विचारप्रक्रिया : आपल्या सभोवती, जवळपास किंवा दूरवर ज्या वस्तू पसरलेल्या असतात, किंवा ज्या घटना घडत असतात त्यांचे अवकलोकन करून त्यांच्याविषयीचे ज्ञान आपण मिळवितो. अशा ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. पण वाईला पण वाईला माझ्या खोलीत मी बसलो असता मुंबईत कार्यालये सुटण्याच्या वेळी होणाऱ्या गर्दीचा व माणसांच्या धावपळीचा विचार मी करीत असेन किंवा येत्या सुटीत कुठे प्रवास करावा, काय मजा करावी ह्याचा विचार मी करीत असेन. हे प्रत्यक्ष ज्ञान नाही, कारण आपले प्रत्यक्ष ज्ञान हे ज्या वस्तू आपल्याभोवती उपस्थित असतात त्यांच्याविषयीचे ज्ञान असते उपस्थित वस्तूंना ते बांधलेले असते. पण आपले विचार हे अनुपस्थित वस्तूंविषयी, ज्यांचे प्रत्यक्ष अवलोन होत नाही अशा वस्तूंविषयी, भूतकालीन, भावीकालीन वस्तूंविषयी किंवा काल्पनिक वस्तूंविषयीही चाललेले असतात. उदा. पऱ्यांचा जीवनक्रम कसा असतो ह्याविषयी विचार करण्यात एखादा माणूस गुंगून जाईल. अनुपस्थित वस्तूंचे प्रतिनिधित्व करणारी अशी प्रतीके आपल्या मनात असतात आणि अशा प्रतीकांच्या साहय्याने, त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या विचार करतो. अनुपस्थित वस्तूंची जागा तिचे प्रतिक घेते. तेव्हा विचारप्रक्रिया ही प्रतीकात्म प्रक्रिया असते. येथे एक बाब स्पष्ट केली पाहिजे: अनेकदा समोर वा जवळच उपस्थित असलेल्या वस्तूविषयी−उदा. एखाद्या व्यक्तीविषयी−आपल्या मनात जे विचार येतात त्यांचा आशय (उदा., ह्या व्यक्तीचे बालपण खडतर होते ही व्यक्ती महत्त्वकांक्षी आहे ती उद्या अमुक एक गोष्ट करणे शक्य आहे इत्यादी) खरोखरी पाहता ज्यांचे प्रत्यक्ष अववलोकन होत नाही, अशा बाबींविषयीचा असतो. त्या व्यक्तीचे बालपण हे प्रत्यक्षात तिथे नसते. तिची महत्त्वाकांक्षाही आपल्या विचारांच्या पातळीवरच असते आणि ती व्यक्ती अमुक एक गोष्ट उद्या करील, ही बाब एका भविष्यकालीन घटनविषयीची आपली कल्पना असते.

मानसिक प्रतिमा हा प्रतीकांचा एक प्रकार होय. प्रतिमा ह्या आपल्याला वस्तूंची, घटनांची जी संवेदना (पर्सेप्शन) पूर्वी लाभलेली असतात त्यांच्या प्रतिकृती होत. उदा., मी जर ताजमहाल पाहिलेला असेल, तर त्याची प्रतिमा माझ्या मनात असते व प्रसंगी ती जागृत होते. प्रतिमा ह्या वस्तूंच्या प्रतिकृती असतात खऱ्या पण सामान्यपणे त्या काहीशा क्षीण आणि काहीशा अपुऱ्या प्रतिकृती असतात. पूर्वी अनुविलेल्या दृश्य वस्तूंच्या प्रतिमा तर आपल्या मनात असतातच पण एखादी गाण्यातील लकेर, एखादा गंध, स्पर्श, चव, वेदना ह्यांच्याही प्रतिमा असतात. जरी सर्वसाधारणपणे प्रतिमा क्षीण आणि अपुऱ्या असल्या, तरी काही माणसांच्या अंगी, ज्या वस्तूंचा त्यांनी अनुभव घेतला असेल, त्यांचे सुस्पष्ट व हुबेहूब प्रतिमाच्या द्वारे स्मरण करण्याची शक्ती असल्याचे आढळून येते. अशा प्रतिमांना प्रतिरूप (आयडेटिक) प्रतिमा म्हणतात. मी रोज जो चढून कार्यालयात जातो त्याची प्रतिमा माझ्या मनात असते. पण प्रत्यक्षात जर मी त्या जिन्याच्या पायऱ्या मोजल्या नसतील तर त्याच्या प्रतिमेवरून त्याच्या पायऱ्या मी मोजू शकत नाही. पण ज्या व्यक्तीला प्रतिमा बनविण्याची शक्ती असते, ती आपल्या मनातील जिन्याच्या प्रतिमेचे निरीक्षण करून जिन्यांच्या पायऱ्या किती आहेत हे मोजून सांगू शकते. लहान मुलांमध्ये प्रतिरूप प्रतिमा बनविण्याची शक्ती प्रौढ माणसांच्या तुलनेने अधिक प्रमाणाक असते. तारूण्यात पदार्पण करण्याच्या वेळी ही शक्ती क्षीण होते किंवा नष्ट होते, असे दिसून आले आहे. पण काही माणसांत ती शेवटपर्यंत टिकून राहते. प्रतिरूप प्रतिमा निर्माण करण्याच्या शक्तीचा आणि बुद्धिमत्तेचा किंवा कलात्मक प्रतिभेच्या काही संबंध नसतो, असे पुराव्या वरून आढळून आले आहे.

विचारप्रकियेत वापरले जाणारे दुसऱ्या प्रकारचे प्रतीक म्हणजे संकल्पना होय. प्रतिमा ही पाहिलेल्या (किंवा ऐकलेल्या इ.) एखाद्या विशिष्ट वस्तूची प्रतिमा असते. उदा., ताजमहालची प्रतिमा माझ्यामनात असेल. ह्याच्या उलट संकल्पना ही वस्तूंच्या एका वर्गाला समान असलेल्या गुणधर्मांची जाणीव असते. उदा. ‘कुत्रा’ ही माझी संकल्पना म्हणजे कुत्रा ह्या वर्गातील सर्व प्राण्यांना समान असलेल्या गुणधर्मांची जाणीव होय. कुणीही कुत्रा घेतला, तर त्याच्या अंगी हे गुणधर्म असतात आणि जिच्या अंगी हे गुणधर्म आहेत अशी अशी कोणतीही वस्तू कुत्रा असते ‘कुत्रा’ ह्या संकल्पनेखाली ती येते.

आपण संकल्पना कशा बनवितो ? आपण पाहिलेल्या काही वस्तूंमध्ये काही समान गुणधर्म आहेत असे समजा आपल्याला आढळून आले. ह्या वस्तूंतील कोणत्याही दोन वस्तू काही बाबतींत भिन्न असणार पण त्या अशा भिन्न असल्या, तरी काही विशिष्ट गुणधर्म अंगी असण्याच्या बाबतीत त्या समान असतात. उदा., रंग आकार, वजन, पळण्याची गती इ. बाबतींत कुत्रे भिन्न असतात. पण काही गुणधर्म सर्व कुत्र्यांना समान असतात आणि हे विशिष्ट गुणधर्म ज्या कुणाही वस्तूंच्या ठिकाणी असतील ती वस्तू कुत्रा असते. ह्या समान गुणधर्मांना ‘कुत्रेपण’ म्हणूया. ह्या कुत्रेपणाची जाणीव असणे म्हणजे ‘कुत्रा’ ही संकल्पना आपल्याला अवगत असणे.

आपण संकल्पना कशा घडवितो ? संकल्पनेच्या घडविणीच्या दोन पायऱ्या असतात: १. अपकर्षण (ॲब्‌ स्ट्रॅक्शन): आपण अनुभविलेल्या काही वस्तूंच्या अंगी काही समान गुणधर्म आहेत असे आढळून आल्यास आपण ह्या समान गुणर्धांवर लक्ष केंद्रित करतो. ज्या इतर गुणधर्मांच्या बाबतींत ह्या वस्तू एकमेकींहून भिन्न असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करून केवळ त्यांना समान असलेल्या गुणधर्मांवर लक्ष केंद्रित करतो ह्या समान गुणधर्मांना वेगळे काढतो. ह्या क्रियेला, म्हणजे अनेक वस्तूंना समान असलेले गुणधर्म ओळखून त्यांच्या पुंजक्याला वेगळे काढण्याच्या क्रियेला अपकर्षणाची क्रिया म्हणतात. २ सामान्यीकरण: ह्या वेगळ्या काढलेल्या समान गुणधर्मांच्या साहाय्याने आपण एका वर्गाची कल्पना करतो हे समान गुणधर्म ज्या ज्या वस्तूंच्या अंगी आहेत, त्या सर्व वस्तूंच्या मिळून बनलेल्या वर्गाची कल्पना करतो. उदा., आपण ज्या अनेक वस्तू पाहिलेल्या असतील त्यांतील काही वस्तूंच्या अंगी काही समान गुणधर्म आहेत हे आपण लक्षात घेतले, त्यांना वेगळे काढले आणि समजा ‘कुत्रेपण’ असे नाव दिले. आता कुत्रेपण अंगी असलेल्या सर्व वस्तूंच्या वर्ग अशी कल्पना जर आपण केली, तर कुत्रेपण ह्या गुणधर्माचे सामान्यीकरण आपण केले आहे असे होईल. कारण ज्या कोणत्याही वस्तूच्या अंगी कुत्रेपण हा गुणधर्म (किंवा गुणधर्माचा हा पुंजका) असेल, ती वस्तू कुत्रा होय, ती कुत्र्याच्या वर्गात मोडते असे आपण म्हणत आहोत. संकल्पना अशा रीतीने सामान्य असतात आणि त्यांच्या द्वारा काही समान गुणधर्म अंगी असलेल्या वस्तूंच्या वर्गाची कल्पना आपण करतो. सामान्यपणे आपल्या विचारप्रक्रिया संकल्पनांच्या माध्यमातून चालत असतात.


आपण घडविलेल्या संकल्पना स्थिर करण्याकरिता त्यांच्यासाठी आपण शब्दांची योजना करतो. उदा. ‘कुत्रेपण’ हा शब्द आणि ह्या संकल्पनेशी संबंधित असलेली ‘कुत्रा’हा शब्द. विचारप्रक्रियेत वापरले जाणारे तिसऱ्या प्रकारचे प्रतीक म्हणजे शब्द होय. भाषा ही शब्दांची बनलेली असते. प्रौढ माणसांच्या बहुतेक विचारप्रक्रिया प्रामुख्याने शब्दांच्या, भाषेच्या माध्यमातून चालत असतात. भाषा ही नेहमी एका समाजाची भाषा असते. भाषेमुळे भिन्न व्यक्तींमध्ये विचारांचे आदानप्रदान होऊ शकते. [⟶भाषा].

विचारप्रक्रिया अनेक प्रकारच्या असतात. आपण मनोराज्यात गुंग होतो, किंवा बालपणी सुटीत आजोळी दिवस कसे मजेत घालविले ह्याची आठवण करण्यात दंग होतो, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या विचारप्रक्रियांत आपण गढलेलो असतो. आता विचारप्रक्रियेचा एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे तार्किक विचार किंवा युक्तिवाद हा होय. तार्किक विचारप्रक्रियेला एक प्रकारची शिस्त असते मनोराज्य रंगविण्यात ही शिस्त नसते. तार्किक विचारांचे वैशिष्ट्य असे, की असा विचार करताना आपल्यापुढे एक उद्दिष्ट असते. समस्या असते आणि तिचे उत्तर आपल्याला शोधून काढायचे असते. हे उत्तर शोधून काढण्यासाठी आपण तार्किक विचार करतो. समजा, माझ्या खोलीत वावरत असताना मी चष्मा काढून ठेवला आणि तो सापडत नाही. मग, ‘माझा चष्मा कुठे आहे?’ ह्या प्रश्नाचे उत्तर खोलीचे अवलोकन केल्याने सापडेल. पण काही समस्यांची उत्तरे अशा अवलोकनाने मिळत नाहीत. ती शोधून काढण्यासाठी विचार करावा लागतो.

ह्या समस्या व्यावहारिक असतील किंवा एखाद्या विज्ञानातील किंवा शास्त्रातील उपपत्ती, सिद्धांत ह्यांच्या विषयीच्या असतील, म्हणजे औपपत्तिक (थिऑरेटिकल) असतील. उदा., माझ्या मुलाला मी कोणत्या शाळेत पाढवावे अशी माझ्या पुढची समस्या असेल. समजा, ‘अ’ ह्या शाळेचा शिक्षकवर्ग चांगला आहे अशी ख्याती आहे. ही वस्तुस्थिती मुलाला त्या शाळेत पाठवायला अनुकूल आहे. पण लगेच माझ्या ध्यानात येते, की त्या शाळेची फी महागडी आहे आणि मला परवडणारी नाही. इतर खर्चात काटकसर करून ती भरावी असे ठरवायचे झाल्यास कुटुंबात आजारपण असल्यामुळे बराच खर्च करणे अटळ आहे व आवश्यक तेवढी काटकसर करणे शक्य होणार नाही, हे माझ्या लक्षात येते. शिवाय ‘अ’ ह्या शाळेतील मुले सामान्यपणे श्रीमंत कुटुंबांतील असल्यामुळे त्यांच्या संगतीत माझा मुलगा बुजेल व त्याच्या अभ्यासावर त्याचा वाईट परिणाम होईल अशी भीती आहे. उलट ‘ब’ ह्या शाळेची फी मला परवडणारी आहे तिचा शिक्षकवर्ग खास नसला, तरी मुलाच्या अभ्यासाकडे मी नियमितपणे लक्ष दिले तर त्याची प्रगती समाधानकारक होईल, असा विश्वास बाळगायला हरकत नाही. असा सारासार विचार करून मुलाला ‘ब’ ह्या शाळेत पाठवावे असा निर्णय मी घेतो.

ही व्यावहारिक समस्या झाली. व्यावहारिक समस्येचा निष्कर्ष म्हणजे आपण काय करावे ह्याविषयीचा निर्णय असतो. विज्ञान किंवा इतर शास्त्रे ह्यांत संशोधन करताना ज्या समस्या उद्‌भवतात, त्या औपपत्तिक असतात. विज्ञानात ज्या उपपत्ती रूढ आहेत त्यांच्याशी विसंगत ठरतील अशी निरीक्षणे जर आढळून आली, तर त्या विसंगतीचे निरसन कसे करावे, अशी ही समस्या असते. अशी विसंगती दूर करण्यासाठी रूढ उपपत्तीत कमीअधिक बदल करावा लागतो किंवा अधिक कठीण प्रसंगी रूढ उपपत्ती बाजूला सारून सर्व निरीक्षित वस्तुस्थितींशी-ज्यांच्याशी रूढ उपपत्ती सुसंगत आहेत त्या आणि ज्यांच्याशी त्या विसंगतच ठरल्या आहेत त्या सर्व वस्तुस्थितींशी−सुसंगत ठरेल अशा उपपत्तीची कल्पना करावी लागते.

आपल्या पूर्वीच्या अनुभवांमुळे जी माहिती आपल्या मनात साठविलेली असते, तिचा वापर करून आपण तार्किक विचार करीत असतो. पूर्वीनुभवांपासून माहिती मनात साठविलेली नसेल, तर तार्किक विचाराला प्रारंभच होणार नाही. पण जरी माहिती साठविलेली असेल आणि तिचे स्मरण असेल, तरी तार्किक विचारात तिचा वापर करण्यात येईल अशी निश्चित नसते. जी समस्या सोडवायची आहे तिच्याशी ह्या विशिष्ट माहितीचा काही संबंध पोचतो, हे विचार करणाऱ्याने ओळखले पाहिजे. ती माहिती समस्येशी प्रस्तुत आहे हे त्याला दिसले पाहिजे. समस्येचे उत्तर शोधून काढण्यासाठी ज्यांना उपलब्ध माहितीचा उपयोग करता येतो त्यांच्याच अंगी तार्किक विचार करण्याची विशेष शक्ती असते, असे म्हणणे योग्य ठरते.

मनोराज्य रंगविताना किंवा जुन्या काळच्या आठवणी काढीत असताना आपले विचार बऱ्याच मुक्तपणे चाललेले असतात. तार्किक विचारप्रक्रिया नियंत्रित असते. जी समस्या सोडविण्यासाठी तार्किक विचारप्रक्रिया चालू असते, तिचे नियंत्रण त्या विचारप्रक्रियेवर असते. जी समस्या सोडवायची असेल, तिच्याशी कोणत्या तरी प्रकारे संबंधित असलेली माहिती उपलब्ध माहितीतून निवडून तिचा वापर करावा लागतो. इतर माहिती वर्ज्य करावी लागते. तार्किक विचारप्रक्रियेत आपण अशा माहितीचा जो उपयोग करतो तो तिच्यापासून अनुमानाने काही निष्कर्ष काढण्यासाठी करतो. ही अनुमाने मुख्यतः दोन प्रकारची असतात. एका प्रकारची अनुमाने निगामी अनुमाने किंवा निगमने असतात. निगामी अनुमानात आपण काही विधाने सत्य आहेत असे तात्पुरते मानून त्यांच्यापासून निष्पन्न होणारे विधान निष्कर्ष म्हणून काढीत असतो. उदा., पुढील अनुमाने निगामी अनुमान आहे :

कामाच्या दिवशी संध्याकाळी मुंबईच्या रस्त्यांत वाहनांची गर्दी असते.

आज कामाचा दिवस आहे आणि आपण आज मुंबईला पोहोचू तेव्हा संध्याकाळी झालेली असेल.

तेव्हा, आपण मुंबईला पोहोचू तेव्हा रस्त्यांत वाहनांची गर्दी असेल. ज्या विधानांपासून आपण अनुमान करतो त्यांना आधारविधाने (प्रेमिसेस) म्हणतात व त्यांच्यापासून जे विधान आपण प्राप्त करून घेतो त्याला निष्कर्ष म्हणतात. निगामी अनुमानात जो निष्कर्ष काढलेला असतो, तर तो त्याच्या आधारविधानांपासून खरोखरच निष्पन्न होत असेल, तर ते अनुमान प्रमाण (व्हॅलिड) आहे असे म्हणतात. अनुमान करताना आपण जर सत्य आधारविधानांपासून प्रारंभ केला आणि आपले अनुमान प्रमाण असेल, तर त्याचा निष्कर्ष सत्य असतोच. निगामी अनुमानांचे प्रकार किती आहेत आणि निगमनाच्या प्रामाण्याचे निकष कोणते आहेत, ह्याचा अभ्यास निगामी तर्कशास्त्रात होतो. [⟶तर्कसास्त्र, आकारिक].

अनुमानांच्या दुसऱ्या प्रकाराला विगामी अनुमाने किंवा विगमने म्हणतात. विगामी अनुमानांत आपण एका प्रकारच्या वस्तूची किंवा घटनेची अनेक उदाहरणे पाहिलेली असतात व ह्या सर्व उदाहरणांच्या अंगी एक समान धर्म आहे असे आपल्याला आढळून आलेले असते. ह्यापासून त्या प्रकारच्या सर्व वस्तूंच्या किंवा घटनांच्या अंगी हा धर्म असला पाहिजे असा निष्कर्ष आपण, आपल्या अनुभवांचे सामान्यीकरण करून काढीत असतो. उदा., ‘मी (आणि इतरांनी) पाहिलेले सर्व कावळे काळे आहेत तेव्हा सर्व (आपण आतापर्यंत पाहिलेले व इतर धरून सर्व) कावळे काळे असले पाहिजेत’ हे विगामी अनुमानाचे उदाहरण आहे. विगामी अनुमानांचा अभ्यास विगामी तर्कशास्त्रात होतो. [⟶तर्कशास्त्र, विगामी].

प्रत्यक्ष व्यवहारात जेव्हा आपण तार्किक विचार करीत असतो, तेव्हा आपण निगामी आणि विगामी अनुमाने सरमिसळपणे वापरीत असतो. आपल्या पुढे व्यावहारिक किंवा औपपत्तिक समस्या असते आणितिचे समाधानकारक उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नात आपण असतो. व्यावहारिक समस्या असली, तर ह्या विशिष्ट परिस्थितीत काय करावे ह्याविषयीच्या वेगवेगळ्या पर्यायांची कल्पना आपण करतो. समजा, आपण अमुक एक कृत्य केले, तर त्याच्यापासून कोणकोणते बरेवाईट परिणाम घडून येतील ह्याचा अंदाज आपण घेतो. हा अंदाज घेण्यासाठी आपण निगामी आणि विगामी अनुमानांचा उपयोग करतो. पर्यायी कृत्य केले, तर त्याच्यापासून कोणते बरोवाईट परिणाम घडून येतील, ह्याचा असाच अंदाज घेतो. मग कल्पिलेल्या सर्व पर्यायी कृत्यांपासून निष्पन्न होतील अशा बऱ्यावाईट परिणामांची तुलना करून सर्वात इष्ट वाटणाऱ्या पर्यायाची कृती करण्यासाठी निवड करतो.


जेव्हा आपल्यापुढे औपपत्तिक समस्या असते, तेव्हा कोणत्या तरी घटनेचे किंवा आढळून आलेल्या वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण (एक्सप्लनेशन) आपण शोधीत असतो. सृष्टीत जे घडते किंवा आढळून येते त्याच्या संबंधी च्या काही नियमांचे ज्ञान आपल्यला अगोदरच असते आणि ह्या नियामांशी काही बाबतीत विसंगत असलेली घटना जेव्हा आपल्याला आढळून येते, तेव्हा तिचे स्पष्टीकरण करण्याचे आव्हान आपल्यापुढे उभे राहते. असे स्पष्टीकरण देण्याच्या प्रयत्नाचे स्वरूप सामान्यपणे असे असते : अशी अटकळ आपण करतो. म्हणजे आपण अगोदर स्वीकारलेले जे नियम ह्या घटनेचे स्पष्टीकरण करण्यात अयशस्वी ठरले आहेत, त्यांच्याहून काही प्रमाणात वेगळ्या असलेल्या नियमांची कल्पना आपण करतो. ह्या नव्याने कल्पिलेल्या नियमांशी ही ‘विपरीत’ घटना सुसंगत असते. पण केवळ एवढ्यावरून हे नवीन नियम प्रमाण ठरत नाहीत. त्यांच्यापासून निगमनाने हे नवीन नियम प्रमाण ठरत नाहीत. त्यांच्यापासून निगमनाने आपण आणखी निष्कर्ष काढतो. मग ह्या निष्कर्षाचा प्रत्यक्ष निरीक्षणे करून पडताळा घेतो. हे निष्कर्ष ह्या पडताळ्याला जर उतरले, त्यांची सत्यता निरीक्षणाने जर सिद्ध झाली, तरच आपली अटकळ स्वीकाराई आहे असे आपण मानतो. नंतर जुन्या नियमांच्या जागी नवीन नियम रूढ होतात, मान्यता पावतात. घटनांचे स्पष्टीकरण करण्यासाठी आपण प्रारंभी जी अटकळ करतो, त्याला ‘गृहीतक’ (हाय्‌पॉथिसिस) म्हणतात आणि ह्या प्रकारे विचार करण्याच्या पद्धीतला ‘गृहीतक-निगामी’ पद्धत म्हणतात. ही केवळ विज्ञानाची पद्धत नाही व्यवहारातही आपण ह्याच पद्धतीने विचार करीत असतो.

नवीन, परीक्षणानंतर प्रमाण ठरेल असे गृहीतक सुचण्याला ह्या पद्धतीत मोक्याचे स्थान आहे हे उघड आहे. अशा गृहीतकांची कल्पना कशी करावी ह्याविषयीचे काही नियम नाहीत. ज्यांची कल्पनाशक्ती तीव्र आहे त्यांना ती सुचतात, एवढेच म्हणता येईल. पण केवळ कल्पनाशक्ती पुरेशी नसते. शास्त्राच्या किंवा व्यवहाराच्या ज्या क्षेत्रासंबंधी विचारप्रक्रिया चालू असते, त्या क्षेत्रासंबंधीची व्यापक माहिती शोधकाच्या मनात जर मुरलेली असली, त्याच्या कल्पनाशक्तीचे असे पोषण झालेले असेल, तर त्याची अभिनव आणि उपयुक्त गृहीतके सुचायला मदत होते.

तार्किक विचाराने आपण एखादा निसर्गनियम शोधून काढतो किंवा वस्तुस्थिती शोधून काढतो. उदा., चंद्राचे पृथ्वीपासून अंतर किती आहे किंवा एखादा गुन्हा कुणी, कसा केला हे शोधून काढतो. जे पूर्वी माहीत नव्हते ते जसे तार्किक विचारप्रक्रियेद्वारे आपण माहीत करून घेतो, त्याप्रमाणे एका वेगळ्या विचारप्रक्रियेद्वारे ज्या प्रकारची वस्तू पूर्वी अस्तित्वात नव्हती अशा प्रकारची वस्तू अस्तित्वात आणतो. उदा., एखादे नवीन प्रकारचे यंत्र आपण घडवितो किंवा नवीन कविता करतो, नवीन चित्र रंगवतो किंवा नवीन प्रकारच्या सामाजिक संस्था−उदा., विवाहपद्धती किंवा आर्थिक व्यवस्था−संघटित करतो. ह्याला नवनिर्मिती (इन्‌व्हेन्शन) म्हणतात. नवनिर्मिती केवळ योगायोगाने घडत नाही. तिच्या मागे विचार असतो.   

एखादा शोध नव्याने लावण्यामागे किंवा एखादी नवीन स्वरूपाची गोष्ट नव्याने निर्माण करण्यामागे सर्जनशील (क्रिएटिव्ह) विचारप्रक्रिया असते. सर्जन करणे म्हणजे जे पूर्वी करण्यात आले आहे त्याचे अनुकरण न करता, काही तरी महत्त्वाचे किंवा अर्थपूर्ण असे निर्माण करणे. एखादा प्रतिभावंत वैज्ञानिक जेव्हा नवीन शोध लावतो, तेव्हा रूढ असलेल्या उपपत्तींचे (थिअरी) तो केवळ उपयोजन करीत नसतो. पूर्वी जिची स्पष्टपणे कल्पना करण्यात आली नव्हती, अशी नवीन उपपत्ती तो मांडीत असतो. हे करण्यासाठी त्याला नवीन प्रकारच्या गृहीतकाची कल्पना करावी लागते कदाचित नवीन प्रकारच्यागणिती निगमनाने त्याच्यापासून निष्कर्ष प्राप्त करून घ्यावे लागतात. अभिनव शैलीत चित्र रंगविण्यात किंवा वेगळ्या प्रकारचे यंत्र घडविण्यात सर्जनशील विचारप्रक्रियेचा आविष्कार घडून येत असतो, हे उघड आहे. असा सर्जनशील विचार करण्याची शक्ती कमीअधिक प्रमाणात सर्व माणसांत विखुरलेली असते पण काही थोड्या व्यक्तींत ती असाधारण प्रमाणात असलेली आढळून येते. अशा माणसांना प्रतिभेची देणगी असते, असे आपण म्हणतो.

सर्जनशील विचार कसा करावा ह्याचे नियम घालून देता येत नाहीत किंवा सर्जनशील विचार कसा करावा ह्याचे प्रशिक्षण देता येत नाही. म्हणजे कुणाही माणसाला प्रशिक्षण देऊन सर्जनशील विचार करण्याची क्षमता त्याच्या अंगी निर्माण करता येत नाही. पण ज्याच्या अंगी ही क्षमता आहे तिचा काही प्रमाणात विकास करणे आणि तिला योग्य वळण लावणे ह्या गोष्टी प्रशिक्षणाने साध्य होतात.

सर्वसाधारणपणे असे म्हणता येते, की सर्जनशील विचारप्रक्रियेच्या काही पायऱ्या असतात:(१) पूर्वतयारी : ज्या क्षेत्रात सर्जनसीलतेचा आविष्कार व्हायचा असेल−उदा., मूर्तिकला, काव्य, भौतिकी, स्थापत्य, उत्पादने व्यवस्थापन इ. क्षेत्रे-त्याच्या विषयीची तपशीलवार माहिती मोठ्या प्रमाणात सर्जकाने गोळा केलेली असते. ती त्याच्या मनात घर करून राहिलेली असते. (२) माहिती मनात मुरण्याची प्रक्रिया:सर्जकाच्या मनात ही माहिती निष्कियपणे पडून रहात नाही. ती मनात मुरते. म्हणजे तिच्या वेगवेगळ्या घटकांचे परस्परांशी संबंध जुळत जातात ह्या घटकांतून वेगवेगळे आकृतिबंध रचले जातात. ही सर्व खोल मनात अभावितपणे घडणारी प्रक्रिया असते. तिचा बाह्यतः फारसा आविष्कार घडलेला दिसून येत नाही. ह्या अवधीत सर्जक विचारांत स्वस्थ, निष्क्रिय असल्यासारखा दिसतो पण त्याच्या अबोध (अन्कॉन्शन) मनात एक प्रकारचे मंथन चालू असते. (३) स्फूर्ती : मग एकाएकी त्याला हवा असलेली नवीन आकृतिबंध, नवीन गृहीतक, नवीन प्रकारच्या यंत्राची कल्पना इ. स्पष्टपणे सुचते. (४) प्रामाण्याची प्रचीती : ही नवीन निर्मिती जर प्रमाण, मूल्यवान असायची असेल, तर त्याच्या प्रामाण्याची प्रचीती घ्यावी लागते. ती निर्मिती म्हणजे नवीन प्रकारचे चित्र किंवा कविता असेल, तर तिला सौंदर्यात्मक निकषांचे समाधान करावे लागते. ते यंत्र असेल तर ते नीटपणे चालावे लागते. नवनिर्मितीचे मूल्य तिच्या प्रामाण्याचा अशा स्वरूपाचा प्रत्यय येण्यावर अवलंबून असते.

सर्जक व्यक्ती सामान्यपणे वयाच्या ३० ते ५० ह्या कालावधीत सर्वां त अधिक सर्जनशील असतात, असे आढळून आले आहे. पण अशी माणसे बऱ्याच उतारवयापर्यत−८० वर्षापर्यंतही-निर्मितीशील रहातात असा अनुभव आहे.

सर्जनशील व्यक्ती सामन्यपणे आत्ममग्न, एकांडी, तुसंडी, आपल्या सामाजिक परिसराशी जुळवून घेऊ न शकणारी अशी असते, अशी एक समजूत आहे. ह्या बाबतीत पहाणी करून काढलेला निष्कर्ष असा, की प्रत्येक सर्जनशील व्यक्तीच्या बाबतीत हे खरे नसेल, तरी अशा वृत्तीच्या व्यक्तींचे सर्जनशील व्यक्तींशी असलेले प्रमाण सर्वसाधारण माणसांच्या तुलनेने, लक्षात यावे इतके यावे इतके जास्त असते.

संदर्भ : 1. Bartlett, F. C. Thinking: An Experimental and Social Study, New York, 1958.

           2. Berlyne, D. E. Structure and Direction in Thinking, New York, 1965.

          3. Burner, J. S. Goodnow, J. J. Austin, G. A. A Study of Thinking, New York, 1956.

          4. Johnson, D. M. The Psychology of Thought and Judgement, New York, 1955.

         5. Osborn, A. F. Applied Imagination: Principles and Procedures of Creative Thinking, New York, 1957.

रेगे, मे. पुं.