विल्यम्सबर्ग : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी व्हर्जिनिया राज्यातील जेम्स सिटी परगण्याचे मुख्य ठाणे व एक प्रसिद्ध ऐतिहासिक शहर. लोकसंख्या ११,५३० (१९९०). आग्नेय व्हर्जिनियात जेम्स व यॉर्क नद्यांमधील द्वीपकल्पीय प्रदेशांत, न्यूपोर्ट न्यूजच्या वायव्येस ४५ किमी. वर हे शहर वसले आहे. ब्रिटिश वसाहतकऱ्यांनी १६३३ मध्ये ‘मिडल प्लँटेशन’ या नावाने याची स्थापना केली. अमेरिकन इंडियनांपासून वसाहतवाल्यांचे संरक्षण करण्यासाठी या द्वीपकल्पीय भागातील शहराभोवती १० किमी. लांबीचे कुंपण घातले होते. वसाहत काळात सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक दृष्ट्या हे बॉस्टन, न्यूयॉर्क सिटी व फिलाडेल्फियाच्या तुलनेचे शहर होते. स्वयंशासनविषयक अनेक तत्त्वांचा मूलारंभ येथेच झाला.

‘विल्यम अँड मेरी’ या अमेरिकेतील हार्व्हर्ड विद्यापीठानंतरच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत जुन्या महाविद्यालयाची स्थापना १६९३ मध्ये येथे करण्यात आली. इंग्लंडचे किंग विल्यम तिसरे व क्वीन मेरी दुसरी यांच्यावरून या महाविद्यालयाला विल्यम अँड मेरी हे नाव देण्यात आले. जॉर्ज वॉशिंग्टन हे या महाविद्यालयाचे पहिले अमेरिकन कुलपती झाले (१७८८-९९). याशिवाय इतर अनेक प्रसिद्ध व्यक्ती या महाविद्यालयाशी निगडित आहेत. सांप्रत या महाविद्यालयात मानव्य, विज्ञान, व्यवसाय प्रशासन, शिक्षण, कायदा व सागरी विज्ञान या विद्याशाखा आहेत.

बेकनच्या बंडकाळात (१६७६) जवळचे जेम्सटाउन जाळले गेले, तेव्हा संसदसभा (जनरल असेंब्ली) येथेच भरविण्यात आली होती (१६७७). १६९८ मध्ये जेम्सटाउन दुसऱ्यांदा जाळ्यात आले, तेव्हा संसदेने एका ठरावान्वये मिडल प्लँटेशन येते राजधानी आणण्याचे तसेच त्या काळातील इंग्लंडचा राजा विल्यम तिसरा याच्या सन्मानार्थ या शहराचे विल्यम्सबर्ग असे नामकरण करण्याचे ठरविण्यात आले. १६९९ ते १७७९ या काळात हे व्हर्जिनियाच्या राजधानीचे ठिकाण होते. १७२२ मध्ये याला शहराचा दर्जा देण्यात आला. गव्हर्नर फ्रान्सिस निकोल्‌सन यांनी शहराचा नियोजनबद्ध आराखडा तयार केला. पुढे शहराचा विस्तार करण्यात आला.

देशातील पहिले थिएटर (इ. स. १७१६), राज्यातील पहिला छापखाना (१७३०) व पहिला कागद कारखाना (१७४४ ), व्हर्जिनिया गॅझेट या पहिल्या वृत्तपत्राचे प्रकाशन (१७३६) इ. विल्यम्सबर्ग येथेच सुरू झाले. पॅट्रिक हेन्रीन यांनी ‘स्टँप अँक्ट’ला विरोध करणारे ऐतिहासिक भाषण येथील राजभवनात दिले होते (१७६५). येथील १५ मे १७७६ च्या व्हर्जिनिया अधिवेशनात ‘काँटिनेन्टल काँग्रेस’ला अमेरिकन स्वातंत्र्याची घोषणा करण्याचा आग्रह धरणारा ठराव मंजूर करण्यात आला. सुरूवातीचे साधारण एक शतकभर विल्यम्सबर्ग हे वसाहतीतील महत्त्वाचे राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक केंद्र होते. परंतु १७८० मध्ये राज्याची राजधानी रिचमंड येथे गेल्याने विल्यम्सबर्गचे महत्त्व कमी झाले. विल्यम्सबर्ग युद्धानंतर शहराचा ताबा केंद्रीय सैन्याने घेतला (१८६२), तो अमेरिकेच्या यादवी युद्ध समाप्तीपर्यत राहिला. कॉलेज ऑफ विल्यम अँड मेरी अल्पकाळ (१८८१–८९) बंद ठेवण्यात आले, तेव्हा तर शहराला अगदी उतरती कळा आली होती पण पहिल्या महायुद्धकाळात जवळच स्थापन झालेल्या युद्धसामग्री-निर्मिती कारखान्यामुळे शहराला पुन्हा चांगले दिवस येऊ लागले. विल्यम्सबर्गला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याच्या जॉन डी. रॉकफेलर यांच्या धोरणामुळे व भरीव आर्थिक मदतीमुळे १९२६ मध्ये शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे व ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी करण्यात आली. त्यावेळी १,२०० हेक्टर जमीन ताब्यात घेऊन त्यावरील ७०० इमारती पाडून टाकल्या, ८३ इमारतींची दुरूस्ती व ४१३ इमारतींची पुनर्बाधणी करण्यात आली.

शहरातील ६९ हेक्टर क्षेत्रात सु. पाचशेवर वसाहतकालीन इमारती व ३६ हेक्टर क्षेत्रात बाग–बगीचे व हिरवळीचे भाग पहावयास मिळतात. निम्म्यावर अधिक वसाहतकालीन इमारती मूळ स्थितीत असून बाकीच्या इमारतींची मूळ पायावरच पनर्बाधणी करण्यात आलेली आहे. वसाहतकालीन राजवाडा, रेन बिल्डिंग (१६९५), कॅपिटॉल (१७०१–०५), गव्हर्नरांचा राजप्रसाद (१७०६), ब्रुटन पॅरीश चर्च (१७१०–१५), ॲबी ॲल्ड्रिच रॉकफेलर म्यूझीयम, पब्लिक मॅगॅझीन (१७१५), पेटन रॅनडॉल्फ हाउस ( काँटिनेन्टल काँग्रेसच्या प्रथम अध्यक्षांचे निवासस्थान –१७१५), रॅली टॅव्हर्न (१७४२), वेदरबर्न्स टॅव्हर्न (१७४३), विथ हाउस (अमेरिकेतील पहिले कायदा प्राध्यापक जॉर्ज विथ यांचे निवासस्थान – १७५५), कोर्ट हाउस (१७७०) इ. अनेक ऐतिहासिक वास्तू या शहरात पहावयास मिळतात. त्यामुळे पर्यटकांचे हे एक मोठे आकर्षक ठिकाण बनले आहे. येथे उद्योगधंद्यांचे स्थानिकीकरण होऊ शकले नाही, त्यामुळे विल्यम्सबर्गची अर्थव्यवस्था प्रामुख्याने ईस्टर्न स्टेट हॉस्पिटल (स्थापना–१७७३), कॉलेज ऑफ विल्यम अँड मेरी व पर्यटन व्यवसाय यांवरच अवलंबून असलेली आढळते.

चौधरी, वसंत