वाळूचे घड्याळ : मध्ययुगीन काळात यूरोपमध्ये प्रचारात असलेले वेळ दाखविण्याचे एक प्रमुख साधन, किंबहुना दिवसाची वेळ दाखविण्यापेक्षा ठराविक कालावधी संपला हे दाखविण्यासाठी याचा उपयोग होत असे. वाळूचे घड्याळया उपकरणात मोठ्या नासपतीच्या आकाराचे काचेचे दोन पोकळ गोळे असून त्यांपैकी एकात अगदी बारीक कोरडी वाळू किंवा रेती अर्धवट भरलेली असते. गोळ्यांची निमुळती टोके नळीसारखी पोकळी राखून एकमेकांस जोडलेली असतात. वाळू ऐवजी पाराही वापरता येत असला, तरी सामान्यपणे सहज उपलब्ध असणाऱ्या वाळूचाच उपयोग केला जातो. हे उपकरण एका लाकडी चौकटीत बसविलेले असते. वाळू असलेला गोळा वर करून उपकरण ठेवले म्हणजे वरच्या गोळ्यातील वाळू निमुळत्या नळीसदृश टोकाच्या पोकळीतून हळूहळू घरंगळत खालच्या गोळ्यात उतरते. वरच्या गोळ्यातील वाळू संपूर्ण संपण्यास एक तास लागत असेल, तर उपकरण तासाचा कालावधी दाखविणारे घड्याळ होते. अशी १५ सेकंदापासून ४ तासापर्यंत अवधी दाखविणारी निरनिराळी घड्याळे असतात. पोकळीची रुंदी व वाळूचे प्रमाण अशा रीतीने ठरविलेले असते की, तेवढ्या अवधीत सर्व वाळू खाली यावी. यातील मुख्य अडचण अशी की, तासाच्या घड्याळावर अर्धातास, पावतास असे तासाचे विभाग सहज मिळविता येत नाहीत आणि घड्याळ उलटून ठेवण्यासाठी माणसाची उपस्थिती आवश्यक असते.

पंधराव्या शतकापर्यंत यूरोपातील चर्चमधून वाळूच्या घड्याळांचा उपयोग होत असे. जहाजावरच्या घड्याळांची अचूकता तपासण्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या कामाचा कालावधी दाखविण्यासाठी, त्याचप्रमाणे ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये मतदानाचा कालावधी संपल्याचा क्षण समजण्यासाठी अशी उपकरणे वापरीत असत. टेलिफोन कॉलचा तीन मिनिटांचा कालावधी, अंडी उकळण्याचा ठराविक काळ, वक्त्याला दिलेल्या वेळेची अखेर वगैरे नक्की कळण्यासाठी वाळूच्या घड्याळांचा उपयोग होऊ शकतो. मात्र यांत्रिक व इलेक्ट्रॉनीय घड्याळे पुढे आल्याने वाळूची घड्याळे निरुपयोगी झाली आहेत.

फडके, ना. ह. नेने, य. रा.