विष्ठाश्म : शिळारूप प्राप्त झालेली विष्ठा. जीवांच्या शिळाभूत अवशेषांना जीवाश्म म्हणतात आणि नेमकेपणे सांगायचे झाल्यास प्राण्यांची अश्मभूत झालेली विष्ठा म्हणजे विष्ठाश्म होय. व्यापक अर्थाने इतर फॉस्फेटी ग्रंथींसाठीही ही संज्ञा वापरतात. विपुल विष्ठाश्म असलेले खडकांचे थर खणून काढतात व खत म्हणून त्यांचा उपयोग होतो.

 

विल्यम बकलँड या इंग्रज भूवैज्ञानिकांनी विष्ठाश्माचे खरे स्वरूप शोधून काढले. ग्‍लॉस्टरशरमधील पूर्व जुरासिक म्हणजे सु. १८.७ ते २०.८ कोटी वर्षांपूर्वीच्या लायस नावाच्या खडकांच्या थरांत त्यांना परिवलित (वळलेले) पिंड आढळले. पिंडांचा हा आकार त्याचे द्रव्य मऊ असताना सरीसृप (सरपटणारे प्राणी), मासे किंवा उभयचर (जमिनीवर व पाण्यातही राहणारे प्राणी) यांच्या आतड्यांतून गेल्यामुळे आला असावा, असे त्यांचे अनुमान होते. हे पिंड दीर्घकाळापासून फर वृक्षाचे अश्मरूप शंकू वा गोरोचनाचे खडे म्हणूनच ओळखले जात असत. ते विष्ठेपासून बनले असून हायनाच्या शेणासारखे (लेंडकासारखे) आहेत, अशी बकलँड यांची अटकळ होती. रासायनिक विश्लेषणावरून ही अटकळ खरी असल्याचे दिसून आले. कारण विश्लेषणामुळे त्यांच्यात कॅल्शियम फॉस्फेट व कार्बोनेट असल्याचे उघड झाले. क्वचित त्यांच्यात बदल न झालेले हाडाचे वा सांगाड्याचे तुकडे, न पचलेले अन्नाचे कण वगैरेही टिकून राहिलेले आढळले आहेत. सागरी सरीसृपांच्या विष्ठाश्मांत हाडांच्या तुकड्यांबरोबर माशांचे खवले, संधिपाद प्राण्यांचे अवशेषही आढळतात. विष्ठाश्मांवरून खूप पूर्वी विलुप्त (निर्वंश) झालेल्या प्राण्यांच्या खाण्याच्या सवयींविषयी माहिती मिळू शकते. उदा., जमिनीवर राहणाऱ्या स्लॉथ नावाच्या विलुप्त झालेल्या प्राण्याच्या विष्ठाश्मात (शेणात) आढळलेल्या वनस्पतींच्या अवशेषांवरून त्या प्राण्याला कोणत्या वनस्पती अधिक आवडत असत, ते कळते. तसेच वनस्पतिभक्षक प्राण्यांच्या विष्ठाश्मांवरून त्यांच्या काळात कोणत्या प्रकारच्या वनस्पती होत्या, ते कळू शकते. सुमारे २८ कोटी वर्षांपूर्वीच्या पेनसिल्व्हेनियन काळातील दगडी कोळशाच्या थरांतील गोलसर पिंडांत आढळलेले काही विष्ठाश्म हे पूर्णपणे घट्ट झालेल्या वनस्पतिद्रव्याचे बनलेले आहेत. मात्र इतरांत खनिजद्रव्यही आढळते.

विष्ठा (किंवा शेण) आणि दगड या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून विष्ठाश्माला कॉप्रोलाइट हे नाव आले आहे.

पहा : ग्वानो फॉस्फेटी निक्षेप.

ठाकूर, अ. ना.