हीनयान पंथ : एक बौद्ध संप्रदाय. गौतमबुद्धाचे महानिर्वाणइ. स. पू. ५४३ (पाश्चिमात्यांच्या मते इ. स. पू. ४८३) ह्या वर्षीझाले, असे आशियातील दक्षिण देशांतील बौद्धांचे मत आहे. पाली वाङ्मयात बौद्ध संघाचे अठरा पंथ निर्माण झाले, असे म्हटले आहे. ह्यांतील बारा पंथ पुराणमतवादी स्थविर (पाली-थेर) संघातूनझाले, तर नवीन मताचे सहा पंथ होते. खुद्द बुद्धाच्या हयातीतच त्याचा चुलतभाऊ ‘देवदत्त’ ह्यानेच भिन्न मते प्रस्थापित केली. तसेच षड्वर्गिक भिक्षू व भिक्षुणी ह्यांनीही विरुद्धगतीच दाखविली. बुद्धाच्या महानिर्वाणानंतर भरलेल्या पहिल्या धर्म-संगीतीत मतभिन्नता दिसली. ‘पुराण’ व ‘गवांपति’ ह्यांनी राजगीरच्या पहिल्या संगीतीला मान्यता दिली नाही. बुद्धाच्या कडक नीतिनियमांना कंटाळून लोक त्यांतून सुटण्याचाप्रयत्न करू लागले. बुद्धाच्या पुढे शंभर वर्षांनी वैशाली येथील द्वितीय संगीतीच्या वेळी उघड उघड फूट पडली व त्यातून महासंघिक नावाचा पक्ष स्थापन झाला. ह्याच पक्षातून पुढे ⇨ महायान पंथ अस्तित्वात आला. 

 

पुराणमतवादी स्थविरवाद्यांच्या मते बुद्ध हा मनुष्यलोकांत उत्पन्न झालेला असून तो आपल्या मिळविलेल्या गुणसंपत्तीने ‘बुद्ध’ होऊन लोकांतअग्रगण्य मानला गेला. त्यांच्या निकाय या ग्रंथात त्याचे माणुसकीचे गुण दिसतात. मज्झिमनिकाया तील ‘चातुमसुत्ता’ त (अनुक्रम ६७) तो भिक्षूंच्या गोंधळलेल्या भांडणाचा उल्लेख बाजारातील मच्छीमार लोकांच्या हमरी--तुमरीशी करून त्वेषाने त्यांना निघून जाण्यास सांगतो. ‘सेख सुत्ता’ त( मज्झिमनिकाय अनुक्रम ५३) तो आपल्या ताठलेल्या पाठीचे वर्णन करून त्यास क्लेश होत आहेत, असे सांगतो. 

 

‘महा-परिनिब्बाण सुत्ता’ त (दीघनिकाय.१६ वे सुत्त) तो आपल्या देहाचे विजीर्ण झालेल्या खटाऱ्यासारखे वर्णन करून ‘चुन्द’ नावाच्या गृहस्थाला अंगवस्त्राच्या चौघडी टाकून त्यांत पडून विश्रांती घ्यावी असे म्हणतो. ‘उपालिसुत्ता’ त (म.नि ५६ वे सुत्त) उपालीला आपल्या पूर्वीच्या निगण्ठ शिकवणीची आठवण देऊन, त्यांना भक्तिभावाने दिलेल्या पाहुणचाराचे स्मरण देऊन विचारपूर्वक बुद्धाचे उपासकत्व पतकरावे, असे सांगतो. अंगुत्तरातील (‘तिकनिपात सुत्त’ ४७) ‘केसमुत्ति’ सुत्तात सांगतो, की दुसऱ्या कोणत्याही मुद्द्याचा विचार न करता बुद्धाने सांगितलेले मुद्दे समर्थनीय आहेत, ह्या मुख्य तत्त्वावर त्याचे उपासकत्व पतकरावे कारण बुद्धाचे मुद्दे खरे आहेत ही तपासणी करूनच त्यावर विश्वास ठेवावा (म. नि. १४७ सुत्त) . महायानिकांच्या तत्त्वसंग्रहां तदेखील असे म्हटले आहे

 

तपात् छेदात्च निकषांत सुवर्णमिव पण्डितैः । 

परीक्ष्य भिक्षवो ग्राह्यं मद्वचो न तु गौरवात् (३५८८, द्वारकादासशास्त्रींच्या ग्रंथात ३५८७). 

 

“ज्याप्रमाणे शहाणे लोक तापवून, कापून, कसोटीवर घासून सोन्याची परीक्षा करतात, त्याप्रमाणे माझ्या व्यक्तित्वाबद्दल आदर मनात न बाळगता माझ्या वचनांची परीक्षा करावी आणि नंतरच त्यांचा स्वीकार करावा.”ह्या सर्व गोष्टींवरून बुद्धाचे महत्त्व व समंजसता पटते. 

 

याउलट, महासंघिकांना असे वाटत असे की, बुद्ध हा दैवभूत प्राणी असून त्याच्यात अनेक दैवी चमत्कार करण्याची पात्रता असून तो नेहमीच अनेक देव-देवता, यक्ष-गंधर्व ह्यांच्याकडून पूजिला जातो. ह्या महासंघिकाचे रूपांतर महायानात झाले. दुसरा पक्ष गौण म्हणून त्यांना तुच्छतापूर्वक ‘हीनयान’ म्हणू लागले. दक्षिण आशियातील लोकांना हे नाव कमीपणाचे वाटते म्हणून त्यांना ‘श्रावकयान’ पंथीय म्हणणेच इष्ट आहे. श्रावकयानी परदेशांत म्हणजे श्रीलंका किंवा ब्रह्मदेशात गेल्यानंतर भारतात राहिलेला सर्वास्तिवाद पंथ जोरात आला व त्याने संस्कृत भाषेचा उपयोग केला. 

 

सर्वास्तिवादातून वैभाषिक आणि सौत्रांतिक असे दोन संप्रदाय निर्माण झाले. वैभाषिकांचा भर जुन्या ग्रंथावरील ‘विभाषा ‘वर होता, तर सौत्रांतिकांचा मूळ ग्रंथांवर होता. या पंथाचा विकास महायानांचे प्रतिस्पर्धी या रूपात झाला. विख्यात बौद्धपंडित ⇨ वसुबंधू याने काश्मीरच्या विभाषावर ⇨ अभिधर्मकोश हा ग्रंथ लिहिला. मधूनमधून तो सौत्रांतिकांचेही समर्थन करीत असे. ह्याच अभिधर्मकोशाची व्याख्या यशोमित्राने स्फुटार्था अभिधर्मकोशव्याख्या या नावाने पुढे लिहिली. ह्या सर्वास्तिवादीचा प्रभाव वायव्य प्रांत, काश्मीर, अफगाणिस्तान व आशियाचा काही प्रदेश यांत होता. प्राकृत धम्मपद, अर्थपदसूत्र पाली निकायाला अनुसरून दीर्घागम, मध्यमागम, संयुक्तागम व एकोत्तरागम असे ग्रंथ होते. सौगांतिक व वैभाषिक ह्यांच्यासंबंधी बरीच माहिती अभिधर्मदीप या ग्रंथातूनही प्राप्त होते.मध्य आशियात खोतान (गोदान) हे एक मोठे बुद्धक्षेत्र होते. हळूहळू ह्या भागातही महायानांचे प्राबल्य वाढले. 

 

दक्षिण आशियातील श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड, कंबोडिया आणि लाओस ह्या देशांत पाली भाषेचे समर्थक थेरवादी प्रबल झाले. ह्यादेशांतही पुढे टीका, व्याकरणग्रंथ वगैरे लिहून आपापले ग्रंथ विद्वानांनी प्रसिद्ध केले. 

 

पहा : पाली साहित्य बौद्ध दर्शन बौद्ध धर्म बौद्ध धर्मपंथ. 

बापट, पु. वि.