वास्कारान : पेरू देशाच्या पश्चिम-मध्य भागातील आंकाश विभागात असलेला एक प्रसिद्ध निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत. तो नव्हादो वास्कारान म्हणूनही परिचित आहे. वारास शहर त्याच्या नैसर्गिक पार्श्वभूमीवर बसले असून तो लीमा शहराच्या उत्तरेस सु. ३२० किमी. वर अँडीज पर्वतातील कॉर्डिलोरा ब्लांका या रांगेत आहे. पेरू देशातील हे सर्वोच्च शिखर (सस. पासून उंची ६,७६८ मी.) असून ते गिर्यारोहणामुळे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. वास्कारान आणि त्याला लागून असलेली अँडीज पर्वतश्रेणीतील अन्य बर्फाच्छादित शिखरे यांनी वारास शहराला जणू नैसर्गिक तटबंदीच केली आहे, असे दृश्य दिसते. १९६२ मध्ये शिखराच्या उत्तरेकडील बर्फ वितळल्यामुळे कडा तुटला आणि उतारावरून जोराने हिमलोट खाली आले. त्यामुळे पायथ्याशी असलेली अनेक खेडी त्यात उद्ध्वस्त झाली व सु. ३,५०० माणसे मृत्युमुखी पडली. पुढे ३१ मे १९७० मध्ये या भागाला भूकंपाचा जबरदस्त तडाखा बसला आणि पुन्हा हिमलोट निर्माण झाले. त्यांत दहा खेडी, वारास शहराचा काही भाग व त्याच्या पश्चिमेकडील यूंगाय शहराचा फार मोठा भाग जमिनीखाली गाडला गेला. विसाव्या शतकातील ही एक मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जाते. तिच्यात सु. २०,००० लोक मरण पावले.

देशपांडे, सु. र