वॉर्सा : पोलंडमधील एक प्रमुख औद्योगिक तसेच लोकसंख्येने सर्वांत मोठे व राजधानीचे शहर. सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक दृष्ट्या ते यूरोपात प्रसिद्ध आहे. लोकसंख्या १६,५९,४०० (१९८६ अंदाज). ते व्हिश्चला नदीच्या दोन्ही काठांवर मॉस्कोच्या नैर्ऋत्येस सु. १,१५० किमी. आणि बर्लिनच्या पूर्वेस सु. ५१५ किमी.वर देशाच्या मधोमध वसले आहे. त्याच्या भौगोलिक मध्यवर्ती स्थानामुळे व्यापारी दृष्ट्या त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे.

थोर पोलिश कवी मीट्‌सक्येव्हिचचे स्मारक, वॉर्सा.वॉर्साचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही तथापि दहाव्या शतकात विद्यमान वॉर्सा स्थळाजवळ स्लाव्हिक वसाहत होती. बाराव्या शतकात मसोव्हिआ राजपुत्राच्या ऊयास्टो या किल्ल्याजवळ वॉर्सा नावाचे खेडे वसले. पुढे तेथे मसोव्हिआची राजधानी आली (१४५३). सोळाव्या शतकात यागेलन घराण्याची १३८६-१५७२ दरम्यान पोलंडवर सत्ता होती. त्यावेळी पोलिश-लिथ्युएनियन जोड-राज्याची ‘सेम’ (संसद) येथे होती. तिसरा झिग्मूंट याने क्रेकोहून आपली राजधानी वॉर्सा येथे हलविली (१५९६). त्या वेळेपासून वॉर्साचे ऐतिहासिक महत्त्व वाढले. सतराव्या-अठराव्या शतकांत रशियन-स्वीडिश लोकांनी त्यावर आक्रमणे केली आणि अल्पकाळ सत्ता मिळविली. यादवी युद्धातून पोलंडचे तीन वेळा विभाजन झाले आणि ऑस्ट्रिया, प्रशिया व रशिया यांनी सर्व देश आपापसांत वाटू घेतला. तिसऱ्या विभाजनाच्या वेळी (१७९५) वॉर्सा हे प्रशियाच्या आधिपत्याखाली आले. पहिल्या नेपोलियनने ते जिंकले (१८०६) आणि ग्रँड डची ऑफ वॉर्सा ही स्वतंत्र गादी स्थापन केली पण नेपोलियनच्या पराभवानंतर (१८१४) ती संपुष्टात येऊन व्हिएन्ना काँग्रेसने (१८१५) हा भाग रशियाला बहाल केला. एकोणिसाव्या शतकात पोलिश जनतेने स्वातंत्र्यासाठी अनेक अयशस्वी उठाव केले. पहिल्या महायुद्धात जर्मनीने हा प्रदेश पादाक्रांत केला. जर्मनीच्या पराजयानंतर नोव्हेंबर १९१८ रोजी पोलंड स्वतंत्र होऊन वॉर्सा ही त्याची राजधानी झाली. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने हा देश पुन्हा (१७ सप्टेंबर१९३७) हस्तगत करून वॉर्साचे अपरिमित नुकसान केले, हजारो नागरिकांना ठार वा कैद केले, पाच लाख ज्यूंना शहराच्या एका भागाला (घेटो) डांबून ठेवले, ज्यूंनी अयशस्वी उठाव केला, तेव्हा जर्मन सैन्याने साठ हजारांना कंठस्नान घातले. रशियन-पोलिश फौजांनी जर्मनांचा १७ जानेवारी १९४५ रोजी पराभव केला आणि पोलंडमध्ये कम्युनिस्ट राजवट स्थापन केली. अल्बेनिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, पूर्व जर्मनी, हंगेरी, रूमानिया वगैरे रशियांकित देशांनी १४ मे १९५५ मध्ये वॉर्सात बैठक घेऊन नाटो संघटनेला शह देण्यासाठी जो करार केला, तो ⇨वॉर्सा करार या नावाने प्रसिद्ध आहे. कम्युनिस्ट राजवटीविरुद्ध अनेक उठाव झाले.१९८० नंतर लेक वालेसा (१९४३- ) यांच्या सॉलिडॅरिटी पक्षाने आंदोलन छेडले. अखेर त्यांच्या पुढाकाराने१५ ऑगस्ट १९८९ रोजी संयुक्त सत्तारूढ झाले.

वॉर्सा हे लोहमार्गांनी बर्लिन, कीव्ह, सेंट पीटर्झबर्ग (लेनिनग्राड), मॉस्को, प्राग आणि व्हिएन्ना या पोलंडबाहेरील शहरांशी जोडलेले आहे. वॉर्साचा आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑकत्स्ये या उपनगरात असून तेथून चौदा देशांशी विमान वाहतूक चालते. झेरॉन या बंदरामार्फत शहरातील आयात-निर्यात होते. शहरात अन्नप्रक्रिया, कापड, मोटारगाड्या, इलेक्ट्रॉनिकीय व विद्युत् उपकरणे तसेच यंत्रसामग्री, सिमेंट, पादत्राणे इत्यादींचे निर्मितिउद्योग चालतात.

दुसऱ्या महायुद्धात वॉर्सामधील अनेक जुन्या-नव्या इमारतींची मोडतोड झाली त्यांपैकी बहुतेक वास्तूंचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. शहरात जगप्रसिद्ध चर्च आणि राजप्रासाद आहेत त्यांपैकी सेंट जॉनचे गॉथिक शैलीतील कॅथीड्रल (चौदावे शतक), बरोक शैलीतील होली क्रॉस चर्च, अभिजात पोलिश शैलीतील सेंट कार्मिलाइट चर्च, लॅझिएन्की राजप्रासाद, कोपर्निकस व आडाम मीट्सक्येव्हिच ह्यांची स्मारके, झिग्मूंटचा स्मृतिस्तंभ यांशिवाय स्टासझिक (अकादमी ऑफ सायंसिस), तिसरा जॉन सॉबेएस्कीचा प्रासाद इत्यादी वास्तू प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या आधुनिक वास्तूंत रशियन वास्तुशैलीतील चाळीस-मजली संस्कृती वा विज्ञान राजभवन आणि दशवर्षीय प्रेक्षागार या लक्षणीय वास्तू असून शहरात शासकीय कार्यालये, बँका, संसदभवन यांच्या आकर्षक वास्तू आहेत. शहरात वॉर्सा विद्यापीठ (स्था.१८१८) आणि टेक्निकल युनिव्हर्सिटी (तंत्रविज्ञान विद्यापीठ-१९१५) ही दोन विद्यापीठे असून तंत्रविज्ञान विद्यापीठाने परजीवीविज्ञान व अणुकेंद्रीय भौतिकी या विषयांतील संशोधनात आंतरराष्ट्रीय मान्यता मिळविली आहे. यांव्यतिरिक्त उच्च शिक्षण देणाऱ्या चौदा संस्था, पंधरा संग्रहालये आणि नॅशनल थिएटर, पोलिश थिएटर यांसारखी रंगमंदिरे, नॅशनल फिलामॉर्निक हॉलसारखी वाद्यवृंद संस्था, तीन नभोवाणी केंद्रे व दूरचित्रवाणी केंद्र या सांस्कृतिक संस्था शहरात कार्यरत आहेत. वॉर्सामधून अनेक वृत्तपत्रे व नियतकालिके प्रसिद्ध होतात. रोमन कॅथलिक पंथाच्या मुख्य उपाध्यायाचे पीठही येथेच आहे.

संदर्भ : 1. Ciborowski, A. A city Destroyed and Rebuilt, Warsaw,1966.

           2. Diskinson, R. E. The West European City, London,1961.

देशपांडे. सु. र.