विश्वामित्र : एक सूक्तकर्ते ऋषी, राजपुरोहित, मुळात क्षत्रिय राजे असूनही कठोर तपःश्चर्येच्या सामर्थ्यावर ‘ब्रह्मर्षी’ ही पदवी प्राप्त करणारे, ऋग्वेदातील सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या ⇨ गायत्री मंत्राचे कर्ते, ⇨ वसिष्ठांचे शत्रू अशा अनेक नात्यांनी ‘विश्वामित्र’ हे नाव वैदिक साहित्यात तसेच पुराणे, महाकाव्ये अशा उत्तरकालीन साहित्यात आलेले आढळते. ‘विश्वामित्र’ हा शब्द ऋग्वेदात विश्वामित्रांच्या कुटुंबाचा वाचक म्हणूनही योजिलेला आढळतो. विश्वामित्र हे ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलाचे द्रष्टे (कर्ते) होत, असे कात्यायनाच्या सर्वानुक्रमणीत सांगितले आहे. ⇨ सायणाचार्यांनीही तसे म्हटले आहे. अर्थात येथे विश्वामित्र आणि त्यांचे कुटुंबीय असाच अर्थ घ्यावयाचा आहे. ह्या मंडलात ‘विश्वामित्र’ ह्या शब्दाचा एकवचनी निर्देश काही ठिकाणी आल्याचे दिसते (उदा., ३·५३·७ ३·५३·९ आणि ३·५३·१२). हा निर्देश विश्वामित्र कुटुंबाचे मूळ पुरूष ‘ब्रह्मर्षी’ विश्वामित्रांचा असला पाहिजे. ह्याच विश्वामित्रांचा उल्लेख ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात जमदग्‍नी ऋषींच्या निर्देशाबरोबर आलेला आहे (१०·१६७·४). ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलातील उपर्युक्त तीन ऋचांच्या आशयावरून जे सूचित होते ते असे : भरतवंशी राजा सुदास हा ह्या विश्वामित्रांचा आश्रयदाता होता आणि विश्वामित्र हे त्याचे पुरोहित होते. द्यावापृथिवी आणि इंद्र ह्यांच्या स्तुत्यर्थ आपण रचिलेल्या स्त्रोत्रांनी भारतजन रक्षिले जातील, असा विश्वास विश्वामित्रांना होता आणि ते व त्यांचे कुटुंबीय ‘कुशिक’ ह्या नावानेही ओळखले जात होते. ह्या तीन ऋचांपैकी एका ऋचेत विश्वामित्रांचा निर्देश देवजा (देवजात), देवजूत (देवप्रेरित), नृचक्षस् (मनुष्यांचा मार्गदर्शक) असा केलेला आहे (३·५३·९).

राजा सुदास आणि त्याचे शत्रू असलेले दहा राजे ह्यांच्यामधील युद्ध हे ⇨ दाशराज्ञ युद्ध ह्या नावाने ओळखले जाते. ऋग्वेदकाळी लढल्या गेलेल्या ह्या महत्वाच्या युद्धाला विश्वामित्र आणि वसिष्ठ ह्या दोन ऋषींमधील वैमनस्य कारणीभूत झाले, असे सामान्यतः मानले जाते. विश्वामित्र हे सुदासाचे राजपुरोहित होते. त्यांनी आपल्या मंत्रशक्तीच्या जोरावर सुदासाला पूर्वी एका युद्धात विजय मिळवून दिला होता. ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलातील तेहतिसाव्या सूक्तात विपाशा (बिआस) आणि शुतुद्री (सतलज) ह्या दोन नद्यांच्या संगमापाशी विश्वामित्रांनी त्यांच्याशी केलेला संवाद आहे. ऋग्वेदातील हे एक प्रसिद्ध संवादसूक्त होय. वेगाने वाहणाऱ्या ह्या नद्यांपलीकडे जाणे भरतपुत्रांना (सुदासाच्या सैन्याला) सुकर व्हावे म्हणून विश्वामित्र ह्या नद्यांना ‘रथाच्या आसापर्यंतच तुमचा प्रवाह वाहू देत’ अशी विनंती करीत आहेत. अखेरीस ह्या नद्या विश्वामित्रांची विनंती मान्य करतात आणि भरतपुत्रांना पलीकडे जाता येते. विश्वामित्र अशा प्रकारे सुदासाच्या उपयोगी पडलेले असतानाही सुदासाने विश्वामित्रांना पुरोहितपदावरून दूर करून तेथे वसिष्ठांची नेमणूक केली. त्यामुळे विश्वामित्रांनीच वायव्येकडील आणि पश्चिमेकडील दहा राजांना सुदासाच्या प्रदेशांवर स्वारी करण्याची चिथावणी दिली, असे सामान्यतः मानतात. ह्या युद्धात वसिष्ठांच्या मंत्रसामर्थ्याने सुदासाला विजय मिळाला, असे ह्या युद्धाचे ऋग्वेदात जे वर्णन आलेले आहे, त्यावरून दिसते. तथापि विश्वामित्रांनी हे युद्ध घडवून आणले, असे दाखवणारा आधार ऋग्वेदात आढळत नाही. वसिष्ठ आणि विश्वामित्र ह्यांच्यातील वैराचा आरंभ मात्र सुदासाने विश्वामित्रांना दूर करून वसिष्ठांना पुरोहितपद दिले, ह्या घटनेपासून झालेला असावा.

विश्वामित्र आणि त्यांचे कुटुंबीय ‘कुशिक’ ह्या नावाने जसे संबोधिले जात होते, तसेच ‘गाथिन्’ ह्या नावानेही संबोधले जात होते, असे दिसते. पुराणांतून उपलब्ध होणाऱ्या वंशावळींमध्ये कुशिक हा विश्वामित्राचा आजा, तर गाथी हा विश्वामित्राचा पिता म्हणून निर्देशिलेले दिसतात. बृहदेवता ह्या ग्रंथात विश्वामित्र हे गाथीचे पुत्र असल्याचे म्हटले आहे (४·९५). ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलातील १९ ते २२ ही चार सूक्ते ‘गाथिन्’ ह्या ऋषींची आहेत. हे विश्वामित्रांचे वडील असण्याचा संभव आहे. विश्वामित्र हे भरतजनांपैकीच एक होते, असे ऐतरेय ब्राम्हणात म्हटले आहे (७·१३-१८). काही अभ्यासकांचा तर्क असा : भरतजनांमध्ये आरंभी पुरोहितकर्मे करणाऱ्यांचा वर्ग व योद्धयांचा वर्ग एकत्रच नांदत असावेत. त्यांच्यात फारसा भेद केला जात नसावा. परंतु पुढे पुरोहिताच्या व्यवसायाचे विशेषीकरण झाले, तेव्हा पुरोहितकर्मे करणारी विश्वामित्राच्या कुटुंबासारखी काही कुटुंबे स्वतंत्र झाली असावीत. तथापि ते मूळचे भरतजनांपैकीच असल्यामुळे ‘भरत’ म्हणूनही ती ओळखली जात असावीत. कुशिक आणि विश्वामित्र हीदेखील एके काळी एकाच मोठ्या कुटुंबाचा भाग असलेली आणि नंतर स्वतंत्र झालेली दोन कुटुंबे असावीत. भागवत पुराणात असा निर्देश आहे, की विश्वामित्रांच्या एकूण शंभर पुत्रांपैकी पहिले पन्नास ‘विश्वामित्र’ ह्या नावाने, तर उरलेले पन्नास ‘कुशिक’ ह्या नावाने ओळखले जात (९·१६·२८-३७). विश्वामित्र व त्यांचे कुटुंबीय हे जह्‌नुकुलातले होत, असे ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलातील एका ऋचेवरून (३·५८·६) दिसते. जह्‌नू हा विश्वामित्र कुटुंबियांचा एक दूरचा पूर्वज होता, असे काही पौराणिक वंशावळींवरून दिसते.

विश्वामित्र आणि वसिष्ठ ह्यांच्यातील शत्रुत्वाचा उल्लेख वर आला आहे. ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलातील चार ऋचा (३·५३·२१-२४) वसिष्ठद्वेषिणी ऋचा म्हणून परंपरेने मानल्या जातात. वसिष्ठगोत्रीय लोक त्यांचे श्रवण वा पठण निषिद्ध मानतात. वसिष्ठांच्या शंभर पुत्रांना सुदासाच्या पुत्रांनी ठार केले, असे बृहद्देवता ह्या ग्रंथात म्हटले आहे (६·२७-२८). ऋग्वेदाच्या सातव्या मंडलातील १०४ क्रमांकाचे सूक्त ह्या दुःखद घटनेनंतरच्या मानसिक अवस्थेत वसिष्ठांनी रचले असेही हा ग्रंथ सांगतो. वसिष्ठांच्या मदतीने दाशराज्ञ युद्धात विजय मिळवल्यानंतर सुदासाचे आणि वसिष्ठांचे संबंध बिघडले असावेत आणि ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन विश्वामित्राने सुदासाच्या पुत्रांकडून हे कृत्य घडवून आणले असावे, असा तर्क केला जातो. ब्राम्हणग्रंथांत वसिष्ठांची संतती मारली गेल्याचा निर्देश येतो, परंतु त्याला विश्वामित्र जबाबदार होते, असे कुठेच म्हटलेले नाही.

विश्वामित्र हे क्षत्रिय राजे असताना वसिष्ठांच्या आश्रमात गेले होते. तेथे कोणतीही इच्छा पूर्ण करणारी ‘कामधेनू’ त्यांनी पाहिली व वसिष्ठांकडे तिची मागणी केली, वसिष्ठांनी नकार देताच विश्वामित्र जबरदस्तीने तिला नेऊ लागले, पण त्या गायीच्या शरीरातून उत्पन्न झालेल्या सैन्याने त्या गायीचे रक्षण केले, अशी कथा वाल्मीकिरामायणाच्या बालकांडात आलेली आहे. क्षत्रियाच्या सामर्थ्यापेक्षा ब्रम्हतेजाचे बळ मोठे, अशी ह्या घटनेनंतर विश्वामित्रांची खात्री पटल्याने विश्वामित्रांनी ब्रम्हर्षी होण्याचा खडतर मार्ग स्वीकारला, असेही ह्या कथेत सांगितले आहे (सर्ग ५१ ते ५६ ). विश्वामित्रांनी ते कान्यकुब्ज देशाचे राजे असताना वसिष्ठांच्या आश्रमातील कामधेनू जबरीने नेण्याचा प्रयत्‍न केला, ही कथा महाभारतातही आहे. रामायणमहाभारतासारख्या वेदोत्तरकालीन साहित्यातच विश्वामित्र मुळात राजे होते, असे निर्देश सापडतात. तथापि तसे सुचविणारा आधार ऋग्वेदात कोठेच मिळत नाही. विश्वामित्र आणि वसिष्ठ ह्यांच्यातील वाद हा क्षत्रिय आणि ब्राह्मण ह्यांच्यातील वादाचे प्रतीक होय, असे मत काही समाजशास्त्रज्ञांनी व्यक्त केलेले आहे. तथापि त्या मताला ऋग्वेदात आधार सापडत नाही, असेही काही अभ्यासकांचे मत आहे. विश्वामित्र हे पुरोहिताची कर्मे करीत असल्याचेच दिसते. उलट ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलातील एका ऋचेत (३·४३·५) त्यांनी असे म्हटले आहे, की ‘हे इंद्रा, तू मला जनांचा रक्षक कर. हे मघवन्, हे सोमवन् (मला) राजा (कर). मला सोमप्राशक ऋषी (कर). तू मला अक्षय धन दे’. येथे सोमप्राशक ऋषी होण्याबरोबरच राजा होण्याची तसेच संपत्ती मिळविण्याची इच्छा व्यक्त केलेली दिसते.

वसिष्ठ-विश्वामित्र वादाचे दर्शन घडविणारी आणखी एक कथा वाल्मीकिरामायणात आलेली आहे (बालकांड, सर्ग ५७-६१) . ती थोडक्यात अशी : सदेह स्वर्गात जाण्याच्या हेतूने इक्ष्वाकुवंशीय राजा त्रिशंकू ह्याने एक यज्ञ करण्याचे ठरवून त्यासाठी वसिष्ठांची मदत मागितली. ती न मिळाल्यामुळे तो विश्वामित्रांकडे गेला. विश्वामित्रांनी ती देण्याचे ठरविले परंतु त्या यज्ञात निमंत्रित केलेल्या देवता न आल्यामुळे स्वत:च्या तपः सामर्थ्यावर विश्वामित्रांनी त्रिशंकूला स्वर्गाप्रत नेण्याचा प्रयत्‍न चालवला. ह्या प्रयत्‍नांना देवांनी विरोध करताच विश्वामित्रांनी स्वतःच एक नवा स्वर्ग बनविण्याचा प्रयत्‍न सुरू केला होता, पण देवांच्या विनंतीवरून तो त्यांनी थांबवला.

विश्वामित्र आणि जमदग्‍नी ऋषी ह्यांचे सख्य होते. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात (सूक्त १६७) ह्या दोघांचा एकत्र उल्लेख आहेच. हे सूक्तही ह्या दोघांनी मिळून रचलेले आहे, असे परंपरेने मानले जाते. ब्रह्मा किंवा सूर्य ह्यांच्यापासून जमदग्‍नी ऋषींनी विश्वामित्रांसाठी ‘ससर्परी वाक्’ ही मंत्रशक्ती मिळविली होती. ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलातील दोन ऋचा (५३·१५·१६) ह्या संदर्भात उल्लेखनीय आहेत. ‘ससर्परी विद्या’ ह्या नावाने ह्या ऋचा ओळखल्या जातात. कात्यायनांच्या सर्वानुक्रमणीवरील षड्‌गुरूशिष्यांच्या भाष्यातले श्लोक सायणाचार्यांनी उद्‌धृत केले आहेत. त्यांत असे म्हटले आहे, की सुदासाच्या एका यज्ञाच्या वेळी वसिष्ठपुत्र शक्ती ह्याने आपल्या वाणीच्या प्रभावाने विश्वामित्रांनाही त्या ठिकाणी निष्प्रभ केले. त्या वेळी हिरमुसलेल्या विश्वामित्रांना जमदग्‍नींनी ससर्परी नावाची वाच्‌शक्ती प्राप्त करून दिली. सायणाचार्यांनी ऋग्वेदातील संबंधित ऋचेवर (३·५३·१५) भाष्य करताना ‘ससर्परी’ चा अर्थ ‘सर्वत्र शब्दरूपाने प्रसार पावणारी’(सर्वत्र शब्दरूपतया सर्पणशीला वाक्) असा दिला आहे. ससर्परी ही सूर्याची वा ब्रह्‌म्याची कन्या होय. मंत्रज्ञानावर प्रभुत्व असलेले जमदग्‍नी विश्वामित्रांचे गुरू असू शकतील. वसिष्ठ-विश्वामित्र वादात जमदग्‍नी हे विश्वामित्रांच्या बाजूलाच असल्याचे दिसते (तैत्तिरीय संहिता ३·१·७·३). जमदग्‍नींनी ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील विहव्य सूक्ताचा (१२८-१) वापर करून वसिष्ठांना एका प्रसंगी शक्तिहीन केले होते. जमदग्‍नी आणि विश्वामित्र कुटुंबीय ह्यांचे नाते होते असेही दिसते. विश्वामित्र आणि त्यांचे कुटुंबीय हे ज्याचे द्रष्टे मानले जातात त्या ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलातील काही ऋचा (६२·१६-१८) ह्या जमदग्‍नींनी रचल्या, असे परंपरेने विकल्पाने मानले आहे. महाभारतातील निर्देशांनुसार विश्वामित्रांची बहीण सत्यवती हिचा विवाह ऋचोकनामक ऋषींशी झाला होता व जमदग्‍नी हे ह्या दांपत्याचे पुत्र होत. म्हणजे ह्या निर्देशांनुसार ऋचीक व विश्वामित्र हे एकमेकांचे मेहुणे होते.


विश्वामित्रांचे पहिले पन्नास पुत्र ‘विश्वामित्र’ तर नंतरचे पन्नास पुत्र ‘कुशिक’ म्हणून ओळखले जात असल्याचा निर्देश वर आला आहे. त्यासंबंधीची कथा ऐतरेय ब्राह्मणात बऱ्याच तपशिलांनी आली आहे (७·१३-१८). ती अशी : इक्ष्वाकू वंशातील हरिश्चंद्र राजाला वरूणाच्या कृपेने रोहित नावाचा पुत्र झाला. हा पुत्र वरूणाला बळी देण्याचे हरिश्चंद्राने मान्य केले होते पण ती वेळ येताच रोहित रानात पळून गेला. परिणामतः वरूणाच्या रोषामुळे हरिश्चंद्राला उदररोग जडला. आपल्या वडिलांना ह्या व्याधीतून मुक्त करण्यासाठी रोहित घरी परतणार होता परंतु इंद्राने त्याला असे करण्यापासून परावृत्त केले. त्यानंतर रोहिताने अजीगर्त नावाच्या एका ब्राह्मणाला शंभर गायी देऊन त्याचा मधला पुत्र शुनःशेप ह्यास विकत घेतले व स्वतःऐवजी त्याला बळी देण्याची योजना केली. ती वरूणास मान्य झाली. तथापि शुनःशेपाने देवांची प्रार्थना केल्याने तो वाचला. ह्या प्रसंगी विश्वामित्रांनी त्याला आपला पुत्र मानून सर्व पुत्रांत ज्येष्ठ मानले त्याचा स्वीकार केला, त्याला ‘देवरात’ असे नवे नाव दिले त्याला आपला उत्तराधिकारी केले. विश्वामित्रांच्या पहिल्या पन्नास पुत्रांनी देवराताला आपला ज्येष्ठ बंधू म्हणून मान्यता देण्याचे नाकारले तथापि उरलेल्या पन्नासांनी ही मान्यता दिली. त्यांत मधुच्छंदस् हा पुत्र प्रमुख होता. ह्या सर्वांना विश्वामित्रांनी शुभाशीर्वाद दिले. दुसऱ्याच्या पुत्राला प्रेमाने आपला म्हणणे, इतकेच नव्हे, तर त्याला सर्वांत ज्येष्ठ पुत्राचे स्थान देणे, त्याला आपला उत्तराधिकारी करणे ह्या विश्वामित्रांच्या कृती त्यांच्या मनाचा मोठेपणा दर्शविणाऱ्या आहेत. 

शुनःशेपाचा निर्देश ऋग्वेदात येतो, परंतु तेथे हरिश्चंद्र, अजीगर्त, विश्वामित्र अशा कोणाचाही निर्देश नाही.

ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील २४ ते ३० अशी एकूण सात संपूर्ण सूक्ते शुनःशेपाच्या नावावर मोडतात. ह्यांपैकी चोविसाव्या सूक्तातील बारा व तेरा ह्या दोन ऋचांमध्ये शुनःशेप स्वतःला मुक्त करण्यासाठी वरूणाचा धावा करीत असल्याचे दिसते. त्याला तीन यज्ञीय यूपांना (खांब) बांधलेले आहे, असेही दिसते. पुढे ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलातील एका ऋचेत (२·७) पुढील आशय आलेला आहे : ‘सहस्त्र गायी घेऊन बांधलेल्या शुनःशेपाला यूपापासून मुक्त करणाऱ्या हे होतृ आणि ज्ञानवान अग्‍ने, आमच्याकडे येऊन पाशांपासून आमची मुक्तता कर’. ऐतरेय ब्राह्मणाची  रचना करणाऱ्याचे ऋग्वेदातील ह्या ऋचांचा आधार घेऊन एक नवीन कथा निर्माण केलेली असावी. वरील सूक्तांशिवाय (१·२४-३०) ऋग्वेदाच्या नवव्या मंडलातील तिसरे सूक्त-पवमान सोमसूक्त-शुनःशेपाच्या नावावर मोडते.

कीकट नावाचे कोणी अनार्य लोक वैदिक आर्यांच्या विरोधात होते, असे दिसते. कीकट हा शब्द ‘एक विशिष्ट प्रदेश’ आणि ‘तेथे राहणारे लोक’ अशा दोन्ही अर्थांनी वापरलेला दिसतो. हा प्रदेश नेमका कोटला ह्याबद्दल अनेक मते आहेत. यास्क (६·३२) आणि सायणाचार्य ह्यांनी हा अनार्यांचा देश असल्याचे म्हटले आहे. हा दक्षिण बिहारकडचा प्रदेश असावा असे सामान्यत: मानले जाते. ‘ह्या कीकटांना तुझ्या गायी देऊन काय उपयोग? सोमरसात मिसळण्यासाठी ते त्या गायीचे दूध काढीत नाहीत. ते तापवीतही नाहीत’, अशा आशयाची एक ऋचा ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलात आहे (५३·१४). यज्ञीय विधींसाठी गायींचे दूध काढावयाचे नसल्यास गाईंचा काही उपयोग नाही, असे ह्या ऋचेतून सूचित होते, असे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. आर्यांच्या अनार्यांशी होणाऱ्या चकमकी वा लढाया ह्यांचेही सूचन ह्या ऋचेतून होते, असे काही अभ्यासकांना वाटते. उपर्युक्त तिसऱ्या मंडलातच असलेल्या एका ऋचेत (३०·६) शत्रूंवर वज्रप्रहार करण्याची तसेच सर्व जग सत्यमय करण्याची प्रार्थना इंद्राला केली आहे. जग सत्यमय करणे म्हणजे आर्यांचा यज्ञप्रधान वैदिक धर्म सर्वत्र प्रसृत करणे असा सायणाचार्य अर्थ करतात. भारताच्या वायव्य दिशेला विपाशा आणि शुतुद्री ह्या नद्यांच्या प्रदेशापर्यंत आणि पूर्वेकडे कीकटनामक प्रदेशापर्यंत आर्यांची जी आगेकूच होत होती, तीत विश्वामित्र आणि त्यांच्या कुटुंबियांनी आर्यांच्या बाजूने महत्वाची भूमिका बजावली, असे ऋग्वेदातील भौगोलिक निर्देशांवरून दिसते.

विश्वामित्र हे रामायणकाळी थोर ब्रह्मर्षी म्हणून मान्यता पावलेले दिसतात. ब्रहुम्याला प्रिय असलेल्या सात ऋषींत त्यांची गणना ह्या काळात झालेली आहे. विश्वामित्र आणि अन्य ऋषी करीत असलेल्या यज्ञांत विघ्‍ने आणणाऱ्या राक्षसांपासून संरक्षण मिळविण्यासाठी विश्वामित्र हे राजा दशरथाकडे आले आणि दशरथाने राम व लक्ष्मण ह्या आपल्या दोन पुत्रांना त्या कामासाठी त्यांच्यासह पाठविले, असा वृत्तांत रामायणाच्या बालकांडात (१८-२१) आलेला आहे. यज्ञकर्ते ब्राह्मण आणि क्षत्रिय राजे ह्यांच्यातील सहकार्याचे हे द्योतक आहे. रामायणातील निर्देशानुसार विश्वामित्रांनी कौशिकी नदीच्या काठी आपले कायम निवासस्थान केले होते.

विश्वामित्रांनी स्वतःच्या वंशासंबंधीची जी माहिती रामायणाच्या बालकांडात सांगितली आहे, ती थोडक्यात अशी : ब्राह्मणकुळात जन्मलेला महातपस्वी कुश ह्याला त्याच्या वैदर्भी नावाच्या पत्‍नीपासून कुशांब, कुशनाम, असूर्तरजस आणि वसू असे चार पुत्र झाले. ह्या चौघांपैकी कुशनाभाला त्याची पत्‍नी धृताची हिच्यापासून १०० मुली झाल्या. कुशनाभाने ह्या मुली ब्रह्मदत्तनामक राजाला दिल्या. पुढे आपल्याला पुत्र व्हावा अशा इच्छेने कुशनाभाने पुत्रेष्टी यज्ञ चालू केला. तो चालू असताना कुशनाभाला त्याच्या पित्याने सांगितले, की तुला गाधी नावाचा अत्यंत धार्मिक पुत्र होईल. त्याप्रमाणे झाले व गाधी जन्माला आला. हा गाधी म्हणजे विश्वामित्रांचा पिता. आपल्याला सत्यवती नावाची एक बहीण होती, ती ऋचीकास दिली होती, अत्यंत थोर चारित्र्याची असल्यामुळे ती पुढे कौशिकी ही महानदी झाली, असेही विश्वामित्र सांगतात.

इक्ष्वाकुवंशीय राजा आणि त्रिशंकूचा पुत्र हरिश्चंद्र ह्याच्याकडून स्वप्‍नात मिळविलेल्या वचनाधारे त्याचे राज्य विश्वामित्रांनी कसे घेतले, ह्याच वचनपूर्तीसाठी स्वतःची पत्‍नी तारामती आणि पुत्र रोहित ह्यांना विकण्याची पाळी हरिश्चंद्रावर कशी आली, ह्याचे वर्णन मार्कंडेय पुराणात (७·८) आलेले आहे. विश्वामित्रांची वंशावळ महाभारतातही  दिलेली आहे. ती जह्‌नुपासून विश्वामित्रांपर्यंत आणलेली आहे. ह्या वंशावळीतही विश्वामित्र हे गाधीचे पुत्र आणि कुशिकाचे नातू असल्याचे दिसते. ऋचीकाशी विवाह झालेल्या सत्यवती ह्या त्यांच्या बहिणीचाही ह्या वंशावळीत निर्देश असून तिच्या पोटी जमदग्‍नींचा जन्‍म झाला व जमदग्‍नींना राम जामदग्न्य (परशुराम)हा पुत्र झाला असेही ही वंशावळ दर्शविते. महाभारताच्या आदिपर्वात शकुंतलेची कथा विस्ताराने आली आहे (८९·१००). विश्वामित्र आणि स्वर्गीय अप्सरा मेनका ह्यांच्यापासून शकुंतलेचा जन्म झाल्याचे तेथे म्हटले आहे. विश्वामित्र हे आत्यंतिक भुकेने व्याकूळ झाले असता, त्यांनी कुत्र्याचे मांस खाल्ले, असा उल्लेखही महाभारतात आलेला आहे.

विश्वामित्रांची वंशावळ पुराणेही देतात. त्यांत सामान्यतः जह्‌नुपासून आरंभ केलेला असतो. जह्‌नू हा ऐलाचा पुत्र अमावसू ह्याचा वंशज, असेही पौराणिक वंशावळींतून दर्शविलेले दिसते. अमावसू हा राजा असून त्याची राजधानी कान्यकुब्ज येथे होती. विश्वामित्रांच्या पौराणिक वंशावळीच्या तपशिलांबाबत काही भिन्नता आढळते. परंतु विश्वामित्र हे मुळात राजवंशात जन्मलेले होते, पुढे कठोर तपश्चर्येच्या योगे ते ब्रह्मर्षी बनले, ह्याबद्दल पुराणांत एकवाक्यता आढळते. पंचविश ब्राह्मणातही विश्वामित्र राजे असल्याचे म्हटले असून तेथे त्यांचा निर्देश जाह्रवो राजा असा आलेला आहे. विश्वामित्रांच्या पौराणिक वंशावळींवरून असे दिसते, की त्यांचा जन्म दशरथपुत्र रामाच्या आधी ३९ पिढ्या आणि भारतीय युद्धाआधी साठ पिढ्या झाला होता. भारतीय युद्धाचा काळ इ. स. पू. १४००  धरून काही अभ्यासकांनी इ. स. पू. २३०० हा विश्वामित्रांचा काळ धरला आहे. ऋग्वेदाचे तिसरे मंडल रचण्यात विश्वामित्र-कुटुंबियांच्या पाच ते सहा पिढ्यांचा सहभाग होता, हे विचारात घेऊन हे अभ्यासक ह्या मंडलाचा रचनाकाल इ. स. पू. २३०० ते इ. स. पू. २००० असा सु. ३०० वर्षांचा असावा, असे मानतात. तथापि पश्चिमी पंडितांच्या मते ऋग्वेदाच्या एकंदर सूक्तरचनांचा काळ इ. स. पू. चौदाव्या शतकाच्या अलीकडे व इ. स. पू. दहाव्या शतकाच्या पलीकडे असा सु. तीनशे ते चारशे वर्षांचा असावा.


विश्वामित्र कुटुंबीय व त्यांनी रचलेली सूक्ते : ऋग्वेदातील २ ते ७ ही सहा मंडले ऋषिकुलांची मंडले असून हा ऋग्वेदाचा सर्वांत प्राचीन असा गाभा होय. ह्यांपैकी तिसऱ्या मंडलातील सूक्ते विश्वामित्रकुलाची आहेत. ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडलात एकूण ६२ सूक्ते असून ती रचणाऱ्या व्यक्ती आणि त्यांनी रचलेली सूक्ते खालीलप्रमाणे: 

(१) विश्वामित्र गाथिन् : १ ते १२ (१२) २४ ते ३० (७) ३२ ते ३७ (६) ३९ ते ५३ (१५) ५८ ते ६२ (५). ही एकूण ४५ सूक्ते होतात.

ह्यांपैकी ६२ व्या सूक्तातील १६ ते १८ ह्या तीन ऋचा जमदग्‍नी ऋषींनी रचल्या, असे परंपरेने विकल्पाने मानले आहे. 

(२) 

ऋषभ : (विश्वामित्रांचा पुत्र) 

१३ व १४ 

(२) 

(३) 

उत्कील कात्य : (कताचा पुत्र) 

१५ व १६ 

(२)

(४) 

कत : (विश्वमित्रांचा पुत्र) 

१७ व १८ 

(२) 

(५) 

गायीन् : (कुशिकाचा पुत्र) 

१९ ते २२ 

(४) 

(६) 

देवश्रव व देववात : 

२३ 

(१) 

(७) 

कुशिक : (इषीरथाचा पुत्र) 

३१ 

(१) 

(८) 

विश्वामित्र किंवा विश्वामित्रकुलातील प्रजापती’ नावाची व्यक्ती किंवा वाक्‌प्रजापतीचा पुत्र प्रजापती :

३८ 

(१) 

(९) 

प्रजापती :  (विश्वामित्रांचा पुत्र वा‘वाक्’चा पुत्र)

५४ ते ५७ 

(४) 

 

 

एकूण सूक्ते :

१७

वर निर्देशिलेल्या देवश्रव व देववात ह्यांचा निर्देश सायणाचार्यांनी भरताचे पुत्र, असा केलेला आहे. हरिवंशामध्ये देवश्रवाचा उल्लेख ‘विश्वामित्राचा पुत्र’ असा केलेला आहे (१४६१).

विश्वामित्रकुलातील काहींनी ऋग्वेदाच्या अन्य मंडलांतही काही सूक्तरचना केलेली आहे. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील पहिली दहा सूक्ते, तसेच नवव्या मंडलातील पहिले सूक्त ह्याची रचना विश्वमित्रांचा एकावन्नावा पुत्र मधुच्छंदस्‌ ह्याने केलेली आहे. पहिल्या मंडलातील अकरावे सूक्त मधुच्छंदस् ह्याचा पुत्र जेतृ ह्याने रचिले आहे. ह्याच मंडलातील एकुणनव्वदाव्या सूक्ताचा कर्ता विश्वामित्रांचा पुत्र रेणू हा आहे, तर एकशे चार क्रमांकाच्या सूक्ताचा रचनाकार अष्टक आहे. विश्वामित्रांना माधवीपासून झालेला पुत्र, असे अष्टकाचे वर्णन महाभारताच्या उद्योगपर्वात आलेले आहे. दहाव्या मंडलातील एकशे साठावे सूक्त रचणारा पूरण वैश्वामित्र हा विश्वामित्रकुलाचा गोत्रकार व प्रवर होय. मधुच्छंदस्‌चा पुत्र अघमर्षण ह्याने ह्या मंडलातील एकशे नव्वदावे सूक्त रचिले आहे.

विश्वामित्र कुलातील ऋषींची ऋग्वेदीय सूक्ते देवतांनुसार पाहिली, तर अग्‍नीसाठी रचलेल्या सूक्तांची संख्या ठळकपणे नजरेत भरते (२९). त्यानंतर इंद्र, विश्वेदेव अशा देवता. एक संपूर्ण सूक्त मित्र ह्या देवतेला वाहिलेले आहे (३·५९). विश्वामित्रांनी रचिलेला गायत्री मंत्र ऋग्वेदातील सर्वात पवित्र मंत्र का मानला जातो, हे सांगणे कठीण आहे. तथापि आपल्या वर्चस्वाखालील प्रदेशाचा पूर्वेच्या दिशेने विस्तार करीत जाणाऱ्या आर्यांना प्रेरणा-स्मूर्ती देण्यासाठी विश्वामित्राने सविता देवाची (सूर्य) प्रार्थना करणारा हा मंत्र रचला असावा, अशी एक शक्यता अभ्यासकांकडून व्यक्त केली जाते.

परंपरेने विश्वामित्रांची मानली गेलेली काही सूक्ते अथर्ववेदातही आहेत (३·१७ ५·१५-१६ ६·४४ ६·१४१ ६·१४२). शेती फलदायी व्हावी चेटक्यांचा प्रतिकार व्हावा रोगनिवारण व्हावे अशा काही कारणांसाठी ही सूक्ते रचली गेल्याचे दिसते. विश्वामित्र हे त्यांच्या पौष्टिक, भैषज्य, कृत्यापरिहरण अशा कर्मांसाठी उपयुक्त असणाऱ्या मंत्रसामर्थ्याकरिताही प्रसिद्ध होते, हे अशा सूक्तांवरून दिसते.

संदर्भ : Rahurkar, V. G. The Seers of the Rgveda, Pune,  1964.

कुलकर्णी, अ. र.