विराट : बैराट. राजस्थान राज्याच्या जयपूर जिल्ह्यातील एक प्राचीन स्थळ. जयपूरच्या ईशान्येस ८५ किमी. वर असलेले हे ठिकाण पुरातत्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असून ते विराटनगर या नावानेही परिचित आहे.

बैराट म्हणजेच महाभारतातील विराटपुरी अथवा विराटनगर असावे. प्राचीन ‘मत्स्यदेश’ म्हणजेच ‘विराट देश’ असे हिंदू धर्मातील कथांच्या आधारे सांगितले जाते. हा देश राजस्थान राज्यातील सांप्रतच्या जयपूर, अलवर, भरतपूर या प्रदेशांचा मिळून बनलेला होता. अलवरच्या दक्षिणेस सु. ३५ किमी. वरील ‘मच्चेरी’ या गावाचे नावही ‘मत्स्य’ या नावाच्या अपभ्रंशातून आले असावे असे म्हणतात. मत्स्यदेशावर विराट नावाच्या राजाचे राज्य होते. त्याच्या नावावरूनच या देशाचे ‘विराट देश’ व राजधानी असलेल्या मत्स्यनगराचे ‘विराटनगर’ हे नाव रूढ झाले असावे.

मत्स्यदेशाचा अंगुत्तरनिकाय या बौद्ध ग्रंथात व इतर वाड्मयात अनेकवेळा उल्लेख आढळतो. त्यानुसार मत्स्यदेश हे सोळा महाजनपदांपैकी एक महाजनपद होते. या देशात राहणाऱ्या लोकांनाही ‘मत्स्य’ म्हणत. यांचे उल्लेख ऋग्वेद, कौषीतकी उपनिषद, गोपथशतपथ ब्राह्मणे, मनुस्मृती, महाभारत इ. ग्रंथांत व बौद्ध वाङ्मयात असून त्यांत हे लोक धनवान व गोपालक होते असे म्हटले आहे. या धनाच्या रक्षणासाठी मत्स्य लोकांना अनेकवेळा युद्ध करावे लागत होते व त्यामुळेच ते चांगले लढवय्ये बनले होते. महाभारत काळात येथे राज्य करणाऱ्या विराट राजाकडे अपार गोधन होते. पांडवांनी वनवासकाळात आपला एक वर्षाचा अज्ञातवासाचा काळ विराट राजाकडे चाकरी करून घालविला होता. त्या काळात भीमाने विराटाच्या सेनापती कीचक याचा वध केल्याची घटना, तसेच विराटाच्या गोधनाच्या रक्षणासाठी अर्जुनाला सुशर्म्याबरोबर युद्ध करावे लागल्याची घटना विराटनगरीतील असल्याचे उल्लेख महाभारतात आहेत.

विराट (बैराट) गावाजवळ सापडलेले, सम्राट अशोकाच्या काळातील राजाज्ञा कोरलेले दोन शिलालेख (इ. स. पू. २५०) ग्रीक व इंडो-ग्रीक नाणी, बोद्ध मठाचे व चैत्याचे अवशेष, चिनी प्रवासी ह्यूएन्‌त्संग याच्या प्रवासवृत्तांतातील उल्लेख (इ. स. ६३४) यांवरून हे ठिकाण इ. स. पू. तिसऱ्या शतकात बोद्ध धर्माचे केंद्र होते, असे तज्ञांचे मत आहे. गावाजवळ झालेल्या उत्खननातील बौद्ध धर्मीय अवशेषांपैकी एका पठारी भागावरील वर्तुळाकार चैत्याच्या भिंतींचे अवशेष उल्लेखनीय आहेत. हे भारतातील प्राचीन अवशेषांपैकी (इ. स. पू. ३००) मानले जातात. या चैत्याला अष्टकोनाकृती २६ कांब आहेत. पूर्व बाजूस प्रवेशद्वाराचा भाग असून याला गोलाकार प्रदक्षिणामार्ग आहे. विराट गावाजवळील पंडू नावाच्या टेकडीवर एक गुंफा असून ती ‘भीमगुफा’ या नावाने ओळखली जाते, तीत अशोकाचा एक शिलालेख आहे. गावाजवळच सारिस्का हे प्रसिद्ध अभारण्य आहे.

या प्रदेशातील मीन (मत्स्य) जमातीचे लोक दरवर्षी बेंगंग हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या उत्सवात ते पारंपारिक नृत्याच्या वेळी पांडवांविषयीची गाणी म्हणतात. राजपुतान्यातील मेवात या भागात राहणारे मीन लोक हेच ‘मेवाती’ म्हणून ओळखले जात होते व पुढे मराठ्यांच्या काळात तेच ‘मवासी’ या नावाने प्रसिद्ध झाले असावेत, असे तज्ञांचे मत आहे.

पूर्व बंगालमधील (बांगला देश) दिनाजपूरबरोबर विराट देशाचा संबंध भविष्य पुराणातील काही उल्लेखांवरून जोडला जातो. त्यात निवृति (निवृत्ती) देशाचा (पुंड्र देशाचा पूर्व भाग) उल्लेख करताना त्याच्या शेजारी विराट देश होता असा उल्लेख आहे. दिनाजपूर जिल्ह्यातील कांतनगर येथे विराटाचे ‘उत्तर गोगृह’, तर मिदनापूर येथे ‘दक्षिण गोगृह’ दाखविले जाते. परंतु महाभारतातील वर्णनानुसार युधिष्ठिराने हस्तिनापूर (दिल्ली) येथे राज्य करणाऱ्या दुर्योधनाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने त्याच्या जवळपास आपले अज्ञातवासाचे ठिकाण निवडले होते. त्यामुळे महाभारतातील विराट देशाशी यांचा संबंध दाखविणे योग्य नाही, असे इतिहासज्ञाचे मत आहे.

चौंडे, मा. ल.