वासवानी, साधु: (२५ नोव्हेंबर १८७९ – १६ जानेवारी १९६६). एक थोर समाजसेवक आणि सत्पुरुष. संपूर्ण नाव थांबरदास लीलाराम वासवानी. ‘दादाजी’ ह्या नावाने ते संबोधिले जात. त्यांचा जन्म आज पाकिस्तानात असलेल्या सिंध हैदराबादमध्ये एका धार्मिक आणि सत्त्वशील कुटुंबात झाला. वडील कालीमातेचे उपासक होते, तर आई वरनदेवी गुरु नानकांची भक्ती करीत असे. ह्या मातापित्यांनी त्यांच्या मनावर सदाचाराचे संस्कार केले. दादाजींचे प्राथमिक शिक्षण ‘बकसराय प्रायमरी स्कूल’ मध्ये व नंतर ‘नवलराय हिरानंद अकॅडमी’चे मुख्याध्यापक साधू हिरानंद हे एक संत आणि समाजसेवक होते. निःस्वार्थी जनसेवेचा आदर्श त्यांच्या रूपाने दादाजींच्या समोर राहिला. एक थोर क्रांतिकारक ब्रह्मबांधव उपाध्याय ह्यांच्याही संपर्कात ते विद्यार्थी म्हणून आले. ब्रह्मबांधवांनी त्यांना संस्कृत भाषा, उपनिषदे, तसेच येशू ख्रिस्ताची शिकवण ह्यांची ओळख करून दिली. एक बुद्धिमान विद्यार्थी म्हणून दादाजींचा लौकिक होता. मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या मॅट्रिकच्या परीक्षेत सिंध प्रांतातील सर्व विद्यार्थ्यात ते पहिले आले (१८९८). त्यांना मॅक्लिऑड शिष्यवृत्तीही मिळाली. पुढे बी. ए. च्या परीक्षेत इंग्रजीत सर्वप्रथम येऊन त्यांनी एलिस शिष्यवृत्ती मिळवली. एम्. ए. झाल्यानंतर कोणतीही नोकरी न करता ईश्वरभक्ती आणि मानवसेवा ह्यांत जीवन व्यतीत करण्याची त्यांची इच्छा होती. तथापि आईच्या आग्रहाला मान देऊन त्यांनी प्राध्यापकाची नोकरी पतकरली. लाहोरचे दयाळसिंग महाविद्यालय, पतियाळाचे महेंद्र महाविद्यालय इ. महाविद्यालयांचे प्राचार्यपदही त्यांनी भूषविले. त्यांच्या प्राध्यापकीय जीवनात गीता, उपनिषदे, संतबानी, गुरुबानी ह्यांचा त्यांनी अभ्यास केला तसेच एमर्सन, थोरो, गटे इ. पश्चिमी साहित्यिक आणि विचारवंत ह्यांच्या साहित्याचाही त्यांनी सखोल अभ्यास केला. भारतीय तत्त्वज्ञानच जगाला अखेरीस तारून नेईल, अशी त्यांची धारणा होती. वयाच्या तिसाव्या वर्षी बर्लिन येथे वेल्ट धर्मपरिषदेत त्यांना व्याख्यानाचे निमंत्रण आले. त्यानंतर भारतीय संस्कृती व परंपरा ह्यांचा प्रचार करीत त्यांनी भारतात आणि भारताबाहेरील अनेक देशांत प्रवास केला. सहानुभूती आणि सेवा ह्यांच्या पायावर उभ्या असलेल्या एका नव्या संस्कृतीची शिकवण देणारा महान देश म्हणून साऱ्या जगाने भारताकडे पाहावे, हे त्यांचे स्वप्न होते.
मातृनिधनानंतर, वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. महात्मा गांधीचा निकटचा सहवास त्यांना लाभला. पुढे त्यांनी ठिकठिकाणी युवकसंघ आणि युवा-आश्रम स्थापन करून तरुणांना विधायक कार्यासाठी संघटित करणे सुरू केले. डेहराडून येथील शक्ती आश्रम हा त्यांनी स्थापन केलेला प्रसिद्ध युवा-आश्रम होय. स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी ‘सखी सत्संग मंडळ’ स्थापन केले (१९३१).
त्याचप्रमाणे ‘संत मीरा शैक्षणिक चळवळ’ सुरू करून प्रथम मुलींसाठी शाळा व नंतर त्यांच्यासाठी महाविद्यालय काढले. मीरा शैक्षणिक चळवळीचे प्रमुख कार्यालय पुणे येथे आहे. पुण्याचे ‘सेंट मीराज कॉलेज फॉर गर्ल्स’ प्रसिद्ध आहे. ‘मीरा स्कूल’ व ‘साधू वासवानी स्कूल’ ह्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या शाळा दिल्ली, अहमदाबाद, बडोदे व मुंबई येथे आहेत.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानात गेलेल्या सिंध प्रांताचा निरोप घेऊन दादाजी पुण्यास आले (१९४८) आणि त्या शहराला आपली कर्मभूमी मानून राहू लागले. १९५० साली त्यांनी पुण्यास ‘ब्रदरहुड असोसिएशन’ ची स्थापना केली. आज हीच संस्था ‘साधू वासवानी मिशन’ म्हणून ओळखली जाते. ह्या मिशनच्या शाखा सर्व भारतभर, तसेच भारताबाहेर लंडन, न्यूयॉर्क, स्पेन, जाकार्ता, हाँगकाँग, पिनँग, लेगॅश इ. ठिकाणी विखुरलेल्या आहेत. दादाजींची भूमिका सर्वधर्मसमभावाची होती. मिशनतर्फे सर्व धर्मांतील साधुसंतांचे जन्मदिवस व पुण्यतिथ्या साजऱ्या होतात.
मिशनतर्फे आध्यात्मविषयक चर्चा, भजने, प्रवचने इ. कार्यक्रम होत असतात. गरीब कुटुंबांना मदत, खेडी दत्तक घेणे, दुष्काळग्रस्त भागांत विहिरी खोदणे ह्यांसारखी कामेही केली जातात. संस्थेने अद्ययावत इस्पितळही बांधले आहे. तीन धर्मादाय दवाखाने आणि एक रोगनिदान केंद्रही चालविले जाते. इंग्रजी, मराठी, हिंदी, सिंधी अशा विविध भाषांतून मिशनची नियतकालिके व पुस्तके निघतात. संस्थेने त्यासाठी एक प्रकाशनसंस्थाही काढली आहे. २५ नोव्हेंबर हा दादाजींचा जन्मदिवस जागतिक शाकाहार दिन म्हणून पाळला जातो.
स्वतः दादाजींना सिंधी आणि इंग्रजी ह्या भाषांत अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या काही पुस्तकांचे भारतीय भाषांत अनुवाद झाले आहेत. दादजी वेळोवेळी गात असलेल्या सिंधी भक्तिगीतांचा एक संग्रह-नूरीग्रंथ-त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध करण्यात आला (१९७६). ‘नूरी’ हे टोपणनाव त्यांनी काव्यलेखनासाठी घेतले होते. मानव हा जीवनयात्री असून केवळ ईश्वर हाच आपला आहे, ही श्रद्धा मनात वागवीत माणसाने आपली कर्तव्ये पार पाडावी, आयुष्य साधेपणाने मानवसेवेत घालवावे, गरिबांची सेवा हीच परमेश्वराची पूजा असे दादाजींचे विचार होते. पुणे येथे ते निधन पावले. पुणे येथे साधू वासवानी मिशनच्या आवारात त्यांची समाधी आहे.
दादाजींच्या नव्वदाव्या वाढदिवशी, त्यांच्या स्मरणार्थ, भारतीय टपाल खात्याने एक खास तिकीट छापले होते. १९७९ साली, त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारत सरकारच्या फिल्म प्रभागाने त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारा एक माहितीपट तयार केला होता. पुणे महनगरपालिकेने त्यांचा भव्य पुतळा उभारला होता.
रत्नपारखी, आशा
“