विद्युत् प्रवाहमापक : अल्प विद्युत् प्रवाहाचे अस्तित्व दाखविण्यासाठी आणि मापन करण्यासाठी मुख्यत्वे वापरण्यात येणारे नाजूक उपकरण. भोवती चुंबकीय क्षेत्र असताना तारेतून वाहणारा विद्युत् प्रवाह तारेवर प्रेरणा निर्माण करतो, या तत्त्वावर विविध विद्युत् प्रवाहमापकांचे कार्य चालते. विद्युत् प्रवाहामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे मापन करून व त्यावरून विद्युत् प्रवाहाचे मापन करणारे अथवा विद्युत् प्रवाहामुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र व स्थायी चुंबकाचे चुंबकीय क्षेत्र यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रेरणा-युग्मांचे (सारख्या, समांतर व परस्परविरुद्ध असणाऱ्या दोन प्रेरणांचे) मापन करणारे असे विद्युत् प्रवाहामापकांचे दोन मुख्य प्रकार आहेत.

हॅन्स क्रिश्चन ओस्टेर्ड यांनी १८२० मध्ये विद्युत् प्रवाहाचा चुंबकीय सूचीवर होणाऱ्या परिणामाचा शोध लावला. त्याच वर्षी योहान एस्. सी. श्वाइगर यांनी पहिला विद्युत् प्रवाहमापक तयार केला. १८५८ मध्ये विल्यम टॉमसन (लॉर्ड केल्व्हिन) यांनी अत्यंत संवेदनशील असे उपकरण तयार केले. १८८० मध्ये झाक आर्सेअन द’ आरसांव्हाल यांनी या उपकरणामध्ये वैशिष्ट्यपूर्ण सुधारणा केल्या. या उपकरणात घोड्याच्या नालाच्या आकाराच्या स्थायी चुंबकाच्या ध्रुवांमध्ये अत्यंत बारीक तारेचे वेटोळे तंतूने टांगलेले असते. वेटोळ्यावर किंवा थोडा वर आरसा चिकटविलेला असतो. त्यामुळे प्रखाशशलाकेचे परावर्तन दूर अंतरावर असलेल्या अंशांकित मोजपट्टीवर होते. वेटोळ्यातील विद्युत् प्रवाहाच्या बलानुसार मोजपट्टीच्या मध्यापासून (शून्यापासून) कमीजास्त अंतरावर प्रकाशशलाकेचे विस्थापन होते. या पद्धतीने १०-११ अँपिअर इतक्या अल्प विद्युत् प्रवाहाचे मापन करता येते. ⇨धारित्रातून विसर्जित होणारा क्षणिक विद्युत् प्रवाह व साध्या विद्युत् घटातील दुर्बल विद्युत् प्रवाह यांचे मापन करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतो. मराठी विश्वकोशात ‘गॅल्व्हानोमीटर’ या नोदींत विद्युत् प्रावाहमापकांच्या विविध प्रकारांची माहिती दिलेली आहे.

पहा : अँपिअरमापक.

सूर्यवंशी, वि. ल.