वुस्टर–३ : दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाच्या केप प्रांतातील एक नगर. लोकसंख्या ७६,८९४ (१९९६–अंदाज). केप प्रातांच्या नैर्ऋत्य भागातील ड्युटॉइट्स व हेक्स रिव्हर या पर्वतीय प्रदेशांच्या दरम्यान असलेल्या ब्रे नदीखोऱ्यात हे नगर वसले आहे. केपटाउनच्या पूर्व ईशान्येस सु. ९६ किमी. वर वुस्टर आहे. १८२० मध्ये या नगराची स्थापना झाली. केप ऑफ गुड होप कॉलनीचा गव्हर्नर मार्व्किस ऑफ वुस्टर याच्यावरून नगराला वुस्टर हे नाव देण्यात आले. ब्रे नदीपासून वुस्टरभोवतालच्या कृषीक्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. त्यातून फळे व भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. फळे व भाजीपाला यांवर येथेच वेगवेगळ्या प्रक्रिया करून डबाबंदीकरण केले जाते. द्राक्षापासून दारू तयार करण्याचे हे महत्त्वाचे केंद्र आहे. नगरात धातू व वस्त्रे, विविध मद्ये, लाकडी सामान, ॲस्बेस्टसचे पत्रे, विटा इत्यादींचे निर्मितीउद्योग आहेत. येथील वुस्टर औष्णिक वीज उत्पादन केंद्रातून जवळपासच्या रेल्वेला वीज पुरविली जाते. अंध व बधिरांसाठीची शाळा, केप टेक्निकल कॉलेज, कॉलेज फॉर कॉलोरेड टीचर्स, ‘ड्रॉस्टे’ हे राष्ट्रीय स्मारक (१८२५), ‘आफ्रिकानेर म्यूझीयम’ या शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था येथे आहेत. नगराच्या उत्तरेस जवळच १०७ हेक्टर क्षेत्रातील कारू वनस्पतिउद्यान प्रसिध्द आहे.