हर्ट्झ, हाइन्रिख रूडोल्फ : (२२ फेब्रुवारी १८५७–१ जानेवारी १८९४). जर्मन भौतिकीविज्ञ. त्यांनी रेडिओ तरंगांच्या प्रेषणाचे आणि ग्रहणाचे यशस्वी प्रात्यक्षिक सर्वप्रथम करून दाखविले.

हर्ट्झ यांचा जन्म हँबर्ग (जर्मनी) येथे झाला. बर्लिन विद्यापीठातून त्यांनी पीएच्.डी. पदवी संपादन केली (१८८०). या काळात त्यांना ⇨ हेर्मान फोन हेल्महोल्ट्स यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी १८८३ मध्ये ⇨ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांच्या विद्युत् चुंबकीय तरंगांविषयीच्या सिद्धांताच्या अभ्यासास सुरुवात केली. १८८५–८९ दरम्यान ते कार्लझ्रूए येथील तांत्रिक विद्यालयात भौतिकीचे प्राध्यापक होते. त्यानंतर त्यांची १८८९ मध्ये बॉन विद्यापीठात भौतिकीच्या प्राध्यापक पदावर नेमणूक झाली. तेथे त्यांनी विरल केलेल्या वायूंमधील विद्युत् विसर्जनविषयक आपले संशोधन चालू ठेवले.

हर्ट्झ यांनी प्रयोगशाळेत विद्युत् चुंबकीय तरंग निर्माण केले आणित्यांची लांबी व वेग यांचे मापन केले. विद्युत् चुंबकीय तरंगांच्या कंपनांचे स्वरूप आणि परावर्तन व प्रणमन यांविषयीची त्यांची प्रवणता हे प्रकाशव उष्णता यांच्या तरंगांसारखीच असते असे त्यांनी दाखविले. परिणामतः प्रकाश व उष्णता हे विद्युत् चुंबकीय प्रारण असतात असे निःसंदिग्धपणे सिद्ध झाले.

हर्ट्झ यांचे संशोधनपर निबंध इंग्रजीत भाषांतरित करून पुढील तीन खंडांत प्रकाशित करण्यात आलेले आहेत : इलेक्ट्रिक वेव्ह्ज (१८९३) मिसेलेनिअस पेपर्स (१८९६) आणि प्रिन्सिपल्स ऑफ मेकॅनिक्स (१८९९).

हर्ट्झ यांचे बॉन येथे निधन झाले.

भदे, व. ग.