वॉटर्लू : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी आयोवा राज्यातील ब्लॅक हॉक परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ७५,९८५ (१९८०). हे शहर सीडार नदीच्या दोन्ही काठांवर डे मॉइन शहराच्या ईशान्येस सु. १७७ किमी.वर वसले आहे. सुरुवातीस हे ‘प्रेअरी रॅपिड्स’ या नावाने ओळखले जात होते (१८४५), परंतु टपाल सेवेसाठी तयार करण्यात आलेल्या दर्शिकेत याचा ‘वॉटर्लू’ असा निर्देश करण्यात आल्यामुळे शहराचे तेच नाव रूढ झाले (१८५१). प्रथमतः येथे लाकूड कापण्याच्या व पिठाच्या गिरण्या उभारण्यात आल्या. येथे लोहमार्गाचे एक विभागीय केंद्र तसेच प्रादेशिक व्यापारी केंद्र उघडण्यात आल्यानंतर शहराच्या विकासात भर पडली. वॉटर्लूस १८६८ मध्ये शहराचा दर्जा मिळाला. हे औद्योगिक व व्यापारी केंद्र असून प्रामुख्याने कृषि-उत्पादनांच्या बाबतीत अग्रेसर आहे. अन्नधान्य, दूध उत्पादन, कुक्कुटपालन, वराहपालन, निकोप जनावरांची पैदास हे येथील प्रमुख व्यवसाय होत. यांशिवाय शहरात मांस डबाबंदीकरण, लाकूड उत्पादन, धातू ओतकाम, मौल्यवान वस्तू ठेवण्याचे करंडक, कपडे, खाद्य उत्पादने, प्लॅस्टिके, प्रशीतके, काचसामान, लोहमार्ग, गृहोपयोगी साधने, इत्यादींचे निर्मितीउद्योग चालतात. येथे कृषि-अवजारे, विशेषतः ट्रॅक्टर, तसेच सिमेंट यांचे व सोयाबीनवर प्रक्रिया करणारे कारखाने आहेत.
शहरात विस्तृत बागबगीचे करण्याचा उद्योग प्रचलित असून पर्यटकांचे ते मोठेच आकर्षण ठरले आहे. येथे ऐतिहासिक व वैज्ञानिक संग्रहालय असून कृत्रिम तारामंडळही आहे. वॉटर्लू हे कलानिर्मितीचे व मनोरंजनाचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथील नगरपालिका दालनाचा नाट्यगृह तसेच कलाप्रदर्शन यांसाठी उपयोग केला जातो गॉस्पेल चर्चमधील शाळेची इमारत (१८५८) जुन्या भक्कम दगडी बांधकामातील आहे. प्रख्यात इंग्रज कादंबरीकार डॅन्यल डिफो (१६६०-१७३१) याच्या कादंबरीतील रॉबिन्सन क्रूसो ह्या नायकाचे गलबत फुटल्यामुळे तो ज्या निर्जन बेटावर पोहोचला, त्या बेटाची सु. चार हेक्टरांमधील प्रतिकृती सीडार नदीत बांधण्यात आलेली आहे. शहराच्या पश्चिमेस सु. ११ किमी.वर सीडार फॉल्स येथे उत्तर आयोबा विद्यापीठ (स्था. १८७६) आहे. शहरात ‘द नॅशनल डेअरी कॅटल काँग्रेस’ च्यावतीने प्रतिवर्षी ऑक्टोबर महिन्यात जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात येते. त्यामध्ये देशातील तसेच परदेशांतील विविध जातींच्या जनावरांचा समावेश असतो. महापौरनियुक्त परिषदेमार्फत शहराचा कारभार चालतो.
संकपाळ. ज. वा.