विलायतखाँ : (१९११ – ). विख्यात सतारवादक. सतारवादनातील इमदादखानी घराण्याचे आजचे प्रभावी व प्रमुख प्रतिनिधी. त्यांचे वडील इमदादखाँ हे विलायतखाँ यांच्या लहानपणीच निर्वतले. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रारंभीच्या शिक्षणावर मातुल आजोबा बंदे हसन यांच्या गायकीचे व स्वतःच्या मेहनती प्रतिभेचे संस्कार करून विलायतखाँनी आपली वादनशैली सिद्ध केली. प्रस्तुत शैलीची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे : (१) धृपद व ख्याल गायनाच्या प्रभावाने आणि या प्रकारांना अनुसरून वादन व्हावे म्हणून डाव्या (म्हणजे वाद्याच्या पडद्यांवर काम करणाऱ्या) व उजव्या (म्हणजे नखीने तारा छेडणाऱ्या) हातांच्या कामगिरी नव्या कौशल्याने व संतुलनाने सिद्ध केल्या. त्यातून गायकी अंग विकसित झाले. (२) सतारवादनात नेहमी वापरल्या जाणाऱ्या गत या रचनाप्रकाराप्रमाणेच ठुमरी, भटियाली, धनु वगैरेंचे प्रभावी सादरीकरण केले. (३) एक-एक स्वर स्वतंत्र आगाताने वाजवूनही द्रुत व गुंतागुंतीच्या बंधाचा विपुल वापर केला. (४) सादरीकरणातील आलाप या मंदगती अंगासाठी सूरबहार या मंद्रस्वनी वाद्याची व नंतरच्या वादनासाठी सतारीची योजना करण्याचा प्रघात सुरू केला. (५) इष्ट त्या वादनाकरिता आवश्यक ते तांत्रिक बदल ⇨सतार या वाद्यात घडवून आणले. उदा., पाच स्वरी मींड घेण्याकरिता करावा लागणारा जोरदार आघात (नखीचा तारेवर) पेलता यावा, म्हणून भोपळ्यावरील तबली अधिक जाड बनविण्यात आली. घोडीची उंची वाढविली. भोपळा व दांड हे भाग अधिक मजबुतीने जोडण्याकरिता विशेष मळसूत्रे इ. वापरली. पडदेही अधिक जाड व जर्मन सिल्व्हर धातूचे केले. तारांची संख्या व जाडी यांतही बदल केले. विलायतखाँ यांच्या शिष्यपरिवारात त्यांचा भाऊ इम्रतखाँ, अरविंद पारीख आदींचा अंतर्भाव होतो. सतारवादन देशीविदेशी लोकप्रिय करण्याचे व भारतीय वाद्यसंगीतात मोलाची भर टाकण्याचे श्रेय विलायतखाँ यांच्याकडे जाते. जलसाघरसारख्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाला विलायतखाँनी वेधक संगीत दिले आहे.
रानडे, अशोक दा.
“