विमुक्त जाति-जमाती : भारतीय समाजातील वंशपरंपरेने आणि सामाजिक प्रथेनुसार गुन्हेगारीवर व भटक्या वृत्तीवर गुजारण करणाऱ्या काही जाति-जमातींना ब्रिटिश अमदानीत गुन्हेगार जाती म्हणून ओळखण्यात येत होते व तशी त्यांची शासकीय नोंद करण्यात येत होती. त्यांच्या हालचालींवर पोलिसांचे नियंत्रण असे. ठरावीक बंदिस्त वसाहतीत पोलिसांच्या देखरेखीखाली राहण्याची सक्ती त्यांच्यावर होती स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्माधिष्ठित विषमतेच्या तत्वावर आधारलेली ही शासकीय प्रथा, स्वतंत्र भारतीय समाजाच्या निर्मितीत पायाभूत म्हणून मानल्या गेलेल्या सामाजिक समतेच्या तत्वाविरद्ध आहे, हे लक्षात आल्यामुळे ब्रिटिश अमदानीतील या जाति-जमीतींच्या संदर्भात तयार केलेला गुन्हेगार जमातींचा कायदा रद्द करण्यात येऊन त्यांच्या हालचालींवरील व राहण्यावरील सर्व निर्बध काढून टाकण्यात आले. म्हणून या जाति -जमातींना स्वतंत्र भारतात ‘डीनोटिफाइड’ म्हणजे नोंदणीवर्जित किंवा विमुक्त जाति-जमाती या संज्ञेने ओळखण्यात येते.

काही जमातींची गुन्हेगार जमाती म्हणून शासकीय स्तरावर नोंद करण्याची व त्या अनुषंगाने त्यांना वागणूक देण्याच्या प्रथेची सुरूवात ब्रिटिश अमदानीच्या सुरूवातीच्या कालखंडात १७९३ साली निर्माण केलेल्या ‘रेग्युरलेशन २६’ या अघिनियमाने झाली. याचे पुढे रूपांतर ठगी व डकॉइटी खात्याच्या निर्मितीत झाले. १८६० साली भारतीय दंड संहिता (इंडियन पीनल कोड) अंमलात आली. पुढे १८७१ मध्ये गुन्हेगार जमाती कायदा (क्रिमिनल ट्राइब्ज ॲक्ट) करण्यात आला व या कायद्याचे १९२४ सालच्या गुन्हेगार जमाती केंद्रीय अधिनियम (क्रिमिनल ट्राइब्ज सेंट्रल ॲक्ट) या कायद्यात रूपांतर झाले. हा कायदा १९५२ पर्यत अंमलात होता. तो ३१ ऑगस्ट १९५२ रोजी रद्द करण्यात आला व आतापर्यत गुन्हेगार जमाती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाति-जमातींना विमुक्त जाति-जमाती या संज्ञेने ओळखण्यात येऊ लागले.

गुन्हेगार जमाती म्हणून नोंदणी झालेल्या जाति-जमातींची लोकसंख्या १९२५ साली ४० लाखांच्या आसपास होती. १९४९ साली या वर्गाची लोकसंख्या २२, ६८, ००० एवढी होती व यात एकूण १२७ सामाजिक गटांचा अंतर्भाव झाला होता. अनुसूचित जाती व जमातींखेरीज अन्य जातींची नोंद जनगणनेच्या वेळी न करण्याच्या शासकीय निर्णयामुळे १९५१ नंतर या वर्गाची निराळी लोकसंख्या जनगणना अहवालात उपलब्ध नाही. १९५१ साली या वर्गाची लोकसंख्या २४,६४,००० एवढी होती. महाराष्ट्रात १९८६ च्या शासकीय परिपत्रकानुसार २८ भटक्या जमाती व १४ विमुक्त जाती आहेत. बेरड, बेस्तर, भामटा, रामोशी, वडार, वाघरी व छप्परबंद या १४ विमुक्त जाती होत. भटक्या जमातींच्या गोटात गोसावी, बेलदार, भराडी, भुते, चित्रकथी, गारूडी, घिसाडी, गोंधळी, गोपाळ जोशी, कोल्हाटी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, बहुरूपी या काही प्रमुख जाती आहेत.

एखाद्या जमातीची वंशपरंपरेने गुन्हेगार म्हणून नोंद करावयाचा प्रघात शासकीय तसेच सर्वसामान्यांच्या दृष्टीने पडला असला, तरी मुळात गुन्हेगार जमाती कशा निर्माण झाल्या, याबद्दल विविध मतप्रवाह आढळतात. भारताचे आदिवासी म्हणून गणल्या गेलेल्या वन्य जमातींचे ते वंशज आहेत, असे काहींचे म्हणणे दिसते. मानवशास्त्राच्या दृष्टीने गुन्हेगार जमातींमध्ये काही आदिवासी मानववंशांची लक्षणे दिसत असली, तरी त्यांच्यात अनेक मानववंशांचे मिश्रण झाले असावे, असेही म्हटले जाते. आदिवासी जमातींपैकी काही टोळ्या एका ठिकाणी स्थिर होऊन राहत नसत. तर अन्न शोधण्याकरिता रानावनांत भटकत असत. रानातील जनावरांची शिकार करणे अगर वृक्षवल्लींमधून खाद्य शोधणे यांवर त्यांचा उदरनिर्वाह होत असे. इंग्रज राजवटीत अंमलात आलेल्या जंगल –कायद्यामुळे या वनचर आदिवासींच्या मुक्त संचारावर बंधने आली. त्यामुळे अगतिक होऊन लहानमोठ्या चोऱ्या करणे, दरोडा घालणे, वाटमारी करणे यांच्याच आश्रयाने त्यांना जगावे लागले. गावगाड्याच्या चाकोरीत बसेल आणि गावकऱ्यांच्या गरजा भागवून प्रामाणिक जीवन जगता येईल, असा कोणताच व्यवसाय त्यांना लाभला नाही, अगर ते पतकरू शकले नाहीत. त्यांच्या वंशजांनाही हेच जीवन जगावे लागले आणि कालक्रमाने त्यांच्या गुन्हेगार जमाती बनल्या, असेही काहींचे मत आहे.

गावकऱ्यांच्या नित्य-नैमित्तिक अशा गरजा भागविण्याकरिता अलुतेदार-बलुतेदार यांची लहानमोठ्या गावांतून सोय होती. शिवाय काही उदीमदार-कसबदार तसेच खेळ-करमणूक करून अगर देवादिकांची भजने-गाणी म्हणून पैसे-धान्य-वस्तू यांच्या रूपाने भीक मागणारे लोकही हंगामात गावांना भेटी देत असत. अशा लोकांची गावागावांतून एकप्रकारे वतनदारी चालू होती. महाराष्ट्रात अशा लोकांच्या एकूण ६०-७० तरी जाति-जमाती होत्या. पुढे कालांतराने ही प्रथा बंद पडली. ज्यांना गावगाड्यात काहीच स्थान उरले नाही ते गुन्हेगारीकडे नाइलाजाने वळले असावेत, असाही एक तर्क आहे. यांतील बहुतेकांच्या आता जाती बनल्या आहेत आणि काहींच्या बाबतींत त्यांचा पारंपारिक व्यवसाय आजही चालू आहे. गुन्हेगार मानल्या गेलेल्या या जमाती मात्र स्वतःला राजपूत क्षत्रियांचे वंशज समजतात. त्यांच्यातील काही आडनावे व कुलनामेसुद्धा राजपुतांकडून आलेली आहेत.


उत्तर भारतात राजपुतांचा वारसा सागंणाऱ्या अशा अनेक गुन्हेगार जाती अस्तित्वात आहेत मुसलमानांकडून राजपुतांचा पराभव झाल्यानंतर स्थानिक राजपूत सैनिकांचा सैनिकी पेशा बंद झाला आणि हातातून शेतजमीन निसटल्यामुळे ते शेतीसुद्धा करू शकले नाहीत. अशा परिस्थितीत ते गुन्हेगारीकडे वळले असणे शक्य आहे. उत्तरेतील सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे व सत्ता बळकावण्याकरिता चाललेल्या स्पर्धेमुळे या गुन्हेगार जमातींवर वचक राहणेही अशक्य होऊन बसले. इंग्रज राजवट भारतात स्थिरावण्याच्या प्रारंभीच्या काळात ⇨पेंढारी व ठग या कुप्रसिद्ध टोळ्यांसहित सबंध देशभर पसरलेल्या अनेक गुन्हेगार प्रवृत्तींच्या जमातींना आवरण्याचे काम पतकरावे लागले व त्यासाठी गुन्हेगार जमातींविषयक कायदे करावे लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या गुन्हेगारी कायद्यांच्या बंधनातून या जमातींची मुक्तता करण्यात आली. उत्तर भारतात, विशेषतः पंजाबात ⇨संसी (सानसी) नावाची जमात अशा रीतीने विमुक्त झालेली आहे. ते स्वतःला राजपुतांचे वंशज समजतात. उ. भारतात संसी जात आहेच, शिवाय तिच्याशी निकटच्या अशा बेदिया (बेरिया) आणि माला नावाच्या जातीही आहेत. या दोन्ही जातींत अनेक शाखा-उपशाखा आहेत परंतु त्या सर्वाचा व्यवसाय मात्र सारखा आहे. संसी लोकांत प्रचलित असलेल्या समजुतीनुसार तेराव्या शतकात मुसलमानी आक्रमकांकडून ते राजस्थानमधून हाकलले गेले तेथून ते प्रथम पंजाबला गेले आणि नंतर इतरत्र पसरले. घरेदारे, जमीनजुमला सर्व सोडून जावे लागल्यामुळे उदरनिर्वाहाचे नवीनच साधन त्यांना शोधावे लागले. स्थानिक जमीनदारांकडे शेतमजूर वा मेंढपाळ वा जमीनदारांच्या वंशावळीची माहिती ठेवणारे म्हणून त्यांना राहावे लागले. भटकी अवस्था, कोठेही स्थायिक होऊन राहण्याची असमर्थता यांमुळे काही संसी लोक नाइलाजाने गुन्हेगारीकडे वळले असावेत. चोऱ्या करणे, दरोडे घालणे, जनावरे पळवणे, प्रवासी बैलगाड्या अडवून वाटमारी करणे, आगगाड्या लुटणे, उभी पिके कापून नेणे, मेंढ्या पळविणे यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये संसी तरबेज होते. या गुन्हेगारीत त्यांच्या स्त्रियासुद्धा खुशीने भाग घेत असत. दाखवायला औषधी वनस्पती विकण्याचा धंदा जरी त्या करीत असल्या. तरी दरोडा घालण्यायोग्य घरे कोणती त्या घरांत माणसे किती, त्यांची कमजोरी कशात आहे इ. उपयुक्त माहिती गोळा करण्यात त्या निष्णात असल्याचे दिसून आले. तसेच पुरूष मंडळी काही आपत्तींत सापडली, तर त्यांच्या संरक्षणासाठी त्या हिरिरीने पुढाकार घेत असत. संसी समाजात स्त्रियांचे स्थानही उच्च दर्जाचे आहे. कौटुंबिक मालमत्तेत त्यांना वारसाहक्क आहे. गावच्या पंचायतीत त्या भाग घेऊ शकतात. घटस्फोटाचा आणि पुनर्विवाहाचा अधिकारही त्यांना आहे. संसी जमातीत बहुपत्नीय-विवाहास मान्यता नाही. परंतु देवर-विवाह आणि मेहुणी-विवाह संमत आहे. देज देणे त्यांना पसंत नाही. जमातीत अनेक अंतर्विवाही गट आहेत. प्रत्येक गटात अनेक बहिर्विवाही कुळी आहेत आणि प्रत्येक कुळीमध्ये उपकुळीही आहेत. एक उपकुळी म्हणजे सर्वसामान्यपणे बरोबरीने गावोगाव भटकणाऱ्या काही कुटुंबांचा तांडाच असतो. ह्या तांड्याबरोबर त्यांची सर्व जंगम मालमत्ता, जनावरे, भांडीकुंडी इ. असतात. ‘सरगणा’ नावाचा या तांड्याचा नायक अगर प्रमुख असतो. हे प्रमुख्यत्व त्याला त्याच्या कर्तृत्वाच्या आधारे मिळते. तांड्याच्या हालचालीवर त्याची देखरेख चालते. जाट शेतकऱ्यांच्या वंशावळीची माहिती सांगण्याचे काम संसी जमातीकडे असते आणि वंशावळीच्या निश्चितीच्या बाबतीत त्यांचा शब्द अखेरचा व प्रमाणभूत मानला जातो. दिसायला ते राजपूत वा जाट यांसारखे दिसतात. काही संसी मुसलमान झाले आणि त्याहून अधिक लोकांनी शीख धर्म स्वीकारला असला, तरी बहुसंख्य संसी लोक हिंदू धर्मच अनुसरतात.

राजपुतांचे वंशज म्हणून दावा करणारी आणखी एक जमात म्हणजे हबुरा ही होय. राजपूत चौहानांचे वंशज म्हणून सांगणारी व गंगा-यमुना नद्यांच्या प्रारंभीच्या प्रदेशात दिसून येणारी ही जमात बहुधा संसी जमातीचीच शाखा असावी. ते पूर्वी भटकत राहून चोऱ्या, घरफोड्या करीत. आपल्या मुलांनाही लहानपणीच शेतातल्या चोऱ्या करायला शिकवत. संसीप्रमाणेच हबुरा स्त्रियांचा दर्जाही उच्च प्रतीचा आहे. संसीपेक्षा हबुरा जमातीमध्ये हिंदू धर्मीयांचे प्रमाण जास्त दिसते. यांच्यातील अविवाहित स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यांच्या बोलीभाषेवर गुजरातीचा प्रभावही अधिक आहे. यावरून ही जमात मुळात गंगा-यमुनेच्या दक्षिणेकडून आलेली असावी, अगर राजस्थानशी संबंधित असावी, असा तर्क केला जातो.

मूळची पंजाबातील परंतु आता भारतभर पसरलेली एक गुन्हेगार जात म्हणजे छप्परबंद ही होय. ते महाराष्ट्रातही आढळतात. घरावरील छप्परे बांधण्याचा, म्हणजेच घरे बांधण्याचा व्यवसाय ते करीत असल्याने त्यांना छप्परबंद हे नाव पडले, असे एक मत आहे. धर्माने ते मुसलमान असून खोटी नाणी पाडण्यात आणि खोटे दस्तऐवज बनविण्यात पटाईत होते. ते देशभर भटकत असले, तरी छप्परबंद ही जात मुख्यतः कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात स्थिरावलेली दिसते. स्थायिक झालेल्या गावी ते शेतमजूर म्हणून काम करतात. शेतीबरोबरच कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय ते करतात. स्त्रिया रजया शिवतात व पुरुष त्या विकतात. नाणी बनवणारे छप्परबंद बहुधा व्यापारी किंवा फकिरी वेषात फिरून ती बनावट नाणी खपवतात.

राजपुतांचे वंशज म्हणून सांगणारे आणि कच्छ, काठेवाड येथून अहमदाबाद, सिंधपर्यत भटकत जाणारे मियाणा हे पूर्वीचे हिंदू आणि काही शतकांपूर्वी मुसलमान झालेले लोक एकेकाळी चाचेगिरी करीत असावेत, असा तर्क आहे. त्यांचे मूळ वसतिस्थान सिंधमध्ये असून दिसायला ते सिंधी लोकांसारखेच दिसतात. त्यांच्यावर पोलिसांची सक्त देखरेख असल्याने त्यांचा उपद्रव आता कमी आहे एकेकाळी ते घरफोडी, वाटमारी, जनावरे पळविणे, बायका पळविणे यांकरिता कुप्रसिद्ध होते. अलीकडे काही लोक शेती, मोलमजुरी, गुरे चारणे असे व्यवसाय करतात मात्र गुन्हेगारी वृत्तीचा पूर्ण लोप झालेला नाही.

वंशाने राजपूत म्हणून सांगणारी आणि संघटित दरोडेखोरीवर जगणारी आणखी एक जमात म्हणजे भांटू होय. उत्तर व मध्य भारतामध्ये ते बहुधा आढळतात आणि त्यांची फेरी बंगाल, आसामपर्यतही असते. भांटू जमातीचे स्वतःचे मत काहीही असले, तरी संसी, हबुरा आणि कंजार यांच्यातीलच ती एक शाखा वाटते. भांटू जमात ३६ बहिर्विवाही गोत्रे आणि कुळी यांमध्ये विभागली गेली आहे आणि विवाह, पूजाअर्चा आणि अंत्यसंस्काराचे विधी यांच्याबाबतीत त्यांच्यात भेद आहेत. भांटू लोक शरीराने चांगले, सशक्त असून ते उत्तम धावपटू आहेत. सर्वसामान्यपणे ते १०–१२ कुटुंबांच्या घोळक्यात भटकातात आणि गावापासून बऱ्याच अंतरावर मुक्काम ठोकतात. धर्माचरणात ते हिंदूमधील कनिष्ठ जातींसारखे वाटतात. ते देवीभक्त आहेत, परंतु ते हिंदूंच्या कोणत्याही देवळात जात नाहीत आणि कोणत्याही धार्मिक समारंभात ब्राह्मणाला बोलावत नाहीत. आपसांत ते एक प्रकारची बोलीभाषा वापरतात, ती अन्य कोणालाच कळत नाही. अनेक गुन्हेगारी भांटू कुटुंबांची वसाहत १९२६ मध्ये अंदमान बेटावर वसविण्यात आली. त्यानंतर ते गुन्हेगारीपासून मुक्त झाले आणि शेती करून अगर स्थानिक उद्योगधंद्यांमध्ये मोलमजुरी करून उदरनिर्वाह करू लागले, असे म्हटले जाते.


सनौढिया किंवा चंद्रवेदी नावाची एक भटकी जमात आहे. बुंदेलखंड हा तिचा बालेकिल्ला आहे. सनाढ्य ब्राह्मणांपासून आपली उत्पत्ती झाली असल्याचे ते मानतात. अनेक जातींतून फुटून आलेल्या सदस्यांनी ही जमात बनलेली आहे. या जमातीचे वैशिष्ट्य म्हणजे तिला रात्री चोरी करणे मान्य नाही. तिचे सदस्य फक्त दिवसाच चोऱ्या करतात आणि गुन्हा करताना हिंसाचार झालेलासुद्धा या जमातीला पसंत नाही.

सनौढिया अगर चंद्रवेदी सोडून बाकीच्या सर्वच जमाती राजपुतांशी वांशिक संबंध जोडणाऱ्या आहेत. त्यांच्यातील गोत्रे आणि कुलनामेसुद्धा या जमातींनी उचलली आहेत. जन्म व मृत्यूसंस्कारही स्थानिक राजपुतांचेच आहेत, हे लक्षणीय आहे.

संसी जमातीशी नाते सांगणारी, परंतु मध्य भारतातील बाघरी (बागडी) जमातीशी साम्य असलेली ⇨वाघरी नावाची जमात गुजरातमध्ये आहे. दिसायला ते साधारण संसीसारखेच दिसतात. यावरून ती संसीमधून फुटून निघालेली शाखाच असावी, असे वाटते. त्यांच्यात प्रचलित असलेल्या लोककथांनुसार वाघरी हे गुजरातमध्ये राजस्थानकडून आले आणि नंतर मध्य प्रदेशात आणि महाराष्ट्राच्या उत्तरेतील भागात आले. त्यांच्या बोलीभाषेत आजही गुजरातीचे मिश्रण दिसून येते. ते जेथे जातील, तेथील स्थानिक भाषाही ते सहजपणे आत्मसात करतात. व्यवसायानुसार आणि त्यांच्या वास्तव्याच्या प्रदेशानुसार त्यांच्यात विभागणी झालेली आहे. ही विभागणी वैवाहिक संबंधातही दिसून येते. म्हणजे त्यांच्यात व्यवसाय आणि राहत्या प्रदेशानुसार अंतर्विवाही गट निर्माण झाले आहेत. काही वाघरी कुटुंबे शेती करतात, काही कोंबड्या पाळतात, अन्य काही लोक फळझाडे वर्षाच्या कराराने घेऊन फळे विकतात. त्यांच्यातील कंकोडिया आणि तळवडा यांसारख्या पोटजाती शेती करतात. अन्य काही दातवणाच्या काड्या विकतात आणि लग्नसराईत ताशा वाजवितात. वाघरींच्या बऱ्याच टोळ्या मुंबई, अहमदाबाद अशा मोठ्या शहरांलगतच्या झोपडपट्टीत राहतात, तर अन्य काही गावांजवळ राहतात. पाचदहा कुटुंबांच्या घोळक्यात ते प्रवासाला निघाले की सर्व सामानसूमान, गुरेढोरे बरोबर घेतात. कोठेही ते २–४ दिवसांहून अधिक मुक्काम करीत नाहीत.

वरील जमातींव्यतिरिक्त पूर्वी अन्न शोधण्याकरिता दूरवर जंगलांतून व दऱ्याखोऱ्यांतून भटकत असलेल्या, परंतु नंतर असले जीवन असाध्य झाल्यानंतर नाइलाजाने गुन्हेगारी वृत्तीकडे वळलेल्या काही जाति-जमातीही देशभर पसरलेल्या दिसून येतात. त्यांच्यापैकी ज्यांना शक्य झाले, ते लोक स्थायिक होऊन शेतमजुरी वा इतर मोलमजुरी करून राहू लागले. इतर लोक मात्र भुरट्या चोरीपासून दरोड्यापर्यxत गुन्हे करण्यास सरावलेले आहेत, असा प्रवाद आहे. जेथे हे लोक स्थायिक होऊन राहतात व काही अंशी गावगाड्याच्या व्यवहारात भाग घेतात अगर गावकऱ्यांच्या सहकार्यावर जगतात, तेथे त्यांना जातीचा दर्जा मिळालेला आहे. अन्यत्र त्यांची गणना स्वतंत्र जमातीत होते. त्यांच्यावर दैनंदिन व्यवहाराच्या बाबतीत ग्रामपंचायतीचा अंमल चालत नाही. गावालगत राहणारे भटके-फिरस्ते म्हणून पोलीसपाटलाला मात्र त्यांची दखल घ्यावी लागते व त्यांच्यावर नजर ठेवावी लागते. अशा रीतीने मूळचे एकाच जमातीचे लोक काही ठिकाणी शेती वगैरे करून स्थायिक झाले आहेत, तर अन्य काही लोक अजूनही भटक्या अवस्थेतच आहेत.

बावरिया (बावरी) किंवा बाडरी ही सर्वांत मोठी जात अशा भटक्या अवस्थेतली आहे, ती पश्चिम बंगाल, ओरिसा, राजस्थान तसेच काही प्रमाणात पंजाब, उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेश येथे दिसून येते. आंध्र प्रदेशात त्यांना बाडरी म्हणतात. दिसण्यात ते सर्वत्र इतरांहून वेगळेच वाटतात. पंजाबात तर ते मेवाड आणि अजमेर येथून आल्याचा दावा करतात. त्यांच्यात अनेक शाखा आहेत आणि बहुतेक सर्वाचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. आहारात ते विधिनिषेध पाळीत नसले, तरी यमुना नदीचा परिसर सोडून इतरत्र त्यांना अस्पृश्य समजून जातीबाहेर टाकण्यात आलेले नाही. यमुना नदीच्या परिसरात मात्र त्यांचा दर्जा कनिष्ठ असून तेथे त्यांना अस्पृश्य समजण्यात येते. बावरियांचे बरेच हिंदूकरण झाले असले, तरी त्यांची पूजाअर्चापद्धती मात्र अजूनही पूर्वीचीच असल्याचे दिसून येते. हिंदुकरण झालेल्या बऱ्याच जमातींप्रमाणे बावरियादेखील राजपुतांचे वंशज असल्याचे सांगतात परंतु त्यांचा कृष्ण वर्ण आणि इतर मानववंशीय लक्षणांमुळे ते राजपुतांचे वंशज असावेत, असे वाटत नाही. बावरियांच्या धार्मिक विधींचे पौरोहित्य करावयाला ब्राह्मणांना बोलावले जाते.

राजस्थानमध्ये आणि दिल्लीच्या परिसरामध्ये अहेरिया या नावाची जमात राहते. अहेरियांची दोन तुकड्यांमध्ये विभागणी झालेली आहे. पैकी एका तुकडीतील लोक गावालगत राहतात. अजूनही ते रानटी जनावरांची शिकार करतात आणि बोरूकाम करतात. दुसऱ्या तुकडीचे लोक चटईकाम करतात आणि या निमित्ताने त्यांना भटकावे लागते. विक्रीकरिता गावोगाव हिंडताहिंडता ते पूर्वी घरफोडी करीत असत. अजूनही त्यांच्यापासून ही भीती आहेच. आगगाडीची सोय झाल्यामुळे ते लांब बंगालपर्यत जाऊन डाका घालू शकतात, असे दिसून आले आहे. जमातीत अंतर्विवाही अगर बहिर्विवाही असे अन्य गटोपगट नाहीत. जमातीत बव्हंशी हिंदू आहेत पण काही शीख तर काही मुसलमान बनले आहेत. जमातीतील एखादी व्यक्ती मुसलमान झाली, तरी तिच्या जमातीमधील स्थानात फरक पडत नाही.

पूर्वीच्या काही भटक्या अवस्थेतील जमाती आज शेती, मोलमजुरी करून ठिकठिकाणी स्थायिक झालेल्या दिसून येतात. त्यांची गणना अजूनपर्यत गुन्हेगार म्हणून झालेली नाही. अशा जमातींमध्ये उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे राहणारे आणि ब्राह्मणांचे पौरोहित्य स्वाकारून (कनिष्ठ दर्जाचे ब्राह्मण त्यांचे पौरोहित्य करतात) हिंदू धर्माच्या छायेत आलेले बहेलिया व सतलज नदीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारे महतम किवा बुंदेलखंडाच्या परिसरात राहणारे सहारिया अगर ओरिसाच्या डोंगराळ भागात राहणारे शवर (संस्कृत साहित्यातून पूर्वी यांचा उल्लेख ‘शबर’ या नावाने केला आहे) वा सावरा हे लोक येतात. ⇨सावरा हे आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बंगाल, तमिळनाडू इ. भागातही आढळतात. सावरांपैकी काही लोक किरकोळ चोऱ्या, घरफोड्या करीत, क्वचित त्यांनी दरोडा प्रकरणात भाग घेतल्याचीही नोंद झालेली आहे. बव्हंशी सावरा हे हिंदू आहेत. वेगवेगळ्या प्रदेशांतील सावरांच्या देवदेवता व धार्मिक आचारविधी यांत फरक आढळतो. ओरिसातील सावरा धार्मिक विधी ब्राह्मणाला न बोलावता स्वतंत्रपणे पार पाडतात. मात्र बंगालमधील सावरा हे देवदेवतांच्या पूजेसाठी ब्राह्मण पुरोहितांची मदत घेतात. काही सावरांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे.


सावरांपासून वंशानुक्रम सांगणारी ⇨लोधा नावाची गुन्हेगार म्हणून पूर्वी नोंद झालेली जमात प्रामुख्याने पश्चिम बंगाल, ओरिसा आणि बिहार येथे आढळते. बंगाली, ओडिया ह्या भाषा आणि मुंडारी बोली यांचे मिश्रण असलेली भाषा ते बोलतात. ते अधिकतर बंगालमधील मिदनापूरच्या जंगलातून अन्नसंग्रहाकरिता भटकतात. इतरत्र ते शेतमजुरी करतात. त्यांच्यात बहिर्विवाही असे कुलचिन्हावर आधारित गट आहेत. ब्रिटिश शासनाने जंगल कायदा करून लोधा जमातीचे उपजीविकेचे साधन हिरावून घेतल्याने, तसेच वनसंपत्तीचा ऱ्हास होऊ लागल्याने या जमातीला चोरी करण्याशिवाय गत्यंतर उरले नाही, असे म्हटले जाते. वनसंपत्तीवर खाजगी मालकी प्रस्थापित होऊ लागी, तरी लोधा जमातीचे पूर्वीचे जंगलांतून अन्न शोधण्याचे जीवनही गुन्हेगारीचे असे गणले जाऊ लागले. अशा रीतीने ते नकळत गुन्हेगार ठरले.

बिहार, ओरिसा आणि पश्चिम बंगालच्या वनविभागांत अगर त्यालगत अनेक भटक्या जमाती राहतात. प्रत्येक जमातीकडे काही ना काही खास व्यवसाय आहे. ⇨तुरी ही आदिवासी जमात छोटा नागपूर, बिहार, आसाम व सिमला पर्वतरांगांत राहते. काही तुरी लोक बांबूपासून टोपल्या, सुपे, पंखे, शिवतरे इ. विणतात तर काही शेती करतात. काही वादक आहेत. काही जमातींमध्ये त्यांच्यातलेच काही लोक धार्मिक विधींचे पौरोहित्य करतात, तर काही जमातींचे पौरोहित्य ब्राह्मण करतात. तुरी जमातीमध्ये लग्नाविधीचे पौरोहित्य, त्या जमातीलाच पण वधूवरांच्या गोत्रांपेक्षा भिन्न गोत्र असलेला इसम पार पाडतो तर इतर धार्मिक विधी करणाऱ्या जमातीतल्या पुरोहिताला ‘पहान’ म्हणतात. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश येथे वास्तव्य असलेल्या मुसाहर जमातीला लग्नुविधीसाठी ब्राह्मण पुरोहित लागत नाही, मात्र मुहूर्तनिश्चितीसाठी ब्राह्मण आवश्यक असतो. बिहार, प. बंगाल येथील राजवाड जमातीची धार्मिक कृत्ये कनिष्ठ दर्जाचे ब्राह्मण करतात. धारकर जमातीला धर्मविधींसाठी ओझा हे कमी प्रतीचे ब्राह्मण चालतात. या जमातीत शेती, शेतमजुरी, लोहारकी, गारूडीकाम असे विविध व्यवसाय चालतात. एके काळी भटक्या अवस्थेत असलेल्या ह्या जमाती आता ठिकठिकाणी स्थायिक होत आहेत. यांच्याविरूद्ध गुन्हेगारींची नोंद नाही, हे लक्षणीय आहे. ह्या सर्व भटक्या जमाती पूर्वीच्या आदिवासी परंतु अजूनही पूर्णपणे त्या गावगाड्याच्या जीवनक्रमात समरस झालेल्या नाहीत, असे म्हटले जाते. मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये राहणारे बागडी, पश्चिम बंगाल, बिहार आणि अवध येथे यमुना नदीच्या काठाने राहणारे बेडियो हे यांपैकीच होत. बेडियांविषयी उत्तरेत चोरीबद्दल तक्रारी आहेत. यांच्यापैकी काही मुसलमान झाले आहेत. बेडियांपैकीच काहींची गणना अनुसूचित जातीचे म्हणून झाली आहे, तर अन्य लोकांची अनुसूचित जमातीचे म्हणून झालेली आहे. १९६२ च्या जनगणनेत मुळात ते मालेर नावाच्या जमातींचे नोंदले आहेत म्हणून द्राविडी बोली बोलणाऱ्या मध्य भारतातील भटक्या जमातींपैकी वाटतात.

पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः धुळे व जळगाव जिल्ह्यांत, तसेच काही प्रमाणात मध्य प्रदेश, गुजरात आणि सिंधपर्यत ⇨पारधी नावाची भटकी जमात आढळते. त्यांच्यात अनेक शाखा आहेत आणि प्रत्येकीचे काही ना काही व्यावसायिक अगर अन्य वैशिष्ट्य आहे. फासेपारधी हेपक्षी आणि वन्य जनावरे सापळा (फासा) टाकून पकडतात, चित्ता – पारधी हे चित्त्यांना पकडून त्यांना प्रशिक्षणाने काही शिकवून विकतात. असा प्रवाद आहे. टाकणकार (टकारी) किंवा टाकिया हे जाते बनवितात अगर जात्याला टाकी घालतात. कर्नाटकातील अडवी चिंचर (जंगलात भटकणारे) म्हणजे यांचीच एक पोट शाखा होय. आज विमुक्त जातींमध्ये जरी यांची गणना होत असली, तरी पूर्वी हे लोक घरफोडी, दरोडे इ. गुन्ह्यांत गुंतल्याचे व वेळप्रसंगी त्यांनी हिंसाचार केल्याचेही दाखले आहेत. खानदेशात (धुळे व जळगाव जिल्हे) काही फासेपारधी गावातील पहारेकरी म्हणून नेमले गेले आहेत. फासेपारधी लोकांच्या भटक्या टोळीमध्ये काही वेळा शंभरापर्यत माणसे असतात. ते सर्व सामानसुमान बैलावर टाकून भटकतात.

फासेपारध्यांप्रमाणेच मांगगारूडी नावाची पूर्वी गुन्हेगार असलेली एक जात मुख्यतः दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक आणि काही प्रमाणात मध्य प्रदेश आणि गुजरात येथे दिसून येते. मांगगारूडी ही मांगांचीच एक पोटजात आहे. यांची प्रवासातील टोळीसुद्धा कधीकधी शंभर माणसांपर्यत असते. ⇨कैकाडी नावाची जात दक्षिण महाराष्ट्रात तसेच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातसुद्धा दिसून येते. तेथे त्यांना कोरचा आणि कोरवा असे म्हणतात. यांच्यापैकी काही लोक आता गावात स्थायिक झाले आहेत. तेथे ते सणासुदीला किंवा लग्नतसमारंभात सनई वाजविणे, चट्या-टोपल्या विणणे इ. कामे करतात. कैकाडी हे मुळात भटकेच. भटक्या कैकाडींच्या नावे दरोडे, चोऱ्या, जनावरे पळविणे इ. गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. दक्षिणेत अजूनही भटक्या अवस्थेतील छोट्या जाती, जमाती आहेत.

विमुक्त जाति-जमातीसंबंधीचा आजचा प्रश्न गुन्हेगारी आटोक्यात आणण्याशी निगडित नसून, मुख्यतः त्यांना उद्योगधंद्यांत सामावून घेण्याशी, तसेच त्यांच्यातील पुढच्या पिढीला बाह्य व्यवहारी जगापासून काहीशा अलिप्त अशा ⇨आश्रमशाळेसारख्या वातावरणात ठेवून त्यांना पुरेसे शिक्षण देणे आणि देशाचे सुविद्य नागरिक बनवणे यांच्याशी अधिक निगडित आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. परिसराचा आणि कौटुंबिक परंपरेचा, अस्मितेचा प्रभाव पडून मुले पुन्हा गुन्हेगारी वृत्तीकडे वळू नयेत, म्हणून हा आश्रमशाळेची योजना राबवली जाते. जेथे कामधंदा उपलब्ध आहे, तेथे पूर्वीच्या गुन्हेगार जाति-जमाती काही ना काही मोलमजुरी करून जगताहेत, असे दिसून आले आहे. या सर्व जाति-जमातींच्या स्वतःच्या संघटना अजूनही अस्तित्वात आहेत. त्यांचे नेतेही अजून प्रभावी आहेत. त्यांना हाताशी धरून आश्रमशाळेची योजना राबविली, तर विमुक्त जाति- जमातींचा प्रश्न सुटण्यास बरीच मदत होईल, असे वाटते.

पहा : आदिवासी भटके.

संदर्भ : 1. Fuchs, Stephen, The Aboriginal Tribes of India, Bombay, 1973.

           2. Government of India, Report of the Backward Classes Commission, Vol. I, New Delhi, 1982.

           3. Majumdar, D. N. Races and Cultures of India, Bombay, 1961.

           4. Russell, R. V. Hira Lal, Rai Bahadur, The Tribes and Castes of the Central provinces of India, Vols. 4, Delhi, 1975.

           5. Singh. K. S. People of India, Calcutta, 1992.

          ६. चव्हाण, रामनाथ, भटक्या विमुक्तांचे अंतरंग, पुणे, १९८९.

कुलकर्णी, मा. गु.