वुस्टर–१ : इंग्लंडच्या हरफर्ड अँड वुस्टर (१९७४ पूर्वीचे हरफर्डशर अँड वुस्टरशर) परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ९५,३०० (१९९८–अंदाज). इंग्लंडच्या पश्चिम मध्यभागात, सेव्हर्न नदीच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले हे शहर लंडनपासून वायव्येस सु. १९० किमी. अंतरावर आहे. इतिहासप्रसिध्द इंग्लिश कॅथीड्रलचे शहर तसेच प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून वुस्टरची ख्याती आहे.
येथे सापडलेल्या अवशेषांवरून रोमन किंवा त्यापूर्वीच्या काळातही येथे वस्ती असल्याचे आढळते. शहराच्या नावातील ‘सेस्टर’ (लॅटिन–कॅस्ट्रा म्हणजे कँप-छावणी) या शब्दावरूनही येथे पूर्वी रोमनांची वस्ती असल्याचे अनुमान काढले जाते. डेन लोकांनी दोन वेळा हे शहर पादाक्रांत केले होते. १०८६ मध्ये येथे किल्ला, कॅथीड्रल, थोडीशी वस्ती व त्याभोवती एक उंच तट आणि खोल खंदक होता. १३१३ मध्ये वुस्टर शहराजवळ सेव्हर्न नदीवर एक पूल बांधण्यात आला.
इ. स. १६५१ मध्ये येथे झालेल्या लढाईनंतर इंग्लंडची यादवी युध्दे संपुष्टात आली व त्यामुळे इंग्लंडच्या इतिहासात वुस्टरला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. दुसऱ्या चार्ल्स राजाने पुन्हा सत्ता बळकाविण्याच्या इराद्याने आपल्या समवेत स्कॉटिश सैन्य गोळा करून दक्षिणेस कूच केले. २२ ऑगस्ट १६५१ रोजी तो सैन्यासह वुस्टरला पोहोचला, त्याने तेथील ‘कमांडरी’ या सोळाव्या शतकात बांधलेल्या वास्तूचा ताबा घेतला व ते आपले मुख्य ठाणे बनविले. पार्लमेंट पक्षाचा सेनाप्रमुख ऑलिव्हर क्रॉमवेल व जॉन लँबर्ट यांनी दुसरा चार्ल्स व स्कॉटिश सैन्याचा वुस्टर येथे पराभव केला. परिणामी दुसऱ्या चार्ल्सला फ्रान्सला पळून जावे लागले.
तेराव्या शतकाच्या सुरूवातीपासून येथे लोकर तसेच हातमोजे व पायमोजे निर्मितीउद्योग भरभराटीस आले होते. १७५० मध्ये जॉन व्हॉल याने चिनी मातीची भांडी बनविण्याचा उद्योग येथे सुरू केला. १८४५ पासून येथे प्रसिध्द अशा ‘वुस्टरशर सॉस’ चे उत्पादन चालू आहे. याशिवाय हलक्या अभियांत्रिकी वस्तू, रसायने, कपडे, धातू व चामड्याच्या वस्तू, मद्यनिर्मिती इ. अनेक उद्योगधंदे शहरात चालतात. हे शहर प्रगत कृषी क्षेत्राच्या मध्यभागी असून तेथे फळे, विशेषतः मद्याला चव आणण्यासाठी लागणारी हॉप फळे, पिकविली जातात.
वुस्टरच्या ऐतिहासिक घडामोडींवर येथील कॅथीड्रलचा प्रभाव आढळतो. ६७९ मध्ये व्हिट्बीच्या बॉझेल या मठवासियाने येथील पहिले बिशपपद भूषविले. ९८३ मध्ये बिश्प ऑझ्वल्ड (सेंट ऑझ्वल्ड) यांनी येथे एक नवीन कॅथीड्रल उभारले. सांप्रत या कॅथीड्रलचे भुयार वगळता बाकी सर्व बांधकाम नष्ट झाले आहे. सध्याची चर्चची वास्तू ही १०८४ मध्ये सेंट वुल्फस्टन याने बांधण्यास प्रारंभ केला. हे बांधकाम चौदाव्या शतकापर्यंत चालू होते. तेव्हापासूनच वुस्टर कॅथीड्रलचा लौकिक आहे. नंतरच्या कालखंडात या कॅथीड्रलच्या रचनेत अनेक वेळा फेरबदल करण्यात आले. त्याची पुनर्रचना १८५७–७४ या काळात करण्यात आली. वेगवेगळ्या कालखंडांत याची पुनर्रचना करण्यात आल्यामुळे बांधकामात नॉर्मन, इंग्लिश, गॉथिक अशा विविध वास्तुशिल्पांचा मिलाफ झाल्याचे आढळते. कॅथीड्रलमधील प्रेक्षणीय स्मारकांमध्ये जॉन राजाचे स्मारक व राजपुत्र आर्थर याचे प्रार्थनागृह यांचा अंतर्भाव होतो. याशिवाय शहरात ऐतिहासिक तसेच वास्तुशैलीच्या दृष्टीने उल्लेखनीय अनेक इमारती आढळतात. नॉर्मन व गॉथिक वास्तुकलेची उत्तम उदाहरणे असलेली अकरा पॅरिश चर्च या शहरात आहेत. १०८५ मधील ‘कमांडरी’ वसतिगृह, गिल्डहॉल (१७२१–२३) व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूट ह्या इतर महत्त्वाच्या इमारती आहेत. कमांडरीमध्ये सुरूवातीला रूग्णालय होते. १९५४ मध्ये कमांडरीची दुरुस्ती करण्यात आली. व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटमध्ये सार्वजनिक ग्रंथालय, कलावीथी व वस्तुसंग्रहालय आहे. इ. स. ६८० पासून अस्तित्वात असलेल्या सॅक्सन चर्चच्या बाजूलाच पंधराव्या शतकातील सेंट हेलेना चर्च आहे. नॉर्मनांच्या शतकभराच्या काळात शहर सहा वेळा आगीच्या भक्षस्थानी पडले. त्यातून प्रसिध्द गॉथिक चर्चसारख्या काही प्राचीन सुंदर वास्तु वाचल्या.
आठव्या हेन्रीने १५४१ मध्ये येथे ‘कॅथीड्रल ग्रामर स्कूल’ (किंग्ज स्कूल) ची स्थापना केली. रॉयल ग्रामर स्कूल ही संस्था १५६१ पासून येथे आहे. देशातील प्रसिध्द क्रिकेट मैदान तसेच घोड्यांच्या शर्यतीचे मैदान येथे आहे. देशातील जुन्या काळातील प्रसिध्द अशी वृत्तपत्रे वुस्टरमधून निघत असत. १६९० पासून वृत्तपत्र म्हणून चालू असलेले बेरोज वुस्टर जर्नल हे नियतकालिक येथूनच प्रसिध्द होते.
देशपांडे, सु. चिं.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..