विरूपाक्ष पंडित : (सु. १५८४ – ?). मध्ययुगीन कन्नड कवी. त्याची चरित्रपर माहिती फारशी उपलब्ध नाही. सोळाव्या शतकाच्या मध्यापासून विजयानगर साम्राज्याला उतरती कळा लागली. तेव्हा त्या साम्राज्याची राजधानी विजयानगरहून पेनुकोंडे येथे हलविण्यात आली. तेथे नव्या राजवटीत नव्याने उदयास आलेल्या प्रमुख कन्नड कवींमध्ये विरूपाक्ष पंडित याची गणना होते. त्याने लिहिलेल्या चेन्नबसवपुराण या काव्यग्रंथाला मध्ययुगीन कन्नड साहित्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान आहे. ⇨चेन्नबसव (सु. बारावे शतक) हा बसवेश्वराचा भाचा. महाज्ञानी व क्रियाज्ञानी असे त्याचे वर्णन वीरशैव इतिहासकारांनी केले आहे. अशा ह्या चेन्नबसवाचे संपूर्ण जीवनचरित्र म्हणजेच चेन्नबसवपुराण होय. चेन्नबसव याला शिवाचा अवतार मानून त्याचा जन्म, त्याचे पराक्रम, त्याने केलेली तत्वज्ञानाची मांडणी व प्रसंगोपात्त उपदेश, जनजागृतीसाठी केलेला संचार, संप्रदायाचे संघटनकार्य इ. विषयांचे महाकाव्यसदृश वर्णन विरूपाक्ष पंडिताने या ग्रंथात केले आहे. याशिवाय वीरशैवांच्या आचारविचारांचे विधिनियम, वीरशैव संतांची चरित्रे, वीरशैवांचा कुळाचार इ. विषयांचे विवरणही कवीने त्यात केले आहे. त्यामुळे हा काव्यग्रंथ म्हणजे वीरशैवांचा आचारग्रंथच मानला जातो. आजही या पुराणाचे सामुदायिक वाचन कर्नाटकात होते.
पंधराव्या व सोळाव्या शतकांत कन्नड साहित्यात शिवशरण संतांची चरित्रे, आख्याने, महाकाव्ये यांची एक लाटच आली. हरिहर, राघवांक, चामरस या कवींनी हा नवा प्रवाह लोकप्रिय केला. याच काळात भीमकवीचे बसवपुराण व विरूपाक्ष पंडिताचे चेन्नबसवपुराण ही पुराणे अत्यंत लोकप्रिय ठरली. चेन्नबसवपुराण हे आकाराने व गुणानेही अन्य पुराणांमध्ये अधिक उठून दिसते. या काव्यावर महाकाव्याची छाया आहे. हा ग्रंथ कवीने पेनुकोंड्याच्या वेंकटपतिराय या आपल्या आश्रयदात्याच्या गुणवर्णनासाठी लिहिला आहे व विजयानगरच्या गतवैभावाचे पुनरूज्जीपवन सूचित करणारी भविष्यवाणी त्यात सांगितली आहे, असेही मत एका समीक्षकाने मांडले आहे. असे असले, तरी वीरशैव संप्रदायाची महती जनसामान्यांपर्यत पोहोचविण्याचे श्रेय चेन्नबसवपुराणासच द्यावे लागते.
तोरो, अ. रा.