वॉलरस : हे नाव मूळ स्वीडिश शब्द व्हॉलरॉस (Hvalross Whale horse) यापासून आले आहे. याचे मोर्स असे दुसरे नावे आहे. वॉलरसाचा स्तनी वर्गात ओडोबेनिडी कुलात समावेश होतो. हा जलचर प्राणी असून जलीय जीवनास पूर्णपणे अनुकूल झालेला आहे. उत्तर ध्रुवाजवळील बर्फमय प्रदेशात लहान लहान कळप करून हे प्राणी राहतात. यांना किनाऱ्यावर किंवा हिमखंडावर राहण्यास जास्त आवडते. हे सागरातील पाण्यात पोहतात आणि भक्ष्याच्या शोधार्थ ६० मी. देखील पाण्याखाली जातात. श्वसनासाठी काही मिनिटामिनिटांनी हे पाण्याच्या पृष्ठभागावर येतात आणि शेवटी बर्फावर व हिमखंडावर लोळण घेतात. पॅसिफिक वॉलरसाचे (ओडोबेनस रोझमेरस डायव्हर्जन्स) दात लांब आणि बारीक असून हे बेअरिंग समुद्र व आर्क्टिक महासागरात आढळतात. अटलांटिक वॉलरस (ओडोबेनस रोझमेरस) उत्तर अटलांटिक आणि लॅब्रॅडॉरच्या दक्षिणेकडील आर्क्टिक महासागरात आढळतात. वॉलरसांचे जीवाश्म (शिळाभूत अवशेष) इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स व बेल्जियम या देशांतील तृतीय संघाच्या (सु. ६.५ ते १.२ कोटी वर्षापूर्वीच्या) खडकांत मिळाले आहेत.
वॉलरस हा सील माशाशी साम्य असलेला मोठा जलचर प्राणी आहे. नर तसेच मादीमध्ये रदनक दंत (सुळे) बरेच लांब होऊन उद्दन्त (मोठे सुळे) झाले आहेत. त्यांची लांबी ६० सेंमी., जाडी १० सेंमी. आणि प्रत्येकी वजन सु. ४ किग्रॅ. एवढे असू शकते. या प्राण्याची लांबी ३-४ मी. व वजन सु. ६५० ते ९७५ किग्रॅ. असते. या वे शरीर आखूड केसांनी आच्छादिलेले असून काही जातींच्या अंगावर दाट लोकरीसारखी फर असते व ती बरीच मौल्यवान असते. प्रौढ प्राण्यांचे केस फार विरळ होतात. वॉलरसाचे डोके गोल, मान अलग व स्पष्ट आणि डोळे लहान असून याला बाह्यकर्ण नसतात. आखूड व रुंद मुस्कटावर दोन्ही बाजूंनी राठ गालमिशा असतात. याची शेपटी फारच लहान असते व शरीराबाहेर बोटाएवढी दिसते. याचे हात कोपरापासून पुढे शरीराबाहेर असतात आणि ते पसरट व चपटे असतात. पाय पंख्यासारखे पसरट असतात.
वॉलरस लहान कळप करून राहतात. त्यांची गर्जना दीर्घ व मोठी असून तिची ते पुष्कळ वेळा पुनरावृत्ती करतात. त्यांचे मुख्य खाद्य म्हणजे शिंपले व शुक्ती (माखली) यांसारखे बायव्हाल्व्ह (मृदुकाय) प्राणी हे होय. हे प्राणी सागरतळातून ते आपल्या उद्दन्ताच्या साहाय्याने खोदून काढतात.
मादीची गर्भधारणा दोन वर्षांतून एकदाच होत असून ती एका वेळेस एका पिल्लास जन्म देते. ती पिल्लास दोन वर्षापर्यंत स्तनपान करविते. त्यानंतर पिल्लाचे उद्दन्त बरेच लांब वाढल्यामुळे ते आपले भक्ष्य स्वतः खोदून काढू शकते. वॉलरस हा फार प्रेमळ व गरीब प्राणी आहे परंतु त्याच्यावर कोणी हल्ला केला असता तो क्रूर बनतो आणि स्वसंरक्षणासाठी आपल्या उद्दन्तांचा पुरेपूर उपयोग करतो. बहुतेक पूर्ण कळप एकोप्याने शत्रूशी लढा देतो. त्याचे प्रमुख शत्रू उत्तर ध्रुवीय अस्वल व मानव हे होत. मादी आपल्या पिल्लास हाताच्या साहाय्याने मार्गदर्शन करते आणि छातीच्या साहाय्याने त्याला निवाऱ्याच्या जागी पळविते. हे प्राणी एवढे शक्तिमान असतात की, आपल्या उद्दन्ताच्या मदतीने ते लहान होडी बुडवू शकतात.
वॉलरसाचे मांस हे एस्किमो व चुकची लोकांचे महत्त्वाचे खाद्य आहे. त्याच्या चरबीपासून काढलेले तेल दिव्यात जाळण्यासाठी वापरतात. चामड्यापासून घरांचे छत, होड्यांची आच्छादने आणि साज तयार करतात. हस्तिदंतासारख्या उद्दन्तांवर नक्षीकाम करतात. त्याच्यापासून मिळणाऱ्या या उपयुक्त पदार्थांसाठी वॉलरसांची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असल्याने त्यांची संख्या खूपच कमी झाली आहे.
डाहाके, ज्ञा. ल.
“