मायकेल फॅराडेफॅराडे, मायकेल : (२२ सप्टेंबर १७९१- २५ ऑगस्ट १८६७). इंग्‍लिश रसायनशास्त्रज्ञ व भौतिकीविज्ञ. विद्युत् शास्त्रातील महत्त्वाच्या शोधांकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म न्यूइंग्टन, सरी येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण अगदी प्राथमिक स्वरूपाचे होते. परंतु वयाच्या तेराव्या वर्षी पुस्तकांच्या एका दुकानात पुस्तक-बांधणीची व विक्रीची उमेदवारी करीत असताना रसायनशास्त्र व विद्युत् शास्त्र या आपल्या आवडत्या विषयांतील पुस्तके विस्तारपूर्वक वाचून त्यांनी त्यांतील प्रयोग आपल्या प्राथमिक स्वरूपाच्या साधनांच्या साहाय्याने अनेक वेळा करून पाहिले. ⇨ सर हंफ्री डेव्ही यांची रॉयल इन्स्टिट्यूशनमधील व्याख्याने १८१२ मध्ये फॅराडे यांनी ऐकली व त्यांची टिपणे करून ती डेव्ही यांच्याकडे नोकरीच्या अर्जाबरोबर पाठविली. १८१३ मध्ये डेव्ही यांनी आपल्या प्रयोगशाळेत साहाय्यक म्हणून फॅराडे यांची नेमणूक केली. १८१३-१५ या काळात डेव्ही यांच्याबरोबर त्यांना यूरोपमधील प्रमुख प्रयोगशाळांचे अवलोकन करण्याची संधी मिळाली. त्या वेळी ए.एम्. अँपिअर, एफ्. एच्. ए. हंबोल्ट, जे. एल्. गे-ल्युसॅक, काउंट रम्फर्ड या त्या काळातील प्रख्यात शास्त्रज्ञांची भेट होण्याची फॅराडे यांना संधी मिळाली. १८२५ मध्ये रॉयल इन्स्टिट्यूशनच्या प्रयोगशाळेच्या संचालक पदावर त्याच संस्थेत १८३३ मध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली.

डेव्ही यांच्याबरोबर काम करीत असताना १८२३ मध्ये क्लोरिनाचे द्रवीकरण करण्यात फॅराडे यांनी यश मिळविले आणि नंतर हायड्रोजन क्लोराइड, हायड्रोजन सल्फाइड, कार्बन डाय-ऑक्साइड व इतर वायूंचेही त्यांनी द्रवीकरण केले [→ वायूंचे द्रवीकरण]. १८२५ मध्ये त्यांनी बेंझॉल (बेंझीन) या महत्त्वाच्या रसायनाचा शोध लावला. कार्बन व क्लोरीन यांची दोन संयुगे (C2Cl6 व C2Cl 4) त्यांनी १८२० मध्ये प्रथमच तयार केली.

फॅराडे यांनी १८२१ मध्ये विद्युत् चुंबकत्वाच्या इतिहासाची रूपरेषा प्रसिद्ध केली. त्याच वर्षी त्यांनी विद्युत् प्रवाहवाहक तारेभोवती चुंबकसूची फिरविली असता तिचा एक ध्रुव एका वर्तुळात फिरतो व प्रवाह बंद केल्यावर चुंबकसूचीचे हे विचलन थांबते, असे प्रयोगाद्वारे दाखविले. १८२१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका निबंधात त्यांनी विद्युत् चलित्राचे (मोटरचे) तत्त्‍व (विद्युत् प्रेरणेचे यांत्रिक प्रेरणेत रूपांतर करण्यासंबंधीचे तत्त्‍व) मांडले. याच निबंधात त्यांनी चुंबकीय प्रेरणा रेषेची प्राथमिक संकल्पना मांडली होती. १८३१ साली त्यांनी विद्युत् चुंबकीय प्रवर्तनाचा (चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत बदल केल्यास विद्युत् चालक प्रेरणा म्हणजे विद्युत् मंडलात प्रवाह वाहण्यास कारणीभूत होणारी प्रेरणा उत्पन्न होणाऱ्या तत्त्वाचा) शोध लावला. अशा प्रकारे एच्. सी. ओर्स्टेड यांनी १८२० साली लावलेल्या शोधातील परिणामाच्या उलट परिणाम सिद्ध करण्याच्या म्हणजे चुंबकीय प्रेरणेचे विद्युत् प्रेरणेत रूपांतर करण्याच्या प्रयत्‍नात वरील तत्त्वाचा फॅराडे यांनी शोध लावला. स्थिर चुंबकाभोवती विद्युत् संवाहक तारेचे वेटोळे फिरविले असता किंवा तारेच्या वेटोळ्यातून चुंबक पुढे-मागे नेला असता वेटोळ्यात विद्युत् चालक प्रेरणा निर्माण होते. म्हणजेच चुंबक व वेटोळे यात सापेक्ष गती असली तरच विद्युत् चालक प्रेरणा निर्माण होते, असे त्यांनी दाखविले. यानंतर केलेल्या संशाधनान्ती फॅराडे यांनी पहिल विद्युत् जनित्राचा शोध लावला व त्याद्वारे १८२१ मध्ये त्यांनी लावलेल्या शोधाचा उलट परिणाम (म्हणजे यांत्रिक प्ररेणेचे विद्युत् प्रेरणेत रूपांतर करता येते) त्यांनी सिद्ध केला. विद्युत् प्रवर्तनासंबंधी त्यांनी शोधून काढलेले नियम आधुनिक विद्युत् जनित्र व ⇨ चिरचुंबकी जनित्र (मॅग्‍नेटो) यांच्या विकासाला आधारभूत ठरलेले आहेत. ⇨विद्युत् अपारक पदार्थांच्या बाबतीत त्यांनी केलेल्या संशोधनाच्या बहुमानार्थ विद्युत् धारकतेच्या एककाला ‘फॅराड’ हे नाव देण्यात आलेले आहे. कोणत्याही उद्‍गमापासून [उदा., घर्षणजन्य, चुंबकीय (प्रवर्तित) इ.] निर्माण होणारी विद्युत् एकाच स्वरूपाची आहे असे त्यांनी दाखवून दिले. ⇨विद्युत् विच्छेदनासंबंधी त्यांनी मांडलेले दोन महत्त्वाचे नियम सुप्रसिद्ध आहेत. यासंबंधात त्यांनी वापरलेल्या इलेक्ट्रोलिसिस (विद्युत् विच्छेदन), इलेक्ट्रोलाइट (विद्युत् विच्छेद्य), इलेक्ट्रोड (विद्युत् अग्र), ॲनोड (धनाग्र), कॅथोड (ऋणाग्र), ॲनायन (धनायन) व कॅटायन (ऋणायन) या संज्ञा अद्यापही रूढ आहेत. विद्युत् विच्छेदनाने एक ग्रॅम-सममूल्य पदार्थ मिळविण्यासाठी लागणाऱ्या विद्युत् भाराला ‘फॅराडे’ असे नाव देण्यात आले आहे. (यालाफॅराडे स्थिरांकअसेही म्हणतात). १८४५ मध्ये त्यांनी तीव्र चुंबकीय क्षेत्रामुळे प्रतलीय ध्रुवित प्रकाशकिरणाच्या (एकाच प्रतलात कंपने होणाऱ्या प्रकाशकिरणाच्या) कंपन प्रतलाचे घूर्णन (परिभ्रमण) होते असा शोध लावला तोफॅराडे परिणामया नावाने ओळखण्यात येतो. हा शोध त्यांनी स्वतः तयार केलेल्या शिशाचे बोरोसिलिकेट अंतर्भूत असलेल्याजड काचेच्या साहाय्याने लावला. विद्युत् चुंबकत्वासंबंधीच्या आपल्या शोधांचे स्पष्टीकरण करण्याकरिता त्यांनी चुंबकीय प्रेरणा रेषांची आणि नंतर विद्युत् प्रेरणा रेषांची) संकल्पना मांडूनअंतरात्मक परस्परक्रियाया त्या काळातील प्रचलित दृष्टिकोनाचे स्पष्टीकर केले. चुंबकीय दृष्ट्या सर्व पदार्थाचेपॅरामॅग्नेटिक्स’ (समचुंबकीय पदार्थ) डायमॅग्नेटिक्स’ (प्रतिचुंबकीय पदार्थ) असे दोन सर्वसामान्य प्रकारांत त्यांनी वर्गीकरण केले. समचुंबकीय पदार्थ चुंबकीय क्षेत्रात ठेवल्यास त्यांचे चुंबकीकरण क्षेत्राच्या दिशेत होते, तर प्रतिचुंबकीय पदार्थांचे चुंबकीकरण प्रतिसमांत (समांतर पण विरुद्ध) दिशेत होते [→ चुंबकत्व]. चुंबकाची ऊर्जा त्याच्या सभोवतालच्या अवकाशात असून खुद्द चुंबकात नसते ही कल्पना त्यांनी मांडली हीच क्षेत्र सिद्धांताची पायाभूत कल्पना आहे. ही कल्पना पुढे ⇨जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी विकसित केली.

फॅराडे यांना शंभरापेक्षाही जास्त वैज्ञानिक व शैक्षणिक सन्माननीय पदके, पदव्या व इतर बहुमान मिळाले. १८२४ मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. पुढे १८५७ मध्ये प्रकृतीच्या कारणास्त त्यांनी रॉयल सोसायटीचे अध्यक्षपद नाकारले. रॉयल सोसायटीचे त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना कॉप्ली (१८३२), रॉयल (१८३५ व १८४६) व रम्फर्ड (१८४६) या पदकांचा बहुमान दिला. वैशिष्ट्यपूर्ण व विपुल प्रयोगकार्य आणि विविध विषयांवरील सुबोध व्याख्याने यांकरिता ते विशेष प्रसिद्ध होते. त्यांचे निबंध अद्यापही शास्त्रीय लेखनाचे आदर्श म्हणून मानले जातात. रॉयल इन्स्टिट्यूशनमधील आपल्या ५४ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी १५८ संशोधनपर निबंध प्रसिद्ध केले. केमिकल मॅनिप्युलेशन्स (१८२७), एक्सपिरिमेंटल रिसर्चेस इन इलेक्ट्रिसिटी (३ खंड, १८३९-५५) व एक्सपिरिमेंटल रिसर्चेस इन केमिस्ट्री अँड फिजिक्स (१८५९) हे त्यांचे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. ते हॅम्पटन कोर्ट, मिडलसेक्स येथे मृत्यू पावले.

संदर्भ : 1. Tyndall, John, Faraday as a Discoverer, New York, 1961.

2. Williams, L. P. Michael Faraday : A Biography, London, 1965

भदे, व. ग.