विद्युत् मंडल परीक्षण : उघडे मंडल, लघुमंडल (मंडल संक्षेप) किंवा विद्युत् मंडलातील गळती निश्चित करण्यासाठी व या दोषाचे स्थान ठरविण्यासाठी विद्युत् मंडलांचे करण्यात येणारे परीक्षण. यात प्रामुख्याने विद्युत् मंडलाची अखंडता आणि गळती यांचा विचार करतात. विद्युत् मंडल परीक्षणासाठी विविध प्रकारच्या उपकरणांचा वापर केला जातो. मंडलाचा रोध मोजण्यासाठी ओहममापक अथवा व्हीट्स्टन सेतू [चार भुजायुक्त सेतु-मंडलाच्या चारही भुजा मुख्यत्वे रोधात्मक असून हे मंडल विद्युत् रोध मोजण्यासाठी वापरतात ⟶ व्हीट्सटन सेतु] या उपकरणाचा वापर करतात. वेगवेगळ्या मंडलांत मंडल रोधमूल्यानुसार दोषाचे स्थान अचूक रीतीने ठरविण्यासाठी व्हीट्स्टन सेतूचे वेगवेगळे प्रकार वापरतात.

विद्युत् मंडलाची अखंडता : विद्युत् मंडलाच्या अखंडतेच्या परीक्षणकरीता विजेचा चमक दिवा, गुंजक (गुंजारव करणारे विद्युत् चुंबकीय साधन) वगैरे साधनांचा उपयोग केला जातो. पुष्कळदा मंडलाकाडून विद्युत् प्रवाहाला होणारा रोध मोजून त्यावरूनच मंडलाची अखंडता अजमाविता येते. हा रोध मोजण्यासाठी वर उल्लेखिलेली उपकरणे उपयोगी पडतात.

मंडलातील गळती : निरोधन व तदनुषंगिक गळती ह्या विद्युत् मंडलाच्या दुसऱ्या गुणधर्माचे परीक्षण करताना विद्युत् प्रवाह वाहून नेणारी तार व निरोधक यांमधील फार मोठ्या रोधाचे मापन कतात. हा रोध मोजण्यासाठी वापरावयाच्या उपकरणास ‘मेगर’  म्हणतात. मेगरमध्ये १०० पासून ५,००० व्होल्ट दाबाच्या, हातांनी फिरविता येण्याजोग्या एकदिश जनित्राचा (यांत्रिक ऊर्जेपासून विद्युत् ऊर्जा निर्माण करणाऱ्या साधनाचा) वापर केलेला असतो आणि त्याच्या दर्शकावर रोधाचे मूल्य सरळ वाचता येते. जेवढा रोध जास्त तेवढे निरोधक चांगले समजले जातात. हा रोध जेव्हा विशिष्ट मर्यादेहून फारच कमी होतो, तेव्हा निरोधक सुस्थितीत नाही, असे मानतात. मंडल तारेच्या निरोधकाच्या या स्थितीलाच ‘गळती’  असे संबोधतात.

प्रेषण तार व केबल परीक्षण : प्रेषण तार अथवा केबलीचे परीक्षण करणे अगर दोषस्थान अचूक ठरविणे त्यामानाने अधिक गुंतागुंतीचे असते व त्यासाठी बऱ्याच वेळा वेगवेगळी स्वयंचलित आणि क्लिष्ट उपकरणे वापरावी लागतात. हे दोष पुढीलपैकी कोणत्याही एक वा अनेक प्रकारचे असू शकतात : (१) उघडे विद्युत् मंडल, (२) त्याच मंडलातील दुसऱ्या संवाहकाबरोबर होणारा मंडल संक्षेप (लघुमंडल), (३) संवाहक तार व जमीन यांतील मंडल संक्षेप म्हणजे भूयोग [⟶ भूयोजन], (४) गळती (विद्युत् मंडलाचा एक भाग ते दुसरे विद्युत् मंडल अथवा जमीन यांच्या दरम्यानचा मोठा रोध असलेला परिपथ) व (५) भिन्न मंडलांच्या तारांदरम्यानचा मंडल संक्षेप वा गळती.

मंडल संक्षेप : दोषाची जागा अचूकपणे ठरविण्याकरिता सर्व प्रथम एकूण तारांपैकी सदोष तार कोणती ते शोधून काढतात व त्यानंतर सदोष तारेतील दोषाची नेमकी, जागा निश्चित करतात. त्यासाठी प्रथम एक चमक दिवा, गुंजक, ओहममापक यांसारख्या अखंडता परीक्षणाच्या उपकरणांचाच उपयोग करतात व त्यानंतर फारच कमी रोधाच्या मंडलातील दोष परीक्षणासाठी मरे वलय (लूप), तर त्यामानाने जास्त रोध असलेल्या मंडलातील दोष परीक्षणासाठी व्हार्ली वलय या परीक्षणांचा उपयोग करतात (ही परीक्षण पद्धतींची नावे त्यांच्या संशोधकांच्या नावांवरून पडलेली आहेत). मरे वलय परीक्षणात केबलीमधील दोषाचे स्थान निश्चित करण्यासाठी व्हीट्स्टन सेतूचा एक प्रकार वापरतात. या सेतूच्या दोन भुजांची जागा एका वलयाने घेतलेली असते आणि परीक्षण करावयाची केबल व सदोष केबलीच्या दूरच्या टोकाला जोडलेली चांगली केबल यांचे हे वलय बनलेले असते. व्हार्ली वलय परीक्षणातही एक प्रकारचा व्हीट्स्टन सेतू वापरतात. या पद्धतीने परीक्षणबिंदू ते केबल वा संवाहक तारेतील दोषस्थानापर्यंतचे अंतर निश्चित करतात. [⟶ व्हीस्टस्टन सेतु].

उघडे मंडल : उघडे मंडल शोधताना प्रत्यावर्ती धारित्र (विद्युत् ऊर्जा साठविणारे साधन म्हणजे धारित्र) प्रकारचा सेतू वापरून सदोष तार व जमीन यांमधील विद्युत् धारिता, तसेच चांगली तार व जमीन यांमधील विद्युत् धारिता स्वतंत्रपणे मोजतात व त्यांच्या गुणोत्तरावरून दोषाची जागा निश्चित करता येते. प्रेषण तारेचा भूयोग हा दोष शोधण्यासाठी १,००० हर्ट्झ कंप्रतेचा (एक सेकंदातील आवर्तनांच्या संख्येला कंप्रता म्हणतात व ती हर्ट्झ या एककात देतात) प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशांनी वाहणारा) प्रवाह तारेतून खेळवतात व त्यात वेळी तारेवरून अथाव तिच्या जवळून गुंजक फिरवितात. केबलमधील दोषाच्या जागेवर गुंजक फिरवितात. केबलमधील दोषाच्या जागेवर गुंजक येताच एकदम वाजावयाचा थांबतो व त्यावरून लगेचच दोषाची जागा निश्चित करता येते.

पहा : विद्युत् दोष विद्युत् मंडल व्हीट्स्टन सेतु.

संदर्भ : 1. Braccio, M. Basic Electrical and Electronic Tests and Measurement, New York, 1979.

    2. Cooper, W. D. Electronic Instrumentation and Measurement Techniques, New York,1979.

बापट, प्र. रा. कोळेकर, श. वा.