे बदलण्यात आले. १९४६ मध्ये वूजो नावाने येथे नगरपालिकेची स्थापना झाली. थांग ( इ.स.६१८-९०६) मिंग (१३६८–१६४४) व मांचू ( १६४४–१९१२) या राजवटींत येथे राजेशाहीचे शासन होते. बाराव्या व तेराव्या शतकांत येथे मोठ्या प्रमाणावर चिनी वसाहत वाढू लागली. दुसऱ्या महायुध्दात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा महत्त्वाचा हवाई तळ येथे होता. संयुक्त संस्थानांच्या हवाई दलाने जपानी सैन्याचा चीनमधील हल्ला येथूनच परतवून लावला. १९४४-४५ मध्ये अल्पकाळ हे जपानच्या ताब्यात होते.

ग्वांगसीच्वांग, नैर्ऋत्य चीन तसेच किनाऱ्यावरील कँटन प्रदेश यांना जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवर अगदी मोक्याच्या ठिकाणी वूजो असल्याने आर्थिक व व्यापारी दृष्ट्या यास फार महत्त्व आहे. कँटन व हाँगकाँग येथून वूजोपर्यंत शी नदीतून १,००० टन वजनापर्यंतची मोठी जहाजे जाऊ शकतात. ग्रेट ब्रिटनशी झालेल्या करारानुसार १८९७ साली वूजो विदेशी व्यापारासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर जर्मनी व ग्रेट ब्रिटनशी आणि पुढे रशियाशीही या शहराचा व्यापार बराच वाढला. येथून लोखंडी पत्रे, अँटिमनी व टंगस्टन खनिजे, लाकूड, नीळ यांची निर्यात व कापूस, लोकरी वस्तू, धातू उत्पादने, कोळसा, कागद, सिगारेटी, साखर यांची आयात केली जाते. १९२० व ३० च्या दशकांत येथे बरेच उद्योगधंदे स्थापन झाले. त्यांत औषेधे व गंधकाम्ल निर्मिती महत्त्वाची होती. चीन-जपान युध्दात (१९३७–४५) येथील बहुतांश कारखाने उदध्वस्त झाले. १९४९ पासून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. रेशीम प्रक्रिया, सूत कताई, कापडनिर्मिती, साखर, रसायने (मुख्यतः गंधकाम्ल), अन्नप्रक्रिया, जहाजबांधणी व दुरुस्ती, लाकूड उत्पादने, भातसडीच्या गिरण्या , अभियांत्रिकी इ. उद्योगधंदे शहरात चालतात. शहराच्या जवळच सोन्याचे साठे सापडले आहेत. वूजोच्या परिसरात बांबू, तृणधान्ये, तांदूळ, गहू यांचे उत्पादन होते. ग्वांगसी प्रांतीय विद्यापीठ येथे आहे.              

अनपट, रा. ल.