विवर्ण प्राणि : त्वचा, डोळे, केस किंवा पिसे यांच्यातील रंगाच्या पूर्ण अभावाला विवर्णता म्हणतात. आनुवंशिकतेमुळे रंजक (रंगद्रव्य) नसणे म्हणजे विवर्णता होय. एकूण मानवी लोकसंख्येमध्ये तीस हजार माणसांत एक या प्रमाणात विवर्णता आढळते असा अंदाज आहे.

संपूर्ण विवर्णतेत त्वचेमध्ये रंजकाचा पूर्ण अभाव असतो. त्वचा तिच्या खाली असलेल्या रक्तवाहिन्यांतील रक्तामुळे काहीशी गुलाबी दिसते.विवर्णतेमुळे केस व पिसे हिमासारखी पांढरी शुभ्र दिसतात. कारण त्यांच्यातील लहान मोकळ्या जागा रंगद्रव्याच्या कणिकांऐवजी हवेने भरलेल्या असून त्यांच्यावर पडलेले सर्व प्रकाशकिरण परावर्तित होतात [⟶ केस पीस]. डोळ्याची कनीनिका (मध्यभागी छिद्र असलेला पडदेवजा भाग) गुलाबी व बाहुली लाल असते. विशेषतः दृष्टिवैषम्य (या नेत्र दोषामुळे प्रतिमा पुसट व अर्धवट दिसते) व प्रकाशसंत्रास (तीव्र प्रकाश सहन न होणे वा त्याचा त्रास होणे) ह्या डोळ्यासंबंधीच्या अन्य अपसामान्य अवस्थाही विवर्णतेत आढळून येतात. अशा अवस्थेत जोडीला मानसिक व शारीरिक दुर्बलता असते.

विवर्णतेची अनेक कारणे आहेत. रंजक कोशिका म्हणजे कृष्णरंजीपेशी अजिबात नसणे, गर्भाच्या विकासाच्या वेळी ह्या कोशिकांच्या स्थानांतरणात अडथळा निर्माण होणे किंवा कृष्णरंजी  कोशिकांमार्फत मेलॅनीन(कृष्णरंजक) या रंजकाची निर्मिती न होणे ही अशी कारणे होत. येथे कृष्णरंजी कोशिका मेलॅनीन निर्माण करू शकत नाहीत. कारण त्यांच्यात टायरोसिनेज ह्या मेलॅनीननिर्मितीस आवश्यक असलेल्या एंझाइमाचा [उत्तेजक स्त्रावाचा ⟶ एंझाइमे] अभाव असतो. मेलॅनिनाचे निक्षेपण (साचण्याची क्रिया) दोन स्वतंत्र प्रक्रियांद्वारे होते. या दोन्ही प्रक्रियांपैकी एखादी प्रक्रिया बिघडली, तरी प्राणी विवर्ण होतो.

विवर्णता ही आनुवंशिक अवस्था आहे. विशिष्ट जनुके [आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणारी एकके ⟶जीन] नसल्यामुळे टायरोसिनेजाचा अभाव निर्माण होतो, असे मानले जाते. जेव्हा सर्वसामान्य रंजनासाठीचे, म्हणजे टायरोसिनेजाच्या निर्मितीचे जनुक (जीन) नसते आणि अरंजनासाठीचे म्हणजे टायरोसिनेज निर्मिती न होणारे जनुक दुहेरी अवस्थेत असते, त्या वेळी विवर्णता आपोआप प्रकट होते.

माणसाळविलेल्या व पाळीव प्राण्यांमधील तसेच मनुष्यमात्रामधील विवर्णता सर्वपरिचित आहे. वन्य प्राण्यांमध्ये ती क्वचितच आढळते. कारण विवर्णता प्राण्यांच्या अस्तित्वालाच अडचणीत आणणारी असते आणि ⇨नैसर्गिक निवडीची क्रिया ही उत्तरजीवित्वाच्या (मागे जिवंत वा टिकून राहण्याच्या क्रियेच्या) विरुद्ध कार्य करीत असते. मार्जारमीन, जिराफ, हरिण, गेंडा, बेडूक, कासव, साळ, रॉबिन, खार, पोपट, शेवंडा, ट्राउट मासा, उत्तर आर्क्टिक, खोकड, एर्माइन ससा इ. अन्य अनेक प्राण्यांमध्ये विवर्णता आढळते.

आंशिक विवर्णताही आपल्या परिचयाची आहे. हिच्यात शरीराचे विशिष्ट भाग सामान्य असतात, पण अन्य पांढरे असतात, या विवर्णतेमुळे पांढरे ठिपके व कपाळावरील पांढरे केस असे त्वचेतील बदल घटतात. त्याचे प्रमाण सर्वसाधारण विवर्णतेएवढे असते, पण तिच्यात तेवढी विकलांगता येत नाही. ⇨कोडामध्ये शरीराच्या विविध भागांत रंजक नसते त्यामुळे त्वचेवर लहानमोठे पांढरे फटफटीत डाग वा चट्टे दिसतात. रंजकाच्या अभावाचे प्रमाण १-३ टक्के असते. प्रभावित भाग (चट्टे) विविध आकार व आकारमानांचे असू शकतात व त्यांच्या कडा अतिरंजित असतात. काही भागांचे पुनश्च रंजन होते, तथापि सामान्यतः या विकाराचे प्रमाण वाढत जाते म्हणजे तो  सर्वत्र पसरत जातो [⟶ कोड].

मेलॅनिनाचे प्रमाणाबाहेर निक्षेपण झाल्यास अतिकृष्णता ही विवर्णतेच्या उलट असलेली अवस्था निर्माण होते. आशिया खंडातील ‘ब्लॅक पँथर’ (काळा बिबळा) हे याचे उत्तम उदाहरण आहे. खरोखरी तो लेपर्डचे अतिकृष्णतारूप आहे. जलजीवालय पात्रात पाळल्या जाणाऱ्हा मोली माशात अतिकृष्णता आढळते. ही बंदिस्त स्थितीतील प्राण्यांतील अतिकृष्णता होय. अतिकृष्णतेत मेलॅनिनाने प्रकाशकिरण शोषले जाऊन संपूर्ण प्राणी काळा दिसतो. विवर्णतेत अथवा अतिकृष्णतेत शरीरावरील रंग-चिन्हे त्याच रंगाच्या फिकट वा गडद छटेत स्पष्टपणे दिसू शकतात. उदा., रंगहीन मोराचा पिसारा पांढरा असतो व पिसावरील डोळ्यांची पांढरी खूण स्पष्टपणे दिसते, तर काळ्या चित्याच्या अंगावर स्पष्ट काळे ठिपके दिसतात [⟶ रंजन, जैव].

विवर्णता असलेल्या जीवांमध्ये टायरोसिनेजची निर्मिती करणारे जनुक निर्माण करण्याचा मार्ग जोवर सापडत नाही, तोपर्यंत विवर्णतेवर उपाय सापडणार नाही. दरम्यान सूर्यप्रकाश टाळणे श्रेयस्कर असते. कारण विवर्णता असलेल्या व्यक्तींमध्ये तीव्र सूर्यप्रकाशाविषयीची सहनशक्ती कमी असते, तसेच नेत्रतज्ञाकडून डोळ्यांच्या अपसामान्य अवस्थेवर लवकर व काळजीपूर्वक उपचार करून घेणे हितावह असते.

पहा : कोड रंजन, जैव.

कानिटकर, बा. मो. जमदाडे, ज. वि.