विल्मिंग्टन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी डेलावेअर राज्यातील न्यू कॅसल परगण्याचे मुख्य ठिकाण, राज्यातील सर्वांत मोठे शहर, तसेच प्रमुख औद्योगिक व व्यापारी केंद्र. लोकसंख्या ७१,५२९ (१९९०). फिलाडेल्फियाच्या नैर्ऋत्येस ४२ किमी. वर ब्रँडीवाइन, क्रिस्तीना आणि डेलावेअर या नद्यांच्या संगमावर हे शहर वसलेले असून एक बंदर म्हणूनही ते प्रसिद्ध आहे.
डेलावेअर नदीखोऱ्यात पीटर मिन्यवट या डच व्यक्तीच्या नेतृत्वाखाली स्वीडिश वसाहतकारांनी शहराची सर्वांत जुनी वसाहत केली (१६३८). स्वीडिश लोकांनी डचांच्या प्रतिकारासाठी ‘फोर्ट क्रिस्तीना’ हा किल्ला येथे बांधला. तथापि नंतर डचांनी तो आपल्या ताब्यात घेतला (१६५५). डचांनी त्यास ‘अल्तेना’ असे नाव दिले. १६६४ मध्ये इंग्रजांनी डचांचा पराभव करून या ठिकाणावर ताबा मिळविला. प्रारंभीच्या शंभर वर्षापर्यत शेती हाच येथील प्रमुख व्यवसाय होता. परंतु क्वेकर लोकांच्या आगमनानंतर बंदर आणि बाजारपेठ या दृष्टीने याची भरभराट झाली (१७२०-३०). टॉमस विलिंग या वसाहतकऱ्यांच्या नावावरून याला विलिंग्टन असे नाव देण्यात आले (१७३१). १७३९ मध्ये पुन्हा याचे विल्मिंग्टन असे नाव बदलण्यात आले. याच वर्षी टॉमस पेनकडून याला ‘बरो’ची सनद मिळाली. अमेरिकन राज्यक्रांतीच्या वेळी हे डोलावेअर प्रांतातील सर्वांत मोठे शहर होते. ब्रँडीवाहन येथील युद्धात जॉन मॅकिन्ली याच्या नेतृत्वाखाली हे ब्रिटिशांनी घेतले (१७७७). याच वर्षी जॉर्ज वॉशिंग्टनने यावर ताबा मिळविला. वॉशिंग्टनने येथे आपल्या सैनिकी तळाचे मुख्यालय व टेहळणी केंद्र उभारले होते. पुढे १८३२ मध्ये याला शहराचा दर्जा मिळाला.
परिसरातील सुपीक शेतजमीन, जवळच्या खाडीमधून मुबलक पाणीपुरवठ्याची सुविधा आणि फिलाडेल्फिया हंदराचे सान्निध्य यांमुळे शहराच्या विकासात मोठी भर पडली. येथे लाकूड कापण्याच्या, धान्य कांडण्याच्या आणि कागदाच्या गिरण्या आहेत शहराच्या उत्तरेस पीठ गिरण्या असून अमेरिकेतील सर्वांत मोठ्या गिरण्यांत त्यांचा समावेश होतो. ब्रँडीवाइन येथे १८०२ मध्ये ई. आय्. दुपॉण्ट याने बंदुकीच्या दारूचा कारखाना सुरू केल्यानंतर शहराच्या औद्योगिक विकासास खऱ्या अर्थाने चालना मिळाली. पूर्वीच्या या छोट्या कारखान्याचे नूतनीकरण व विस्तृतीकरण झाले. येथील रासायनिक उद्योग जगात प्रगत समजला जातो. त्यामुळेच विल्मिंग्टनला ‘जगाची रासायनिक राजधानी’ अंसे संबोधले जात. अद्ययावत प्रयोगशाळांचीही येथे वाढ झाली आहे. फिलाडेल्फिया, विल्मिंग्टन आणि बॉल्टिमोर लोहमार्ग (सध्याचा पेन सेंट्रल) पूर्ण झाल्यानंतर (१८३७) या शहराच्या औद्योगिक व व्यापारी विकासात आणखी उत्तेजन मिळाले. जहाजबांधणी, रेल्वे कर्मशाळा, रसायननिर्मिती हे प्रमुख उद्योग व त्यांची प्रधान कार्यालये येथे आहेत. त्याशिवाय तांबे व खनिजतेल शुद्धीकरण, स्वयंचलित यंत्रांची जुळणी, स्फोटक द्रव्ये, युद्धसाहित्य, रबर, कापड, चामड्याच्या वस्तू, लोह आणि पोलादाच्या वस्तू, प्लॅस्टिके, खते, अन्नप्रक्रिया इ. व्यवसाय येथे चालतात.
शहरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यांमध्ये फोर्ट क्रिस्तानी राज्य उद्यान व वस्तुसंग्रहालय, प्रॉटेस्टंट पंथाचे जुने स्वीडिश चर्च (होली ट्रिनिटी चर्च-१६९८), फ्रेंच वास्तुशैलीतील प्रसिद्ध विंटरथर वस्तुसंग्रहालय व उद्यान, सीझर रॉडनी या स्वातंत्र्यगीत गाणाऱ्या संगीतकाराच्या स्मरणार्थ उबारण्यात आलेले स्मारक (१६३८), हेंड्रिकसन हाउस (१६९०), सैनिकी छावणी (१७७७), ओल्ड टाउनहॉल (१७९८), डेलावेअर कलाकेंद्र व वस्तुसंग्रहालय, हॅग्ली वस्तुसंग्रहालय, रॉडनी मध्यवर्ती कलाकेंद्र, डेलावेअर वैद्यकीय अकादमी या विशेष उल्लेखनीय आहेत. येथील १८७० च्या दशकात सुरू करण्यात आलेले जलविद्युत्प्रकल्प, लाकडी पाणचक्की व वाफेवर चालणारे एजिन इ. पाहण्यासारखे आहे. ब्रँडीवाइन उद्यान व प्राणिसंग्रहालय, बॅनिंग पार्क व ब्रँडीवाइन स्प्रिंग्ज पार्क ही सर्व सुविधांनी युक्त अशी उद्याने आहेत. डेलावेअर कला संग्रहालय आणि डेलावेअर निसर्ग इतिहास वस्तुसंग्रहालय या दोन संग्रहालयांमुळे शहराच्या सांस्कृतिक जीवनात भर पडली आहे. शहरात ब्रँडीवाइन कॉलेज (स्था. १९६६) व गोल्डे बीकाम कॉलेज (१८८६) आणि इतर अनेक महाविद्यालये आहेत. येथे दोन विमानतळ व संगीतिका गृह आहे. शहरातील ग्रँड ऑपेरा हाउसमध्ये नृत्य, संगीत, चित्रपट महोत्सव इ. कार्यक्रम साजरे केले जातात.
चौधरी, वसंत