वॉल फ्लॉवर : (हिं. तोद्रिसुर्ख लॅ. चेरँथस चेरी कुल-क्रुसीफेरी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ही सु. ३०-७५ सेंमी. उंच, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), सरळ वाढणारी, किंचित लवदार व ओषधीय वनस्पती [⟶ ओषधि] दक्षिण व मध्य यूरोपात आढळते. इंग्लंडमध्ये ती सामान्यतः भिंतीवर वाढलेली आढळते त्यावरून इंग्रजी नाव पडले आहे. भारतात ती बागेत लावतात. हिच्या सर्व अवयवांवर दुभंगलेले केस असतात व ते पृष्ठभागावर सपाट पसरलेले असतात. खोड सरळ अनेक फांद्यायुक्त असते. पाने साधी व एकाआड एक, अखंड, तलवारीसारखी व टोकदार असतात फुले मोठी, द्विलिंगी, गोड वासाची, बहुधा विविध पिवळसर छटांची असून फांद्यांच्या टोकांना मंजरीवर येतात [⟶ पुष्पबंध]. बाजूच्या दोन संदलांच्या तळाशी पिशवीप्रमाणे फुगवटा असतो [⟶ फूल]. फूल लांबट (४-६ सेंमी.), मोहरीच्या शेंगेसारखे काहीसे चपटे आणि बिया अनेक, इतर शारीरिक लक्षणे ⇨क्रुसीफेरी कुलाच्या (अथवा मोहरी कुलाच्या) वर्णनात दिल्याप्रमाणे असतात.

वॉलफ्लॉवर काष्ठयुक्त बहुवर्षायू असली, तरी बियांपासून नेहमी पुन्हा लागवड करणे चांगले, कारण एकदोन वर्षानंतर बहर कमी होतो. बी लावल्यानंतर रोपांना दुसऱ्या वर्षी फुले येतात. फेब्रुवारीत बी पेरून इंग्लंडमध्ये नाताळच्या सणाकरिता फुले मिळवतात. खुज्या झाडांचे व दुहेरी फुलांचे, तसेच विविध पिवळ्या छटांचे, तपकिरी व जांभळे असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. यूरोपइतकी ही वनस्पती अमेरिकेत लोकप्रिय नाही. बी पौष्टिक, मूत्रल (लघवी साफ करणारे), कफोत्सारक (कफ पाडून टाकणारे), दीपक (भूक वाढविणारे), वाजीकर (कामवासना वाढविणारे) असून ज्वरात आणि डोळ्याला इजा झाल्यास देतात. फुले आर्तवजनक (विटाळ सुरू करणारी), पक्षाघात, नपुंसकत्व व हृद्रोगावर उपयुक्त असतात. सुक्या पाकळ्या उत्तेजक व सुगंधी असतात तथापि त्यांतील सुगंधी बाष्पनशील (उडून जाणाऱ्या) तेलाचा सुगंधी द्रव्यांत फारसा वापर करीत नाहीत. फुलातून सु. ०.०६% बाष्पनशील तेल काढतात ते पिवळे असते त्याला विरल (पातळ) अवस्थेत चांगला वास येतो. बियांत २०% स्थिर तेल असते.

संदर्भ: Kinikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. I,  Delhi, 1975.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.