विल्क्स, जॉन : (१७ ऑक्टोबर १७२७-२६ डिसेंबर १७९७). इंग्लंडमधील एक राजकीय मुत्सद्दी व क्रांतिकारक. त्याचा जन्म लंडन येथे कलालीचा व्यवसाय करणाऱ्या सधन कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांचे नाव इझ्राएल विल्क्स. सुरुवातीस प्रेसबिटेरियन पाद्र्याकडून धार्मिक शिक्षण घेऊन तो हार्टफर्ड येथील विद्यालयात गेला. नंतर त्याने घरीच शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने लायडन (जर्मनी) विद्यापीठातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले (१७४४-४६). इंग्लंडला आल्यानंतर एल्झबरीच्या जहागीरदार घराण्यातील मेरी मीड या युवतीबरोबर त्याचा विवाह झाला (१७४७). त्यामुळे बर्किंगहॅमशरच्या लोकांत त्याची प्रतिष्ठा वाढली आणि तो विलासी जीवन जगू लागला. परिणामतः काही दिवसांतच मेरी मीड त्याच्यापासून विभक्त राहू लागली. तथापि तिच्यामुळेच त्याला बकिंगहॅम परगण्याचे शेरीफपद मिळाले (१७५४-५५). सर फ्रान्सिस डॅशवुड या घनिष्ठ मित्रामुळे तो ‘मँड मंक्स ऑफ मेडमेनहॅम’ या दुराचारी गुप्तमंडळाचा सदस्य झाला.

एल्झबरी परगण्यातून तो १७५७ मध्ये संसदेवर व्हिग पक्षातर्फे निवडून आला. या सुमारास यूरोपमधील सप्तवार्षिक युद्ध संपून पॅरिस येथे शांततातह झाला. या युद्धामध्ये इंग्लंडला अवाजवी खर्च आला. तत्कालीन प्रधानमंत्री ब्यूटने पॅरिस तहाने इंग्लंडला फसविले, अशी विल्क्ससह व्हिग पक्षातील सर्व लोकांनी टीका केली. विल्क्स हा नॉर्थ ब्रिटन या राजकीय वृत्तपत्राचा लेखक-संस्थापक होता. त्याने या वृत्तपत्राच्या पंचेचाळीस क्रमांकाच्या अंकात (२३ एप्रिल १७६३) या तहावर व तहासंबंधी तिसऱ्या जॉर्जच्या घेतलेल्या भूमिकेवर घणाघाती हल्ला केला. तिसऱ्या जॉर्जच्या आईचे ब्यूटशी संबंध आहेत, असा बदनामीकारक आरोपही त्याने ब्यूटला राजकीय जीवनातून उठविण्यासाठी केला. त्यावेळी त्यास पकडण्याचे निनावी अधिपत्र (जनरल वॉरंट) काढण्यात येऊन विल्क्स व त्याचे सहकारी यांना तुरूंगात डांबण्यात आले. आपण पार्लमेंटचे सभासद असल्यामुळे आपल्यावरील आरोप शाबीत होईपर्यत आपणास तुरूंगात डांबणे बेकायदेशीर आहे, कारण हा संसदेच्या कायद्याचा भंग आहे, असा युक्तिवाद त्याने केला. तेव्हा मुख्य न्यायाधीशाने त्यास मुक्त केले. तथापि राजद्रोहाचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. शिवाय या प्रकरणापूर्वी विल्क्सने अलेक्झांडर पोपच्या ‘एसे ऑन मॅन’ वर आधारित ‘एसे ऑन वुमन’ ही निंदाव्यंजक अश्लील कविता प्रसिद्ध केली. या गुन्ह्याचा आरोप ठेवून त्याच्यावर पुन्हा खटला सुरू झाला. त्याच्यावरील बदनामीचा आरोप शाबीत होऊन न्यायाधीशाने त्यास दोषी ठरविले तेव्हा शिक्षा चुकविण्यासाठी तो फ्रान्सला पळून गेला. त्याला हाउस ऑफ कॉमन्समधून हाकलून लावण्यात आले (१७६४). मुद्रणस्वातंत्र्य व व्यक्तिस्वातंत्र्य या हक्कांचे रक्षण व्हावे, म्हणून प्रयत्नन करीत असता विल्क्सला देशत्याग करावा लागला. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढू लागली व परिणामी १७६८ मध्ये त्याच्या मित्रांनी त्यास इंग्लंडला परत बोलाविले आणि मिडलसेक्स परगण्यातून पुन्हा संसदेवर निवडून दिले. त्याची संसदेतून पुन्हापुन्हा हकालपट्टी झाली, तरी मिडलसेक्स परगण्यातून तीन वेळा त्याची फेरनिवड झाली. अखेर त्याने आपल्याजवळील आरोपांविरूद्ध सेक्रेटरी ऑफ स्टेट यांच्याकडे दाद मागणारा अर्ज केला. त्यानुसार त्याची आरोपातून मुक्तता होऊन त्याला नुकसानभरपाई मिळाली (१७७०) आणि लंडनवासियांनी त्यास डोक्यावर घेतले. त्याची लोकप्रियता पुढे वाढतच गेली. व्यापाऱ्यांचाही त्याला पाठिंबा मिळाला. ‘विल्क्स व स्वातंत्र्य’ असे घोषवाक्य प्रसृत झाले. अमेरिका आणि इंग्लंड येथील त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याचे कर्ज फेडले. धार्मिक सहिष्णुता आणि संसदीय सुधारणा यांसाठी त्याने अथक प्रयत्न केले, संसदेत त्याने अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाविरोधी बरीच भाषणे दिली. लंडन शहराचा ऑल्डरमन (उपमहापौर-१७६९), मिडलसेक्स परगण्याचा शेरीफ (१७७१) व लंडन नगरपालिकेचा लॉर्ड मेयर (महापौर-१७७४) ही पदेही त्याने भूषविली. मात्र त्यानंतर त्याच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. मतदारांनीच त्याला नाकारले. तो राजकारणातून निवृत्त झाला. त्याची आर्थिक स्थितीही खालावली. तो लंडन येथे मरण पावला.

विल्क्समुळे इंग्लंतडच्या संसदीय इतिहासात, निनावी अधिपत्र काढणे हे बेकायदेशीर आहे आणि आपणास हव्या असणाऱ्या व्यक्तीस आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा जनतेला हक्क आहे, या गोष्टी सिद्ध झाल्या. तसेच संसदेत होणारी भाषणे प्रसिद्ध केली जाऊन त्यांवर वृत्तपत्रांतून टीकाही होऊ लागली. त्यातून संसदीय कामकाजासंबंधी सामान्य लोकांस माहिती मिळू लागली. शिवाय संसदसदस्यांवर अप्रत्यक्षरीत्या लोकमताचा दबाव निर्माण झाला. विल्क्सचे एकूण जीवनच संघर्षमय होते. त्याचे व्यक्तिमत्व स्वैर व स्वच्छंदी होते.

संदर्भ : 1. Postgate, R. W. That Devil Wilkes, 1929, Rev. Ed., London, 1956.

           2. Rude, G. Wilkes and Liberty: A Social Study of 1763 to 1774. New York, 1962.

           3. Sherrard, Owen A. A Life of John Wilkes, 1930, Rev. Ed. London, 1972.

घाडगे, विमल