विद्युत् दिवे : विजेच्या साहाय्याने प्रकाश निर्माण करण्याचे साधन. यात विद्युत् ऊर्जेचे प्रकाशात रूपांतर होते. इतर दिव्यांशी तुलना करता विद्युत् दिवे सोयीस्कर, कमी खर्चिक व अधिक कार्यक्षम असतात. म्हणून घरे, कार्यालये, कारखाने, रंगमंदिरे, सभागृहे, क्रीडागृहे, क्रीडांगणे, रस्ते, वाहने, विमानतळ, स्थानके इ. विविध ठिकाणी विविध प्रकारचे विजेचे दिवे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. विजेच्या दिव्याविना वरील कोणत्याही ठिकाणी काम करणे आता अशक्य होईल. विद्युत् उत्पादन क्षेत्रात झालेली प्रगती व वाढ याचे एक मुख्य कारण म्हणजे विजेपासून प्रकाश मिळविण्यास सुरुवातीच्या काळातच आलेले यश हे आहे. प्रगत देशांत एकूण उत्पादित विजेपैकी ५ टक्क्यांहून जास्त वीज विद्युत् प्रकाशनासाठी व पर्यायाने विजेच्या दिव्यांसाठी वापरली जाते. भारत व अन्य विकसनशील देशांमध्ये विजेच्या अशा वापराचे प्रमाण हे २·५ टक्क्यांहून थोडे जास्त आहे.
विद्युत् दिव्यांचे पुढील तीन प्रमुख प्रकार आहेत : (१) तंतूच्या उच्च तापमानामुळे प्रकाशनिर्मिती करणारे प्रदीप्त (काचेच्या फुग्याचे) दिवे (२) कमी व जास्त दाबाखाली असलेल्या वायूत अथवा धातूच्या बाष्पात असणाऱ्या विद्युत् अग्रांमधून विद्युत् भाराचे विसर्जन करून प्रकाश देणारे विसर्जक दिवे आणि (३) दोन विद्युत् अग्रांमधील आयनीभूत (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट असणाऱ्या) वायूतून विद्युत् प्रवाह पाठविल्याने जी प्रज्योत निर्माण होते त्या प्रज्योतीने प्रकाशमान होणारे प्रज्योत दिवे. यांपैकी प्रदीप्त दिवे साधे, स्वस्त व सुरक्षित असल्याने दिव्यांचा वापर होतो प्रज्योत दिवे मात्र औद्योगिक व संशोधनाच्या क्षेत्रांत काही विशिष्ट कामांसाठी वापरतात.
मराठी विश्वकोशात चलचित्रपट तंत्र, छायाचित्रण, दीपगृह, प्रदीपन अभियांत्रिकी व प्रकाशक्षेपक अशा स्वतंत्र नोंदी असून त्यांमध्ये काही विद्युत् दिव्यांची माहिती आली आहे. शिवाय ‘तंत्रविद्या’ व ‘दिवे’ या नोंदींतही विद्युत् दिव्यांची थोडी माहिती दिलेली आहे.
इतिहास : इ. स. १६५० मध्ये जर्मन शास्त्रज्ञ ओटो फोन गैरिक यांनी जलद गतीने फिरणाऱ्या गंधकाच्या गोळ्यावर हात घासला, तर उजेड फाकतो हे दाखवून दिले. त्याचप्रमाणे १७०६ मध्ये इंग्लंडमधील शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॉक्सबी यांनी जलद गतीने फिरणाऱ्या निर्वात काचेच्या फुग्यावर हात घासला असता फिकट प्रकाश पडतो, हे दाखवून दिले. १८०२ मध्ये सर हंफ्री डेव्ही या शास्त्रज्ञांनी प्लॅटिनमाची पातळ पट्टी विद्युत् प्रवाहाने तापवून प्रकाश मिळविता येतो हे दाखविले. मात्र तेव्हा समाधानकारक विद्युत् पुरवठा उपलब्ध नव्हता व हवेत तापविण्यात येणारी धातूची पट्टी थोड्याच वेळात जळून जाते. यामुळे तेव्हा असा दिवा व्यवहार्य ठरला नाही. १८२० मध्ये वॉरेन डे ला रू यांनी काचेच्या निर्वात नळीमध्ये ठेवलेले प्लॅटिनमाच्या तारेचे वेटोळे विद्युत् प्रवाहाने तापवून प्रकाश निर्माण करण्याचा प्रथम प्रयत्न केला, तर १८४५ मध्ये ओहायओ येतील संशोधक स्टार यांनी अशा प्रकारे धातूची तार तापवून प्रकाश देणारा दिवा विक्रीसाठी तयार केला. १८५६ मध्ये फ्रेंच अभियंते सी. डे. चागनी यांनी खाणीत वापरण्यायोग्य अशा प्लॅटिनम तंतूच्या दिव्याचे एकस्व (पेटंट) मिळविले. १८७९ मध्ये अमेरिकेतील ⇨ टॉमस आल्वा एडिसन यांनी पहिला प्रदीप्त दिवा बनविला. त्यात शिलाईचा कार्बनीकृत दोरा काचेच्या एका निर्वात गोलात ठेवला होता. ही दिवा १८८० साली बाजारात आला. त्याच साली या दिव्यांचा कारखाना कोलंबिया नावाच्या जहाजावर काढण्यात आला होता. एडिसन व इंग्लंडमधील ⇨सर जोसेफ विल्सन स्वॉन या दोघांनी मिळून ‘एडि-स्वॉन’ नावाचा कळकाच्या सालीपासून बनविलेल्या तंतूचा दिवा बनविला. १८९९ मध्ये कार्ल औअर फोन वेल्सबाख यांनी ऑस्मियम या धातूच्या तंतूपासून (अगदी बारीक तारेपासून) प्रदीप्त होणारा पहिला दिवा बनवला. १९०२ मध्ये वेर्नर फोन बोल्टन या रशियन शास्क्षज्ञांनी टँटॅलम धातूचा तंतू वापरून दिवा बनवला आणि १९०७ साली टंगस्टन धातूच्या तंतूचा वापर सुरू झाला. १९११ साली विल्यम डी. कूलिज यांनी तन्य टंगस्टन बनविले. यामुळे टंगस्टनाची बारीक तार तयार करता आली. टंगस्टनाचा तंतू सर्व दृष्टींनी अधिक कार्यक्षम असल्याचे आढळून आल्यामुळे इतर धातूंचा वापर आपोआपच बंद झाला. १९१३ साली दिव्याच्या पितळी टोपीतून काचेच्या फुग्यात जाणाऱ्या संवाहक तारा या निकेल व लोखंड यांच्या मिश्रधातूपासून तयार करण्यास सुरूवात झाली व नुसता काचेचा निर्वात फुगा वापरण्याऐजी त्यामध्ये नायट्रोडन किंवा नायट्रोजन व आऱ्गॉन या वायूंच्या मिश्रणासारखे अक्रिय (सहजासहजी रासायनिक विक्रिया न होणारे) वायुमिश्रण वापरण्यास प्रारंभ झाला.
इ. स. १९३७ पासून वेटोळ्यावेटोळ्याचा तंतू वापरण्याची पद्धती प्रचारात आली. तसेच दिव्याच्या काचेतून येणाऱ्या प्रकाशाचे विसरण (विखुरण्याची क्रिया) चांगले करण्यासाठी काचेवर संस्करण करण्याची प्रथाही सुरू झाली.
‘एडि−स्वॉन’ दिव्याची प्रकाशनक्षमता खूपच कमी होती. त्या वेळी २·५ ते ४ वॉट विद्युत् शक्ती खर्च करून फक्त एका मानक मेणबत्तीपासून मिळणारा प्रकाश मिळे म्हणजे साधारणपणे दर वॉट विजेमागे ३·० ते ४·० ल्यूमेन एवढाच प्रकाश मिळे. याउलट आज प्रचारात असलेले दिवे दर वॉट विद्युत् शक्तीमागे १० पासून ३० ल्यूमेनपर्यंत प्रकाश देऊ शकतात. (ल्यूमेन हे दीप्तिस्त्रोताचे एकक असून एका मानक मेणबत्तीपासून ४p ल्यूमेन प्रकाश मिळतो).
इ. स. १९५९ साली ५०० व १,५०० वॉटच्या दिव्यांच्या क्वॉर्ट्झ-आयोडीन नावाचा नवीन प्रकारचा प्रदीप्त दिवा पुढे आला. क्वॉर्ट्झापासून बनविलेला हा दिवा नलिकाकार होता. यात अक्रिय वायूबरोबर आयोडिनाची वाफही भरली होती. बाष्पीभूत टंगस्टनामुळे दिवा काळा होण्याचा दोष आयोडिनामुळे दूर झाला.
भारत : भारतात इंगलफील्ड या अभियंत्यांनी १८४९ साली विजेचा दिवा तयार करून त्याचे प्रात्यक्षिक मुंबईत दाखविले होते. मुंबईत विजेचे दिवे १९०५ साली वापरण्यास सुरुवात झाली. १९०६ साली टाटा कंपनीने जलविद्युत् केंद्रंमार्फत वीजनिर्मिती सुरू केल्याने वीज मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली ती स्वस्तही होती. त्यामुळे मुंबईतील विजेच्या दिव्यांचा वापर झपाट्याने वाढला व १९२३ साली रस्त्यांवर विजेचे दिवे लावण्यास सुरुवात झाली, तर १९६८ साली मरीन ड्राइव्हवरील सुप्रसिद्ध प्रकाशन व्यवस्था कार्यान्वित झाली.
भारतात विजेच्या दिव्यांचे उत्पादन १९३२ साली कलकत्त्यात सुरू झाले. तेव्हा दिवसात ५० दिवे तयार होत. नंतर या उद्योगात वाढ होत गेली व देशभर विजेच्या दिव्यांचे कारखाने निघाले. कलकत्ता, मुंबई, दिल्ली, पाटणा, बंगलोर, चेन्नई इ. ठिकाणी असे कारखाने आहेत. भारतात १९४९ साली १·८ कोटी तर १९५३ साली ९·६ कोटी दिवे तयार करण्यात आले. १९७३ साली भारतात १२·६ कोटी प्रदीप्त दिवे, तर १·४ कोटी अनुस्फुरक दिवे तयार झाले होते.
प्रदीप्त दिवे : हे सर्वाधिक वापरले जाणारे दिवे घराघरांतून असतात. हा दिवा किती वीज वापरतो त्यावर त्यापासून मिळणारा प्रकाश अवलंबून असतो. घरातील बहुतेक दिवे १५ ते १०० वॉट वीज वापरतात. दिव्यापासून मिळणारा प्रकाश ल्यूमेन या एककात मोजतात. सर्वसाधारण १०० वॉटच्या दिव्यापासून सु. १,७५० ल्यूमेन प्रकाश उत्पन्न होतो. दिव्यात किती वॉट वीज वापरली जाते ते दिव्याच्या काचेवर फुग्यावर छापलेले असते.
तंतू, काचेचा फुगा, आधारस्तंभ व टोपी किंवा टोपण हे प्रदीप्त दिव्यातील प्रमुख भाग असतात.
तंतू : प्रदीप्त दिव्यात विद्युत् प्रवाहाने धातुतंतूचे तापमान वाढते. साधारण ६००० ते ७००० से. तापमानापर्यंत तंतूपासून बाहेर पडणारे किरण हे प्रकाशापेक्षा उष्णतेच्या स्वरूपातच अधिक असतात परंतु यापलीकडे तापमान वाढवीत गेल्यास मात्र वर्णपटातील दृश्य किरणांचा भाग झपाट्याने वाढत जातो व धातुतंतू कितीही तापविला, तरी दृश्य किरणांचा भाग एकूण पुरविलेल्या विद्युत् शक्तीच्या मानाने दहा टक्क्यांपेक्षाही कमीच असतो. त्यामुळे तेजस्वी व चांगल्या कार्यक्षमतेने प्रकाश मिळवावयाचा झाल्यास धातुतंतूचे तापमान शक्य तेवढे उच्च ठेवणे आवश्यक असते, विशेषतः टंगस्टनाचा वितळबिंदू ३,३८०० से. असल्याने आता बहुतेक सर्व दिव्यांसाठी टंगस्टनाच्या तंतूचाच वापर केला जातो. कार्बनाचा वितळबिंदू यापेक्षा थोडा जास्त म्हणजे ३,५००० से. आहे पण त्यापासून मिळणारा प्रकाश टंगस्टन तंतूप्रमाणे पांढराशुभ्र नसून पिवळसर असल्याने त्याचा उपयोग प्रकाशापेक्षाही प्रयोगशाळेतील रोधक दिव्यांकरिताच मर्यादितपणे केला जातो. कार्बनाचे या तापमानाखाली बाष्पीभवन होते म्हणून कार्बनाच्या तंतूचे तापमान बरेच कमी ठेवावे लागते. म्हणजे दिवे बरेच टिकतात. ते यांत्रिक धक्क्यांत टिकून रहातात. टँटॅलम व ऑस्मियम या धातूंचे तंतूही वापरून पाहण्यात आले आहेत.
टंगस्टनाचा तंतू वापरण्यात पुढील फायदे आहेत : टंगस्टनाची तार तापली म्हणजे तिचे बाष्प होऊन कण उडून जाण्याचे प्रमाण फारच कमी असते. तसेच तारेचे तापमान वाढले की, तिच्यातून निघणाऱ्या दृश्य किरणांचे प्रमाणही पुष्कळ जास्त असते. चंगस्टनाची तन्यता व बलही उत्तम असते [⟶ टंगस्टन]. त्याचा लांब व बारीक तंतू दुसऱ्या एखाद्या बारीक पोलादी तारेभोवती गुंडाळून अगदी लहान व्यासाचा स्प्रिंगसारखा वळ्यावळ्यांचा (वेटोळ्यावेटोळ्यांचा) तंतूही बनविता येतो. हे वळे जाड तारेभोवती गुंडाळून मोठमोठ्या व्यासाचे सर्पिलाकार मळसूत्रही तयार करता येते. टंगस्टनाच्या तंतूपासून प्रत्येक वॉट विद्युत् शक्तीमागे २२ ल्यूमेनांपर्यंत प्रकाश सहज मिळू शकतो व थोड्या विशेष प्रयत्नाने तो ३५·८ ल्यूमेनांपर्यंतही वाढविता येतो. तापमान वाढत जाईल तसे प्रत्येक वॉट विजेपासून मिळणाऱ्या प्रकाशाचे ल्यूमेनमध्ये व्यक्त केलेले मान वाढत जाते. त्यामुळे जसजसे तंतूचे तापमान वाढत जाते, तसतसा त्यापासून मिळणारा प्रकाश जास्त तेजस्वी व पांढराशुभ्र होऊ लागतो. तंतू तापून हळूहळू त्याचे बाहेरील पृष्ठाचे बाष्प होऊन उडून जाते व ते दिव्याच्या काचेवर आतील बाजूने बसून काच काळसर दिसू लागते तसेच यामुळे मूळ तंतूचे आकारमान कमी होऊन त्याचा रोध वाढत जातो आणि दिव्यास दिलेला बाह्य विद्युत् दाब कायम राहत असल्याने त्यामधील प्रवाह कमी होऊन परिणामी दिव्यापासून मिळणारा प्रकाशही कमी होत जातो. अशा बाष्पीभवनाने अखेरीस तंतू तुटून दिवा जळतो. टंगस्टनाचे असे बाष्पीभूत कण आकर्षून घेऊन धरून ठेवण्यासाठी काही दिव्यांत जालक असते. सामान्यपणे विद्युत् दिवा हा एक हजार तास उत्तम रीतीने प्रकाश देईल असा बनविलेला असतो. प्रकाश झोत टाकणाऱ्या दिव्यांचे आयुष्य २ ते ६ तास, तर काही खास दिव्यांचे आयुष्य १०,००० ते १,००,००० तास असते. वापर होत जातो तसा दिव्यापासून मिळणारा प्रकाश कमी होत जातो.
टंगस्टनाचा तंतू तयार करण्यासाठी प्रथम टंगस्टन धातूची पूड यंत्राने दाबून ८·५ मिमी. X ८·५ मिमी. छेदाची व ३० सेंमी. लांबीची एक सळई बनवितात [⟶ चूर्ण धातुविज्ञान]. ही सळई नंतर विजेच्या भट्टीत तापवून तिला पुरेशी दृढता आणतात. नंतर ती सळई निर्वात जागेत दाबाखाली ठेवून तिच्यामधून कित्येक हजार अँपिअरांचा विद्युत् प्रवाह पाठवून ती तापवितात (या क्रियेत तापपिंडन म्हणतात). अशी तापपिंडन केलेली सळई नंतर घडवून तिची १·५ मिमी. व्यासाची जाड तार तयार करतात. ही तार प्रथम पोलादी मुद्रेतून व नंतर हिऱ्याच्या अगदी बारीक मुद्रेतून ओढून तिचा अतिसूक्ष्म व्यासाचा (०·०१२५ मिमी.) तंतू बनवितात
[⟶ तार काढणे, धातूची]. अशा १ मी. लांबीच्या बारीक तंतूपासून २ सेंमी. लांबीचा वेटोळ्यावेटोळ्याचा तंतू तयार होतो. हाच दिव्यातील प्रदीप्त होणारा मुख्य भाग असतो. शुद्ध टंगस्टनाचा तंतू तापविल्यास त्यास स्फटिकीभवन होऊ शकते व यामुळे तंतू दुर्बल आणि ठिसूळ होतो. त्यात थोरियम ऑक्साइड मिसळ्यास असे स्फिटिकीभवन होत नाही. तसेच वायू भरलेल्या दिव्यासाठी वापरण्यात येणारा तंतू बनविताना कधीकधी टंगस्टनामध्ये सिलिका, तसेच सोडियम व पोटॅशियम यांची फ्लोराइडे मिसळतात.
काही दिव्यांत एकापेक्षा जास्त तंतू असतात. हे तंतू स्वतंत्रपणे अथवा एकाच वेळी चालू करता येतात. त्यामुळे दिव्यांपासून कमीजास्त प्रकाश मिळू शकतो. उदा., एकाच दिव्यात ५० वॉटचा एक व १०० वॉटचा एक असे दोन तंतू आहेत. हे तंतू एकाच वेळी तापविले गेल्यास १५० वॉट तर स्वतंत्रपणे तापविल्यास ५० किंवा १०० वॉट विजेचा प्रकाश मिळू शकतो. या दिव्याला तीन-मार्गी दिवा म्हणतात.
काचेचा फुगा व दिव्याची रचना : मळसूत्री टंगस्टन तंतूच्या दिव्याची रचना आ. १ मध्ये दाखविली आहे.
रचनेच्या दृष्टीने ह्या दिव्याचे तीन भाग पडतात. पहिला भाग शिसेमिश्रित काचेच्या नळीसारखा असून त्याला दिव्याचा आधार स्तंभ म्हणतात. एकमेकांच्या अगदी जवळ असणाऱ्या दोन संवाहक तारा तंतूच्या उष्णतेमुळे वितळू नयेत आणि त्यांमध्ये किंचितही विद्युत् प्रवाह झिरपू नये म्हणून या काचेचा उपयोग करतात. स्तंभाच्या मध्य भागात दिव्यातील हवा बाहेर काढून घेण्यासाठी एक काचेचीच बारीक निष्कासक नळी बसवितात. काचेच्या स्तंभामध्ये निष्कासक नळी व दोन्ही संवाहक तारा ठराविक जागी बसविल्यावर स्तंभाचा वरचा भाग तापवून नरम झाल्यावर दाबून चपटा करतात. या चपट्या भागाच्या वरील बाजूस राहिलेल्या निष्कासक नळीचा भागही दाबून नळीचे तोंड बंद करून तेथे तिला गुंडीसारखा आकार देतात. त्या गुंडीवरच प्रदीप्त तंतूला आधार देणारी तार जोडतात. स्तंभाचा चपटा भाग पुन्हा गरम करून निष्कासक नळीच्या खालच्या तोंडातून हवा फुंकतात. त्यामुळे निष्कासक नळीमध्ये चपट्या भागाजवळ भोग पडते. या भोकाद्वारे दिव्याच्या फुग्यातील हवा काढून घेतात. चापट भागात अडकवलेल्या संवाहक तारांचा व चापट काचेचा प्रसरणगुणक सर्व परिस्थितीत अगदी एकसारखा रहावा लागतो. याकरिता चपट भागातील संवाहक तार निकेल व लोखंड यांच्या मिश्रधातूपासून (ड्यूमेटपासून) बनवतात व तिच्यावर प्रथम चांदीचा मुलामा व नंतर तांब्याचे आवरण देतात. यावर टाकणखाराचा लेपही देतात. अशा रीतीने तयार केलेली तार शिसेमिश्रित काचेमध्ये उत्तम रीतीने चिकटून बसते. आधार स्तंभाच्या खालच्या भागात असलेला संवाहक तारेचा भाग तांब्याचा असतो आणि चापट भागाच्या वरच्या बाजूस असलेला भाग मॉलिबडेनमाचा असतो. प्रदीप्त होणाऱ्या तंतूला मधून मधून आधार देणारी तार मॉलिब्डेनमाची अथवा टंगस्टानाची असते. दिव्याचा आधार स्तंभ, काचफुगा व प्रदीप्त तंतू हे तीन प्रमुख भाग एकमेकांशी एकत्रितपणे जोडलेले असतात (आ.१). संवाहक तारांचे निरनिराळे भाग वितळजोड करून एकमेकांस जोडलेले असतात.
दिव्याची रचना करताना प्रथम वरीलप्रमाणे तयार केलेला काचेचा आधार स्तंभ यंत्राच्या बैठकीवर उभा करतात व चपट्या भागावरील दोन्ही संवाहक तारांची टोके आकड्यासारखी वळवतात. त्या आकड्यांमध्ये टंगस्टनाच्या तंतूची टोके अडकवून ते आकडे दाबून टाकतात. या तंतूवर फॉस्फरस-अल्कोहॉल मिश्रित लेप लावतात. स्तंभाच्या पसरट भागावर काचेचा फुगा बसवून त्यांचा वितळजोड करतात. हा जोड थंड होऊन पक्का झाल्यावर पुन्हा सर्व फुगा गरम करून त्यातील हवा निष्कासक पंपाने काढून घेतात. अशा रीतीने निर्वात केलेल्या फुग्यामध्ये म्हणण्याजोगा ऑक्सिजन रहात नाही व त्यामुळे तंतू जळून जाण्याची भीती रहात नाही. फुग्यातील उरला-सुरला ऑक्सीजन तंतूवरील फॉस्फरसकड़ून गरम झाल्यावर शोषला जातो. अशा रीतीने फुग्यातील सर्व हवा काढून घेणाऱ्या निष्कासक नळीचे खालचे तोंड गरम करून कायमचे बंद करतात. दिव्याचा फुगा हा सोडामिश्रित काचेपासून बनवतात. त्यामुळे तो स्वच्छ पारदर्शक तसेच स्वस्तही असतो. बहुतेक दिव्यांचे फुगे मृदू काचेचे असतात. तापमानात अचानकपणे व तीव्र चढउतार होत असल्यास कठीण काच वापरतात. फुग्याचा आकार नासपतीसारखा गोल, ज्योतीसारखा किंवा नलिकाकार असतो. काही दिव्यांमध्ये फुग्यात एखादा अक्रिय वायू भरतात. अशा वेळी फुगा निर्वात करून झाल्यावर, निष्कासक नळीतून अक्रिय वायू भरून नंतर निष्कासक नळीचे खालचे तोंड बंद करतात. त्यानंतर दिव्याच्या खालच्या भागावर गरम सिमेंटच्या साहाय्याने तस्तलेपित पत्र्याची वा पितळी टोपी बसवतात. टोपीमधून दिव्यातील संवाहक तारांची टोके बाहेर काढून टोपीमध्ये लाख व राळ भरून वरीलप्रमाणे तयार केलेले सिमेंट गरम करून भरतात. टोपीमधून बाहेर आलेल्या दोन्ही संवाहक तारांच्या टोकांशी कथिलाच्या लंबवर्तुळाकार स्पर्शक चकत्या झाळून बसवतात व त्या सिमेंटवर दाबतात. या चकत्या बसवताना टोपीच्या दोन्ही बाजूंच्या खुंट्याची जागा पाहून मध्यापासून समांतर स्थितीत एक विवक्षित ठिकाणीच त्या बसवाव्या लागतात. कारण हा दिवा बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही प्रमाणभूत दिवाधराकात बसवल्यानंतर त्या धारकातील विद्युत् संवाहक खुंट्याशी या चकत्यांचा परिणामकारक स्पर्श झाला पाहिजे. चकत्या बसवून झाल्यावर दिव्यातून ठराविक दाबाच्या दुप्पट दाबाचा विद्युत् प्रवाह नियंत्रित वेळेपुरता सोडतात. त्यामुळे दिव्यातील तंतूवरील फॉस्फरस गरम होऊन दिव्यातील ऑक्सिजन पूर्णपणे शोषला जातो व तंतू विशेष मजबूत होतो. दिव्यास बाहेरून द्यावा लागणारा विद्युत् दाब व दिव्याची वॉटमधील विद्युत् शक्ती यांची माहिती रासायनिक क्रियेने काचेच्या फुग्यावर बाहेरील बाजूने छापतात किंवा काही वेळा ती टोपीवर काळ्या शाईने छापतात. बहुतेक ठिकाणी दिवे बनविण्याचे काम स्वयंचलित यंत्रावरच फार मोठ्या प्रमाणावर केले जाते.
दिवा जळत असताना टंगस्टनाचा तंतू साधारण २,५००० से. तापमानावर असतो. त्यामुळे या तापमानास टंगस्टनाचे हळूहळू बाष्प होऊन काही धातूकण बाहेर पडतात. निर्वात जातीच्या दिव्याच्या फुग्यात सुरुवातीस आयोडीन किंवा त्याच्या सारखे मूलद्रव्य अगदी सूक्ष्म प्रमाणात भरतात. त्याचा बाष्पीभूत टंगस्टनाशी संयोग होऊन वायू बनतो. हा वायू तंतूला स्पर्श होईपर्यंत फुग्यातून फिरतो. तंतूच्या अधिक उच्च तापमानामुळे या वायूचे विघटना होऊन टंगस्टन परत तंतूवर साचते व सुट्या झालेल्या आयोडिनाचा बाष्पीभूत टंगस्टनाशी परत संयोग होतो. परिणामी दिवा काळा पडत नाही. यामुळे तंतूचे तापमान वाढविता येते व परिणामी अधिक पांढराशुभ्र प्रकाश मिळतो. काळानुसार दिव्यापासून मिळणाऱ्या प्रकाशात होणारी घट कमी होते. दर वॉटमागे मिळणारा प्रकाश व दिव्याचे आयुष्य यांत वाढ होते. हे दिवे क्वॉर्ट्झाच्या बारीक नळीचे असतात. मात्र नेहमीच्या दिव्यापेक्षा या दिव्यांत, जंबुपार किरण जास्त निर्माण होतात व या किरणांना संवेदनशील असणाऱ्या वस्तूंचे या दिव्यांनी प्रकाशन करताना समस्या निर्माण होऊ शकते.
दिवा निर्वात ठेवण्यापेक्षा त्यामध्ये तंतूवर क्रिया करू न शकणारा आर्गॉनसारखा एखादा अक्रिय वायू भरल्यास टंगस्टनाचे बाष्प होण्याचे प्रमाण बरेच कमी होते. परिणामी तंतूचे आयुष्य वाढते असे अनुभवास आल्यामुळे आता ४० वॉट पुढील दिव्यांतून शुद्ध आर्गॉन वायू किंवा आर्गॉन व नायट्रोजन यांचे ८० : २० प्रमाणातील मिश्रण वापरतात. या वायूचा दाब बाहेरील हवेच्या दाबापेक्षा थोडा कमी (६०० मिमी.) ठेवतात. ५०० वॉटपर्यंत शक्तीच्या दिव्यात क्रिप्टॉन व झेनॉन यांचे मिश्रण वापरता येते. या वायूंची उष्णता संवाहकता आर्गॉन व नायट्रोजन यांच्यापेक्षा कमी असते. शिवाय क्रिप्टॉनाचे दिवे ७ ते २० टक्के अधिक प्रकाश देतात व ऊर्जेची बचत करणारे दिवे म्हणून त्यांची जास्त किंमत आकरली जाते. निर्वात दिव्यांत तंतूंचे तापमान कमी असते व वायू भरलेल्या दिव्यांपेक्षा निर्वात दिव्यापासून दर वॉट विजेमागे कमी प्रकाश मिळतो. दिव्याच्या प्रदीप्त तंतूपासून डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून काही दिव्यांच्या फुग्यांना आतून हायड्रोफ्लुओरिक अम्ल लावून काचेचा पारदर्शकपणा थोडा कमी करतात किंवा त्यावर अतिसूक्ष्म कणी पांढऱ्या मातीचा रंग चढवतात. ही क्रिया केल्याने गोळ्याची काच पांढरच किंवा दुधी रंगाची बनते व आतून येणारा प्रकाश विसरित होऊन येत असल्याने त्याचा डोळ्याला त्रास होत नाही परंतु या क्रियेमुळे दिव्याच्या प्रकाशनक्षमतेमध्ये थोडी घट होते.
शोभेसाठी वापरावयाच्या दिव्यांची काच विविध रसायने वापरून निळी, हिरवी, लाल, गुलाबी अशा विविध रंगांची करता येते किंवा पांढऱ्या काचेवरच आतून अगर बाहेरून रंग लावता येतो. प्रकाशित केलेली वस्तू (उदा., मांस) गरम न होता थंड रहावी अशा रीतीने काही दिव्यांतील परावर्तक बसविलेले असतात. काही फुग्यांवर वरच्या अर्ध्या भागात चांदीचा पातळसा थर देऊन खाली पांढरा रंग लावतात. या योजनेमुळे दिव्याचा सर्व प्रकाश खालील दिशेने येतो व त्यामुळे त्याची डोळ्यावर तिरीप येत नाही.
वरील सर्व जोडणीसह दिवा त्याच्या टोपीत बसवितात. या टोपीमार्फत दिवा विद्युत् मंडलात जोडला जातो. दिव्यांच्या टोप्यांचे दोन प्रकार आहेत. एकात टोपीच्या दोन्ही बाजूंस बाहेरून एक एक छोटी खुंटी असते व टोपीच्या वरच्या बाजूस दोन लंबवर्तुळाकार स्पर्शक चकत्या असतात. या प्रकारच्या टोपीला दाबून बसवण्याची बायोनेट टोपी म्हणतात. अशा प्रकारच्या टोपीचा दिवा दिवाधारकात दाबून थोडा फिरवला असता त्यावरील छोट्या खुंट्या धारकातील खाचांत बरोबर अडकवून बसतात. घरात वापरल्या जाणाऱ्या बहुतेक सर्व छोट्या दिव्यांच्या (१०० वॉटपर्यंत) टोप्या याच प्रकारच्या असतात परंतु वॉट किंवा त्यापेक्षा जास्त शक्तीच्या दिव्यांना मात्र स्क्रूसारखी टोपी बसवितात. या एडिसन स्क्रू टोपीचा दिवा तशाच प्रकारच्या दिवाधारकात बसविताना आट्यांच्या दिशेने फिरवून बसवावा लागतो. टोपीतील मळसूत्री भाग दिव्यातील एक संवाहक तारेस जोडलेला असतो. त्यामुळे हा दिवा बसवताना मळसूत्री भागात स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. दिव्याच्या डोक्याच्या मधोमध असलेली धातूची गोल टिकली दिव्याच्या दुसऱ्या संवाहकास जोडलेली असते. स्क्रू पद्धतीच्या टोपीचा स्पर्शक भाग हा नेहमी घट्ट बसत असल्याने अधिक प्रवाह असला, तरी दिवाधारक विशेष गरम होत नाही. बायोनेट जातीच्या टोप्यांवरील स्पर्शक चकतीची मापे मिमी. मध्ये असतात व सर्व उत्पादनांमध्ये ती एकसारखीच ठेवलेली असतात. त्यामुळे कोणत्याही कंपनीचा दिवा कोणत्याही इतर कंपनीच्या दिवाधारकामध्ये बसवता येतो परंतु या प्रकारच्या टोप्या चांगल्या घट्ट बसत नाहीत तसेच त्यांमध्ये बाहेरील ओलावा शिरू शकतो. त्यामुळे दिव्यामध्ये मंडल संक्षेप होऊन टोपी खराब होण्याची शक्यता असते. अगदी लहान आकारमानाच्या दिव्यांसाठी किंवा विद्युत् घटमालेवर चालणाऱ्या दिव्यांसाठीसुद्धा स्क्रू प्रकारच्याच टोप्या वापरण्याची पद्धत आहे.
विद्युत् दाब ठराविक मूल्यावर स्थिर राहिला, तरच दिव्यापासून ठारविक प्रकाश मिळू शकतो पण विद्युता दाबाचे मूल्य स्थिर न राहता सारखेच कमी अधिक होत असेल, तर दिवा जास्त दिवस टिकत नाही. विद्युत् दाबाच्या बदलाचा दिव्याचा कार्यक्षमतेवर व कार्यकालावर होणाऱ्या परिणामाचा संबंध दाखविणारा आलेख आ. २ मध्ये दाखविला आहे. यावरून असे दिसून येते की, दाबामध्ये थोडी घट झाली, तरी त्यामुळे दिव्यापासून मिळणाऱ्या ल्यूमेनमध्ये बरीच मोठी घट होते आणि दाबामध्ये थोडी जरी वाढ झाली, तरी दिव्याच्या कार्यकालात बरीच मोठी घट होते.
टंगस्टन तंतूचे प्रदीप्त दिवे घरातील वापराकरिता ११० व्होल्ट किंवा २३० व्होल्ट विद्युत् दाबावर चालण्यायोग्य व १५ वॉटपासून २५, ४०, ६०, १०० वॉट अशा निरनिराळ्या विद्युत् शक्तीचे मिळतात. तसेच रस्त्यावर लावण्याचे अथवा पूरप्रदीपनात वापरण्यासाठी २००, ५००, ७५०, १,००० व १,५०० वॉट शक्तीचे मोठे दिवे सुद्धा प्रचारात आहेत [⟶ प्रदीपन अभियांत्रिकी]. विद्युत् घटमालेवर चालणारे दिवे जरूरीप्रमाणे १, २, ४, २४, ६० वॉटचे व २, ४, ६, ८, १२, किंवा २४ व्होल्ट विद्युत् दाबावर कार्य करतात. वरील सर्व दिवे एकदिश अगर प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशेने वाहणाऱ्या) यापैंकी कोणत्याही विद्युत् प्रवाहावर चालतात. भारतामध्ये तयार केले जाणारे दिवे तपासण्यासाठी भारतीय मानक संस्थेने सविस्तर नियम तयार केलेले आहेत. भारतात बनविल्या जाणाऱ्या प्रदीप्त दिव्यांच्या काचेच्या फुग्यांची आकारमाने सामान्यतः पुढीलप्रमाणे असतात : १०, १५ व २० वॉटच्या दिव्यांची ५५ मिमी. ६० वॉटच्या दिव्याचे ६५ मिमी ७५ वॉटच्या दिव्याचे ७० मिमी. १०० वॉटच्या दिव्याचे ७५ मिमी. १५० वॉटच्या दिव्याचे ८० मिमी. २०० वॉटच्या दिव्याचे ९० मिमी. ३०० वॉटच्या दिव्याचे ११० मिमी. व ५०० वॉटच्या दिव्याचे १३० मिमी.
नेहमीचे व छोटे हे प्रदीप्त दिव्यांचे सर्वसाधारणपणे वापरले जाणारे प्रकार आहेत. यांशिवाय खास प्रकारचे प्रदीप्त दिवेही आहेत. उदा., उच्च तापमानाला कार्य करणारे पारदर्शिका व चित्रपट दाखविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रकाशक्षेपकातील दिवे, प्रदर्शन पेटिका व जाहिरातीचे फलक यांच्यातील दिवे, दोन तंतूंचे त्रिमार्गी दिवे, छायाचित्रणासाठी प्रकाशझोत टाकणारे दिवे, दिवसासारखा निळसर प्रकाश देणारे दिवे वगैरे.
फायदे व तोटे : प्रदीप्त दिव्यांचे फायदे असे आहेत : प्रकाशनाच्या इतर साधनांच्या मानाने हे स्वस्त असतात. विद्युत् मंडलात समाविष्ट करण्याच्या दृष्टीने हे दिवे सोयीस्कर असतात. या दिव्यांना विद्युत् प्रवाह मर्यादित करणाऱ्या अथवा आरंभक विद्युत् भार पुरविणाऱ्या साधनासारख्या पूरक भागांची गरज नसते. यामुळे प्रकाश उद्गमाचे आकारमान मर्यादित ठेवता येत असल्याने परावर्तक किंवा भिंगे यांच्या मदतीने याच्या प्रकाशाचे सहजपणे नियंत्रण करता येते. खास उपयोगांसाठी विविध आकारमानांचे व आकारांचे प्रदीप्त दिवे उपलब्ध असतात. १·५ व्होल्ट एवढ्या कमी विद्युत् दाबावर काही दिवे चालू शकतात. त्यामुळे विद्युत् घटमालेवर ते सहड चालू शकतात (उदा., मोटारगाडीतील दिवे वा चमक दिवे). प्रकाशकीय नियमन चांगल्या प्रकारे व कमी खर्चात करता येईल असा हा प्रकाश उद्गम आहे. आकारमानाच्या तुलनेत याची प्रकाशनक्षमता चांगली असते.
अर्थात प्रदीप्त दिव्यांचे काही तोटेही आहेत. उदा., अनुस्फुरक किंवा उच्च प्रकाशतीव्रता असणारे विसर्जक दिवे यांच्यापेक्षा प्रदीप्त दिवे एका वॉट विजेपासून कमी ल्यूमेन प्रकाश देतात व त्यांच्या कार्यकालही कमी असतो. निळ्या रंगाजवळील प्रकाश हवा असताना प्रदीप्त दिवे अतिशय अकार्यक्षम ठरतात. प्रदीप्त दिव्यांत मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. विद्युत् दाबातील चढउतारानुसार प्रदीप्त दिव्यांच्या उजेडात चढउतार होतात. यात दृश्य प्रकाशाबरोबर अवरक्त व जंबुपार (दृश्य वर्णपटातील तांबड्या व जांभळ्या रंगांपलीकडील अदृश्य) किरणही उत्सर्जित होतात. यामुळे या दिव्याची प्रकाशनक्षमता कमी असते. तथापि अवरक्त वा जंबुपार किरण तीव्र होतात (त्यांचे प्रमाण वाढते) तेव्हा या किरणांचा उद्गम म्हणून असा दिवा वापरता येतो.
विसर्जक दिवे : वायूतून अथवा धातूच्या बाष्पातून विद्युत् प्रवाह पाठविता असता प्रकाश निर्माण करणाऱ्या दिव्यांना हे नाव देतात. बहुतेक विसर्जक दिव्यांत प्रकाश प्रत्यक्ष वायूत किंवा बाष्पातच निर्माण होतो. या प्रकाशाचा रंग वापरलेला वायू व त्याचा दाब यांच्यावर अवलंबून असतो. निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, हीलियम इ. वायू आणि पारा व सोडियम या धातूंचे बाष्प विसर्जक दिव्यांत वापरतात.
अनुस्फुरक दिवे : यात अनुस्फुरणाद्वारे प्रकाशनिर्मिती होत असल्याने हे नाव पडले आहे. मुळात हे विसर्जक दिवे असून यांच्या आतील पृष्ठावर फॉस्फर किंवा ल्युमिनोफोर नावाच्या अनुस्फुरक द्रव्याचा लेप दिलेला असतो. विद्युत् विसर्जन निर्माण होणाऱ्या जंबुपार किरणाच्या काही भागाचे या लेपाद्वारे दृश्य प्रकाशात रूपांतर होते. हे दिवे नळीच्या आकाराचे असून सामान्यतः त्यांची लांबी ६० सेंमी व १२० सेंमी असते. यांच्या जास्त उजेडामुळे व्यापारी व औद्योगिक प्रदीपनासाठी हे दिवे मोठ्या प्रमाणात वापरतात. तसेच रस्ते, दुकाने, क्रीडांगणे इ. ठिकाणीही हे दिवे वापरतात.
इ. स. १६७५ मध्ये झां पीकार यांनी आणि १७८० मध्ये जे. बेर्नुली यांनी पाऱ्याच्या बाष्पाचे उद्दीपन करून प्रकाश उत्पन्न करता येईल, हे प्रथम सूचित केले. १८५० साली एच्. गाइसलर यांनी यासंबंधी विशेष संशोदन करून विरल वायूमध्ये विद्युत् विसर्जन केले, तर त्यापासून प्रकाश उत्पन्न करता येतो हे दाखवून दिले. १८५९ साली आलेक्सांद्र एद्माँ बेक्रेल यांनी स्वतः बनविलेल्या अनुस्फुरक दिव्यांचे वर्णन प्रसिद्ध केले. मात्र यानंतर ८० वर्षांनी असे दिवे अमेरिकेत वापरात आले. १८७९ मध्ये लंडनचे जॉन रेपीक व १८८७ मध्ये फ्रान्समधील एम्. झामँ या दोघांनी गाइसलर यांच्या नळीच्या मूळ दिव्यात पुष्कळ सुधारणा केली. १८९७ साली निरनिराळ्या रंगांचे प्रकाश देणाऱ्या नळ्या बनविण्यास सुरुवात झाली. १९०१ पासून पाऱ्याच्या बाष्पाचे दिवे तयार होऊ लागले. सुरुवातीच्या दिवसात या दिव्यांचा प्रकाश समाधानकारक नव्हता पण १९०३ पासून पाऱ्याच्या दिव्यावर काचेच्या आतील बाजूने अनुस्फुरक रसायनाचे रंगलेप लावण्याची पद्धत सुरू झाली आणि त्यामुळे नळीच्या दिव्यांचा प्रकाश पुष्कळच तेजस्वी व पांढरा स्वच्छ मिळू लागला. १९०४ साली पीटर कूपर हेविट यांनी पाऱ्याचा दिवा तयार केला. १९१० साली जी क्लोड यांनी निऑन, आर्गॉन, हीलियम, क्रिप्टॉन आणि झेनॉन यांसारख्या अक्रिय वायूंचा उपयोग करून निरनिराळ्या रंगांचा प्रकाश देणारे विसर्जक दिवे बनविले. १९३४ पासून विसर्जक नळीचे दिवे घरात वापरण्यास सुरुवात झाली. १९५० पासून सोडियम बाष्पाचा दिव्यांचा वापर सुरू झाला.
इ. स. १९३९ सालापर्यंत अनुस्फुरक दिव्यांचे १५, २०, ३० व ४० वॉटचे चारच प्रकार उपलब्ध होते व ते सर्व नलिकाकार होते. १९६० सालापर्यंत या दिव्यांचे आकार व आकारमान यांनुसार असलेले ४५ प्रकार तयार करण्यात आले होते व ते ४ पासून २०४ वॉटपर्यंतचे होते. यांत वर्तुळाकार, वक्र व दंतुर आकारही होते. या काळात अनुस्फुरक दिवे वापरण्याच्या नवीन पद्धती पुढे आल्या व बरीच तांत्रिक प्रगती झाली. उदा., ४० वॉटच्या दिव्यापासून मिळणाऱ्या प्रकाशात १,४०० पासून २,९०० ल्यूमेनपर्यंत वाढ झाली. नमुनेदार अनुस्फुरक नळी दिव्याचे भाग आ. ३ मध्ये दाखविले आहेत. हा दिवा लांबट नळीच्या आकाराचा असून त्याच्या दोन्ही टोकांकडे साध्या दिव्यातील टंगस्टनाच्या तंतूप्रमाणेच पण अल्कली ऑक्साइडाचे आवरण दिलेले विद्युत् प्रवाहाने गरम होणारे दोन तंतू बसविलेले असतात. यांना विद्युत् अग्रे असेही म्हणतात. या अग्रांना प्रवाह पुरविण्यासाठी तंतुधारकाची संवाहक टोके खुंट्याच्या स्वरूपात टोपीच्या बाहेर आणलेली असतात. या दिव्याची नळी चुनामिश्रित काचेची असते. ही नळी प्रथम स्वच्छ करून तिच्या आतील बाजूंवर मिश्रणांचा रंगलेप करतात. हा रंगलेप फवारा मारून किंवा स्थिर विद्युत् शक्तीच्या साहाय्याने बसवितात. रंगलेप बसल्यावर सर्व वायू काढून टाकण्यासाठी नळी हवेतच ठेवून वाळवितात. रंगलेप चांगला वाळला म्हणजे नळी हवेत ७००० से. तापमानापर्यंत तापवतात. त्यामुळे रंगलेप काचेवर पक्का चिकटवून बसतो व रंगलेपातील कार्बनासारख्या द्रव्यांचे पूर्ण भस्म होते. नंतर नळीच्या दोन्ही तोंडांवर टंगस्टनाचे तंतू बसंवलेल्या पितळी वा प्लॅस्टिकच्या टोप्या बसवितात. ह्या टोप्या नळीच्या भागावर पक्क्या बसाव्यात म्हणून लाख, नैसर्गिक राळ व फिनॉलिक रेझीन एकत्र गरम करून त्यांत संगमरवराची बारीक पूड एकत्र करून तयार केलेल्या सिमेंटचा वापर करतात. टोप्या बसवल्यावर नळीतील हवा एका निष्कासक नळीद्वारे काढून घेतात. अशी क्रिया चारपाच वेळा करतात. दोन्ही बाजूंकडील तंतूमधून विद्युत् प्रवाह पाठवितात. त्यामुळे दोन्ही तंतूंवरील कार्बोनेटाचा थर ऑक्साइड बनून असे नको असलेले पदार्थ आर्गॉन वायूबरोबर बाहेर ढकलले जातात. नळी प्रकाश देत असताना या ऑक्साइडामधूनच इलेक्ट्रॉन बाहेर पडतात व तेच नळीतील विद्युत् प्रवाह चालू ठेवतात. या दिव्यांच्या नळीमधील आर्गॉनाचा दाब अगदी कमी (पाऱ्याच्या ०·००५ मिमी. उंचीच्या स्तंभाएवढा) असतो. निष्कासक नळीचे तोंड गरम करून बंद करतात. नंतर दोन्हीकडील टोप्या थोड्या तापवून त्यांतील सिमेंट पक्के करतात. मग नळीतील दोन्ही वाजूंच्या तंतूंमधून मोठ्या दाबाचा प्रवाह पाठवून नळीतील वायूत प्रज्योत उत्पन्न करतात. या प्रज्योतीमुळे तंतूमधील बाकी राहिलेल्या सर्व कार्बोनेटाचे ऑक्साइड बनून अशुद्ध पदार्थ प्रज्योतीच्या मार्गातून बाजूला फेकले जातात.
नळीतील तंतूमधून काही वेळ प्रवाह गेला म्हणजे विद्युत् प्रवाहामुळे तापून दोन्ही तंतू गरम होतात आणि त्यामुळे त्यांवरील उत्सर्जक द्रव्यांमधून इलेक्ट्रॉन उत्सर्जित होऊ लागतात. हे इलेक्ट्रॉन आर्गॉनच्या मदतीने नळीच्या दुसऱ्या टोकांपर्यंत जातात व त्यामुळे नळीतून एका टोकाकडून दुसरीकडे प्रवाह गेल्याने पारा तापून त्याचे बाष्पात रूपांतर होऊन व त्या अणूंचे इलेक्ट्रॉन त्यावर आदळून आयनीकरण होते. असे आयनीकरण झालेले धन कण व ऋण भारित इलेक्ट्रॉन नळीमधून एकमेकांच्या विरुद्ध दिशांनी जाऊ लागतात. इलेक्ट्रॉनाने धक्का दिल्याने आयनीकरण झालेल्या अणूतील काही इलेक्ट्रॉन उत्तेजित होऊन ते त्यांची मूळ कक्षा सोडून अधिक उत्तेजित कक्षेकडे जाऊन परत येतात. तसे परत येताना ते उत्तेजित स्थितीत मिळविलेली ऊर्जा प्रारणाच्या रूपाने बाहेर फेकतात. ही ऊर्जा दृश्यमान तरंगलांबीच्या मर्यादेत असेल, तर आपणास तीपासून सरळ प्रकाश मिळतो. हे प्रारण नळीच्या आतील भागावरील अनुस्फुरक पदार्थांच्या लेपावर पडून नळी चमकू लागते व तिच्यापासून अधिक स्वच्छ व चकचकीत असा प्रकाश मिळतो. अशा रीतीने नळीमधील पाऱ्याच्या बाष्पाच्या विसर्जनामुळे प्रवाहास होणारा विरोध कमी होताच नळीतील विद्युत् प्रवाह वाढतो. तो मंडलात एकसरीत इतर साधने वापरून मर्यादित करून एका स्थिर मूल्यावर ठेवावा लागतो. अशा तऱ्हेने नळीतील मुख्य प्रवाह एका बाजूकडून दुसरीकडे वाहू लागतो. आयनीकरण झालेल्या पाऱ्याचे बाष्प अणू उत्तेजित झाल्यामुळे फेकले जाणारे जंबुपार किरण फॉस्फरच्या लेपावर पडताच त्यापासून निळसर रंगाचा प्रकाश मिळू लागतो. अशा नळीच्या दिव्याची प्रकाश देण्याची क्षमता ७·५ टक्के असते. त्यापासून दर वॉट विद्युत् शक्तीमागे ५० ते ७० ल्यूमेन इतका प्रकाश मिळतो. हा दिवा वरचेवर चालू आणि बंद करण्याने प्रत्येक वेळेला त्यातील इलेक्ट्रॉनांचे उत्सर्जन करणाऱ्या अग्राचे लेपातील काही कण नाहीसे होऊन तेवढ्या प्रमाणात दिव्याचा कार्यकाल कमी होतो. त्यासाठीच असा दिवा एकदा चालू करून बराच वेळ तसाच अखंडपणे वापरला, तर त्याचा कार्यकाल ४,००० तासांपर्यंत वाढविता येतो. अशा नळ्यांच्या दिव्यांचा व्यास १५ मिमी. पासून ४० मिमी. पर्यंत व लांबी ४५, ६०, १२० व १५० सेंमी. असते आणि या दिव्यांची शक्ती १५, २०, ४० व ८० वॉट इतकी असते.
नळीचे दिवे सुरू करण्यासाठी व ते चालू ठेवण्यासाठी नेहमीच्या साध्या स्विचाशिवाय मंडलात पुढील काही इतर साधने जोडावी लागतात (आ. ४) : (१) आरंभक स्विच, (२) रोधनिका, (३) रेडिओमधील खरखर कमी करण्यासाठी धारित्र (धारणी) इत्यादी.
नळीच्या मंडलाच्या या प्रकारामध्ये दिवा सुरू करताना मुख्य मंडलाचा स्विच चालू करताच आरंभक स्विचामधील द्विधातवीय पट्टी, दिव्यातील दोन्ही बाजूंकडील तंतू व रोधनिका यांमधून विद्युत् प्रवाह वाहू लागतो. त्यामुळे दोन्ही तंतू तापतात. याच वेळी आरंभकातील द्विधातवीय पट्ट्या गरम होऊन वाकून एकमेकींपासून दूर होतात व मंडल तुटते. रोधनिकेच्या प्रवर्तनी गुणधर्मामुळे मोठा विद्युत् दाब निर्माण होतो. या मोठ्या विद्युत् दाबामुळे नळीच्या पोकळीतून दोन्ही बाजूंकडील तंतूंमध्ये प्रज्योत उत्पन्न होते व नळीतून मोठा विद्युत् प्रवाह वाहू लागून नळीचा दिवा सुरू होतो. दिवा सुरू झाला म्हणजे आरंभकामार्गे जाणारा बाहेरचा प्रवाह बंद होतो व नळीतील प्रवाह फक्त नळीतील पोकळीतून एका तंतूपासून दुसऱ्या तंतूपर्यंत जात राहतो. नळी चालू असता तिचा विरोध पाऱ्याच्या बाष्प विसर्जनामुळे एकदम बराच कमी झालेला असतो. त्यामुळे अशा नळीतून जाणारा प्रवाह प्रमाणाबाहेर वाढू न देण्यासाठी म्हणजेच प्रवाहास स्थिरता आणण्यासाठी मंडलात एक रोधनिका ठेवणे आवश्यक ठरते. नळीस आवश्यक तेवढा विद्युत् दाब सोडून उरलेला विद्युत् दाब तिच्यामध्ये खर्च होतो. या रोधनिकेचा स्वतःचा शक्तिगुणाक अगदी कमी असल्याने त्यात रोधासारखी विद्युत् शक्ती खर्च होत नाही. तसेच याच रोधनिकेतील प्रवाह सुरुवातीस कमी वेळात खंडित करून नळीतील विसर्जन सुरू करावयास लागणारा उच्च दाब (१,००० व्होल्ट) पुरवठ्याच्या नेहमीच्या कमी दाबापासूनच (२३० व्होल्ट) मिळवला जातो. अशा रीतीने सुरुवातीला विद्युत् दाब वाढविण्याचे काम करणारी रोधनिकाच नंतर उरलेला विद्युत् दाब खर्च करण्यास उपयोगी पडते. प्रवाह खंडित करण्यासाठी आरंभक स्विच वापरावा लागतो. रोधनिका व आरंभक स्विचाऐवजी आरोहित्राचा उपयोग करूनही हा उच्च दाब मिळू शकतो तसेच रोहित्र वापरूनही नळीचा दिवा पेटवता येतो. अशा प्रकारात नळी लगेच प्रकाश देऊ लागते.
धातूचा प्रदीप्त तंतू वापरून प्रकश देणाऱ्या दिव्यात, दिव्याचा विद्युत् दाब वाढविला, तर दिव्यातील विद्युत् प्रवाहही वाढतो म्हणजेच दिव्यातील प्रवाह व दाब यांचे प्रमाण सम असते. याउलट नळीच्या दिव्यामध्ये मात्र विद्युत् प्रवाह वाढल्यास नळीतील वायूचे आयनीकरण झपाट्याने वाढते व त्यातील बाष्पाकडून होणारा विरोध कमी झाल्याने विशिष्ट प्रवाहास आवश्यक असणारा विद्युत् दाब कमी होत जातो. हा संबंध आ. ५ मध्ये दाखविला आहे.
प्रत्यावर्ती प्रवाहावर चालणाऱ्या सर्व विसर्जक दिव्यांमध्ये विद्युत् प्रवाहाचे मूल्य सतत बदलत असते आणि प्रत्येक अर्ध्या आवर्तनानंतर प्रवाह शून्यापर्यंत कमी होतो. त्यामुळे दिव्यात लुकलुक निर्माण होते परंतु नळीवरील अनुस्फुरक द्रव्याच्या लेपामुळे ही लुकलुक नजरेस विशेष जाणवत नाही मात्र हा प्रकाश पंखा किंवा चाकासारख्या एखाद्या गतिमान वस्तूवर पडल्यास चाकाचा वेग कमी झाल्यासारखे वाटणे, चाक उलटे फिरते असे वाटणे किंवा त्याचा गतिमान भाग पूर्ण स्थिर वाटणे असे प्रकाशीय भास निर्माण होतात. या परिणामाला भ्रमदृश्य परिणाम म्हणतात. यामुळे अपघातही होऊ शकतो. म्हणून मोठमोठ्या कर्मशाळांतून असे अनुस्फुरक नळ्यांचे दिवे वापरून प्रकाशन करताना सर्व दिवे एकाच कलेवर न जोडता प्रत्येक विभागातील काही दिवे विभागून तिन्ही कलांवर प्रत्येकी एकेक संच असे जोडतात. त्यामुळे प्रवाहशून्य होण्याची वेळ सर्व दिव्यांच्या बाबत वेगवेगळी राहिल्याने भ्रमदृश्य दोष नाहीसा होतो. यासाठी काही वेळा दुहेरी दिव्यांची जोडणी करून त्यांपैकी एका नळीच्या मंडलात रोधनिका व दुसऱ्या नळीच्या मंडलामध्ये धारित्र जोडता. यामुळे दोनही मंडलांचा शक्तिगुणक वेगळा होऊन वरीलप्रमाणे कार्य होते. याचा आणखी एक फायदा म्हणजे मंडलात फक्त रोधनिका जोडली असता मंडलाचा शक्तिगुणक अनुगामी असतो परंतु यात वापरलेल्या धारित्राच्या जोडणीमुळे शक्तिगुणक पुरोगामी होतो. परिणामी मंडलाचा एकूण शक्तिगुणक सुधारून जवळजवळ एककाच्या आसपास येतो. नळीतील सतत खंडित होणाऱ्या प्रवाहामुळे तिच्या जवळपास रेडिओ लावल्यास त्यावर खरखर ऐकू येते. ती टाळण्यासाठी दिव्याच्या अनेकसरीत एक योग्य मूल्याचे धारित्र जोडल्यास रेडिओची खरखर कमी होते.
दरवॉट विजेमागे ७७ ल्यूमेन प्रकाश देणारे अनुस्फुरक दिवे प्रकाशनक्षमतेच्या दृष्टीने व दीर्घ कार्यकालामुळे फायदेशीर आहेत. अर्थात या दिव्यांत जास्त किंमत, रोधनिकेचा आवाज व लुकलुकणे हे दोषही आहे. तरीही हे दिवे हळूहळू प्रदीप्त दिव्यांची जागा घेत आहेत.
उच्च दाबाच्या पाऱ्याच्या बाष्पाचे दिवे : टंगस्टन धातूचा प्रदीप्त तंतू वापरून, उच्च दाबयुक्त पाऱ्याच्या बाष्पाचा उपयोग करणारे दिवे बनविले जातात. यामध्ये क्वार्ट्झाच्या काचेची एक नळी दुसऱ्या आतून लेप असलेल्या काचेच्या फुग्यात बंद केलेली असते. सुरुवातीस प्रज्योतीसाठी साहाय्यक विद्युत् अग्राचा उपयोग केलेला असतो. याच्या प्रकाशाची तीव्रता बरीच असल्याने बाहेरील नळीतून प्रकाश विसरित होऊन येईल अशा प्रकारची काच वापरतात. आतील नळीत वापरलेल्या पाऱ्याच्या बाष्पाचा दाब हवेच्या दाबाच्या सुमारे दहापट असतो. बाष्पाचा दाब वाढवावा तसा दिव्याचे आकारमान कमी कमी करत येते. अशा प्रकारचा एक दिवा आ. ६ मध्ये दाखविला आहे. असे दिवे ८० वॉटपासू १,००० वॉटपर्यंत असतात व त्यांपासून २,५०० ल्यूमेन ते ५०,००० ल्यूमेनपर्यंत प्रकाश मिळू शकतो [⟶ प्रदीपन अभियांत्रिकी]. या दिव्यांच्या प्रकाशात कोठल्याही वस्तूच्या मूळ रंगाचे विकृत स्वरूप दिसू नये म्हणून या दिव्यांसाठी क्वॉर्ट्झाची विसर्जक नळी वापरतात. असे दिवे भरपूर उजेडासाठी शहरातील मोठ्या चौकांत लावण्यासाठी विशेष सोयीचे असतात. या दिव्यांच्या नळीत नायट्रोजन, आर्गॉन व थोडा पारा भरतात (आ. ६). दिवा चालू करताना रोधनकेमधून येणारा प्रवाह खालच्या तंतूकडे (कार्यकारी विद्युत् अग्राकडे) जातो व त्यामुळे तो तंतू तापतो. हा तंतू तापल्यावर हा तंतू व वरील तंतू यांच्यात प्रज्योत निर्माण होऊन नळीतून उत्तम प्रकाश मिळू लागतो. प्रज्योत निर्माण होण्यासाठी साहाय्यकारी विद्युत् अग्राचा उपयोग होतो. बाहेरच्या फुग्याच्या आतील भागावर अनुस्फुरक द्रव्याचा लेप चढवलेला असतो. त्यामुळे आतून येणाऱ्या प्रकाशाच्या जंबुपार किरणांचे दृश्य प्रकाशात रूपांतर होते. शिवाय बाहेरच्या फुग्याने प्रज्योतीचे संरक्षण होते व ऑक्सिडीभवन होण्यास प्रतिबंध होतो. या दिव्याने १ वॉट विजेपासून ६५ ल्यूमेनपर्यंत प्रकाश मिळू शकतो. याचा कार्यकाल सरासरी ६,००० ते १२,००० तास असतो. सर्वसाधारण प्रदीप्त दिव्यापेक्षा याची कार्यक्षमता २ ते ३ पट असते शिवाय याचा कार्यकाल दीर्घ असून चांगले नियंत्रण असणारा हा सुटसुटीत प्रकाश उद्गम आहे. मात्र हा महाग पडतो, याच्यापासून निळसर हिरवा प्रकाश मिळतो व दिवा परत लावल्यावर पूर्णपणे प्रकाशमान होण्यास ५ ते ७ मिनिटे वेळ लागतो.
सोडियमाच्या बाष्पाचे दिवे : कमी दाबाच्या सोडियम बाष्पाच्या दिव्यांचा विशेष म्हणजे त्यांपासून मिळणारा एकवर्णी प्रकाश आणि उत्तम प्रदीपनक्षमता होय. त्यामुळे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात, कमी खर्चात व रंगनिरपेक्ष प्रदीपन अपेक्षित असते, त्या ठिकाणी प्रकाशनासाठी सोडियम बाष्प दिवे वापरतात. उदा., मोठ्या रस्त्यांचे प्रकाशन, विमानाच्या धावपट्टीवरील मार्गदर्शक, पूरप्रदीपन, ओतशाळा, काच कारखाने इत्यादी.
उच्चतापसह काचेच्या निर्वात धातुरूप सोडियम व निऑन बंद केलेला असून नळीची काच सोडियमाचे परिणाम सहन करू शकणारी असते. ही नळी उष्णतारोधी काचेच्या निर्वात आवेष्टनात बंदिस्त असते. क्रियाशील वा कार्यकारी विद्युत् अग्रे नळीच्या दोन्ही टोकांशी असून ती टंगस्टनाच्या तारेची दुहेरी किंवा तिहेरी वेटोळी देऊन बनवलेली असतात त्यांवर इलेक्ट्रॉन उत्सर्जक अल्कली ऑक्साइडाचा लेप दिलेला असतो. ह्या दिव्यात विसर्जनासाठी पुरवठ्याच्या नेहमीच्या विद्युत् दाबापेक्षा जास्त विद्युत् दाब लागत असल्यामुळे झिरप रोहित्राचा उपयोग करून त्यापासून ४८० व्होल्ट एवढा विद्युत् दाब मिळवतात. तसेच सुरुवातीस दिव्यातील थंड सोडियमाचे बाष्पात रूपांतर करण्यासाठी लागणारी उष्णता मिळण्यासाठी निऑनचा वापर होतो तसेच नंतर सोडियम बाष्पाची संवाहकता वाढविण्याकडेही याच निऑनाचा उपयोग होतो. अक्रिय वायूमधील विसर्जनामुळे सोडियम बाष्परूप होऊन त्यातून विसर्जन सुरू झाल्यानंतर अगदी सुरुवातीस निऑनाचा तांबूस नारिंगी प्रकाश दिसतो आणि नंतर तो जाऊन काही वेळाने एकसारखा पिवळसर रंगाचा प्रकाश मिळू लागतो. दिवा सुरू केल्यानंतर सु. १५ मिनिटांनी तो पूर्ण शक्तीचे प्रकाशन देऊ शकतो. ह्या दिव्यापासून एका वॉट विजेमाकगे १०० ते १४० ल्यूमेन इतका प्रकाश मिळू शकतो. या दिव्याचा कार्यकालही ६,००० तासांपर्यंत एवढा प्रदीर्घ असतो. सोडियम बाष्पाचे नळीचे दिवे ४५, ६०, ८५ व १४० वॉट इ. शक्तीचे (४,००० ते २५,००० ल्यूमेन शक्तीने) असतात.
झेनॉन वायूचे दिवे : या प्रकारच्या दिव्यांकरिता क्वॉर्ट्झाची नळी वापरतात. ही नळी मध्यभागी फुगीर असून या फुगीर भागात टंगस्टानाची दोन जाड विद्युत् अग्रे एकमेकांपासून ४ ते ६ मिमी. अंतरावर बसवलेली असतात. या नळीत वातावरणाच्या ८ ते १२ पट दाबाखाली झेनॉन हा वायू भरलेला असतो. हा दिवा सुरू करण्यासाठी उच्च दाबाचा व उच्च कंप्रतेचा विद्युत् प्रवाह यातून पाठवावा लागतो. हा प्रवाह जाऊ लागताच दोन्ही अग्रांमध्ये प्रज्योत उत्पन्न होऊन दिवा चालू होतो. या दिव्याचा उजेड सूर्यप्रकाशाप्रमाणे तेजस्वी व शुभ्र पांढरा असतो. त्यामधून जंबुपार व अवरक्त किरणांचे सुद्धा उत्सर्जन होते. त्यांचा उपयोग करून घेण्यासाठी नळीच्या आतल्या भागात अनुस्फुरक द्रव्याचा लेप देतात. हे दिवे ६० ते ६५ व्होल्ट एकदिश दाबावर किंवा २४० व्होल्ट प्रत्यावर्ती दाबावर चालतात. या दिव्यांची कार्यक्षमता चांगली असते परंतु त्यांना विशेष प्रकारचे नियंत्रक व आरंभक साहित्य लागते. तसेच त्यांची मूळ किंमत बरीच जास्त असल्यामुळे हे दिवे साधारणतः घरात वापरीत नाहीत. त्यांचा उपयोग प्रामुख्याने चित्रपटगृहातील प्रक्षेपक, दीपगृह, शोधक दिवे, छायाचित्रणातील चमक दिवे, क्रीडांगणचे प्रदीपन इत्यादींसाठी करतात.
निऑन वायूचे दिवे : निऑन वायू हा विद्युत् संवाहक असल्याने या दिव्यांत दोन्ही टोकांना फक्त दोन संवाहक अग्रे बसवतात. त्यांसाठी टंगस्टन तंतूंची जरूर पडत नाही. या दिव्यासाठी एकंदर विद्युत् शक्ती फारच कमी पुरते, परंतु विद्युत् दाब मात्र ५,००० ते १०,००० व्होल्टपर्यंत लागतो. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे रोहित्र वापरावे लागते. हे दिवे वायू भरलेल्या इतर दिव्याप्रमाणेच कार्य करतात. यांचा प्रकाश अतिशय तेजस्वी परंतु गडद लाल रंगाचा असतो. त्यामुळे त्याचा उपयोग प्रामुख्याने लोकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आकर्षक जाहिरातींसाठी करतात. निऑनाबरोबर हीलियम, आर्गॉन इ. इतर वायू मिसळून, रंगीत नळ्या वापरून वा दोन्ही गोष्टी करून इतर रंगांचा प्रकाश मिळविता येतो. या दिव्याची नळी अगदी अरुंद असून ती २ मी. पर्यंत लांब असते. नळीला वळवून निरनिराळ्या अक्षरांचे व आकृतींचे आकार देतात. काही विशिष्ट प्रकारचे निऑनाचे दिवे घरातील टंगस्टन तंतूंच्या दिव्यासारखेच दिसतात व ते २३० व्होल्ट दाबावर चालतात पण त्यांपासून विशेष प्रकाश मिळत नाही. या दिव्यांच्या अग्रावर टोप्या असतात व त्या चमकतात. त्यामुळे देवापुढील दिवा, रात्रदिवा किंवा विद्युत् परीक्षित्राचा (टेस्टरचा) दिवा हे दिवे या प्रकारचे असतात. विद्युत् प्रवाह नेणाऱ्या संवाहकाच्या तपासणीसाठी अशा प्रकारचा दिवा बसवलेले परीक्षित्र वापरतात. वॉट शक्ती कमी असणारे निऑन मंदतेज दिवे दर्शक दिवे म्हणून अथवा इलेक्ट्रॉनीय मंडलाचा घटक म्हणून वापरतात. सामान्यपणे कमी दाब असलेला निऑन वायू असलेल्या फुग्यात दोन विद्युत् अग्रे बंदिस्त करून हे दिवे तयार करतात.
प्रज्योत दिवे : हा विद्युत् विसर्जन दिव्याचा एक प्रकार असून यात विद्युत् प्रवाह दोन विद्युत् अग्रांमधील वायूतून वा बाष्पातून वाहतो. अशा बहुतेक दिव्यांत वायूच्या दीप्तीने प्रकाश निर्माण होतो तर कार्बन प्रज्योत दिव्यांत प्रकाशाचा मोठा भाग हा एक वा दोन्ही विद्युत् अग्रे प्रदीप्त झाल्याने निर्माण होतो. प्रज्योतीचा रंग विद्युत् अग्राचे द्रव्य व सभोवतालचे वातावरण यांवर अवलंबून असतो.
विद्युत् प्रवाह वाहून नेणाऱ्या दोन कार्बन कांड्या अलग केल्यास त्यांच्यामधील मोकळ्या जागेतून तेजस्वी विसर्जन होते, असे सर हंफ्री डेव्ही यांनी १८०१ साली दाखविले होते. तप्त वाफ वर उसळून विसर्जनाला धनुष्याकृती आकार मिळतो व त्याला प्रज्योत (चाप) म्हणतात. अशा रीतीने पहिला विद्युत् विसर्जन दिवा तयार झाला. तथापि तेव्हा वीज व्यापारी तत्त्वावर उपलब्ध नसल्याने ही प्रज्योत केवळ वैज्ञानिक जिज्ञासाच ठरली.
टॉमस राइट यांनी प्रज्योत दिव्याचे एकस्व प्रथम मिळविले (१८०१). मात्र पहिला व्यापारी तत्त्वावरील प्रज्योत दिवा क्लीव्हलँड येथील प्रदर्शनात चार्ल्स एफ्. ब्रश यांनी १८७६ साली प्रथम मांडला. सुरुवातीच्या प्रज्योत दिव्यांत घन कार्बन कांड्या वापरीत व त्यांत प्रदीप्त कार्बनापासून प्रकाश मिळत असे (प्रज्योत प्रवाहापासून नव्हे). १८९८ साली कार्बन विद्युत् अग्रांमध्ये कॅल्शियम फ्ल्युओराइड समाविष्ट करण्यात आले आणि त्यामुळे ज्योतीचा प्रज्योत दिवा पुढे आला. ही प्रज्योत अतिशय तेजस्वी होती व तिच्यामुळे एक वॉट विजेपासून ३५ ल्यूमेन एवढा प्रकाश मिळत होता. तेव्हा उपलब्ध असलेल्या कार्बन तंतूच्या प्रदीप्त दिव्यापासून मिळणाऱ्या प्रकाशाच्या दहापट प्रकाश ज्योतीच्या प्रज्योतीपासून मिळाला होता. मात्र कार्बन कांड्या जळून गेल्याने प्रज्योतीची अचूक लांबी टिकवून ठेवण्यासाठी आपोआप कांड्या पुरविण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते. त्यामुळे हे दिवे रस्त्यावर लावण्यासाठी वापरायला गैरसोयीचे होते.
कार्बन प्रज्योत दिवे : या दिव्यांत कार्बनाच्या दोन कांड्यांची टोके एकमेकांना चिकटून ठेवून अग्रांना विद्युत् दाब दिल्यास त्यांच्यामधून मोठा विद्युत् प्रवाह वाहू लागतो. अशा वेळी ती टोके एकमेकांपासून थोडी अलग करताच त्यांच्यामधील फटींत प्रज्योत उत्पन्न होते व तिच्याद्वारे फटीतून विद्युत् प्रवाह अखंडपणे वाहू लागतो. या प्रज्योतीच्या उष्णतेने विद्युत् अग्रांमध्ये विद्युत् प्रदीपन चालू ठेवले जाते. यासाठी वापरलेल्या विद्युत् अग्रांत प्रज्योत चालू ठेवणाऱ्या व ज्वलनशील द्रव्यांचा समावेश केलेला असतो. त्यांचे प्रमाण प्रज्योतीपासून अपेक्षित प्रकाशावर अवलंबून असते. त्यामुळेच यामध्ये (१) कमी तीव्रतेचा प्रज्योत दिवा, (२) ज्योतीचा प्रज्योत दिवा व (३) तीव्रतर प्रज्योत दिवा असे तीन मुख्य प्रकार असून यांतील धनाग्रातील प्रदीप्त खळग्यातून बाहेर पडणाऱ्या कमी किंवा अधिक तीव्रतेच्या प्रज्योतीपासून तसेच तिच्या आसपासच्या तप्त प्रदीप्त आयनीभूत वायूपासून प्रकाश मिळतो. यातील १०० अँपिअरापर्यंतची कार्बन अग्रे तांब्याचा मुलामा दिलेली असतात, तर त्यापुढील विद्युत् प्रवाहासाठी ती शुद्ध कार्बनाचीच असतात. ती सरकविण्यासाठी यांत्रिक स्वरूपाची व्यवस्था केलेली असते. कार्बन कांडीच्या मध्यातील गाभ्यातून विविध द्रव्ये (उदा., कॅल्शियम, बेरियम, टिटॅनियम, स्ट्राँशियम) प्रज्योतीत समाविष्ट करतात. ही द्रव्ये बदलून प्रकाशाचा रंग व दिव्यापासून मिळणारे जंबुपार किरणांचे प्रमाण बदलता येते. प्रज्योत दिवे ७५ ते १०० व्होल्ट एकदिश विद्युत् दाबावर चालतात. ज्योतीचा प्रज्योत दिवा वितळजोडकामासाठी वापरतात. तो प्रत्यावर्ती प्रवाहावर पण चालतो. प्रज्योत चालू करण्यासाठी व विद्युत् अग्रांमधील अंतर बदलण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा पण वापरली जाते. तीव्रतर प्रज्योतीचा सरासरी तेजस्वीपणा दर चौ. सेंमी. १,२०,००० कँडल असतो व हिचे दिवे छायाचित्रण, चलच्चित्रपटाचे प्रक्षेपण आणि शोध दीप यांसाठी वापरले जातात. झेनॉन वायू भरलेले प्रज्योत दिवे तसेच सूर्यप्रकाश ज्योतीचे प्रज्योत दिवे अजूनही चलच्चित्रपटाच्या प्रक्षेपणासाठी व छायाचित्रणासाठी वापरले जातात. शिवाय नील प्रती काढणे व इतर छायाचित्रीय कामे, तसेच जंबुपार किरणांची निर्मिती यांकरिताही हे दिवे वापरतात. चिकित्साविज्ञान, सूक्ष्मदर्शकातील प्रकाशन व संशोधनासाठीचे खास प्रकाशन यांकरिताही हे दिवे वापरतात.
इतर खास दिवे : केवळ विद्युत् प्रकाशनासाठीच वापरण्यात येणाऱ्या वरील दिव्यांखेरीज खालील दिवे विशिष्ट कामांसाठी वापरतात. यांपैकी काही दिवे हे वरील दिव्यांचेच खास प्रकार आहेत. अपेक्षित कार्यानुसार या दिव्यांची रचना, आकार, आकारमान व अभिकल्प बनविलेला असतो.
हॅलोजन दिवा : टंगस्टन तंतूच्या प्रदीप्त दिव्यापासून जास्त प्रकाश मिळविण्यासाठी तंतूचे तापमान जास्त असावे लागते. तापमान विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढल्यास तंतूच्या काही रेणूंचे बाष्प बनते. हे बाष्प काचेवर साचत जाऊन काच कळी पडते व दिव्यापासून मिळणारा प्रकाश कमी होतो. तसेच तंतू बारीक झाल्याने रोध वाढून विद्युत् प्रवाह कमी होतो व यामुळेही दिव्याचा प्रकाश कमी होतो. असे बाष्प निघून जाऊन तंतू बारीक होऊन शेवटी तुटू शकतो व दिव्याचा कार्यकाल कमी होतो. या दोषावर उपाय म्हणून दिव्यात आयोडीन, ब्रोमीन, फ्ल्युओरीन, फ्लोरिन, ॲस्टटीन या हॅलोजन गटातील मूलद्रव्यांपैकी एक मूलद्रव्य अगदी थोड्या प्रमाणात समाविष्ट करतात. अशा दिव्यात टंगस्टनाचे बाष्प काचेकडे जाताना मधल्या भागात त्याचा विशिष्ट तापमानाला हॅलोजनाशी संयोग होतो. अशा रीतीने बनलेले टंगस्टन हॅलाइड तंतूकडे जाते. तंतूच्या उष्णतेने त्याचे विघटन होऊन वेगळे झालेले टंगस्टन परत तंतूवर बसते व मुक्त झालेल्या हॅलोजनाचा मग टंगस्टनाच्या उरलेल्या बाष्पाबरोबर संयोग होऊन ही प्रक्रिया चालू राहते. अशा रीतीने जास्त तापमानातही टंगस्टन तंतू कमकुवत होत नाही व प्रकाशाचे प्रमाणही वाढते. परिणामी कमी खर्चात जास्त प्रदीपनक्षमता साध्य होते.
हॅलोजन दिव्यांपैकी टंगस्टन–आयोडीन दिवे अधिक वापरले जाण्याची शक्यता आहे, कारण या दिव्यांत वरील प्रकारची प्रक्रिया जास्त सुलभपणे व प्रभावीपणे होते. अशा दिव्यातील तंतूचे तापमान २,०००० के तर बाहेरच्या काचेचे तापमान २५०० के असते. या प्रक्रियेतील टंगस्टनाची पुनर्निमिती, तंतूचे तापमान, आर्गॉन वायूचा दाब इत्यादींवर दिव्यातील आयोडिनाचे प्रमाण अवलंबून असते. टंगस्टनाच्या तंतूचे तापमान निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे असते. यामुळे जास्त तापमानाच्या ठिकाणी तंतू बारीक होऊन जळू शकतो. यामुळे दिव्याचा कार्यकाल कमी होतो. टंगस्टनाचे बाष्परूप अणू परत तंतूवर येण्यावर दिव्याचा कार्यकाल व प्रकाश देण्याची क्षमता अवलंबून असते. म्हणून या आवश्यकतेनुसार दिव्याचा आकार व आकारमान बदलता येतात. टंगस्टन-आयोडीन दिव्याचे आकारमान नेहमीच्या टंगस्टन तंतूच्या प्रदीप्त दिव्याच्या आकारमानाच्या फक्त १ टक्का एवढेच असते.
साधारणपणे टंगस्टनाचे वेटोळे सायुज्जित करून ते क्वॉर्ट्झाच्या नळीत मध्यभागी घालून टंगस्टन-आयोडीन दिवा तयार करतात. आतील वायूत ऊर्जा कमीत कमी खर्च होईल व दिव्याची कार्यक्षमता वाढेल अशा प्रकारे नळीचा व्यास ठरवितात. टंगस्टन-क्लोरिनाचे दिवे याहून अधिक कार्यक्षम व अधिक कार्यकाल असलेले असतील, अशी संशोधकांची अपेक्षा आहे.
अवरक्त किरण दिवा : अवरक्त किरण निर्माण करणारा हा खास प्रकारचा अनुस्फुरक दिवा आहे. आदान विद्युत् दाब व टंगस्टन तंतूचे तापमान यांवर किती प्रमाणात अवरक्त किरण निर्माण होतील ते अवलंबून असते. कमी विद्युत् दाब व तंतूचे २,२००० से. तापमान या स्थितीत यापासून मुख्यत्वे अवरक्त किरण मिळतात. अशा बहुतेक दिव्यांत ६५ ते ७० टक्के अवरक्त किरण मिळतात. या दिव्यांचा कार्यकाल सु. ५,००० तास असतो.
ज्या पृष्ठभागावर अवरक्त किरण पडतात, तो पृष्ठभाग तापतो मात्र या पृष्ठभागाभोवतीची हवा व वस्तू तापत नाहीत, हा अवरक्त किरण तापमानाचा मुख्य फायदा आहे. या दिव्यांचे अनेक उपयोग आहेत. पृष्ठभागाला दिलेला रंगलेप सुकविण्यासाठी यांचा उपयोग होतो. इतर पद्धतीपेक्षा या पद्धतीने रंगलेप सुकविण्याची क्रिया पुष्कळच लवकर होते. वस्तूच्या पृष्ठभागावरील आर्द्रता अथवा विद्रावक पदार्थ काढून टाकण्यासाठी हे दिवे उपयोक्त आहेत. येथे या दिव्यांमुळे बाष्पीभावनाची गती वाढते. पाळीव प्राण्यांचे गोठे व पाळीव पक्ष्यांची खुराडी उबदार राखणे, उपाहारगृहातील खाद्यपदार्थ गरम ठेवणे, थंड प्रदेशातील सार्वजनिक ठिकाणातील काही भाग उबदार ठेवणे, अंग शेकणे, तंबाखू, कागद व कापड सुकविणे, शाई लवकर सुकवून छपाईची गती वाढविणे वगैरे अनेक कामांसाठी हे दिवे वापरतात. अंग शेकताना मध्यम पातळीपर्यंत याचा माणसाला त्रास होत नाही पण उच्च पातळीवर या दिव्याने भाजू शकते. अर्थात ही उष्णता जाणवत असल्याने भाजण्याआधीच दिवा बंद करण्याची वा त्यापासून दूर जाण्याची दक्षता माणूस घेतो.
जंबुपार किरण दिवा : हा मोठ्या प्रमाणात जंबुपार किरण निर्माण करण्यासाठी तयार केलेला पाऱ्याच्या वाफेचा दिवा असून पाऱ्याच्या वाफेचे काही अनुस्फुरक दिवे दृश्य प्रकाशाबरोबरच जंबुपार किरणही देतात. तरंगलांबीनुसार यांचे पुढील तीन प्रकार होतात.
काळा प्रकाश देणाऱ्या दिव्यातून ३२० ते ४०० नॅनोमीटर (१ नॅनोमीटर = १०-९ मी.) तरंगलांबीचे जंबुपार किरण (यांनाच काळा प्रकाश म्हणतात) मिळतात. अनुस्फुरक किंवा पाऱ्याच्या बाष्पाच्या दिव्यांना गाळण्या लावून दृश्य प्रकाश शोषून घेतला जातो व मुख्यतः काळा प्रकाश उत्सर्जित होतो. ही जंबुपार किरणांची ऊर्जी रंगलेप, रंजक अथवा नैसर्गिक द्रव्यातील अनुस्फुरक रंगद्रव्यांचे उद्दीपन करण्यासाठी वापरतात. याचा उपयोग जाहिरातींत, सुशोभनामध्ये व रंगभूमीवरील नाट्यमय परिणाम साधण्यासाठी करतात. औद्योगिक तपासणी किंवा यंत्रावर बनविलेले सुटे भाग व वस्तू यांच्यातील दोष शोधून काढण्यासाठी व धोक्याच्या अदृश्य खुणा ओळखण्यासाठी या किरणांचा उपयोग होतो.
मध्यम जंबुपार किरणांची तरंगलांबी २८० ते ३२० मिमी, असून पाऱ्याचा बाष्पाच्या काही खास दिव्यांत हे किरण जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण होतात. या दिव्यांचा काचेचा फुगा खास प्रकारचा असतो. सूर्यदिवा हा पारा प्रज्योत विसर्जन दिव्यांचा खास प्रकार आहे. त्यात थोडा दृश्य प्रकाशही निर्माण होतो. हे दिवे मुख्यतः त्वचेला रक्तिमा (बदामी वा पिंगट रंग) आणण्यासाठी वापरतात. सूर्यप्रकाशानेही त्वचा अशी होते म्हणून याला सूर्यदिवा म्हणतात. मुडदुसावर उपचार करताना शरीरात ड जीवनसत्व निर्माण करण्यासाठी तसेच अनुस्फुरक निर्माण करण्यासाठीही हे दिवे वापरतात. प्रकाशरासायनिक क्रिया घडवून आणण्यासठी वापरण्यात येणाऱ्या अशा प्रकारच्या दिव्याला प्रकाशरासायनिक दिवा म्हणतात. बुरशी नष्ट करणे, धातूच्या पत्र्यांतील सूक्ष्म छिद्रांची तपासणी, तसेच अभियांत्रिकीय आरेखनांमधील कृष्णधवल छपाई इ. कामांसाठी हे जंबुपार दिवे वापरतात.
मुख्यत्वे दूरस्थ जंबुपार (२२० ते २८० मिमी. तरंगलांबीचे) किरण देणारे दिवे विद्युतीय दृष्टीने पाऱ्याच्या बाष्पाच्या अनुस्फुरक दिव्यांसारखे असतात. मात्र यात फॉस्फरांचा लेप नसतो. या किरणांनी विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजंतू मरतात. म्हणून कधीकधी हवेतील सूक्ष्मजंतू कमी करण्यासठी हे जंतुनाशक दिवे वापरतात. तसेच साठविलेल्या नाशवंत मालावरील व त्याच्या जवळपास असणारे आणि विशिष्ट ओषधांवरील ठराविक सूक्ष्मजीव मारण्यासाठी या दिव्यांचा उपयोग करतात.
लिटेक दिवे : (लाइट टेक्निकल कॉर्पोरेशनवरून आलेले संक्षिप्त रूपातील नाव). सुमारे दहा वर्षे कार्यकाल असणाऱ्या या दिव्यासाठी अतिशय कमी वीज लागते. टंगस्टन तंतूच्या प्रदीप्त दिव्याप्रमाणे दिसणाऱ्या या दिव्याच्या काचेच्या फुग्यावर आतून फॉस्फराचा लेप दिलेला असून त्यात पाऱ्याचे बाष्प भरलेले असते. फुग्यात एक दंडगोलाकार पोकळी थेटपर्यंत असून तिच्यात एक दंडगोलाकार आधारावर गुंडाळलेले चुंबकीय वेटोळे असते. फुग्याची खालची बाजू टोपीपेक्षा थोडी मोठी असून तिच्यात एक ट्रँझिस्टर मंडल असते. विजेच्या नेहमीच्या पुरवठ्याच्या कंप्रतेपासून रेडिओ कंप्रतेचा प्रवाह मिळविण्यासाठी या मंडलाचा उपयोग होतो. हा विद्युत् प्रवाह वेटोळ्यातून जाताच चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. त्यामुळे पाऱ्याच्या बाष्पाचे विच्छेदन होऊन फुग्यात जंबुपार किरण उत्पन्न होतात. हे किरण फॉस्फराच्या लेपावर आदळून प्रकाशनिर्मिती होते. साध्या दिव्यापासून दर वॉट विजेमागे १० ते १५ ल्यूमेन प्रकाश मिळत असेल, तर या दिव्यापासून दर वॉट विजेमागे ३६ ल्यूमेन इतका जास्त प्रकाश मिळतो. यात सुधारणा केल्यास त्यापासून दर वॉट विजेमागे ६० ते ७० ल्यूमेन प्रकाश मिळू शकेल, असे संशोधकांचे मत आहे. अशा प्रकारे या दिव्यांमुळे विजेच्या खर्चात ७५ टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकेल. आरंभक स्विच, रोधनिका इ. पूरक साहित्याची या दिव्याला गरज नसते व नेहमीच्या टंगस्टन तंतूच्या प्रदीप्त दिव्याच्या धारकातच हा दिवा बसविता येतो. यामुळे या दिव्यांचे वापर मोठ्या प्रमाणावर होईल, असा अंदाज आहे. या दिव्यामुळे विशेषतः पूरप्रदीपनाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल होऊ शकेल.
चमक दिवा : (स्फुर दिवा). हा वायु-विसर्जन दिवा छायाचित्रण करताना प्रकाशाची क्षणिक चमक निर्माण करण्यासाठी वापरतात. यामुळे अल्पकालीन व अतिशय प्रखर चमक (उजेड) निर्माण होते. झेनॉन वायू भरलेला चमक दिवा अधिक कार्यक्षम असतो. मात्र हा दिवा चमकल्यानंतर १० मायक्रोसेकंद (१ मायक्रोसेकंद = सेकंदाचा दशलक्षांश भाग) वा अधिक वेळ झेनॉन वायूत द्युती रहाते. त्यामुळे उच्च वेगाने सुटणाऱ्या बंदुकीच्या गोळ्यासारख्या जलद वस्तूचे छायाचित्रण करताना अडचण येते. काही दिव्यांत झिर्कोनियमासारखे अत्यंत ज्वलनशील द्रव्य वापरलेले असते.
बंदिस्त प्रकाशझोत दीप : मोटारगाडीत किंवा स्वयंचलित वाहनात हे दिवे वापरतात. यात विशेष प्रकारचा परावर्तक वापरलेला असतो. त्यामुळे यापासून वाहनाच्या अगदी जवळ अथवा समांतर पण लांबवर पडणारा प्रकाशझोत मिळतो. इतर काही परावर्तक आणि प्रक्षेपक दिव्यांची माहिती ‘प्रदीपन अभियंत्रिकी’ या नोंदीत दिलेली आहे.
प्रकाशाचे इतर विद्युत् उद्गम : रूढ अर्थाने यांना विद्युत् दिवे म्हणता येणार नाही मात्र विजेपासून प्रकाशनिर्मिती करणारे हे उद्गम असल्याने यांची माहिती थोडक्यात येथे दिली आहे. प्रकाश-उत्सर्जक द्विग्रस्थ आणि विद्युत् दीप्तिमान फलक हे असे उद्गम आहेत. यांच्यात विजेपासून सरळ प्रकाश निर्माण होतो मात्र यांच्यात फुगा, विद्युत् विसर्जन अथवा तंतू यांची आवश्यकता नसते परंतु यांचा प्रकाश मंद असल्याने खोली प्रकासमान करण्यासाठी त्यांचा उपयोग होत नाही.
प्रकाश–उत्सर्जक द्विप्रस्थ : (लाइट एमिटिंग डायोड एलईडी). हे उद्गम म्हणजे गॅलियम आर्सेनाइड किंवा इतर कोणत्या तरी घनरूप अर्धसंवाहकाच्या चकत्या असतात [निरोधक व धातू यांच्या विद्युत् संवाहकतांच्या दरम्याची संवाहकता असणाऱ्या द्र्यांना अर्धसंवाहक म्हणतात ⟶ अर्धसंवाहक]. या अर्धसंवाहक चकतीचे अणू विद्युत् ऊर्जेने उद्दीपित झाले की, तिच्यातून तांबूस, पिवळसर अथवा हिरवट प्रकाश बाहेर पडतो. याकरिता थोडीच वीज वापरली जाते व हे उद्गम अनिश्चित काळापर्यंत काम देतात. अक्षरे अथवा संख्या यांच्या आकृती तयार करण्यासठी यांचे गट करून ते संगणक, खिशात ठेवता येणारी गणकयंत्रे व अंकीय घड्याळे यांच्यात वापरतात.
विद्युत् दीप्तिमान फलक : विद्युत् संवाहक असा पारदर्शक लेप आणि धातूची पट्टी यांच्या दरम्यान फॉस्फरांचा थर अशी या उद्गमांची रचना असते. धातूची पट्टी व हा लेप यांच्यातून विद्युत् प्रवाह वाहतो तेव्हा विद्युत् क्षेत्रातील फॉस्फर उद्दीपित होऊन प्रकाश (द्युती) निर्माण होतो. खास प्रकारच्या फॉस्फरांमुळे यात विजेचे सरळ प्रकाशात रूपांतर होते. या फरकांत अगदी थोडीच वीज वापरली जाते तथापि अशा सर्वांत तेजस्वी फलकाचा प्रकाशही सर्वांत लहान अशा सामान्य दिव्याच्या प्रकाशापेक्षा कमी असतो. निशादीप म्हणून तसेच काही विमाने व मोटारगाड्या यांच्यातील उपकरणांवर असलेल्या दर्शक फलकांत हे फलक वापरतात.
विशिष्ट झिंक सल्फाइड फॉस्फरांचे विद्युत् क्षेत्राने उद्दीपन केल्यास त्यांच्यापासून प्रकाश उत्सर्जित होतो, असे झॉर्झ देस्यू यांनी शोधून काढले (१९३६) व या फलकाचा शोध लागला. मात्र या फलकांविषयीच्या संशोधनात त्यानंतर विशेष प्रगती झाली नाही. त्यामुळे १९६०-६५ च्या सुमारास या फलकाद्वारे १ वॉट विजेपासून १०-१२ ल्यूमेन एवढाच प्रकाश मिळत असे. या फलकापासून निळा, हिरवा, पिवळा किंवा गुलाबी प्रकाश मिळू शकतो. याच्या प्रकाशाचा रंग विद्युत् पुरवठ्याच्या कंप्रतेवर (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांच्या संख्येवर) आणि तेजस्विता कंप्रतेवर व विद्युत् दाबावरही अवलंबून असते.
पहा : एडिसन, टॉमस आल्वा दिवे दीपगृह प्रकाशक्षेपक प्रदीपन अभियांत्रिकी.
संदर्भ : 1. Cayless, M. A. Marsden, A. M. Lamps and Lighting, New York, 1983.
2. C. S. I. R The Wealth of India, Industrial Products, Part III, New Delhi, 1953.
3. Elanbaas, W. Light Sources, New York, 1972.
4. Henderson, S. T. Marsden, A. M. Lamps and Lightign, New York, 1972.
5. Hewitt, H. Vause, A. S., Eds., Lamps and Lighting, London, 1966.
6. O’Dea, W. T. The Social History of Lighting, New York, 1958.
ओक, वा. रा. वि. शं. ठाकूर, अ. ना.
“