वासरमान (व्हासरमान), आउगुस्ट फोन : (२१ फेब्रुवारी १८६६ – १६ मार्च १९२५). जर्मन सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ. उपदंशाचे [गरमीचे ⟶ उपदंश] निदान करण्यासाठी उपयुक्त असलेली एक सार्वत्रिक परीक्षा त्यांनी शोधून काढली, म्हणून तिला वासरमान म्हणतात. या परीक्षेमुळे प्रतिरक्षाविज्ञानाची (रोगप्रतिकारक्षमताविज्ञानातील) मूलभूत तत्त्वे निदानासाठी वापरण्यास मदत झाली.
वासरमान यांचा जन्म वामबेर्क (बव्हेरिया) येथे झाला. त्यांचे शिक्षण एर्लांगेन, व्हिएन्ना, म्यूनिक व स्ट्रॅस्बर्ग विद्यापीठांत झाले. त्यांना रॉबर्ट कॉख व पॉल अर्लिक यांचे मार्गदर्शन लाभले होते. १८८८ साली वैद्यकाची पदवी मिळवून त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. १८८९ साली त्यांनी स्ट्रॅस्बर्ग विद्यापीठाची एम्. डी. पदवी संपादन केली. १८९० साली ते बर्लिन येथील संसर्गजन्य रोगविषयक रॉबर्ट कॉख संस्थेत साहाय्यक व १९०२ साली प्राध्यापक झाले. १९१३ साली ते बर्लिन-डालेम येथील कैसर व्हिल्हेल्म संस्थेच्या प्रायोगिक चिकित्सा विभागाचे संचालक झाले व मृत्यूपावेतो ते या पदावर होते.
सुरुवातीला त्यांनी पटकीविरोधी प्रतिकारक्षमता व धनुर्वाताविषयीचे प्रतिविष (उतारा) यांविषयी संशोधन केले. १९०६ साली आल्बेर्ट नाइसर यांच्या मदतीने त्यांनी उपदंशाच्या रोगकारक आदिजीवाचा (प्रोटोझोआचा) संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरात निर्माण होणाऱ्या प्रतिपिंडासाठीची [प्रतिकार करून शरीराचे रक्षण करण्यासाठी रक्तद्रवात-रक्तातील तांबड्या कोशिकांसारखे (पेशींसारखे) निलंबित (लोंबकळत असणारे) द्रव्य, फायब्रीन, फायब्रिनोजेन काढून टाकल्यावर मागे उरणाऱ्या नितळ पिवळसर द्रवात तयार होणाऱ्या प्रथिनासाठीची ⟶ प्रतिपिंड] परीक्षा विकसित केली म्हणजे हिच्यात रक्तरसातील प्रतिपिंडाद्वारे रोगाचे निदान करतात. उपदंशाव्यतिरिक्त इतर रोगांतही (उदा., कुष्ठरोग) ही परीक्षा होकारात्मक मिळू शकते. कान परीक्षा (आर्. एल्. कान या वैद्यांच्या नावावरून ओळखली जाणारी परीक्षा), व्हीडीआरएल (व्हेनेरिअल डिसीझेस रिसर्च लॅबोरेटरी) यांच्यासारख्या उपदंशाच्या सोप्या पद्धती आता निदानासाठी वापरतात. खात्रीलायक निदानासाठी इतर नैदानिक पद्धतींबरोबर वासरमान परीक्षाही वापरतात.
वासरमान यांनी क्षयाच्या निदानासाठीही एक परीक्षा शोधून काढली. शिवाय विषमज्वराविरुद्ध प्रतिकारक अंतःक्रामण, घटसर्पाविरुद्धचे प्रतिविष, रक्तगटांचे वर्गीकरण, कर्करोग इत्यादींविषयी त्यांनी अनुसंधान केले होते.
वासरमान व व्हिल्हेल्म कोले यांनी मिळून एक सहा खंडांचा ग्रंथ लिहिला होता (१९०३ – ०९), तसेच वासरमान यांनी अनेक ज्ञानपत्रिकांतून लेख लिहिले होते. ते बर्लिन येथे मृत्यू पावले.
भालेराव, य. त्र्यं.