विचिटॉ: अमेकरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी कॅनझसराज्यातील एक व्यापारी व औद्योगिक शहर आणि सेजविक परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३,११,७४६ (१९९२) महानगरीय ४,८५,२७० (१९९०). हे कॅनझस राज्याच्या दक्षिणमध्य भागात कॅनझस सिटीच्या नैर्ऋत्येस ३०५ किमी. अंतरावर आर्‌ कॅन्सॉ व लिट्‌ ल आर् कॉन्सॉ नद्यांच्या संगमाजवळ वसलेले आहे. दक्षिणेकडील जमातींशी संघर्ष टाळण्यासाठी ओक्लाहोमामधून आलेल्या विचिटॉ इंडियनांनी यादवी युद्धकाळात येथे वसाहत स्थापन केली. इ.स. १८६४ मध्ये जेम्स आर्‌. मीड व जेसी चिझम यांनी याच ठिकाणी आपले व्यापारी केंद्र उघडले. १८६७ मध्ये विचिटॉ इंडियनांनी येथून पुन्हा ओक्लाहोमा प्रदेशात स्थलांतर करताना त्या ठिकाणी आपले नाव दिले. त्यानंतर गोऱ्या लोकांची या व्यापारी ठाण्याजवळील वस्ती वाढली. १८७० मध्ये याला नगराच्या दर्जा आला. १८७२ मध्ये याला नगराचा दर्जा देण्यात आला. १८७२ मध्ये विचिटॉपर्यंत लोहमार्ग बांधण्यात आला व तेव्हापासून गुरांच्या व्यापाराचे हे प्रसिद्ध ठिकाण बनले. त्या काळात गुरांचे कळप वाहून नेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व टेक्ससमधून आलेल्या ‘‘चिझम कॅटल ट्रेल’’ या लोहमार्गावरील विचिटॉ हे महत्त्वाचे ब अंतिम ठिकाण होते. याशिवाय गहू उत्पादक समृद्ध प्रदेशात हे असल्याने गव्हाचा व्यापार व पीठगिरण्यांमुळे हे प्रसिद्धीस आले. तसेच ॲचिसन, टोपेका व सँता फे लोहमार्गाच्या परिसरात शेतकऱ्यांच्या वस्तीचा वेगाने विस्तार झाल्याने या शहरास महत्त्व प्राप्त झाले. १८८६ मध्ये विचिटॉला शहराचा दर्जा मिळाला.

विचिटॉ शहराच्या जवळच बटलर परगण्यात १९१५ मध्ये खनिज तेल व नैसगिक वायूंचे साठे सापडले व त्यानंतर १९२० मध्ये येथे विमानबांधणीचा कारखाना सुरू झाला. तेव्हापासूनच शहराच्या औद्योगिक विकासास सुरुवात झाली. राज्याची खनिज तेल राजधानी म्हणून विचटॉ ओळखले जाते. दुसऱ्या महायुद्धकाळात विमाननिर्मिती उद्योगाचा येथे विशेष विकास झाला. विमानबांधणी, हवाई उपकरणे, कृषी अवजारे, धातू व लाकडी सामान, संगणकनिर्मिती, घरगुती व कार्यालयीन उपयोगाच्या वस्तूंची निर्मिती, मांसप्रक्रिया, पीठगिरण्या, खनिज तेलशुद्धीकरण, सोयाबीन तेलप्रक्रिया, वातानुकूलन उपकरणे, रसायननिर्मिती इ. उद्योगधंदे शहरात चालतात. हे देशाच्या नैर्ऋत्य भागातील काही राज्यांचे किरकोळ व ठोक व्यापाराचे एक महत्त्वाचे प्रादेशिक केंद्र असून विभागीय शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे. विचिटॉ स्टेट यूनिव्हर्सिटी (१८९५), फ्रेंड्स यूनिव्हर्सिटी (१८९८), कॅनझस न्यूमन कॉलेज (१९३३), यूनिव्हर्सिटी ऑफ कॅनझस स्कूल ऑफ मेडिसीन या शैक्षणिक संस्था शहरात आहेत. विचिटॉ आर्ट म्यूझीयम, विचिटॉ आर्ट असोसिएशनच्या कलावीथी, विचिटॉ सिंफनी ऑर्केस्ट्रा , ऐतिहासिक संग्रहालय, विचिटॉ ऑम्नीस्फीअर खगोलालय इ. सांस्कृतिक संस्था येथे आहेत. रस्ते, लोहमार्ग व हवाई वाहतुकीचे हे प्रधान केंद्र आहे. मकानल हा वायुसेना तळ शहराच्या जवळच आग्नेयीस असून दहा किमी. अंतरावर विचिटॉ मिडकाँटिनंट हा विमानतळ आहे.

चौधरी, वसंत