वुडहाउस, पेलॲम ग्रॅन्व्हिल : (१५ ऑक्टोबर १८८१–१४ फेब्रुवारी १९७५). विसाव्या शतकातील अग्रगण्य इंग्रज विनोदकार. इंग्लंडमधील गिल्फर्ड (परगणा सरे) ह्या गावी जन्म. शिक्षण लंडनच्या डलिज कॉलेजात. पदवीधर झाल्यानंतर (१९००) दोन वर्षे एका बँकेत नोकरी केली पण त्यानंतर लेखन हाच व्यवसाय स्वीकारला. आरंभी लंडनच्या ग्लोब ह्या नियतकालिकात मुलांसाठी स्तंभलेखन त्यानंतर कॅप्टन ह्या नियतकालिकात मुलांच्या शालेय जीवनाशी संबंधित अशा अनेक विनोदी कथांचे लेखन. त्यांनी निर्माण केलेल्या विख्यात व्यक्तिरेखांपैकी स्मिथ ही व्यक्तिरेखा प्रथम ह्याच गोष्टींतून अवतरली. १९०९ मध्ये ते अमेरिकेत गेले आणि तेथील सॅटर्डे ईव्ह्निंग न्यूज ह्या साप्ताहिकात लिहू लागले. १९३५ पर्यंतचे त्यांचे लेखन ह्याच साप्ताहिकात प्रसिध्द झाले. त्यांच्या आरंभीच्या लेखनात शालेय जीवन, तिथल्या गमतीजमती, विद्यार्थि-शिक्षक ह्यांच्यात घडून येणारे विनोदी प्रसंग बरेच येतात. समथिंग न्यू (१९१३) [इंग्लंडमध्ये समथिंग फ्रेश (१९१५) ह्या नावाने प्रकाशित.] ह्या पुस्तकापासून त्यांच्या विनोदी लेखनाने निराळे वळण घेतले व पुढे मॅन विथ टू लेफ्ट फीट (१९१७), पिकॅडली जिम (१९१८), लीव्ह इट टू स्मिथ (१९२३), द इन्इमिटेबल जीव्ह्ज (१९२४) ह्यांसारख्या पुस्तकांनी लोकप्रिय विनोदकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली.
इंग्लंडमधील उच्चवर्गीयांतील तऱ्हेवाईकपणा, जुन्याला चिकटून राहण्याचा त्यांचा हास्यास्पद अट्टाहास, त्यांचे चमत्कारिक छंद व सवयी यांची ते हसत हसत टर उडवतात. त्यांचे लेखन म्हणचे ह्या लोकांच्या जीवनपध्दतीची खिल्ली उडवणारे ‘फार्स’ आहेत. हास्यनिर्मितीसाठी अतिशयोक्ती, विस्मयजनक गुंतागुंत, फार्सिकल घटना, पात्रांची विडंबनचित्रे (कॅरिकेचर्स) इत्यादींचा वापर ते कौशल्याने करतात. गोष्टींतील गुंतागुंत सोडविण्यासाठी त्यांनी वापरलेल्या युक्त्या असंभाव्य वाटल्या, तरी विनोदनिर्मितीसाठी भाषा हवी तशी वाकवण्याच्या त्यांच्या सामर्थ्यामुळे वाचक त्या असंभाव्यतेकडेही आनंदाने दुर्लक्ष करतात.
“