होफस्टाटर, रॉबर्ट : (५ फेब्रुवारी १९१५–१७ नोव्हेंबर १९९०). अमेरिकन भौतिकीविज्ञ. त्यांनी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांसंबंधी संशोधन केल्यामुळे तोपर्यंत माहीत नसलेल्या या मूलकणांच्या संरचनेवर नवीन प्रकाश पडला. या संशोधनाबद्दल होफस्टाटर यांना १९६१ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक जर्मनीच्यारूडोल्फ लूटव्हिख मॉसबावर यांच्यासमवेत विभागून मिळाले. 

 

होफस्टाटर यांचा जन्म न्यूयॉर्क सिटी (न्यूयॉर्क राज्य) येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण न्यूयॉर्क सिटी येथेच झाले. त्यांनी कॉलेज ऑफ द सिटी ऑफ न्यूयॉर्क येथे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. १९३५ मध्ये त्यांना बी.एस्. ही पदवी मिळाली. त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात भौतिकीचे अध्ययन केले (१९३५–३८) आणि एम्.ए. व पीएच्.डी. (१९३८) या पदव्या संपादन केल्या. त्यांना डॉक्टरोत्तर संशोधनाकरिता प्रिन्स्टन विद्यापीठाची अधिछात्रवृत्ती मिळाली (१९३८-३९). तेथे त्यांनी विलेमाइट स्फटिकाच्या प्रकाश संवाहकतेसंबंधी संशोधन केले. १९३९ मध्ये त्यांना पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाची हॅरिसन अधिछात्रवृत्ती मिळाली. तेथे त्यांनी अणुकेंद्रीय संशोधनाकरिता मोठे व्हॅन डी ग्रॅफ यंत्र तयार करण्यास मदत केली. 

 

दुसऱ्या महायुद्ध काळात होफस्टाटर नॅशनल ब्युरो ऑफ स्टँडर्ड्सयेथे असताना त्यांनी विमानविरोधी व इतर तोफगोळा यांचा स्फोट घडवून आणणाऱ्या आयुधातील लगतच्या वातीचा विकास केला. युद्धानंतर त्यांची प्रिन्स्टन विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक पदावर नियुक्ती झाली. तेथे त्यांनी शास्त्रीय संशोधनात अवरक्त किरण, प्रकाश संवाहकता आणि स्फटिक व चमक गणित्रे या गोष्टींना प्राधान्य दिले. होफस्टाटर यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठात अध्यापन केले (१९५०–८५). तेथे त्यांनी चमक गणित्रावर संशोधन चालू ठेवले आणि न्यूट्रॉन व क्ष-किरण यांकरिता नवीन मूलकण अभिज्ञातकांचा विकास केला. उच्च गतिमान अकार्बनी (उीऋ) आणि उपयुक्त चेरेनकॉव्ह (ढश्रउश्र) गणित्रांचे शोध स्टॅनफर्ड येथे लागले. त्यांनी अणुकेंद्राच्या संशोधनाकरिता रेषीय इलेक्ट्रॉन कणवेगवर्धकाचा वापर केला. 

 

होफस्टाटर यांना १९५३ नंतर इलेक्ट्रॉन-प्रकीर्णन मापनासंबंधी जिज्ञासा निर्माण झाली. त्यांनी सहकारी व विद्यार्थी यांच्या साह्याने अणुकेंद्रातील विद्युत् भार वितरणाचा आणि नंतर प्रोटॉन व न्यूट्रॉन यांतील विद्युत् भार आणि चुंबकीय संवेग वितरणाचा शोध घेतला. अणुकेंद्राचे आकार व आकारमान यांचे प्रचल शोधून काढण्याकरिता इलेक्ट्रॉन-प्रकीर्णन पद्धतीचा वापर करण्यात आला. १९५४–५७ या कालावधीत प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यासंबंधी अनेक महत्त्वाचे निष्कर्ष मिळाले. होफस्टाटर यांना आढळून आले की, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांच्या मध्यभागी धन भारित गाभ्याभोवती पाय् (?) मेसॉनांचा दुहेरी समूह असतो. प्रोटॉनामध्ये दुहेरी पाय् मेसॉन समूह धन भारित असतात, परंतु न्यूट्रॉनामध्ये आतील पाय् समूहऋण भारित असल्यामुळे संपूर्ण मूलकणाचा विद्युत् भार शून्य असतो.या संशोधनामुळे प्रोटॉन व न्यूट्रॉन या मूलकणांच्या आंतररचनेवर नवा प्रकाश पडला. 

 

होफस्टाटर १९५८ मध्ये द नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस( यू. एस्. ए) या संस्थेचे सदस्य झाले. १९५९ सालातील कॅलिफोर्निया शास्त्रज्ञ म्हणून त्यांची निवड झाली. ते गुगेनहाइम सदस्य होते (१९५८-५९). त्यांनी जिनीव्हा (स्वित्झर्लंड) येथील सेर्न प्रयोगशाळेत एकवर्ष काम केले होते. 

भदे, व. ग. गायकवाड, पल्लवी