वुड, रॉबर्ट विल्यम्झ : (२ मे १८६८–११ ऑगस्ट १९५५). अमेरिकन भौतिकीविज्ञ.भौतिकीय प्रकाशकीसंबंधी, विशेषतः वर्णपटविज्ञानासंबंधी, केलेल्या कार्याबद्दल सुप्रसिध्द. द्रव्याकडून प्रकीर्णित झालेल्या (विखरून टाकलेल्या) प्रकाशाच्या विश्लेषणाद्वारे द्रव्याचे अध्ययन करण्याच्या उपयुक्त तंत्राला रामन वर्णपविज्ञान म्हणतात. त्यांनी या तंत्राचा व्यापक उपयोग केला [ → वर्णपटविज्ञान]. त्यांना मिळालेल्या अत्यंत महत्त्वाच्या प्रायोगिक निष्कर्षांमुळे अणुभौतिकीच्या विकासाला मदत झाली. त्यांनी ध्वनितरंगांचे छायाचित्रण, श्राव्यातीत प्रारणाचे (ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेग असलेल्या तरंगरूपी ऊर्जेचे) गुणधर्म, रंगीत छायाचित्रण, ⇨रेणवीय भौतिकी, ⇨जीवभौतिकी, अतिपरिशुध्द विवर्तन जालक तयार करणे, अनुस्फुरण (प्रारणाने वा इलेक्ट्रॉनांच्या प्रभावाने द्रव्याकडून प्रकाशाचे उत्सर्जन होण्याची क्रिया) आणि वैज्ञानिक पध्दतीने गुन्हाशोध अशा वैज्ञानिक व तांत्रिक क्षेत्रांमध्ये मूलभूत स्वरूपाचे कार्य केले.
वुड हे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात प्रकाश हा विषय शिकवीत. त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ वायू आणि बाष्प प्रकाशीय गुणधर्मांवर मुख्यतः मूलभूत संशोधन केले. विशेषतः सोडियम बाष्पावरील त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. बोर सिध्दांत वुड आणि इतरांनी पुरविलेल्या वर्णपटविज्ञानीय प्रदत्तावर (माहितीवर) मोठ्या प्रमाणात अवलंबून होता. १९०३–२० या काळात वुड यांनी वर्णपट रेषांवर विद्युत् व चुंबकीय क्षेत्रांचा होणारा परिणाम, अनुस्फुरण आणि बाष्पांचे अनुस्पंदन प्रारण या विषयांवर मूलभूत प्रायोगिक कार्य केले. त्यांनी विवर्तन जालकात सुधारणा करून (उदा.अगदी जवळ असलेल्या रेषा आखणे) प्रकाशीय वर्णपटविज्ञानातील संशोधनाला मोठ्या प्रमाणात उत्तेजन दिले. त्यांनी वर्णपटमापन पध्दतीमध्ये केलेल्या सुधारणा खगोल भौतिकीमध्ये उपयुक्त ठरल्या आहेत. त्यांनी ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासात वापरल्या जाणाऱ्या इतर वर्णपटमापक पध्दतीतही सुधारणा केल्या. रंगीत छायाचित्रणाच्या विवर्तन पध्दतीसंबंधी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ड्रेझ्डेनच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सन्माननीय पदक मिळाले.