वावळा : (हिं. बंचिला, कांजू, पापरी क. तापसी, रसबीज सं. चिरबिल्व इं. इंडियन एल्म लॅ. होलोप्टेलिया इंटेग्रिफोलिया कुल उल्मेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] हा मोठा पानझडी वृक्ष श्रीलंका, म्यानमार (ब्रह्मदेश), व्हिएटनाम येथे व भारतात सर्वत्र (जम्मू ते अवधच्या दरम्यान ६,००० मी. पर्यंतच्या डोंगरांच्या रांगा, आसाम, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, कोकण, बेळगाव इ. भागांत) पानझडी जंगलात आढळतो. याची उंची १५ – १८ मी. व घेर १.५-– ३.५ मी. असतो. साल करडी, खवलेदार व ताजी असता दुर्गंधीयुक्त असते. पाने ७.५ – १२.५ X ४.५ सेंमी., साधी अंडाकृती व चिवट असून चुरगळल्यास दुर्गंध येतो. फुलोरा झुबकेदार, अकुंठित [⟶ पुष्पबंध] असून त्यावर पुं-पुष्पे व द्विलिंगी पुष्पे फेब्रुवारी-मार्चमध्ये सरमिसळ येतात. फुलात परिदले केसाळ व ४ – ८ केसरदले ५ – ९ किंजले २ व किंजपुट चापट असून [⟶ फूल] फळ चापट, वाटोळे (व्यास २.५ सेंमी.) व सपक्ष (पंखयुक्त) बी चपटे व अपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांशरहित) असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨र्टिकेसी कुलात अथवा वावल कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. लाकूड कठीण, पिवळट करडे, हलके व मजबूत असून ते घरबांधणी, शेतीची अवजारे, गाड्या, आगकाड्या, ब्रशांच्या पाठी वगैरेंकरिता व जळणास उपयुक्त असते. पाने गुरांना चारतात. सालीचा काढा संधिवाताने आलेल्या सुजेवर लावतात.

ज्ञानसागर, वि. रा.