सीमेन्स घराणे : औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेले प्रसिद्घ घराणे. विविध प्रकारच्या विद्युत् सामग्रीचे उत्पादन करणारी सीमेन्स एजी नावाची कंपनी १९६६ मध्ये स्थापन झाली. सीमेन्स अँड हाल्स्के एजी (स्था. १८४७), सीमेन्स-शुकेर्टवेर्के (स्था. १९०३) आणि सीमेन्स-रेइनिगर-वेर्के एजी ( स्था. १९३२) या कंपन्यांच्या विलीनीकरणातून सीमेन्स एजी कंपनी स्थापन झाली. एकशे नव्वदाहून अधिक देशांमध्ये या कंपनीचे कार्य चालू आहे. वीजनिर्मिती, प्रेषण व परिवहन, विद्युत् प्रकाशयोजन, विद्युतीय घटक, संदेशवहन प्रणाली आणि वैद्यकीय अभियांत्रिकी यांसारख्या अगदी भिन्न व व्यापक क्षेत्रांमधील उत्पादने व सेवा पुरविणे ही कामे सदर कंपनी करते. संशोधन व विकास या कामांसाठी कंपनीने प्रचंड गुंतवणूक केली आहे. सर्वाधिक एकस्वे ( पेटंट ) असलेली जगातील ही एक मोठी कंपनी आहे. टेलिग्राफ कन्स्ट्रक्शन फर्म ऑफ सीमेन्स अँड हाल्स्के या इंग्रजी अर्थाचे नाव असलेली मूळ जर्मन कंपनी बर्लिन येथे व्हेर्नर फोन सीमेन्स (१८१६— ९२), त्यांचे चुलतभाऊ योहान गेओर्ख सीमेन्स (१८०५— ७९) आणि योहान गेओर्ख हाल्स्के (१८१४— ९०) या तिघांनी १८४७ मध्ये स्थापन केली होती. अल्पावधीतच या मूळ कंपनीने जर्मनीमध्ये सर्वत्र तारायंत्रविद्येसाठीच्या केबली टाकण्याच्या कामाचा मोठा विस्तार केला. नंतर सेंट पीट्सबर्ग (१८५५) व लंडन (१८५८) येथे या कंपनीच्या शाखा स्थापन झाल्या. लंडन येथील शाखेचे प्रमुख व्हेर्नर यांचे भाऊ विल्यम सीमेन्स (१८२३— ८३) होते. कंपनीचा विकास व विस्तार होत गेला आणि तेथे महोत्पादन सुरू झाले. कंपनीचा विस्तार करण्यात रस नसलेल्या हाल्स्के यांनी १८६७ मध्ये कंपनीतून अंग काढून घेतले. यामुळे उरलेले चार सीमेन्स बंधू व त्यांचे वारस यांच्याकडे कंपनी चालविण्याचे व तिचे नियंत्रण करण्याचे काम आले.

सदर कंपनी औद्योगिक क्रांतीमुळे होत गेलेल्या प्रगतीमध्ये गुंतत गेली. उदा., विद्युत् जनित्रे (डायनामो), केबली, दूरध्वनी, विद्युत् शक्ती ( ऊर्जा ) निर्मिती, विद्युत् प्रकाशयोजन इत्यादींशी संबंधित असलेली कामे कंपनी करु लागली. १८९० मध्ये सदर कंपनी मर्यादित भागीदारी कंपनी झाली. तिचे वरील भागीदार व व्हेर्नर यांचे बंधू कार्ल हाइन्रिख सीमेन्स आणि आर्नोल्ड व व्हिल्हेल्म सीमेन्स (व्हेर्नर यांचे पुत्र) या कंपनीचे भागीदार झाले. १८९७ मध्ये सीमेन्स अँड हाल्स्के एजी ही मर्यादित-दायित्व (लिमिटेड लायबिलिटी) कंपनी झाली.

मूळ कंपनीने आपली विद्युत् (शक्ती) अभियांत्रिकीची कामे सीमेन्सशुकेर्टवेर्के कंपनीकडे सोपविली. ही कंपनी न्यूरेंबर्ग येथील शुकेर्टवेर्के अँड कंपनीच्या विलिनीकरणातून बनली होती. १९१९ पासून या दोन्ही कंपन्यांच्या अध्यक्षपदी सामान्यपणे एकच अधिकारी असे आणि हा अधिकारी नेहमीच सीमेन्स कुटुंबातील असे. सात वर्षांच्या सहकार्यानंतर १९३२ मध्ये रेइनिगर गेबेर्ट अँड शॉल एर्लांडर ( फर्म ) ही कंपनी विलीन होऊन सीमेन्स-रेइनिगर-वेर्के एजी ही कंपनी तयार झाली. ही कंपनी वैद्यकीय निदान व चिकित्सा यांविषयीची सामग्री, विशेषतः क्ष-किरण यंत्रे व इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक तयार करण्याचे काम करीत असे.

सदर सर्व कंपन्यांना एकत्रितपणे हाऊस ऑफ सीमेन्स ( सीमेन्स उद्योग) म्हणतात. या कंपन्यांचा विस्तार थर्ड राइशच्या काळात (१९३३— ४५)मोठ्या प्रमाणात झाला. त्यांची सर्व संयंत्रे दुसऱ्या महायुद्घाच्या काळात पूर्ण क्षमतेने कार्यरत होती. १९४३-४४ च्या दरम्यान विमानांचे हल्ले चुकविण्यासाठी ही संयंत्रे सर्व देशभर विखरुन ठेवली होती. दुसरे महायुद्घ संपले तेव्हा हेर्मान फोन सीमेन्स (१८८५— १९८६) हे या उद्योगाचे प्रमुख होते. त्यांना अल्पकाळ स्थानबद्घ केले होते (१९४६— ४८).अंकित देशांमधील गुलामांची नोकरीसाठी भरती करणे आणि आउशविट्झ येथील वंशविच्छेदक छावणी व बुखेनवाल्डची छळछावणी उभारुन त्या चालविणे, यांसारखे आरोप कंपनीच्या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आले. रशियाने व्यापलेल्या जर्मनीच्या प्रदेशातील सदर कंपनीने आपली संयंत्रांची व सामग्रीची ९० टक्के मालकी काढून घेतली होती. शीतयुद्घाच्या काळात प. जर्मनीच्या आर्थिक फेररचनेमध्ये पाश्चात्त्य शक्तींचे हितसंबंध गुंतलेले होते, तोपर्यंत या शक्तींनीही काही सुविधा हिरावून घेऊन नष्ट केल्या होत्या. १९५०— ६० या दशकात सीमेन्स घराण्याने प. जर्मनीतील आपल्या मूळ कार्यक्षेत्रातून सावकाशपणे यूरोपमधील व परदेशांतील विद्युतीय बाजारपेठांत आपल्या भागीदारीचा विस्तार केला. यामुळे १९६०— ७० या काळात हा जगातील एक सर्वांत मोठा विद्युतीय उद्योग बनला.

सर्व कंपन्यांचे १९६६ मध्ये सीमेन्स एजी या नवीन कंपनीत विलीनीकरण झाले. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी या कंपनीची उत्पादने निदानात्मक प्रतिमादर्शन प्रणाली, भ्रमण दूरध्वनी व श्रवण साहाय्यक साधने, तसेच द्रव्यमान संक्रमण प्रणाली, जमिनीवरील हालचालींसाठीचे रडार यांसारख्या व्यापक क्षेत्रांतील आहेत. शिवाय कंपनीने दूरसंदेशवहन जाळ्यांचे अभिकल्प (आराखडे) तयार करून ही जाळी उभारली आणि त्यांचा वापरही केला. विविध प्रकारची वीजनिर्मिती संयंत्रे, दूरध्वनी यंत्रसंच व यंत्रसामग्री, संगणक प्रदत्त प्रणाली, सूक्ष्मतरंग प्रयुक्त्या, तारायंत्रविद्या, संकेतन प्रणाली आणि विद्युत् अधिष्ठापने उभारणे यांसारख्या क्षेत्रांतील उत्पादने, तसेच विक्री व नंतरची सेवा यांसाठी विविध देशांतील कंपनीची केंद्रे कार्यरत आहेत. सदर कंपनीच्या दृष्टीने महत्त्वाच्या सीमेन्स कुटुंबियांची माहिती पुढे थोडक्यात दिली आहे.

सीमेन्स, व्हेर्नर फोन : (१३ डिसेंबर १८१६— ६ डिसेंबर १८९२). यांचे पूर्ण नाव एर्न्स्ट व्हेर्नर फोन सीमेन्स. जर्मन विद्युत् उद्योजक व तंत्रज्ञ. दूरवर्ती तारायंत्रविद्या उद्योग विकसित करण्यात यांचे कार्य महत्त्वाचे आहे.

व्हेर्नर यांचा जन्म हॅनोव्हर जवळील लेंथे (प्रशिया, आता जर्मनी) येथे झाला. ल्युबेक येथील ग्रामर स्कूलमधील शिक्षण पूर्ण झाल्यावर सतराव्या वर्षी ते प्रशियन तोफखाना दलात दाखल झाले. तेथे त्यांना अभियांत्रिकीचे प्रशिक्षण घ्यायचे होते. कारण हे प्रशिक्षण वडील देऊ शकत नव्हते. सहकारी अभियंत्यांमधील द्वंद्वयुद्घातील सहभागामुळे त्यांना अल्पकाळ मॅग्डेबर्गला तुरुंगात रहावे लागले. तुरुंगात असताना त्यांनी आपल्या कोठडीत रसायनशास्त्राचे प्रयोग केले. या संशोधनातून विद्युत् विलेपनाच्या प्रक्रियेचा त्यांनी शोध लावला (१८४२) हा त्यांचा पहिला शोध होता. १८४१ मध्ये त्यांची बर्लिन येथील तोफखाना दलाच्या कार्यशाळेत नेमणूक झाली. यामुळे त्यांना संशोधन करण्याची नामी संधी मिळाल्याने त्यांच्या जीवनकार्याला दिशा मिळाली.

सर चार्ल्स व्हीट्स्टन यांनी १८३७ मध्ये तारायंत्रविद्येचा शोध लावला होता. या तारायंत्राची आधीची प्रतिकृती व्हेर्नर यांच्या पाहण्यात आली, तेव्हा तारायंत्राचे आंतरराष्ट्रीय संदेशवहनातील महत्त्व त्यांच्या लगेचच लक्षात आले. नंतर याविषयी अधिक संशोधन करून त्यांनी त्यात सुधारणा केल्या. अशा रीतीने ते तारायंत्रविद्येतील तज्ञ झाले. म्हणून त्यांना १८४७ मध्ये प्रशियन सैन्यासाठी तारायंत्रासाठी भूमिगत केबली टाकण्याचे काम मिळाले व त्यांनी हे काम पूर्ण केले. याच सुमारास योहान गेओर्ख हाल्स्के या तरुण यंत्रज्ञाला त्यांनी बर्लिनमध्ये आपल्याबरोबर तारायंत्रांचा कारखाना काढण्यासाठी उद्युक्त केले. नंतर व्हेर्नर यांनी बर्लिन ते फ्रँकफुर्टच्या नॅशनल ॲसेंब्लीपर्यंत शासकीय कामासाठी भूमिगत केबली टाकल्या. शिवाय जर्मनीतील इतर भागांत टाकलेल्या अशा केबलींच्या देखभालीचे काम केले. प्रशियन सैन्यात ते १८३७ मध्ये अधिकारी म्हणून दाखल झाले होते. मात्र तारायंत्रांचे उत्पादन करण्यासाठी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला (१८४९).


टेलिग्राफ बाउअनस्टाट सीमेन्स अँड हाल्स्के कंपनीची जलद भरभराट झाली. तिने तारायंत्रविद्येशी निगडित असे मोठे प्रकल्प राबविले. विजेच्या नवीन उपयोगांविषयीचे शोध लागल्याने विद्युत् क्षेत्रात उद्योगाचा विस्तार झाला. व्हेर्नर व त्यांचे बंधू कार्ल हाइन्रिख (१८२९— १९०६) यांनी पीट्सबर्ग, व्हिएन्ना, पॅरिस व लंडन येथे उपकारखाने स्थापन केले. यातून चार्लटन (केंट) येथे सीमेन्स ब्रदर्स कंपनी निर्माण झाली. व्हेर्नर यांच्या सततच्या संशोधनातून विद्युत् अभियांत्रिकीमध्ये विविध शोध व शोधांचे नवे उपयोग माहीत झाले. तसेच अनेक नवी उत्पादने निर्माण होऊन उद्योगात वाढ झाली. १८४७ मध्ये व्हेर्नर यांनी ⇨ गटापर्चाचा (विशिष्ट झाडाच्या चिकाचा ) तारायंत्र केबलींचे आर्द्रतेपासून विद्युत् निरोधन करण्यासाठी उपयोग केला. त्याचा नंतर कमी विद्युत् दाबाच्या केबलींच्या विद्युत् निरोधनासाठी व्यापक प्रमाणावर उपयोग होऊ लागला. यामुळे भूमिगत व डोव्हर ते कॅलेपर्यंत पाण्यातून केबल टाकणे शक्य झाले (१८५०). त्यांच्या मार्गदर्शनाखाली सीमेन्स अँड हाल्स्के कंपनीने भूमध्य सागरांतर्गत आणि यूरोप ते भारत दरम्यानच्या केबली टाकल्या. १८६६ मध्ये त्यांनी स्वयंउत्तेजित विद्युत् जनित्राचा शोध लावला. हे विद्युत् जनित्र त्यातील ऊर्जेसाठी विद्युत् चुंबकातील अवशिष्ट चुंबकत्वाने गतिमान होऊ शकले. अशा प्रकारे साध्या पोलादी चुंबकाच्या जागी विद्युत् चुंबकाचा वापर होऊ लागला. यामुळे विद्युत् उद्योगाला व्यापाराचे स्वरुप प्राप्त झाले. त्यांच्या प्रयत्नातून बर्लिनच्या उपनगरात १८८१ मध्ये जगातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे उभारली गेली. त्यांच्यावरील आत्मचरित्रपर लेखनाचा पर्सनल रिफ्लेक्शन्स हा इंग्रजी अनुवाद १८९३ मध्ये प्रसिद्घ झाला. तर त्यांच्या लेखांचा सायंटिफिक अँड टेक्निकल पेपर्स हा अनुवाद १८९०— ९५ दरम्यान प्रसिद्घ झाला.

व्हेर्नर यांची एकूण औद्योगिक कामगिरी पाहून जर्मन सरकारने त्यांना उमरावपद दिले. त्यामुळे त्यांच्या नावात फोन हा किताब सदृश शब्द लावण्यात येऊ लागला. शार्‌लॉटबुर्ग (बर्लिन, जर्मनी) येथे व्हेर्नर यांचे निधन झाले.

सीमेन्स, सर विल्यम : (४ एप्रिल १८२३— १९ नोव्हेंबर १८८३). हे इंग्रज अभियंते व संशोधक असून त्यांनी पोलादनिर्मिती व तारायंत्र उद्योग यांमध्ये महत्त्वाचे संशोधन केले. त्यांचे मूळ नाव कार्ल व्हिल्हेल्म सीमेन्स आणि इंग्रजीतील पूर्ण नाव चार्ल्स विल्यम सीमेन्स होते.

विल्यम यांचा जन्म जर्मनीत लेंथे येथे झाला. खाजगी शिक्षणानंतर विल्यम यांना ल्युबेक येथील व्यापारी शाळेत घातले. यामुळे ते आपल्या काकांच्या बँकेत नोकरी करु शकणार होते. मात्र त्यांचे थोरले बंधू व्हेर्नर यांना विल्यम यांनी अभियांत्रिकीय शिक्षण घेणे अधिक उचित होईल, असे वाटले. म्हणून विल्यम यांना मॅग्डेबर्ग येथील तंत्रिका शाळेत तीन वर्षांसाठी पाठविण्यात आले. नंतर काकांच्या आर्थिक मदतीने विल्यम यांनी गटिंगेन विद्यापीठात रसायनशास्त्र, भौतिकी व गणित या विषयांचा वर्षभर अभ्यास केला.

व्हेर्नर यांच्या प्रभावामुळे विल्यम यांनी अभियांत्रिकी उद्योगात बिनपगारी उमेदवार विद्यार्थी म्हणून काम केले. मॅग्डेबर्गला असताना विल्यम यांनी वाफेचे एंजिन तयार केले. तेथे त्यांनी व्हेर्नर यांची विद्युत् विलेपन प्रक्रिया विकण्याचा निर्धार केला. यात हँबर्गमध्ये माफक यश मिळाल्यावर विल्यम हे मार्च १८४३ मध्ये अल्प पैशात लंडनमध्ये दाखल झाले. त्यांनी विद्युत् विलेपन प्रक्रिया बर्मिंगहॅमच्या हेन्री एल्किंग्टन्स यांना १,६०० पौंडांना विकली. आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते जर्मनीत परत आले आणि फेब्रुवारी १८४४ मध्ये आणखी काही शोध विकण्यासाठी ते लंडनला गेले.

इंग्लंडमधील एकस्वाविषयीचे कायदे उत्साहवर्धक असल्याचे लक्षात आल्यावर विल्यम यांनी तेथे स्थायिक होण्याचा निर्णय धीटपणे घेतला. तेथे उपजीविका भागविणे हे अवघड काम आहे, असे त्यांच्या लक्षात आले. तथापि १८५१ मध्ये त्यांनी जलमापकाचा शोध लावला. या व अन्य एकस्वांमधून त्यांना मोठे स्वामित्व धन मिळू लागले. यामुळे लंडन येथे कार्यालय उभारणे शक्य होईल, असे त्यांना वाटू लागले. नंतर त्यांनी केन्सिंग्टन येथे एक घर विकत घेतले आणि त्यात ते आपले धाकटे बंधू कार्ल हाइन्रिख व (आउगुस्ट) फ्रीड्रिख (१८२६— १९०४) यांच्यासह राहू लागले. ग्लासगो विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांच्या भगिनी ॲन गॉर्डन यांच्याशी विल्यम यांचा विवाह झाला (१८५९). तोपर्यंत तिघे भाऊ एकत्र राहत होते. त्याच वर्षी विल्यम यांना ब्रिटनचे नागरिकत्व मिळाले.

विल्यम व फ्रीड्रिख या सीमेन्स बंधूंनी औद्योगिक प्रक्रियांमध्ये उष्णता पुनरुद्‌भवन तत्त्व वापरण्याचे प्रयत्न १८४७ सालीच सुरू केले होते. या तत्त्वानुसार अवशिष्ट (वाया जाणाऱ्या) वायूंबरोबर निसटून जाणाऱ्या उष्णतेचा उपयोग भट्टीला पुरविण्यात येणारी हवा गरम करण्यासाठी करण्यात येणार होता. यामुळे प्रक्रियेची कार्यक्षमता वाढणार होती. आपल्या उघड्या चुल्याच्या भट्टीच्या एकस्वामध्ये उष्णता पुनरुद्‌भवन तत्त्व विल्यम यांनी १८६१ मध्ये वापरले होते. कमी प्रतीचा दगडी कोळसा भट्टीच्या बाहेर जाळून निर्माण होणाऱ्या वायूने ही भट्टी तापविली जाते. या शोधाचा उपयोग प्रथम काचनिर्मितीत झाला. नंतर तो पोलादनिर्मितीत व्यापकपणे वापरण्यात आला आणि शेवटी तो १८५६ च्या बेसेमर प्रक्रियेत वापरला [⟶ पोलाद ]. या कर्तबगारीमुळे विल्यम यांना इन्स्टिट्यूशन ऑफ सिव्हिल एंजिनिअर्स या संस्थेचे सदस्यत्व मिळून त्यांच्या शोधाला मान्यताही मिळाली. तसेच यामुळे त्यांची लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून १८६२ मध्ये निवड झाली. व्यवसायातील भावी नफा आणि स्वामित्व धन लक्षात घेऊन त्यांनी लँडोअर (साऊथ वेल्स) येथे स्वतःचा पोलादनिर्मिती कारखाना १८६९ मध्ये सुरू केला. काही वर्षे या कारखान्याची भरभराट झाल्यावर १८८०— ९० या काळात मात्र या कारखान्याला तोटा झाला.


दरम्यानच्या काळात विल्यम यांनी तारायंत्रविद्येच्या व्यवसायात आणखी संपत्ती व कीर्ती मिळविली होती. १८५० — ५८ दरम्यान विल्यम यांनी आपल्या बंधूंच्या बर्लिनमधील सीमेन्स अँड हाल्स्के कंपनीचे अभिकर्ता (एजंट) म्हणून काम केले. १८५८ मध्ये विल्यम लंडनमधील दुसऱ्या एका कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार झाले. याच नावाने स्थापन झालेली ही कंपनी केबल कंपन्यांसाठी विद्युतीय तपासणी व सामग्रीनिर्मिती ही कामे करीत असे. या ब्रिटीश कंपनीने १८७४ मध्ये रीओ दे जानेरो ते माँटेव्हिडिओपर्यंतची केबल, तर १८७५ मध्ये ब्रिटन ते अमेरिकेपर्यंतची थेट अटलांटिकपार केबल टाकण्याचे काम केले. केबल टाकणाऱ्या पहिल्या फॅराडे या जहाजाचा अभिकल्प त्यांनी तयार केला होता. ते जहाज १८७४ मध्ये वापरायला सुरूवात झाली. नंतर विल्यम यांनी विद्युत् प्रकाशयोजना आणि विद्युत् कर्षण यांविषयीचे काम केले. त्यांनी प्रज्योत दिव्यांमध्ये (आर्क लाइटमध्ये) सुधारणा केल्या आणि ते दिवे ब्रिटीश म्यूझीयम व इतरत्र स्थापित केले. मृत्यूच्या काही महिने अगोदर त्यांनी नॉर्दर्न आयर्लंडमधील पोर्टरश विद्युत् रेल्वे सुरू केली. विल्यम यांनी व्यावसायिक जीवनात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. ते विविध व्यावसायिक संघटनांचे अध्यक्ष होते. उदा., ब्रिटीश ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स. त्यांना विविध विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या, तसेच परदेशातील किताब व मानसन्मान मिळाले होते. ब्रिटनमधील विद्युतीकरणात विल्यम यांचा मोठा सहभाग होता आणि या कार्यासाठी त्यांना ब्रिटीश सरकारने १८८३ मध्ये ‘सर’ हा किताब दिला. त्यांनी लिहिलेल्या लेखांचे संपादन ई. एफ्. बँबर यांनी केले असून ते कलेक्टेड वर्क्स या शीर्षकाने तीन खंडांत १८८९ मध्ये प्रसिद्घ झाले. सर विल्यम यांचे लंडन येथे निधन झाले.

सीमेन्स, फ्रीड्रिख : (८ डिसेंबर १८२६— २४ मे १९०४). व्हेर्नर यांच्या या धाकटया बंधूचा जन्म ल्यूबेकजवळील मेंटझेनडॉर्फ येथे झाला. त्यांनी १८४८ पासून आपले बंधू विल्यम यांच्याबरोबर इंग्लंडमध्ये काम सुरू केले. उष्णता पुनरुद्‌भवन भट्टीची कल्पना त्यांची होती. तिच्यावर त्यांनी मोलाचे संशोधन केले. त्यांचे दुसरे बंधू हान्स यांचे १८६७ मध्ये निधन झाले. यामुळे हान्स यांनी स्थापन केलेला ड्रेझ्डेन (जर्मनी) येथील काच उद्योग फ्रीड्रिख यांनी चालू ठेवला. फ्रीड्रिख यांनी काचनिर्मितीच्या तंत्रविद्येत मोठी कामगिरी केली. त्यांनी तापन व प्रकाशन करण्यासाठी वायू वापरण्याची सामग्री विकसित केली. जर्मनीत तसेच व्हिएन्ना व लंडन येथे आणखी काही कारखाने उभारले. त्यांचा पोलाद उद्योगातही सक्रिय सहभाग होता. ड्रेझ्डेन येथे त्यांचे निधन झाले.

सीमेन्स, कार्ल फ्रीड्रिख फोन : (५ सप्टेंबर १८७२— ९ जुलै १९४१). व्हेर्नर यांच्या या मुलाचा जन्म शार्‌लॉटनबुर्ग येथे झाला. सीमेन्स उद्योगात त्यांनी अनेक वरिष्ठ पदांवर काम केले. १९०२— ०८ या काळात ते लंडन विभागाचे प्रमुख होते. सीमेन्स-शुकेर्टवेर्के या जर्मनीतील कंपनीचे ते १९१२ मध्ये संचालक झाले. त्यांनी या कंपनीचा विस्तार केला. त्यांनी दूरध्वनिविद्या व विद्युत् रसायनशास्त्र या शाखा वेगळ्या केल्या. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची कामे हाताळण्यासाठी सीमेन्स-बाउयुनियन कंपनी स्थापन केली. उपमार्ग, शक्तिसंयंत्रे व जलविद्युतीय अधिष्ठापने यांसाठी या शाखेने काम केले. या कंपनीचे मुख्यालय बर्लिनजवळ सीमेन्सस्टाड हे होते. ते जवळजवळ एक शहरच बनले होते. कारण दुसरे महायुद्घ सुरू झाले तेव्हा तेथे सु. एक लाख कर्मचारी होते. या महायुद्घानंतर या कंपनीने प. जर्मनीच्या आर्थिक पुनरुत्थानात मोलाचे काम केले. इलेक्ट्रॉनीय सामग्री आणि इतर विविध प्रकारची उत्पादने पुरविण्यात ही कंपनी आघाडीवर होती. कार्ल यांचे हीन्डेन्डोर्फ येथे निधन झाले.

इतर सीमेन्स कुटुंबीय : व्हेर्नर यांचे सहावे बंधू कार्ल हाइन्रिख (१८२९— १९०६) हे सर्वाधिक महत्त्वाचे होते. आयुष्यभर सीमेन्स उद्योगाच्या सेंट पीट्सबर्ग शाखेशी ते निगडित होते. अर्थात अधूनमधून ते इंग्लंडला जाऊन विल्यम यांच्याबरोबर काम करीत असत.

व्हेर्नर यांचे बंधू हान्स (१८१८— ६७)यांनी ड्रेझ्डेन येथे मोठ्या प्रमाणावर काच उद्योग उभारला होता. तेथे त्यांनी विल्यम आणि फ्रीड्रिख यांनी तयार केलेल्या पुनरुद्‌भवन भट्टीचा उपयोग केला. व्हेर्नर यांचे वॉल्टर (१८३२— ६४)व ओटो (१८३६— ७१) हे बंधू तरुण असतानाच वारले. अर्थात त्यांनी कुटुंबाच्या उद्योगात काम केले.

विल्यम यांचे इंग्लंडमध्ये निधन झाल्यावर आलेक्झांडर सीमेन्स (१८४७— १९२८) या त्यांच्या काहीशा दूरच्या चुलत भावाने त्यांचा उद्योग पुढे चालू ठेवला. पहिले महायुद्घ सुरू झाल्यावर त्यांनी या पदावर काम केले. विल्यम यांच्याप्रमाणे तेही ब्रिटीश नागरिक झाले. व्हेर्नर यांच्या उत्तर आयुष्यात आणि त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ त्यांचे चुलतभाऊ व डॉइश बँकेचे संचालक गेओर्ख फोन सीमेन्स यांनी सीमेन्स उद्योगाला आर्थिक दृष्ट्या मार्गदर्शन केले. व्हेर्नर यांच्या निधनानंतर आर्नोल्ड (१८५३— १९१८) व व्हिल्हेल्म (१८५५— १९१९) या त्यांच्या पुत्रांनी या उद्योगाचा कारभार सांभाळला. या दोघांनंतर त्यांचे सावत्र बंधू कार्ल फ्रीड्रिख यांनी दुसऱ्या महायुद्घापर्यंत उद्योगाचा कारभार पाहिला. त्यांनी आपले पुतणे व आर्नोल्ड यांचे पुत्र हेर्मान यांना आपले वारस नेमले. दुसऱ्या महायुद्घाच्या समाप्तीच्या काळातील परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने १९४५ मध्ये सीमेन्स उद्योगाची फेररचना करण्यात आली. त्यावेळी उद्योगाचे नेतृत्व एर्न्स्ट आल्ब्रेक्ट या कार्ल फ्रीड्रिख यांच्या मुलाकडे सोपविण्यात आले.

संदर्भ : 1. Kirbt, Richard S. and others, Engineering in History, 1956.

2. Siemens, Georg, History of House of Siemens, 1957.

भिडे, शं. गो.