वॉरिंग्टन : इंग्लंडच्या चेशर परगण्यातील एक बरो व औद्योगिक शहर. लोकसंख्या १,८६,१०० (१९८८). ते लिव्हरपूल व मँचेस्टर शिप कॅनल यांच्या पूर्वेस सु. २६ किमी.वर मर्सी नदीकाठी वसले आहे. १९७४ पर्यंत या जिल्ह्याचा बराचसा भाग लँकाशरमध्ये होता.
पुरातत्त्वीय उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून असे आढळले की, त्याची स्थापना रोमनपूर्व काळात झाली असावी. नंतर येथे रोमनांनी वसाहत केली. मर्सी नदी ओलांडण्यासाठी रोमन काळात बांधलेल्या येथील पुलाचा उल्लेख १३०५ मधील कागदपत्रांत आढळतो. मध्ययुगात कृषिअवजारे आणि वस्त्रोद्योग ह्यांची ही मोठी बाजारपेठ होती. सेंट एल्फिन चर्चच्या खालील जुनी दफनभूमी (भुयार), १५२६ मधील ‘ग्रामर स्कूल’ (महाविद्यालयीन प्रवेशपूर्व शिक्षण देणारे ब्रिटिश विद्यालय) आणि अनेक जुन्या घरांचे लाकडी अवशेष यांतून मध्ययुगातील वस्तीच्या खुणा स्पष्ट दिसतात. एकोणिसाव्या शतकातील लोहमार्गांची बांधणी आणि कोळशाच्या खाणींचा विकास, यांमुळे येथील अनेक उद्योगांना चालना मिळाली. वॉरिंग्टन बरोच्या नववसाहत भागात वस्त्रोद्योग, आसवन्या, लाकूड कापण्याच्या गिरण्या, कागद कारखाने, धातुकाम, चर्मोद्योग आदी धंद्यांचा झपाट्याने विकास झाला. येथील तीन आसवन्या, लाकूड कापण्याच्या गिरण्या, कागद कारखाने, धातुकाम, चर्मोद्योग आदी धंद्यांचा झपाट्याने विकास झाला. येथील तीन आसवन्यांपैकी एकीत गेली सु. २०० वर्षे बंटर वालुकाश्मात खोदलेल्या विहिरीच्या अतिशुद्ध पाण्याचा वापर केला जातो. याशिवाय शहरात रसायने, साबण, विद्युत् उपकरणे इ. तयार करण्याचे छोटेमोठे उद्योग चालतात. लिव्हरपूल-मँचेस्टर प्रदेशातील जटिल अशा मोटारमार्गांजवळील ते एक प्रमुख केंद असून विकास कार्यक्रमाचा एक भाग म्हणून तेथे संशोधन केंद्रे, वस्तूंच्या वखारी व वितरण केंद्रे स्थापण्यात आली आहेत.
येथील मध्ययुगीन काळातील वास्तूंत वॉरिंग्टन अकॅडेमी (तीत ऑक्सिजनचा शोध लावलेला संशोधक जोसेफ प्रीस्टली हा शिक्षक म्हणून होता), सेंट एल्फिनच्या स्मरणार्थ बांधलेले पॅरिश चर्च (त्याचे शिखर ९२ मी.उंच आहे), बेवसे सभागृह या प्रसिद्ध वास्तू असून असून आधुनिक इमारतींत नगरपालिका कार्यालयाचा भव्य प्रासाद, कलावीथी आणि संग्रहालय यांचा अंतर्भाव होतो.
पंडित, भाग्यश्री.