विखारी : (विखरी, वेखळी, येकाडी हि. वेहकली क. तम्माटा लॅ. पिट्टोस्पोरम फ्लोरिबयंडम कुल-पिट्टोस्पोरेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पती, आवृतंबीज उपविभाग] हा लहान, सदापर्णी व शोभिवंत वृक्ष, म्यानमारमध्ये (ब्रह्मदेशात) व भारतात (सह्याद्री ते निलगिरीपर्यंत उपोष्ण हिमालयात पंजाब ते सिक्कीम दरम्यान १,५५० मी. उंचीपर्यंत, खासी टेकड्या व मिश्मी, द. अर्काट व सालेम इ.) बहुधा रुक्ष व खडकाळ जागी आढळतो.फांद्या चवरीप्रमाणे असतात. साल पातळ, फिकट हिरवट भुरी व र्तावर आडव्या ⇨वल्करंध्रांच्या ओळी असतात.पाने एकाआड एक एक साधी, गुळगुळीत, भाल्यासारखी व तरंगित कडांची फुले अनेक, लहान, पिवळी, पंचभागी, द्विलींगी, लवदार असून शेंड्याकडे अनेक शाखायुक्त, संयुक्त गुलुच्छावर [⟶ पुष्पबंध] किंवा चवरीसारख्या झुपक्यावर येतात.फळ (बोंड) लहान, शेंदरट पिवळे, वाटाण्याएवढे, सहा बीजांचे व काहीसे दबल्यासारखे. तडकल्यावर त्याची दोन सारखी शकले होतात. बी काहीसे कोनयुक्त, गुळगुळीत, शेंदरी किंवा काळपट लाल असून त्याभोवती रेझीनयुक्त चिकट द्रव असतो.
लाकूड पांढरट तपकिरी, चमकदार, मध्यम प्रतीचे कठीण व जड असून ते खेळण्यांसाठी आणि जळण म्हणून वापतात. साल कडू व सुगंधी असून ताजेपणी तिला आल्याप्रमाणे वास येतो. ती कफोत्सारी (कफ पाडून टाकणारी), ज्वरनाशी व मादक असते. तेल बलवर्धक, चर्मरोगनाशक व आरोग्य प्रस्थापक असून संधिवात, छातीचे विकार, लचकणे, खरचटणे, नेत्रदाह इत्यादींवर लावण्यास उपयुक्त असून उपदंश, महारोग, चर्मरोग व जुनाट संविधातावर ते पोटातही देतात.
परांडेकर, शं. आ.