वॉटसन, जेम्स ड्यूई : (६ एप्रिल-१९२८- ) अमेरिकन जीवभौतिकीविज्ञ. ⇨आनुवंशिकतेचा आधार असलेल्या डीएनए (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल) या ⇨न्यूक्लिइक अम्लाच्या रेणूची त्रिमितीय संरचना शोधून काढण्यासाठी महत्त्वाचे काम केल्याबद्दल त्यांना ⇨फ्रॅन्सिस हॅरी कॉम्पटन क्रिक आणि ⇨मॉरिस ह्यू फ्रेडरिक विल्किन्झ यांच्याबरोबर १९६२ सालचे वैद्यकाचे अथवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
वॉटसन यांचा जन्म शिकागो येथे झाला. त्यांनी प्राणिविज्ञानाची बी.एस्सी. पदवी (१९४७) शिकागो विद्यापीठातून व पीएच्. डी. पदवी (१९५०) इंडियाना विद्यापीठातून संपादन केली. नॅशनल रिसर्च कौन्सिलची शिष्यवृत्ती मिळाल्यावर मर्क फेलो म्हणून त्यांनी कोपनहेगन येथे व्हायरसावरील (विषाणूवरील) संशोधन केले (१९५०-५१). त्याच वेळेस त्यांनी डीएनएचे अनुसंधान करण्याचे ठरविले होते व पुढील दोन वर्षे त्यांनी तसे संशोधन केंब्रिजमधील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत केले. त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (१९५३-५५) येथे व हार्व्हर्ड विद्यापीठात जीवविज्ञानाचे प्राध्यापक (१९६१-७६) म्हणून काम केले. १९६८ साली ते कोल्ड स्प्रिंग हार्बर, लाँग आयलंड (न्यूयॉर्क) येथील लॅबोरेटरी ऑफ क्वांटिटेटिव्ह बायॉलॉजी या प्रयोगशाळेचे प्रमुख झाले. ही प्रयोगशाळा म्हणजे रेणवीय जीवविज्ञानाच्या संशोधनाचे एक जगप्रसिद्ध केंद्र आहे.
व्हायरसावर इंडियाना विद्यापीठात केलेले संशोधन व ओसवाल्ड एव्हरी यांचे प्रयोग यांवरून डीएनएचा आनुवंशिक लक्षणांवर परिणाम होतो, हे उघड झाले होते. त्यामुळे न्यूक्लिइक अम्लाच्या रेणूविषयी थोडीफार माहिती झाल्याशिवाय जीनांची म्हणजे जनुकांची (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांमधील आनुवंशिक घटकांच्या एककांची) माहिती होऊ शकणार नाही, याची वॉटसन यांना खात्री होती. तसेच कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत प्रथिनांच्या स्फटिकांतून क्ष-किरण पाठवून मिळविण्यात आलेल्या छायाचित्रीय आकृतिबंधांचा उपयोग करून प्रथिनाच्या रेणूंचा अभ्यास करण्यात येत असल्याचेही त्यांना समजले होते. १९५१ साली विल्किन्झ यांची ओळख झाल्यावर त्यांना विल्किन्झ यांनी क्ष-किरण विवर्तन तंत्राद्वारे (अपारदर्शक पदार्थांच्या कडेवरून किरणांचा मार्ग बदलण्याच्या गुणधर्मांचा उपयोग करणाऱ्या तंत्राद्वारे) मिळविलेली स्फटिकी डीएनएची प्रतिकृती पहावयास मिळाली. त्याच वर्षी ते कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत दाखल झाले व तेथे क्रिक यांच्याशीही त्यांची ओळख झाली. या दोघांनी मग डीएनए रेणूच्या संरचनेवर लक्ष केंद्रित केले. पैकी वॉटसन यांनी क्ष-किरण विवर्तन तंत्र आत्मसात करून प्रयोगांवर भर दिला, तर क्रिक यांनी डीएनएच्या संरचनेविषयीच्या गणितीय व सैद्धांतिक बाजूंवर लक्ष केंद्रित केले. दोघांनी बिल्किन्झ यांच्या तंत्राच्या मदतीने डीएनएच्या रेणूचा ⇨त्रिमितीय रसायनशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास केला. १९५२ साली वॉटसन यांनी तंबाखूवरच्या केवडा रोगाच्या व्हायरसाच्या आवरणातील प्रथिनाची संरचना निश्चित केली. चार कार्बनी क्षारक हे डीएनएचे आवश्यक घटक असून ते विशिष्ट जोड्यांच्या रूपात जोडलेले असले पाहिजेत, असे १९५३ साली अचानकपणे त्यांच्या लक्षात आले. या शोधाच्या आधारे वॉटसन व क्रिक यांनी डीएनए रेणूची सर्पिल (गोल जिन्याप्रमाणे दिसणारी किंवा दुहेरी साखळीच्या पिळाची) संरचना सुचविली. पिवळवटलेल्या शिडीप्रमाणे दिसणाऱ्या या मांडणीला ‘वॉटसन-क्रिककृत प्रतिकृती’ असे संबोधण्यात येऊ लागले. डीएनए रेणू आपल्या रेणूची जशीच्या तशी प्रतिकृती कशी निर्माण करतो हे या प्रतिकतीने दाखविता आले आणि यावरून जीनाचे व शेवटी गुणसूत्राचे द्विगुणन (मूळच्या एकगुणित संख्येच्या दुप्पट संख्या होण्याची क्रिया) कसे होते, हे माहीत झाले. [⟶ आनुवंशिकी, न्यूक्लिइक अम्ले रेणवीय जीवविज्ञान].
वॉटसन यांनी डीएनएच्या नायट्रोजन क्षारकांच्या क्रमावर आधारलेल्या जननिक संकेतलिपीची फोड करण्यास मदत केली तसेच त्यांनी ही संकेतलिपी कोशिकेतील प्रथिननिर्मात्या संरचनेकडे पोचविण्याचे काम करणारे संदेशक (मेसेंजर) आरएनए (रिबोन्यूक्लिइक अम्ल) शोधून काढले. पुढे वॉटसन यांनी कर्करोगावरच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले.
डीएनए रेणूंची संरचना, प्रथिनांचे संश्लेषण, कर्करोगाचा प्रादुर्भाव इ. विषयांवर त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले आहेत. मॉलिक्युलर बायॉलॉजी ऑफ जीन (१९६५) हे त्यांचे पुस्तक आधुनिक जीवविज्ञानासाठी सर्वांत जास्त वापरले जाणारे पाठयपुस्तक ठरले आहे. द डबल हेलिक्स (१९६८) या पुस्तकात त्यांनी वॉटसन-क्रिक प्रतिकृतीविषयीच्या संशोधनाची कथा अतिशय रोचकपणे लिहिली आहे. या पुस्तकाविषयी काही वाद निर्माण झाले होते तरी ते लोकप्रिय होऊन सर्वाधिक खपाच्या पुस्तकांत त्याची गणना झाली होती. यांशिवाय जॉन टूझ यांच्या जोडीने त्यांनी द डीएनए स्टोरी व इतरांबरोबर द रिकाँबिनंट डीएनए:ए शॉर्ट कोर्स (१९८३) आणि द मॉलिक्युलर बॉयालॉजी ऑफ सेल (१९८६) ही पुस्तकेही लिहिली आहेत.
वॉटसन यांना नोबेल पारितोषिकाशिवाय अनेक वैज्ञानिक व वैद्यकीय संस्थांकडून पुढील बहुमानही मिळाले आहेत:एली लिली (१९५९), लास्कर (१९६०) इ. पुरस्कार डी.एस्सी, (शिकागो, १९६१ व इंडियाना १९६३), एल्एल्.डी. (नोत्रदाम, १९६५), एम्.डी. (ब्वेनस एअरीझ) वगैरे सन्माननीय पदव्या क्लेअर कॉलेजर (केंब्रिज, १९६७), रॉयल सोसायटी (लंडन, १९८१) इत्यादींचे सन्माननीय फेलो जॉन जे. कार्टी सुवर्णपदक (१९७१), प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम (१९७७) वगैरे.
पहा: आनुवंशिकी न्यूक्लिइक अम्ले रेणवीय जीवविज्ञान.
भालेराव, यं. त्र्यं. ठाकूर, अ.ना.