विसापूर : (१) महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक इतिहासप्रसिद्ध डोंगरी किल्ला. मावळ तालुक्यात लोणावळ्याच्या पूर्वेस व मळवली रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेस हा किल्ला असून तो सस. पासून सु्. १,०८२ मी. उंचीचा आहे. पुणे – मुंबई मार्गावरील ⇨ भाजे हे प्राचीन बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले गाव याच्या पायथ्याशी आहे.

पूर्वीपासून लोहगड – विसापूर हे आवळे – जावळे किल्ले म्हणून ओळखले जातात. शिवकालात हा किल्ला ‘इसागड’ या नावानेही ओळखला जात होता. याचा प्रचीन स्वतंत्र इतिहास फारसा ज्ञात नाही. परंतु ⇨ लोहगडाच्या इतिहासातच तो सामावलेला असावा. प्रथम विसापूर जिंकून मग लोहगड घेतल्याचे अनेक ऐतिहासिक उल्लेख सापडतात. याचे बांधकाम बाळाजी विश्वनाथ या पेशव्याने केले होते. पेशवाईत या किल्ल्याचा उपयोग तुरूंगासाठी करण्याचा विचार होता. १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकून इंग्रजांच्या ताब्यात आणला व त्यामुळे मराठ्यांना लोहगडही सोडणे भाग पडले होते.

खूप मोठे पठार असलेला किल्ला हे याचे वैशिष्ट्य आहे. पठार, त्या नंतरचे थोडे अंतर व कारवीचे  जंगल ओलांडून पुढे खडकात खोदलेल्या पायऱ्या चढून जाऊन किल्ल्यात जाता येते. मार्गात एक मारूतीची मूर्ती, तसेच खडक फोडून पाण्याची काही टाकी खोदलेली आहेत. एका टाक्याच्या माथ्यावर ब्राह्मी लिपितील एक शिलालेख आहे. किल्ल्याला उत्तम तटबंदी असून कोकण दरवाजा व दिल्ली दरवाजा असे दोन प्रवेशमार्ग आहेत. ब्रिट्रिश अमलात १८२० मध्ये या दोन्ही दरवाजांची पडझड झाली. किल्ल्यातील पठारी भागात कोठीच्या इमारतीचे अवशेष आहेत, पठारावर एक टेकडी व तीवर दाट झाडी असून तीत किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आहेत. किल्ल्याच्या दक्षिण बुरूजावर चुन्याच्या घाणीसारख्या एका वैशिष्ट्यपूर्ण यंत्राचे अवशेष आहेत. यावर तोफ बसवून ती वेगवेगळ्या दिशांत फिरविण्यासाठी त्या यंत्राचा वापर केला जात असावा. उत्तर दरवाजाजवळ एक मोठी तोफ असून तीवर इंग्लंडच्या ट्यूडर घराण्याचे चिन्ह (मुकुट व गुलाबाचे फूल आणि ER ही इंग्रजी अक्षरे) आहे.एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत तयार केलेली ही तोफ आंग्र्यांनी इंग्रजांकडून जिंकून येथे आणली असावी. विसापूर किल्ल्याच्या पठारावर पाण्याची मुबलक टाकी असून मारूतीच्या मूर्तीही  बऱ्याच आहेत.

(२) अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदे तालुक्यातील एक छोटे गाव. लोकसंख्या २,८३२ (१९८१). दौंड– अहमदनगर या रूंदमापी लोहमार्गावरील हे ठिकाण श्रोगोंद्याच्या वायव्येस सु. ३७ कि.मी. अंतरावर आहे.विसापूर तलाव, त्याचा निसर्गसुंदर परिसर व राजकीय कैद्यांसाठी अनेकवेळा वापरला गेलेला येथील तुरूंग यामुळे या गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

चौडे, मा.ल.