विकास मानसशास्त्र : (जेनेटिक सायकॉलॉजी) मानवी वर्तनलक्षणांचा उगम आणि विकास ह्यांचा अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक शाखा. मानवी वर्तनाचा जातिविकास (फाय्लोजेनेसिस), त्याची आनुवंशिकता आणि व्यक्तीच्या गर्भावस्थेपासूनचा विकास (आँटोजेनेसिस) ही ह्या शाखेच्या अभ्यासक्षेत्राची तीन उपक्षेत्रे एके काळी होती. पुढे ह्या क्षेत्रांना स्वतंत्र अभ्यासक्षेत्रांचे स्थान प्राप्त झाले. ⇨तुलनात्मक मानसशास्त्र, ⇨विकासात्मक मानसशास्त्र आणि वर्तन आनुवंशिकी (बिहेव्हिअर जेनेटिक्स, सायकॉलॉजिकल जेनेटिक्स आणि सायकोजेनेटिक्स ही वर्तन आनुवंशिकी ह्या अभ्यासक्षेत्राची प्रचलित इंग्रजी नावे) ही ती तीन अभ्यासक्षेत्रे होत. मानवतेवर प्राण्यांचे परिपक्वन, त्यांच्या सहजप्रवृत्ती, त्यांची ज्ञानसंपादनप्रक्रिया, संवेदनशीलता, स्मृतिक्षमता, त्यांची किमान प्राथमिक पातळीवरील संकल्पनात्मक विचार करण्याची क्षमता व सामाजिक जीवन ह्यांचा अभ्यास तुलनात्मक मानसशास्त्र करते तथापि तो करीत असताना मनुष्यजातीशी तुलना करण्याची त्या अभ्यासक्षेत्राची दृष्टी असते. माणसांमध्ये ज्याप्रमाणे काही व्यक्ती विकृत वर्तन करताना आढळतात, त्याचप्रमाणे प्राण्यांमध्येही विकृत वर्तन करणारे प्राणी दिसून येतात. अशा प्राण्यांच्या वर्तनाची कारणे शोधून काढणे हेही तुलनात्मक मानसशास्त्राच्या क्षेत्रात मोडते. विविध जातींच्या प्राण्यांच्या संदर्भांतील महत्त्वपूर्ण माहिती मनुष्य जातीशी तुलना करीत मिळविल्याने मनुष्याच्या प्रेरणा, त्याचे मनोव्यापार, तसेच त्याचे वर्तनप्रकार ह्यांवरही प्रकाश पडतो. माणसाच्या संपूर्ण जीवनात−म्हणजे गर्भावस्थेपासून मृत्यूपर्यंत−जे शारीरिकमानसिक व समग्र संघटनात्मक बदल घडून येतात, त्यांची योग्य प्रकारे नोंद घेऊन त्यांचा अन्वय लावण्याचा प्रयत्न विकासात्मक मानसशास्त्र करते. प्रसूतिपूर्व कालखंड, अर्भकावस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, तारूण्यावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था ह्यांसारखे, व्यक्तीच्या विकासात्मक अभ्यासाचे कालखंड पाडून त्या त्या कालखंडात मानवी आयुष्यात होणारे बदल नेमकेपणे अभ्यासण्याचा प्रयत्न विकासात्मक मानसशास्त्र करते. व्यक्तीच्या वर्तनात जी गुणलक्षणे (सायकॉलॉजिकल कॅरॅक्टरिस्टिक्स किंवा फेनोटाइप्स) दिसून येतात, त्यांचा त्या व्यक्तींच्या आनुवंशिकतेशी असलेला संबंध हा वर्तन आनुवंशिकीचा विषय होय. एके काळी ‘विकास मानसशास्त्र’ ह्या संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या मानसशास्त्राच्या ह्या शाखेची उपर्युक्त तीन उपेक्षेत्रे आता स्वतंत्र अभ्यासक्षेत्रे झाल्यामुळे ‘विकास मानसशास्त्र’ ह्या संज्ञेला आता केवळ ऐतिहसिक महत्त्व उरलेले आहे.
माणसाच्या वर्तनातून प्रत्ययास येणाऱ्या गुणलक्षणांमधील कोणती गुणलक्षणे कोणत्या जनुकांमधून (जीन्स) विकसित होतात, ह्याचा शोध घेणे वर्तन आनुवंशिकीचे प्रमख कार्य होय. सर्व विद्यमान जीव हे अत्यंत प्राचीन व साध्या जीवांपासून क्रमाक्रमाने विकास पावत आलेले असून ते परिवर्तनीय आहेत ही ⇨चार्ल्स डार्विन (१८०९−८२) ह्यांच्या जैव क्रमविकासाच्या सिद्धांतातील मध्यवर्ती कल्पना वर्तन आनुवंशिकी ह्या अभ्यासक्षेत्राला प्रेरक ठरली. मानवी जनुकांमध्ये योग्य ते बदल घडवून आणता आले, तर इष्ट ती गुणलक्षणे नव्या पिढ्यांमधून विकसित करता येतील, अशा उमेद ह्या अभ्यासक्षेत्राने बाळगली आहे. ⇨सर फ्रान्सिस गॉल्टन (१८२२−१९११) ह्या इंग्रज शास्त्रज्ञांनी परिवर्तन, निवड आणि समायोजन ही तत्त्वे वर्तन आणि आनुवंशिकता ह्यांच्याशी निगडीत अशा प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी प्रथम उपयोगात आणली. हिरेडिटरी जीनिअस (१८६९) ह्या त्यांच्या ग्रंथात त्यांनी असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला, की अंगी लोकोत्तर गुण असलेल्या प्रतिभावंत व्यक्ती काही विशिष्ट कुटुंबांत वारंवार जन्माला येतात आणि ह्या वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण केवळ योगायोगाच्या वा परिसराशी संबंधित अशा कारणांच्या आधारे देता येत नाही. विशिष्ट वंशावळींचे (पेडिग्री) विश्लेषण करण्याचे तंत्र प्रथम गॉल्टन ह्यांनीच वापरले त्याचप्रमाणे मानवी वर्तनातून प्रत्ययास येणाऱ्या गुणलक्षणांतील परिवर्तनांचे मूल्यमापन करण्यासाठी जीवसांख्यिकीवर आधारलेली संशोधनपद्धतीही त्यांनीच विकसित केली. मानवी आनुवंशिकतेच्या अभ्यासाच्या संदर्भात जुळ्या भावंडांतील साम्याचे असलेले महत्त्व त्यांनी ओळखले. लंडन येथील ‘युनिव्हर्सिटी कॉलेजा’त सुप्रजाजननशास्त्राचे ‘गॉल्टन प्राध्यापक’ हे पद भूषविणाऱ्या ⇨कार्ल पीअर्सन (१८५७−१९३६) ह्यांनी गॉल्टन ह्यांची जीवसांख्यिकीवर आधारलेली कार्यपद्धती आणि मानवी आनुवंशिकता ह्यांचा अभ्यास पुढे चालू ठेवला. आनुवंशिकतेची वैज्ञानिक उपपत्ती मांडून आनुवंशिकतेच्या आधुनिक शास्त्राचा पाया घालणारे ⇨ग्रेगोर योहान मेंडेल (१८२२−८४) ह्यांचे ह्या क्षेत्रातले पायाभूत कार्य आणि त्यांच्या उपपत्ती ह्यांपासून प्रेरणा घेऊन ह्या क्षेत्रात ⇨टॉमस हंट मॉर्गन (१८६६−१९४५) व ⇨सर रॉनल्ड एल्मर फिशर (१८९०−१९६२) ह्यांनी लक्षणीय काम केले. मॉर्गन ह्यांनी ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर ह्या फळमाशीवर प्रयोग करून आनुवंशिकतेच्या संदर्भात महत्त्वाचा असा ‘गुणसूत्र सिद्धांत’ मांडला. ह्या माशीची अळी पूर्ण वाढल्यानंतर तिच्या लाला ग्रंथींमधील कोशिकांत असलेल्या गुणसूत्रांचा अभ्यासासाठी उपयोग होतो. प्रयोगशाळेत बदलत्या परिस्थितीत तिचे सहज प्रजनन घडवून आणता येते. त्याचप्रमाणे ह्या माशीचे जीवनचक्र अवघे दहा दिवसांचे असल्यामुळे एका वर्षाच्या कालावधीत तिच्या तीस ते पस्तीस पिढ्या अभ्यासासाठी मिळू शकतात. फिशर हे सांख्यिकीचे तज्ज्ञ होते तथापि आनुवंशिकी हेही त्यांचे एक महत्त्वाचे अभ्यासक्षेत्र होते. ग्रेगोर मेंडेल ह्यांच्या अनुहरण सिद्धांतासंबंधीचे गैरसमज त्यांनी दूर केले आणि मनुष्याच्या आप्तांमधील आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत जाण्याची प्रक्रिया मेंडेल ह्यांनी मांडलेल्या अनुहरण सिद्धांताप्रमाणेच होते. हे त्यांनी निदर्शनास आणले. द जेनेटिकल थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन (१९३०) ह्या ग्रंथातच त्यांनी सुप्रजाजनन शास्त्रावरील आपले विचार मांडले. वर्तनाच्या संदर्भात आनुवंशिकतेचा असलेला संबंध किती गुंतागुंतीचा आहे, हे आर्. सी. ट्रायन ह्यांनी प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांतून दिसून आले. तथापि त्यांनी वेचक प्रजननाची (सिलेक्टिव्ह ब्रीडिंग) पद्धत वापरून उंदरांवर केलेल्या प्रयोगांतून ज्ञानसंपादन आणि आनुवंशिक घटक ह्यांतील संबंध स्पष्ट झाला. छिन्नमानसी (स्किझोफ्रेनिक) रुग्णांच्या रक्ताच्या नात्यातील माणसे छिन्नमानसी बनण्याची शक्यता अधिक असते, हे वर्तन आनुवंशिकीच्या क्षेत्रातील प्रयोगाभ्यासातून दिसून आले आहे. ⇨ग्रॅनव्हिल स्टॅनली हॉल (१८४४−१९२४), डीएनएचे संशोधन करून जेम्स ड्यूई वॉटसन आणि मॉरिस ह्यू फ्रेडरिक विल्किन्झ ह्यांच्यासह १९६२ सालचे वैद्यकाचे नोबेल पारितोषिक मिळविणारे ⇨फ्रॅन्सिस हॅरी कॉम्पटन क्रिक (१९१६− ) ह्यांच्या संशोधनकार्यामुळे, तसेच जे. एल्. फुलर व डब्ल्यू. टॉम्पसन ह्यांच्या बिहेव्हिअर जेनेटिक्स (१९६०), जे. हिर्शसंपादित बिहेव्हिअर जेनेटिक-अनॅलिसिस (१९६७) ह्या ग्रंथांनी वर्तन आनुवंशिकीच्या क्षेत्रात मोलाची भर घातली आहे.
कुलकर्णी, अ. र.