नू, ऊ : (२५ मे १९०७ – ). स्वतंत्र ब्रह्मदेशाचे पहिले पंतप्रधान व ब्रह्मी स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते. याकिन नू या नावानेही ते प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात वकेम येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ऊ सान दून व आईचे नाव दॉ सॉ खिन. प्राथमिक शिक्षण वकेम येथे घेऊन त्यांनी मिओमा नॅशनल हायस्कूलमध्ये माध्यमिक व रंगून विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले. रंगून विद्यापीठात असताना ते विद्यार्थिसंघटनेचे अध्यक्ष होते. आँग सानबरोबर त्यांनी एकदा विद्यार्थ्यांचा मोठा संपही घडवून आणला होता. त्यामुळे काही दिवस त्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले होते. पुढे १९२९ मध्ये ते बी. ए. झाले व त्यांनी शिक्षकी पेशा पतकरला. या सुमारास त्यांचा विवाह दॉ म्या यी या युवतीशी झाला. त्यांना पाच मुले आहेत. ते पान्टानॉ येथील राष्ट्रीय विद्यालयात मुख्याध्यापक झाले. या वेळी ऊ थांट यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध आला तथापि त्यांच्या क्रांतिकारक वृत्तीला या पेशात रस वाटेना. म्हणून ते रंगून विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा दाखल झाले (१९३४). तेथे असताना विद्यार्थ्यांच्या ब्रिटिशविरोधी चळवळीचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. ब्रिटिश व ब्रह्मी नेते यांत संघर्ष होऊन (१९३६) त्यांना विद्यापीठातून कायमचे काढून टाकण्यात आले. साहजिकच त्यांची लोकप्रियता वाढली आणि त्यांच्याकडे राष्ट्राचे नेतृत्व आले. ‘आम्ही ब्रह्मी’ या संघटनेत सामील होऊन (१९३७) देशव्यापी आंदोलनास त्यांनी चालना दिली. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावून ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात डांबले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपानने ब्रह्मदेशावर आक्रमण केले आणि त्यांची आपोआप सुटका झाली (१९४०). ते बे-मॉच्या कळसूत्री सरकारमध्ये मंत्री झाले तथापि जपानविरुद्धचा गुप्तप्रचार त्यांनी चालू ठेवला. पुढे त्यांनी आँग सानच्या मदतीने अँटीफॅसिस्ट पीपल्स फ्रीडम लीग ही संस्था स्थापन केली. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिशांनी ब्रह्मदेशास आँन सानच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार देऊ केले आणि पुढे १९४८ च्या करारान्वये ब्रह्मदेश स्वतंत्र झाला. दरम्यान आँग सान यांचा खून झाला. ऊ नूंची स्वतंत्र ब्रह्मदेशाचे पहिले पंतप्रधान म्हणून निवड झाली (१९४७–५८). त्या आधी ते संविधान परिषदेचे अध्यक्ष होते (१९४६-४७).

त्यांनी लोककल्याणासाठी जमिनींच्या राष्ट्रीयीकरणाचा कायदा केला तथापि सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा आपल्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत त्यांना पूर्ण करता आल्या नाहीत, तसेच देशात शांतता व स्थैर्य निर्माण करण्यात त्यांना फारसे यश आले नाही. स्वातंत्र्यानंतर कम्युनिस्ट व कारेन जमातीने चळवळ सुरू केली. त्यामुळे दंगेधोपे सुरू झाले. १९५६ मध्ये पक्षांतर्गत दुही निर्माण झाली, तेव्हा त्यांनी पंतप्रधानकीचा राजीनामा दिला. जनरल ने विन यांच्या नेतृत्वाखाली काळजीवाहू सरकार काही दिवस अस्तित्वात होते. ऊ नू पुन्हा १९५७ व १९६० मध्ये पंतप्रधान म्हणून निवडले गेले पण जनरल ने विन यांनी १९६२ मध्ये लष्करी क्रांती घडवून आणून सर्व सत्ता आपल्या हाती घेतली आणि ऊ नूंना कैद केले. १९६६ मध्ये त्यांना सोडण्यात आले. त्यांचा पार्लमेंटरी डेमॉक्रसी हा पक्ष पुन्हा चळवळीस उद्युक्त झाला. आपणास पुन्हा कैद केले जाईल, म्हणून ते प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने देशाबाहेर पडले (१९६९). त्यांनी यूरोप, अमेरिका, भारत इ. देशांत प्रवास करून थायलंडमध्ये वास्तव्य केले. पुन्हा ते ब्रह्मदेशात आले (१९७०) व आपल्या पक्षाचे कार्य त्यांनी पुन्हा सुरू केले. या पक्षाने म्यावडी हे थायलंड सीमेजवळील गाव ताब्यात घेतले (१९७४). आपल्याला अद्यापि ब्रह्मी जनतेचा पाठिंबा आहे, असा त्यांचा दावा असून ब्रह्मदेशाच्या राजकारणाबद्दल त्यांना अजूनही आस्था आहे.

राजकारणात असूनही त्यांनी ब्रह्मी वाङ्‌मयात मोलाची भर घातली आहे. ब्रह्मी भाषेतील त्यांचे स्फुटलेखन व ग्रंथलेखन विपुल आहे. द पीपल विन थ्रू (इं. शी. १९५२), द वेजिस ऑफ सिन (इं. शी. १९६०) ही नाटके तसेच बुद्ध, धम्म संघ (प्रबंध, १९५८), ऊ नू सॅटर्डेज सन (इं. शी. १९७६) हे आत्मवृत्त, यांसारखे त्यांचे लेखन विशेष प्रसिद्ध आहे. नाटकांसह कादंबरी, धार्मिक, ऐतिहासिक व राजकीय निबंध-प्रबंध इ. प्रकारांतील एकूण बारा ग्रंथ त्यांच्या नावावर आढळतात. तथापि त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे आधुनिक काळाच्या संदर्भात केलेले बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन हे होय. भारतात १९७४ च्या उत्तरार्धात ते आले आणि भोपाळ येथे स्थायिक झाले. तेथे राहून बौद्ध धर्माच्या प्रचारकार्यास त्यांनी वाहून घेतले आहे. मुत्सद्दी, लेखक व बौद्ध पुनरुज्जीवनवादी म्हणून त्यांना मानाचे स्थान आहे.

संदर्भ : Butwell, R. A. U Nu of Burma, Standford, 1969.

देशपांडे, सु. र.