वीर धरण : महाराष्ट्र राज्यातील नीरा नदीवरील धरण. हे सातारा जिल्ह्यातील खंडाळा व पुणे जिल्ह्यातील पुरंदर या तालुक्यांच्या सरहद्दीवर वीर गावाजवळ बांधलेले असून ते पुण्याच्या अग्नेयेस सु. ६४ किमी. अंतरावर आहे.
भाटघर येथील लॉइड धरणाबरोबरच त्याच्या पूर्वेस सु. २७ किमी. अंतरावर वीर येथे सुरूवातीला उद्ग्रहण बंधारा बांधण्यात आला. लॉइड धरणातील पाणी नदीपात्रात सोडून या बंधाऱ्यात आणले जात असे व तेथून कालव्यांद्वारा शेतीला पुरविले जात असे. त्यावेळी या बंधाऱ्याजवळ पाण्याची खोली सु. ३.३५ मी. व साठा सु. ६५,६९,५०० घ. मी. होता. १९६६ मध्ये वीर–भादे येथे मोठे धरण बांधून पूर्ण झाल्याने पाण्याच्या साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे धरण ३६ मी. उंचीचे असून त्याची पाणी साठविण्याची क्षमता २७,८४,९०,००० घ. मी. आहे. या धरणातील पाण्याचा पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील अनुक्रमे बारामती, इंदापूर व खंडाळा, फलटण आणि माळशिरस या तालुक्यांना लाभ झाला आहे. धरणापासून डावा (नीरा लेफ्ट बॅंक) व उजवा (नीरा राइट बॅंक) असे दोन कालवे काढण्यात आले असून धरणाचे एकूण लाभक्षेत्र ३३,७८८ हेक्टर आहे. उजव्या कालव्यापासून खंडाळा व फलटण तालुक्यांतील २२,२६४ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळतो. हा सर्व प्रदेश कमी पावसाचा असल्याने जलसिंचनाच्या दृष्टीने या धरणाला महत्त्व प्राप्त झाले असून बरेचसे क्षेत्र ऊसाच्या लागवडीखाली आणण्यात आले आहे.
वीर जलविद्युत् केंद्रातील जनित्रे हंगेरीहून आयात केलेली असून हे वीज केंद्र १९७५ मध्ये कार्यान्वित झाले आहे. त्याची वीज निर्मितीक्षमता ९ मेवॉ. आहे.
चौधरी, वसंत
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..