विमानवाहू जहाज : ज्या जहाजावरून विमानांचे आरोहण करता येते, ज्याच्यावर विमानांचे अवतरण करता येते आणि ज्याच्यावर विमाने ठेवण्याची सोय असते, अशा नौसेनेतील जहाजाला विमानवाहू जहाज म्हणतात. ⇨विनाशिका, ⇨फ्रिगेट यांसारख्या युद्धनौकांवर एक-दोन हेलिकॉप्टरे असू शकतात मात्र त्यांना विमानवाहू जहाज म्हणत नाहीत. विमानवाहू जहाजांवर परंपरागंत बाँबफेकी, लढाऊ विमाने, तसेच थोडक्या अंतरात आरोहण व अवतरण करू शकणारी V/STOL (व्हर्टिकल/शॉर्ट टेक-ऑफ अँड लँडिंग) प्रकारची विमाने व हेलिकॉप्टरेही असतात. तरता किंवा हलता विमानतळ म्हणून विमानवाहू जहाजाचा उपयोग होतो. याचे हवाई सामर्थ्य लक्षात घेतल्यास विमानवाहू जहाज ही सर्वांत शक्तिशाली ⇨युद्धनौका आहे. यांच्या माथ्याच्या पृष्ठभाग सपाट असल्याने याला ‘सपाट माथ्याचे जहाज’ असेही म्हणतात. खनिज तेलाची वाहतूक करणारी सर्वात मोठी जहाजे तेवढी याच्यापेक्षा मोठी असतात.

इतिहास : १९०३ साली विमानाचा शोध लागला आणि लवकरच जहाजावरून विमान वापरण्यात असलेले फायदे लक्षात आले. यामुळे नाविक युद्धतंत्रात विमानांचा कशा प्रकारे उपयोग करून घेता येईल, याचा विचार सुरू झाला. सुरुवातीला विमानाचे कार्य हे संरक्षणात्मक व शत्रूच्या आरमारी काफिल्याचा शोध घेणे, यांपुरतेच मर्यादित होते. मात्र विमानाचा विकास झाल्याने नाविक जहाज व नौसेनेचे डावपेच यांत बदल झाला. यांतूनच चाकाची विमाने वापरण्यासाठी नवीन प्रकारचे जहाज म्हणजे विमानवाहू जहाज पुढे आले. परिणामी विमानाच्या शोधानंतर एका पिढीच्या कालावधीतच विमानवाहू जहाज विकसित झाले.

अमेरिकन वैमानिक यूजिन एली याने १४ नोव्हेंबर १९१० रोजी बर्मिंगहॅम या अमेरिकन ⇨क्रूझरवरील (संचारी युद्धनौकेवरील)तात्पुरत्या उभारलेल्या लाकडी फलाटावरून विमानाचे आरोहण करण्याचा पहिला प्रयत्न हॅम्प्टन रोड्‌स येथे केला. १८ जानेवारी १९११ रोजी त्यानेच सॅन फ्रॅन्सिस्को उपमहासागरात यूएसएस पेनसिल्व्हेनिया या चिलखती कवच असलेल्या क्रूझरवर विमानाचे पहिले अवतरण केले. या वेळी फलाटावरील वाळूच्या गोण्यांना जोडलेल्या तारांचा त्याने अटक यंत्रणा म्हणून उपयोग केला. तथापि अमेरिकेच्या नौसेनेने १९१९ पर्यंत ⇨सागरी विमानांवरच (पाण्यावर अवतरण व तेथून आरोहण करू शकणाऱ्या विमानांवरच) लक्ष केंद्रित केले. यांमुळे एलीच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष झाले. दरम्यान १९१३ साली ब्रिटिशांनी एचएमएस हर्मीझ या क्रूझरचे विमानवाहू जहाजात परिवर्तन केले, तसेच एका प्रवासी जहाजाच्या नौकापृष्ठात फेरबदल करून एचएमएस अर्गस हे विमानवाहू जहाजही तयार केले. अर्गस १९१८ च्या सुमारास नौसेनेत दाखल झाले. १९१९ साली यूएसएस ज्यूपिटर या कोळसावाहू जहाजात फेरबदल करून अमेरिकेने प्रायोगिक स्वरूपाचे पहिले विमानवाहू जहाज बनविले आणि यूएसएस लँग्ली नावाने ते अमेरिकन नौसेनेत दाखल झाले (१९२२). क्रूझरमध्ये बदल करून अमेरिकेने लेक्झिंग्टन आणि सारागोटा ही विमानवाहू जहाजेही तयार केली (१९२५). मात्र जपानचे होस्यो हे नौकातलापासून सुरूवात करून बनविलेले पहिले खरे विमानवाहू जहाज असून २७ डिसेंबर १९२२ रोजी ते वापरण्यास सुरूवात झाली. फ्रान्सने नॉर्मंडी या युद्धनौकेत परिवर्तन करून बेअर्न हे विमानवाहू जहाज बनविले. रेंजर हे अमेरिकेचे पहिले खरे विमानवाहू जहाज होय. ते प्रथम १९३४ साली वापरण्यात आले. होस्यो व ब्रिटनचे हर्मीझ ही विमानवाहू जहाजे प्रायोगिक स्वरूपाची होती. त्यांच्यावरून नंतरच्या विमानवाहू जहाजांचा विकास झाला. ब्रिटिशांनी खनिज तेल व धान्य वाहून नेणाऱ्या काही जहाजांवर उड्डाणतळ तयार करून व्यापारी विमानवाहू जहाजे बनविली होती. त्यांना MCA (मर्चंट एअरक्राफ्ट कॅरिअर) जहाजे म्हणत.

विमानवाहू जहाजाचे भाग : (१) विमाने थांबवण्यासाठी व आरोहणासाठी असलेले क्षेत्र, (२) गलोलीसारखी यांत्रिकी क्षेपक प्रयुक्ती, (३) लिफ्ट (उच्चालक), (४) द्वीप, (५) रडार आकाशक, (६) अटक केबली, (७) अवतरण क्षेत्र, (८) विमानघरतळ.

 उड्डाणतळावर चिलखती कवच चढवून तो मजबूत करणे, तसेच रडार, वाफेवर चालणारी गलोलीसारखी यांत्रिक क्षेपक प्रयुक्ती (कॅटापुल्ट), कोन दिलेला अवतरणतळ, आरसा-अवतरण प्रणाली इ. सुधारणांमुळे विमानवाहू जहाजाची उपयुक्तता वाढली. दुसऱ्या महायुद्धानंतरही विमानवाहू जहाजात अनेक सुधारणा करण्यात आल्या आणि इलेक्ट्रॉनीय साधनांचा वापर करून त्यांचे आधुनिकीकरण करण्यात आले. या सर्व सुधारणांमुळे विमानवाहू जहाज व त्यावरील विमाने हाताळणे सोयीस्कर झाले. तसेच विमानांचा वेग व पल्ला वाढल्याने विमानवाहू जहाज इतर जहाजांच्या तुलनेत खूपच सरस झाले.

रचना : विमानाच्या आरोहणासाठी व अवतरणासाठी विमानवाहू जहाजावर उड्डाणतळ असतो व जहाजाचा वरचा बहुतेक पृष्ठभाग उड्डाणतळाने व्यापलेला असतो. उड्डाणतळाच्या खाली विमानघरतळ असतो. वापरात नसलेली विमाने सामान्यपणे त्यांचे पंख दुमडून विमानघरतळात ठेवतात. विमाने एका तळावरून दुसऱ्या तळावर नेण्यासाठी २ वा ३ ठिकाणी मोठे लिफ्ट अथवा उच्चालक बसविलेले असतात. अवतरण हे कोन दिल्याने होते. आरोहण जहाजाच्या टोकाला होत असल्याने आरोहण/अवतरण एकाच वेळी होऊ शकते. मात्र अवतरण चालू असताना लिफ्ट वापरणे फारच धोक्याचे असते. लिफ्टचा उपयोग विमान वरून खाली किंवा खालून वर नेण्यासाठी होतो. विमानघरतळामध्ये विमान एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे सहज शक्य असते. विमानघरतळाच्या बाजूंना मोठ्या यंत्रशाळा असतात व तेथे विमानांची दुरुस्ती व संधारण (देखभालीचे काम) करता येते.

विमानवाहू जहाजाच्या उजव्या बाजूला उड्डाणतळाच्या वर आलेली इमारतवजा रचना असते, तिला द्वीप (आयलंड) म्हणतात. जहाजाचे व विमानाच्या संचलनाने नियंत्रण येथून केले जाते. नियंत्रणाची सामग्री, रडार वगैरेंचे आकाशक, आज्ञा व मार्गनिर्देशन सेतू, संदेशवहनाची सामग्री, तसेच जहाज अणुऊर्जेवर चालणारे नसल्यास निष्कास वायूचे नळ, धुराडे इ. सोयीसुविधा द्वीपात असतात. द्वीपाच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे जहाजावरील संचलनासाठी विमानांकरिता जास्तीत जास्त मोकळी जागा उपलब्ध होते. विमानवाहू जहाजाच्या दोन्ही बाजूंच्या सज्जांमध्ये तोफा असतात, तसेच क्षेपणास्त्रे, दारूगोळे (बाँब वगैरे), खाद्यपदार्थ इ. साठविण्याची सोयही त्यावर असते. शिवाय विमानाच्या संधारणाच्या सुविधा, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, स्वयंपाकगृह, भोजनगृह इ. सोयीही विमानवाहू जहाजावर असतात.


उड्डाणक्रिया : विमानाच्या आरोहणाच्या वेळी जहाज वाऱ्याच्या दिशेत अतिवेगाने पुढे नेतात. यामुळे वाऱ्याची जहाजसापेक्ष गती वाढते आणि तिची आरोहणास मदत होते. कारण यामुळे विमान उचलले जाण्यासाठी उपयुक्त ठरणारी उच्चालक प्रेरणा वाढते. परंपरागत व झोत विमाने अतिशय जड असतात व जहाजावरून केवळ स्वतःच्या शक्तीवर आरोहण करताना त्यांची हवासापेक्ष गती फार जास्त असावी लागते. पुरेसा जोर असणारा वारा नसतो, तेव्हा अशा विमानांना कमी अंतरात अशी उड्डाणयोग्य गती प्राप्त होत नाही. म्हणून त्यांना तशी गती मिळवून देण्यासाठी गलोलीसारखी यांत्रिक क्षेपक प्रयुक्ती वापरतात. या प्रयुक्तीने आरोहण क्षेत्रातून विमान क्षेपित केले जाते व त्याच्या उड्डाणाची सुरूवात होते. उड्डाणाच्या या टप्प्यात या प्रयुक्तीचे विमानाला मार्गदर्शनही होते. ही प्रयुक्ती वाफेवर चालते. वातावरणाच्या दाबाच्या वीसपट दाबाची वाफ याकरिता वापरतात आणि यामुळे ३० मी. अंतरात विमानाला ताशी १६० किमी. गती प्राप्त होते. टी. जी. एलिसन या अमेरिकन नाविक अधिकाऱ्याने १९१२ सालीच ॲन्नापोलिस (मेरिलंड) येथे अशा प्रयुक्तीवरील प्रयोग केले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर या प्रयुक्तीची क्षमता आणखी वाढविल्याने जास्ती वजनाची किंवा बाँब इ. भार घेतलेली विमाने आरोहण करू शकतात. अवतरणाच्या वेळीही जहाज वाऱ्याच्या दिशेत पुढे नेतात. कारण वाऱ्याच्या सापेक्ष वेगाची अवतरणास मदत होते.

विमान झटकन थांबविण्यासाठी अटक यंत्रणा वापरता येते. याकरिता उड्डाणतळाच्या अवतरण क्षेत्राच्या मागील भागात चार पोलादी केबली (तारा) तळापासून १० सेंमी. उंचीवर ताणून आडव्या बांधलेल्या असतात. अवतरणाच्या वेळी विमानातून पुच्छ-गळ खाली सोडला जातो व तो यापैंकी एका केबलीत अडकून विमान केवळ ९१ मी. अंतरावर एकदम थांबते. या अटक केबलींचे कार्य द्रवीय दाबाद्वारे चालते. विमान थांबविण्यासाठी त्या अत्यावश्यक असतात.

अवतरणाच्या वेळी विमान पुढे उभ्या असलेल्या इतर विमानांवर आदळू नये म्हणून, अथवा गळ योग्य वेळी खाली न आल्यास किंवा तुटल्यास शेवटचा प्रयत्न म्हणून अटकाव यंत्रणा असते. नायलॉन किंवा तत्सम दोराचे दोन खांबांमध्ये ताणून बसविलेले जाळे म्हणजे ही अटकाव यंत्रणा असून ती वापरल्याने विमान निकामी होण्याची शक्यता असली, तरी वैमानिकाचा जीव बचावतो. या अटकाव यंत्रणा पाहिजे तेव्हाच उभ्या करतात. विमाने वाऱ्याने हलू नयेत यासाठी डेकमध्ये (गच्चीमध्ये) गोल कड्या असतात व या कड्यांना विमाने तारदोरांनी बांधून ठेवतात.

अवतरण संदेश अधिकारी (लँडिंग सिग्नडल ऑफिसर LSO) विमानाच्या अवतरणांवर लक्ष ठेवतो व रेडिओवरून सूचना देऊन तो आवश्यकतेनुसार वैमानिकाला मदत करतो व सल्लाही देतो. विमान डेकवर असताना तो हातांच्या खुणांद्वारे अशा सूचना देऊ शकतो. एरवी ‘व्हेरी पिस्तूल’ या खास प्रकारच्या पिस्तुलातून रंगीत काडतुसे वापरून लांबून दिसणाऱ्या विविध रंगी उजेडाच्या सांकेतिक खुणा करतात. उदा., हिरव्या उजेडाची खूण म्हणजे सर्वकाही ठीक आहे लाल उजेडाची खूण म्हणजे उतरू नकोस वगैरे. (एडवर्ड विल्सन व्हेरी या अमेरिकन नाविक अधिकाऱ्याने १८७७ साली शोधून काढल्याने या पिस्तुलाला ‘व्हेरी पिस्तूल’ हे नाव पडले आहे). अवतरणासाठी रडार अथवा चाक्षूष संदेशाचीही मदत होते. आरसा-अवतरण प्रणालीची अवतरणास मदत होते. या प्रणालीमुळे इष्ट उड्डाण पथाच्या संदर्भातील आपले स्थान वैमानिक पाहू शकतो व गरजेनुसार मार्गात तत्काळ सुधारणा करू शकतो. आरशाऐवजी फ्रेझ्नेलल भिंगेही वापरतात [⟶ भिंगे].

आधुनिक विमानवाहू जहाजावर उड्डाणतळाच्या मागील २/३ भागांची रचना विशिष्ट कोनात (जहाजाच्या मध्येरेषेला ५ ते ७ अंशांच्या कोनात) केलेली असते व हा अवतरण विभाग पाण्यावरही पुढे आलेला असू शकतो. यामुळे एकाच वेळी विमानाचे आरोहण व अवतरण सहजपणे करता येते. अयोग्य पोचमार्गावरचे अवतरण करणारे विमान व ज्याचा पुच्छ-गळ अटक केबलीत अडकत नाही, असे विमान तसेच पुढे जाते व नंतर परत अवतरण करते.

विमानवाहू जहाज व नाविक युद्धतंत्र : समुद्रावर स्वामित्व प्रस्थापित करणे आणि शत्रूची सागरी नाकेबंदी करून कोंडी करणे, ही नाविक युद्धशास्त्राची मुख्य नीती असते. म्हणून शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव, आपल्या सागरी व्यापाराचे व जलवाहतुकीचे रक्षण, शत्रूच्या सागरी व्यापाराला मज्जाव आणि शत्रूच्या नौसेनेचा विध्वंस ही उद्दीष्टे नौसेनेसमोर असतात. ही उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून विमानवाहू जहाजाचा नाविक युद्धतंत्रात उपयोग करून घेतात. सामान्यपणे विमानवाहू जहाजाबरोबर क्रूझर, फ्रिगेट, विनाशिका इ. लहान-मोठ्या युद्धनौका व पाणबुड्या यांचा काफीला असतो. या काफिल्याला विमानवाहू कार्यदल (कॅरिअर टास्क फोर्स) म्हणतात. शत्रूची विमाने, जहाजे वा पाणबुड्या यांच्यापासून विमानवाहू जहाजाचे रक्षण करण्यासाठी ही इतर जहाजे बरोबर असतात. द्रुतगतीने जाऊन शत्रूवर अचानक हल्ला चढविणे व आपल्या काफिल्यांचे संरक्षण करणे, या दोन प्रकारांनी विमानवाहू जहाज नाविक युद्धात वापरतात. या प्रत्येक प्रकारासाठी विशिष्ट प्रकारची विमानवाहू जहाजे वापरतात. संरक्षणासाठी लहान (१४,००० ते १८,००० टनी) व कमी वेगाची विमानवाहू जहाजे वापरतात. त्यांच्यावर लढाऊ व बाँबफेकी २५-३० विमाने असतात. या जहाजांचे वजन कमी असल्याने त्यांना हलकी विमानवाहू जहाजे (लाइट फ्लीट कॅरिअर) म्हणतात. उलट शत्रूवर हल्ला चढविण्यासाठी मोठी (६०,००० टनांहून जास्त वजनाची) व अधिक वेगवान विमानवाहू जहाजे वापरतात. त्यांच्यावरील लढाऊ विमानांची संख्या बरीच जास्त असते. अशा अधिक वजनाच्या या जहाजांना वजनदार विमानवाहू जहाजे (सुपर कॅरिअर फ्लिट) म्हणतात. ही दोन्ही कामे करू शकणारी मध्यम आकारमानाची व वजनाची (३५,००० ते ४०,००० टनी) विमानवाहू जहाजेही असतात. त्यांना मध्य वजनाची विमानवाहू जहाजे (फ्लीट कॅरिअर) म्हणतात. सशस्त्र नाविक दलातील शिपाई व हेलिकॉप्टरे यांची वाहतूक करण्यासाठी कमांडो कॅरिअर नावाचा विमानवाहू जहाजाचा प्रकार असतो. हेलिकॉप्टर-वाहक जहाजे समुद्रावरील तसेच जमिनीवरील अशा दोन्ही ठिकाणच्या हल्ल्यांसाठी वापरतात. विमानवाहू जहाजाच्या निरनिराळ्या क्षमता ज्याच्यावर एकत्रितपणे असतात, अशा जहाजाला बहुद्देशीय विमानवाहू जहाज म्हणतात.


दोन महायुद्धांदरम्यानच्या काळात (१९१८-३९) विमानवाहू जहाजाचे हवाई सामर्थ्य समुद्रावरील लढायांप्रमाणे जमिनीवरील लढायांच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे आक्रमक युद्धातील एक साधन म्हणू विमानवाहू जहाजाचे महत्त्व वाढत गेले. शत्रूच्या कमकुवत स्थानी सामर्थ्य एकवटण्यासाठी विमानवाहू जहाजाचा उपयोग होऊ लागला. शत्रूचे समुद्रावरील व जमिनीवरील हवाई वर्चस्व नष्ट करणे, जमिनीवरून व पाण्यावरून करावयाच्या हल्ल्याची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने होणारे शत्रूचे प्रयत्न हाणून पाडणे किंवा रोखणे आणि शत्रूच्या मुख्य भूमीवर हवाई हल्ले चढविणे या गोष्टी विमानवाहू जहाजामुळे आवाक्यात आल्या.

जपानच्या विमानवाहू जहाजांवरील विमानांनी अमेरिकेच्या ⇨पर्ल हार्बर येथील नाविक तळावर ७ डिसेंबर १९४१ रोजी अचानक हल्ला करून अमेरिकेच्या मोठ्या व लहान युद्धनौका आणि इतर अनेक जहाजे बुडविली व तळाचेही मोठे नुकसान केले. या हल्ल्यात जपानची ३३ विमानवाहू जहाजे व ३५३ विमाने सहभागी झाली होती. अमेरिकेने असा पहिला हवाई हल्ला हॉर्नेट या विमानवाहू जहाजावरील विमानांद्वारे केला. दुसऱ्या महायुद्धातील पॅसिफिक महासागरातील नाविक युद्ध हे मुख्यतः अमेरिका व जपान यांच्या विमानवाहू जहाजांमध्ये झाले असे म्हणता येईल.

अटलांटिक महासागर व भूमध्य समुद्रातील दोस्तांच्या रसद पुरविणाऱ्या जहाजांना ब्रिटिश विमानवाहू जहाजांचे संरक्षण मिळाले होते. तसेच बिस्मार्क ही जर्मन युद्धनौका बुडविण्याच्या कारवाईतही ब्रिटनची विमानवाहू जहाजे सहभागी झाली होती.

पॅसिफिकमधील लढाईत मोठ्या विमानवाहू जहाजांची विशेष कामगिरी केली. या दृष्टीने कोरल समुद्र (४-८ मे १९४२), लेइट, मिडवे कंकणद्वीप (६-८ जून १९४२) व फिलिपीन्स समुद्र येथील लढाया महत्त्वाच्या आहेत. यांपैकी कोरल समुद्रातील हवाई लढाई ऐतिहासिक स्वरूपाची आहे. कारण या लढाईत जहाजे एकमेकांच्या दृष्टीने टप्प्यात आलीच नाहीत आणि सर्व युद्ध हे मुख्यत्वे विमानवाहू जहाजांवरील विमानांकरवी झाले. यामुळे समुद्रावरील विमानवाहू जहाजाचे हवाई सामर्थ्य  खरोखरच व्यापक असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी नाविक युद्धनीती विमानवाहू जहाज केंद्रस्थानी ठेवून आखली जाऊ लागली तसेच एखाद्या देशाचे नाविक सामर्थ्य त्याच्यापाशी असलेल्या विमानवाहू जहाजांवरून ठरविण्यात येऊ लागले.

अटलांटिकमधील लढाई हे वेगळ्या प्रकारचे युद्ध होते. शत्रूची पाणबुडी हे येथील मुख्य संकट होते. मात्र येथेही विमानवाहू जहाजाचे हवाई सामर्थ्य महत्त्वाचे ठरले. याबाबतीत लहान संरक्षक विमानवाहू जहाजे आणि त्यांच्यावरची टेहळणी करणारी व हल्ला चढविणारी विमाने प्रभावी ठरली. त्यांना विनाशिकांचे संरक्षण होते. अशा प्रकारे विमानवाहू जहाजाचे कार्य मुळात संरक्षणात्मक स्वरूपाचे होते ते नंतर आक्रमक स्वरूपाचे झाले तसेच दुसऱ्या महायुद्धापासून शत्रूच्या प्रदेशावर समुद्रातून हवाई वर्चस्व प्रस्थापित करणे, हे विमानवाहू जहाजाचे एक काम झाले.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (१९३९-४५) सर्व देशांनी मिळून १५० पेक्षा अधिक लहान मोठी विमानवाहू जहाजे तयार केली. युद्धाच्या सुरुवातीस अमेरिका व ब्रिटन यांच्याकडे प्रत्येकी सात, जपानकडे आठ आणि जर्मनी, रशिया व फ्रान्स यांच्याकडे प्रत्येकी एक अशी विमानवाहू जहाजे होती. युद्धसमाप्तीच्या वेळी अमेरिकेकडे हल्ला करणारी (मोठी) ३७ व संरक्षक (छोटी) ७९ आणि राष्ट्रकुल (ब्रिटिश कॉमन वेल्थ) देशांकडे मिळून १४ मोठी व ४२ लहान विमानवाहू जहाजे होती. या युद्धात ही सर्वात महत्त्वाची जहाजे ठरली व त्यांनी युद्धनौकांची जागा घेतली.

दुसऱ्या महायुद्धानंतर हल्ला चढविणाऱ्या मोठ्या विमानवाहू जहाजांची तीन मुख्य कामे पुढे आली समुद्रातील व समुद्रकिनाऱ्यावरील लक्ष्यांवर परंपरागत व आणवीय अस्त्रांनी हवाई हल्ला चढविणे, आपल्या इतर जहाजांना दीर्घ पल्ल्याच्या हवाई संरक्षणाचे छत्र पुरविणे आणि पाणबुड्याविरोधी कारवाईस मदत करणे (पाणबुड्या इतर जहाजे नष्ट करतात) ही कामे व झोत विमाने यांच्यामुळे विमानवाहू जहाजे फारच मोठी खर्चिक झाली. यामुळे अमेरिका, फ्रान्स यांसारख्या श्रीमंत देशांनाच ती बांधून वापरणे परवडते. ज्यांना अशी मोठी विमानवाहू जहाजे परवडत नाहीत, अशा नौसेनांनी या कामांसाठी लहान विमानवाहू जहाजे व त्यांची सोबत करणारी संरक्षक जहाजे वापरण्याचा पर्याय स्वीकारला. अशी लहान विमानवाहू जहाजे मर्यादित प्रमाणात जमिनीवरील हल्ले व हवाई संरक्षण यांच्याबरोबर पाणबुडीविरोधी संघर्षातही सहभागी होतात. हल्लीच्या बहुतेक विमानवाहू जहाजांवर झोत विमाने उतरू शकतात.

भारताच्या विक्रांत या विमानवाहू जहाजाने १९७१ च्या ⇨भारत- पाकिस्तान संघर्षात त्या वेळच्या पूर्व पाकिस्तानची नाकेबंदी करण्यात लक्षणीय यश मिळविले होते. याउलट अमेरिकेने या युद्धाच्या वेळी आपले सातवे आरमार मलॅकाच्या सामुद्रधुनीत आणून ठेवले. यामध्ये एंटरप्राइझ हे अणुऊर्जेवर चालणारे जगातले पहिले विमानवाहू जहाजही होते. भारतावर दबाव आणणे व युद्धाची व्याप्ती वाढू न देणे हा यामागील अमेरिकेचा हेतू असावा.

फायदे : विमानवाहू जहाजाची हालचालक्षमता, लवचिकता व अष्टपैलू कामगिरी या वैशिष्ट्यांमुळे नाविक युद्धात त्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर मध्यपूर्व, दक्षिण आशिया, आफ्रिका, कोरिया, लॅटिन अमेरिका, आग्नेय आशिया या प्रदेशांत नाविक संघर्ष झाले. या प्रदेशांत विमानतळ नव्हते किंवा पुरेशा प्रमाणात नव्हते. तेथे विमानवाहू जहाज हाच एकमेव विमानतळ उपलब्ध होता. अशा तऱ्हेने विमानवाहू जहाजाचा विमानतळ म्हणून उपयोग होतोच, शिवाय त्याच्यामुळे संधारणाच्या सुविधा, सुटे भाग, विमानाचे इंधन, दारूगोळा, अन्नपदार्थ व निवास या सोयीसुविधाही उपलब्ध होतात. या सामग्रीचा इतर जहाजांमार्फत विमानवाहू जहाजाला सतत पुरवठा होत राहिल्याने विमानवाहू जहाज अखंडपणे कारवाई करू शकते. हालचालक्षमतेमुळे याचे स्थान झटकन बदलता येते. तसेच शत्रूच्या हल्ल्याची धार बोथट करता येते किंवा भेदकता कमी करता येते. या कामी त्याला त्याच्या लवचिकतेची मदत होते. हालचालक्षमता या संरक्षणसिद्धता यांमुळे विमानवाहू जहाजावरील उड्डाणतळाचे जमिनीवरच्या विमानतळापेक्षा कमी नुकसान होते (अर्थात उड्डाणतळाचे नुकसान हे विमानतळाच्या तुलनेत अधिक गंभीर स्वरूपाचे असते). हवामानाची अतिशय खराब परिस्थिती सोडल्यास सर्व परिस्थितीत विमानवाहू जहाज व त्यावरील हवाई सामर्थ्य वापरता येते. काही बाबतींत विमानवाहू जहाजाचे केवळ अस्तित्व हे संघर्ष अथवा संघर्षाची व्याप्ती रोखण्यास पुरेसे ठरू शकते.

विमानवाहू जहाज हे देशाच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक असून जगाचा २/३ पेक्षा जास्त पृष्ठभाग व्यापणाऱ्या आंतरराष्ट्रीय जलात ते संचार करू शकते, हाही त्याचा लाभ आहे. आकारमान व दबदबा निर्माण करण्याचा लौकिक यामुळे शांततेच्या काळातही विमानवाहू जहाज देशाची चांगली सेवा करीत असते.


अणुऊर्जेवर चालणाऱ्या विमानवाहू जहाजाचे काही वेगळे फायदे आहेत. असे जहाज थोड्याच वेळात उच्च गती गाठू शकते. यावरील अणु-इंधन दीर्घकाळ पुरते, त्यामुळे पुन्हा इंधन भरण्यासाठी किनाऱ्याकडे दीर्घकाळाने आले, तरी चालते व परिणामी दीर्घकाळ कारवाई करणे शक्य होते. अणु-इंधनाला जागा कमी लागते, तसेच धुराडे, निष्कास वायूचे नळ वगैरेंची गरज उरत नाही. त्यामुळे दारूगोळा, विमानाचे इंधन वगैरेंसाठी काही जागा उपलब्ध होते व सुरक्षितता वाढते. असे असले, तरी अणुऊर्जेवर चालणाऱ्या सर्व जहाजांवर डीझेलवर चालणारी किमान चार तरी मोठी एंजिने असतात. यामुळे प्रत्यक्ष जागा वाचण्याचे प्रमाण कमी होते. अणुऊर्जेवर चालणाऱ्या विमानवाहू जहाजात धूर निर्माण होत नसल्याने धुरामुळे दूरवरून जहाज ओळखले जाण्याचा धोका कमी होतो. तसेच धुराचा त्रास, निष्कास वायूमुळे उड्डाणतळावर निर्माण होऊ शकणारा विक्षोभ (खळबळ) व त्यामुळे उड्डाणात येऊ शकणारे अडथळे टाळले जातात.

मर्यादा : अतिशय खराब हवामान व शत्रूची विमाने वा पाणबुड्या यांच्याकडून होऊ शकणारे नुकसान यांमुळे विमानवाहू जहाजाच्या कार्यक्षमतेवर काही प्रमाणात मर्यादा पडू शकतात. अत्यल्प प्रमाणातील दृश्यमानता, हिमनिर्मिती, हवेतील टोकाचा विक्षोभ इ. हवामानविषयक गंभीर परिस्थितीत विमानाच्या उड्डाणावर मर्यादा येतात. यामुळे जहाजावरील विमानाचे अवतरण अत्यंत काटेकोरपणे होणे आवश्यक असते, अन्यथा विमानास धोका पोहोचू शकतो. शांततेच्या काळात हवामानाचा प्रक्षोभ मर्यादित प्रदेशावर असल्यास जहाज दुसरीकडे नेता येते. विमानवाहू जहाजाला शत्रूच्या विमानाप्रमाणेच शत्रूच्या पाणबुडीचा धोका असतो. मात्र विमानवाहू जहाजाभोवतीचे संरक्षक कवच भेदून, तसेच इतर जहाजे, विमान व पाणबुड्या यांच्या हल्ल्यातून निसटून आल्यावरच अशी पाणबुडी विमानवाहू जहाजावर हल्ला चढवू शकते.

जागतिक परिस्थिती :  दुसऱ्या महायुद्धानंतर पुष्कळ जुनी विमानवाहू जहाजे मोडीत काढण्यात आली. अमेरिकेचा विमानवाहू जहाजांचा ताफा जगातील सर्वांत मोठा व शक्तिशाली ताफा आहे. या जहाजांवर लढाऊ व बाँबफेकी झोत विमाने, टेहळणी करणारी, पाणबुडीविरोधी व इंधन टाक्यांचे काम करणारी विमाने व अत्याधुनिक रडार यंत्रणाही आहे. अमेरिकेच्या विमानवाहू जहाजांचे पाच गट असून प्रत्येक गटातील पहिल्या जहाजाचेच नाव गटाला पडले आहे. निमित्झ (सर्वांत नवीन), किटीहॉक, एंटरप्राइझ, फॉरेस्टल व मिड्‌वे (सर्वांत जुना) हे ते पाच गट आहेत. निमित्झ हे ९१,४८७ टनी जहाज खर्चिक विमानवाहू जहाज आहे. याची लांबी सु. ३३३ मी. व रुंदी ४०·८ मी. असून उड्डाणतळाची कर्णाला अनुसरून किंवा कर्णाच्या दिशेतील रुंदी ७६·८ मी. आहे. यावर ९० विमाने आणि ५,७०० कर्मचारी असतात. हे चालविण्यासाठी दोन अणुकेंद्रीय विक्रियक (अणुभट्‌ट्या) असून यांतील इंधन १३ वर्षे पुरू शकते. याचा वेग ताशी सु. ५५ किमी. (३० सागरी मैल १ सागरी मैल = १·८५२ किमी.) पेक्षा थोडा जास्त आहे. याशिवाय या गटात आयझनहौअर, व्हिन्सन, अब्राहम लिंकन, जॉर्ज वॉशिंग्टनजॉन स्टेनीस ही जहाजे असून त्यांपैकी शेवटची तीन जहाजे जगातील सर्वांत मोठी जहाजे (१,०२,००० टनी) आहेत. या गटात आणखी दोन जहाजे बांधण्यात येत आहेत. किटीहॉक-जॉन एफ्. केनेडी या गटात किटीहॉक, कॉन्स्टलेशन, अमेरिका व जॉन एफ्. केनेडी ही चार जहाजे असून त्यांतील एक ८८,४०० टनी व इतर प्रत्येकी ८२,१०० टनी आहेत. त्यांच्यावर प्रत्येकी ८५ ते ९० विमाने आणि ५,४०० कर्मचारी असतात. एंटरप्राइझ गटात एकच जहाज असून १९६१ साली बांधलेल्या या ९१,०४० टनी जहाजाची लांबी ३३६ मी. आहे. यावर सु. ९० विमाने व ५,७०० कर्मचारी असतात. याची गती सु. ५५ किमी आहे. फॉरेस्टल गटातही चार जहाजे आहेत. त्यांची लांबी ३१९ मी. असून या ७९,३०० टनी जहाजांवर प्रत्येकी ८५ विमाने व सु. ५,३०० कर्मचारी असतात. यांपैकी फक्त इंडिपेन्डन्स हे जहाज वापरात आहे. मिडवे गटात ५२,८०० टनी दोन जहाजे असून त्यांची लांबी सु. २९५ मी. आहे. त्यांच्यावर प्रत्येकी ५५ विमाने व ४,५०० कर्मचारी असतात. अमेरिकेच्या या १५ विमानवाहू जहाजांपैकी नऊ जहाजे अणुऊर्जेवर चालणारी आहेत.

ब्रिटनने १९६०-७० दरम्यान हॅरिअर हे लढाऊ झोत विमान बनविले. ते उभ्या दिशेत किंवा थोड्या अंतरात आरोहण करू शकते. अशी विमाने असलेली विमानवाहू जहाजे ही परंपरागत झोत विमाने असलेल्या विमानवाहू जहाजांपेक्षा पुष्कळच लहान असतात. कारण त्यांच्यावर गलोलीसारखी क्षेपक प्रयुक्ती किंवा अटक यंत्रणा यांची गरज नसते. १९७०-९० या दरम्यान ब्रिटनने अशी तीन जहाजे बांधली. वायू टरबाइनांनी चालणाऱ्या या २०,००० टनी जहाजांवर आठ सी हॅरिअर विमाने व सु. १२ पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर असतात. उड्डाणतळाच्या टोकाशी जवळजवळ उभी अशी ‘स्की-जंप’नावाची प्रयुक्तीही ब्रिटिशांनी बसविली आहे. तिचा कोन साधारणपणे ८-१२ असून विमानांच्या आरोहणास तिची मदत होते. इटली व स्पेन यांनीही अशी लहान विमानवाहू जहाजे बांधली असून त्यांवर हेलिकॉप्टरे व V/STOL झोत विमाने असतात.

रशियाचे कीव्ह हे विमानवाहू जहाज १९७०-८० दरम्यान विकसित झाले. हे ४५,००० टनी व सु. २८२ मी. लांबीचे जहाज दोन टर्बोजेट एंजिनाद्वारे चालते. यावरील तोफा तुलनेने अवजड स्वरूपाच्या आहेत. १९८३साली रशियाने अणुऊर्जेवर चालणारे ६५,००० टनी विमानवाहू जहाज बांधण्यास सुरूवात केली. सोव्हिएट रशियाच्या विमानवाहू जहाजांचा ताफाही रशियाचे विभाजन होईपर्यंत (१९९१) बराच मोठा होता. फ्रान्सही अणुऊर्जेवर चालणारे विमानवाहू जहाज विकसित करीत आहे. या ३४,००० टनी जहाजावर ४० विमाने असतील.

भारताकडे दोन विमानवाहू जहाजे होती. त्यांपैकी विक्रांत हे एक होते. १९५७ साली भारताने ब्रिटनकडून मॅजिस्टिक गटातील हर्क्युलिस हे जहाज विकत घेतले व त्यात परिवर्तन करून ते विक्रांत नावाने भारतीय नौसेनेत १५ फेब्रुवारी १९६१ रोजी दाखल झाले. त्याची लांबी सु. २३१ मी. असून हे २०,००० टनी जहाज ३१ जानेवारी १९९७ रोजी नौसेनेतून निवृत्त करण्यात आले. भारतीय नौसेनेकडे आता विराट (मूळचे हर्मीझ) हे एकच विमानवाहू जहाज आहे. विराट २८,७०० टनी व २२६ मी. लांबीचे असून त्यावर ३० विमाने व ७ हेलिकॉप्टरे ठेवता येतात. जागच्या जागी व थोड्या अंतरात आरोहण व अवतरण करू शकणारी सी हॅरिअर ही अत्याधुनिक ब्रिटीश विमाने तसेच पाणबुडीचा शोध घेऊन ती नष्ट करणारी सी किंग हेलिकॉप्टरे आणि साहाय्यासाठी लागणारी चेतक हेलिकॉप्टरे यावर असतात. विराटचा वेग ताशी सु. ५२ किमी. असून यावर सु. १,३५० कर्मचारी असतात.


 यू. एस. एस. लॅबून: आरले बर्क विनाशिका, अमेरिका आय. एन. एस. विक्रांत: आद्य भारतीय विमानवाहू जहाजअमेरिकन नौदलातील पाणबुडीविरोधी स्प्रुअन्स वर्गातील यू. एस. एस. एलिऑट विनाशिका

हर्मीझ: ब्रिटीश विमानवाहू जहाजराजपूत: भारतीय विनाशिका

पहा : नाविक युद्धतंत्र नौसेना हवाई दल हवाई संरक्षण.

संदर्भ : 1. Brayan, y3wuoeph, III, Aircraft Carriers, New York, 1982.

           2. Chesneau, R. Aircraft Carriers of the World 1914 to the Present, Annapolis (Md.), 1984.

           3. Jordan, J. An Illustrated Guide to Modern Naval Aviation and Aircraft Carriers, New York, 1983.

पुरोहित, सुहास ठाकूर, अ. ना.