विचर्ली, विल्यम : (? १६४०−१ जानेवारी १७१६). इंग्रजी नाटककार. श्रॉपशर, श्रुझबेरीमधील क्लाइव्ह येथे जन्मला. वयाच्या पंधराव्या वर्षी कॅथलिक पंथाचा त्याने स्वीकार केला पण ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला परतल्यावर (१६६०) तो पुन्हा प्रोटेस्टंट झाला. ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त न करताच तो कायद्याच्या अभ्यासाकडे वळला. तथापि त्याला नाट्यलेखन आणि रंगभूमित खराखुरा रस होता. लव्हन इन अ वुड ऑर सेंट जेम्स पार्क ही त्याची नाट्यकृती १६७१ साली लंडनमध्ये रंगभूमीवर आली आणि तिने त्याला मोठी कीर्ती प्राप्त करून दिली. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स ह्याच्या दरबारी वर्तुळातही त्याला प्रवेश मिळाला. लव्ह इन अ वुड… ही एक घटनाप्रधान पार्श्वभूमी आहे. त्याच्या अन्य नाट्यकृतींपैकी जंटलमन डान्सिंग मास्टर (१६७२) ह्या नाटकात मावशी व वडील ह्यांच्या कठोर शिस्तित वाढलेली नायिका हिपोलिटा ही आपल्या प्रियकराबरोबर, तो आपला नृत्यशिक्षक आहे असे सांगून, राजरोसपणे कसा प्रणय करते आणि शेवटी नियोजित वराऐवजी त्याच्याशीच कसे लग्न लावते, हे दाखविले आहे. नपुंसकत्वाचे ढोंग करून आपली विषयवासना सुखेनैव तृप्त करून घेणाऱ्या हॉर्नरच्या लीला द कंट्री वाइफ (१६७५) मध्ये दाखविल्या असून ह्या नाटकावर अश्लीलतेबद्दल टीका झाली आहे. द प्लेन डीलर (१६७६) ही विचलींची सर्वोत्कृष्ट नाट्यकृती. विख्यात फ्रेंच नाटककार मोल्येर ह्याच्या ल मिझांत्रॉप ह्या नाटकाचे हे स्वैर रूपांतर असून ह्या नाटकात कॅप्टन मॅनली ही अविस्मरणीय व्यक्तिरेखा त्याने निर्माण केली. तत्कालीन समाजशील नैतिक अधःपातावर कॅप्टन मॅनली कोरडे ओढतो. ह्या नाटकानंतर काही कवितांखेरीज त्याने काही लिहिले नाही.

दुसऱ्या चार्ल्सच्या काळातील पोषाखी आणि आतून सडलेल्या समाजाचा नैतिक अधःपाताचे प्रभावी चित्रण करणारा नाटककार म्हणून तो गौरविला जातो. लंडन शहरी तो निधन पावला.

संदर्भ : 1. Connely Willard, Brawny Wycherley, New York, 1930.

           2. Dobree. B. Restoretion Comedy, 1924.

           3. Fujimura. T. H. Restoration Comedy of Wit, Princeton (N. J.), 1952.

           4. Weales, Gerald, Ed. The Complete Plays of William Wycherley, New York, 1967.

नाईक, म. कृ.