वॉसॉ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी विस्कॉन्सिन राज्यातील मॅराथॉन परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३७,०६० (१९९०). हे विस्कॉन्सिन नदीकाठावर ग्रीन बे शहराच्या वायव्येस सु. १३६ किमी.वर वसले आहे. लाकूड व्यवसायाच्या उद्देशाने मौंटॅना राज्यातील सेंट लूइस येथून पायी प्रवास करीत आलेल्या जॉर्ज स्टीव्हन्झ या व्यक्तीने १८३९ मध्ये या शहराची स्थापना केल्याचे मानले जाते. आसमंतातील पाइन वृक्षांची विपुलता तसेच लाकडाचा व्यवसाय सुरू करण्यास अनुकूल परिसर म्हणून त्याने येथे सुरुवातीस लाकडे कापण्याची गिरणी सुरू केली. तेव्हापासून कापीव इमारती लाकडांसाठी हे शहर विशेष प्रसिद्धी पावले.

सुरुवातीस हे शहर ‘बिग बुल फॉल्स’ या नावाने ओळखले जात असे. तथापि चिपेवा इंडियन बोली भाषेतील वॉसॉ म्हणजे ‘अतिदूरचे ठिकाण’ म्हणून यास सांप्रतचे नाव प्राप्त झाले (१८७२). विस्कॉन्सिन राज्याच्या समृद्ध व विपुल अशा दुग्धोत्पादन प्रदेशात वसले असल्याने वॉसॉ हे दूधसंकलन व वितरण यांचे प्रमुख केंद्र बनले असून औद्योगिक व व्यापारी दृष्ट्याही प्रगत झाले आहे. येथे राज्यनियंत्रित विस्कॉन्सिन खोरे सुधारणा केंद्राचे मुख्यालय आहे. या केंद्राद्वारे येथील कारखान्यांना नदीचे पाणी पुरविण्यात येते आणि त्या योजनेतूनही शहराच्या विकासार्थ उत्पन्न मिळते. येथे औद्योगिक यंत्रसामग्री, विजेची यंत्रे, लाकूडकाम, कागद व कागद-उत्पादने, प्लॅस्टिके, रसायने, ॲल्युमिनियम, चीज-उत्पादने, दारू गाळणे इ. उद्योग चालतात. येथे ग्रॅनाइट दगडांच्या खाणीही आहेत. विशेषतः इमारती लाकडाच्या मोठ्या प्रमाणावरील उपलब्धतेमुळे वॉसॉचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. येथे विस्कॉन्सिन विद्यापीठाची, दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाची, एक विस्तारशाखा असून वॉसॉ तांत्रिक संस्थेमार्फत येथील विद्यार्थ्याना निवासी वास्तूंचे रचनाकल्प तसेच इलेक्ट्रॉनिकी व इतर उद्योग यांचे प्रशिक्षण दिले जाते.

शहराच्या नैर्ऋत्येस सु. ६ किमी.वरील ‘रिब मौंटन स्टेट पार्क’ हे पर्यटकांचे आकर्षण स्थळ असून हिवाळी खेळांकरिता प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे वॉसॉच्या पूर्वेस सु. २४ किमी.वरील ओ क्लेअर नदीची निदीरी (घळई) पर्यटनदृष्ट्या आकर्षण केंद्र बनली आहे. शहराचा कारभार महापौर व कनिष्ठ अधिकारी (ऑल्डरमेन) यांमार्फत चालतो.

संकपाळ, ज. बा.