आ. १ साधी परिनलिका : (१) पुठ्ठ्यासारख्या जाड कागदाची नळी, (२) जाड कागदाची तबकडी, (३) विद्युत् निरोधक वेष्टन असलेल्या संवाहकाचे वेटोळे, (४) प्लॅस्टिकचे निरोधक वेष्टन, (५-५) वेटोळ्याची टोके.परिनलिका : (सोलेनॉइड). लांबट नळीसारखे व्यवस्थित गुंडाळलेले संवाहक तारेचे वेटोळे. असे वेटोळे साधारणत: विद्युत् चुंबकाला उत्तेजित करण्यासाठी बसवितात, अशा वेटोळ्याची लांबी त्याच्या व्यासाच्या २० पटींपेक्षा जास्त ठेवतात. त्यामुळे त्या वेटोळ्यातून विद्युत् प्रवाह जात असताना ते फार तापत नाही व चुंबकीय क्षेत्र एकविध (एकसारखे) मिळते. अशा वेटोळ्यातून एकदिश विद्युत् प्रवाह पाठवला, तर त्याला चिरचुंबकाचे (कायम चुंबकाचे) गुण प्राप्त होतात म्हणजे प्रवाहाच्या दिशेप्रमाणे वेटोळ्याचे एक टोक चुंबकीय उत्तर ध्रुवाप्रमाणे व दुसरे टोक चुंबकीय दक्षिण ध्रुवाप्रमाणे काम करते. अशा साध्या परिनलिकेची रचना आ. १ मध्ये दाखविली आहे. अशा परिनलिकेच्या तोंडात सैल बसणारा लोखंडी दांडा थोडा आत सरकवून ठेवलेला असला व परिनलिकेच्या वेटोळ्यातून विद्युत् प्रवाह पाठवला, तर सबंध लोखंडी दांडा परिनलिकेच्या आत ओढला जातो. विद्युत् प्रवाह एकदिश अथवा प्रत्यावर्ती (उलटसुलट दिशेने वाहणारा) असला, तरी परिनलिकेची चुंबक ओढदिशा कायमच राहते परंतु प्रत्यावर्ती प्रवाह असला, तर ओढीचा जोर प्रवाहाच्या कंप्रतेच्या (एका सेकंदात होणाऱ्या आवर्तनांच्या संख्येच्या) दुप्पट कंप्रतेने कमीजास्त होतो. त्याशिवाय लोखंडी भागात आवर्त प्रवाह (बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे संवाहक द्रव्यात निर्माण होणारे प्रवाह) उत्पन्न होतात व त्यामुळे काही शक्तीचा क्षय होतो आणि रेणवीय गुंजनाचा (रेणूंच्या कंपनामुळे उत्पन्न होणारा) आवाज येतो. म्हणून शक्य तेथे परिनलिकेकरिता एकदिश प्रवाहच जास्त पसंत करतात. प्रत्यावर्ती प्रवाह वापरला, तर सर्व लोखंडी भाग स्तरीय (पातळ पत्र्याचे तुकडे जोडून बनविलेल्या) जातीचे वापरतात. त्यामुळे आवर्त प्रवाहामुळे होणारा ऊर्जाक्षय पुष्कळ कमी होतो.

आ. २. पोलादी कवच बसविलेली परिनलिका : (१) परिनलिकेचे वेटोळे, (२) पोलादी कवच, (३) पोलादी सरकदांडा, (४) सरकदांडा थोपविणारा भाग, (५) कागदी पुठ्ठा, (६) सरकदांड्याचा मार्गदर्शक, (७) हवा जाण्याचा मार्ग.

सर्व प्रकारच्या स्वयंचलित स्विच यंत्रणांमध्ये आणि संरक्षक अभिचालित्रामध्ये (एका भागातील लहान विद्युत् प्रवाहाचे नियंत्रण करून दुसऱ्या भागातील मोठ्या विद्युत् प्रवाहाचे नियंत्रण करण्याच्या साधनामध्ये) परिनलिकांचा विशेष उपयोग होतो. दूर अंतरावर असलेले तेल भरलेले मंडल खंडक (मोठे स्विच) उघडण्यासाठी आणि चालू करण्यासाठी एकदिश जातीच्या परिनलिका बसवितात. एकदिश चलित्रांच्या (मोटरींच्या) आरंभकातील (सुरू करण्याच्या साधनातील) अतिप्रवाह व शून्य प्रवाहाच्या संरक्षणासाठीही परिनलिकाच वापरतात.

विद्युत् चुंबकाप्रमाणे यांत्रिक काम करण्यासाठी जेथे जास्त यांत्रिक शक्ती लागते, तेथे परिनलिकेच्या भोवती पोलादी कवच बसवितात. त्यामुळे परिनलिकेची कार्यक्षमता पुष्कळच वाढते. अशा परिनलिकेची रचना आ. २ मध्ये दाखविली आहे. या परिनलिकेच्या वेटोळ्यातून विद्युत् प्रवाह पाठविला म्हणजे (३) हा पोलादी दांडा (४) या थोपविणाऱ्या भागाकडे जोराने ओढला जातो व प्रवाह चालू असेपर्यंत तो दांडा परिनलिकेच्या आत अडकलेला असतो. सरकदांड्याच्या मदतीने निरनिराळ्या तरफांचा उपयोग करून पाहिजे तसे यांत्रिक कार्य करता येते. परिनलिकेची लांबी वाढविली, तर ओढशक्ती कमी होते व सरकदांड्याचा व्यास वाढविला, तर ओढशक्ती वाढते परंतु कोणत्याही रचनेत परिनलिकेची एकंदर ओढशक्ती वेटोळ्यातील वेढ्यांच्या संख्येवर आणि त्यामधून जाणाऱ्या विद्युत् प्रवाहावर अवलंबून असते.

काही ठिकाणी लांब परिनलिका वापरणे गैरसोयीचे असते पण चुंबकीय क्षेत्र एकविध असणे जरूर असते. अशा ठिकाणी दोन थोड्या लांबीची व सारखी वेटोळी परस्परांस समांतर बसवितात. या वेटोळ्यांतील संवाहक तारेच्या वेढ्यांची संख्या व त्यांच्या त्रिज्या सारख्या असतात. अशा तऱ्हेची वेटोळी हेल्महोल्ट्स गॅल्व्हानोमीटरमध्ये [⟶ गॅल्व्हानोमीटर] वापरतात. दोन्ही वेटोळ्यांच्या आतील कक्षेमध्ये चुंबकीय क्षेत्र एकविध असते.

संदर्भ : Dawes, C. L.Tokyo, 1955.

ओक, वा.रा. कुलकर्णी, पं. तु.